व्यंकटनाथ महाराजांनी मला गुरु कार्य सोपवण्यापूर्वी पंथाचे कार्य करण्याचा अधिकार द्यावा किंवा नाही यासाठी एक विशेष घटना घडली. समाधीपूर्वी व्यंकटनाथ महाराज म्हणाले होते की पंथाचे कार्य करण्याची संधी स्वामी म्हणजे भगवान दत्तात्रेय परीक्षा घेतल्या शिवाय कोणालाही देत नाहीत. एक दिवस जगन्माता रेणुका देवी ह्या व्यंकटनाथ महाराजांच्या पुढे प्रगट झाल्या आणि पुढच्या पंथकार्याच्या दृष्टीने महाराजांशी विचारविनिमय केला. त्यावर महाराज त्यांना म्हणाले की आमचे दोन शिष्य आहेत, त्यांचा आपण विचार करून त्यांची परीक्षा घेऊन निर्णय घ्यावा. त्यावर जगन्मातेने व्यंकटनाथ महाराजांना म्हंटले की माझ्या पायावर हात ठेव आणि म्हण की मी नरेंद्रला सावध करणार नाही किंवा परीक्षेच्या दृष्टीने मदत करणार नाही. आम्ही त्याची परीक्षा घेऊ. परीक्षा कोण घेणार, केव्हा घेणार, कशी घेणार हे तुला आत्ता सांगत नाही. ते तुला वेळेवरच कळेल.
नाथपंथाचे कार्य सोपवण्यापूर्वी पंथाचे स्वामी भगवान दत्तात्रेय किंवा जगन्माता रेणुका देवी ह्या स्वतः परीक्षा घेऊन गुरूंना पुढची कार्यपद्धती ठरवण्यास सांगतात. पंथकार्य सोपवण्यापूर्वी झालेल्या या परीक्षेचे वर्णन येथे करीत आहोत. यावरून पंथकार्याची धुरा कशी सोपवली जाते व यामध्ये कोण कोण लक्ष घालतो, परीक्षा कशी घेतात आणि त्या परीक्षेतून त्या व्यक्तीचे परिक्षण कसे होते हे समजते.
अध्यात्मिक दृष्टीने कार्य करण्यासाठी एखादी व्यक्ती तयार आहे किंवा नाही हे त्यांनी नरेंद्रच्या बाबतीत कसे पाहिले याचे वर्णन येथे करीत आहे. अध्यात्माला बुद्धीची ज्ञानाची आवश्यकता राहत नाही. ज्ञान गुरु कोणत्याही क्षणी कोणाला क्षणार्धात देऊ शकतात. परंतु ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी लागणाऱ्या चित्त, वृत्ती, प्रवृत्ती आणि कर्मसाधनेला महत्व आहे. बौद्धिक ज्ञानाला विशेष महत्त्व राहत नाही. अंतःकरणाची भाषा अंतःकरणाने जाणणे महत्वाचे आहे.
महाराजांच्या सहवासात आल्यापासून १६ वर्षे महाराज सतत मला घडविण्याचा, वळविण्याचा, माझ्या चित्तवृत्तीत बदल घडविण्याचा प्रयत्न करीत होते. ते नेहमीच म्हणायचे की “बाळ, आम्ही हतात दगड घेतो व तो घडविण्याचा सतत प्रयत्न करतो. त्याला टाकीचे घाव घालतो. दगडाला ते घाव तर सहन करावेच लागतात, त्याशिवाय तो घडत नाही व वंदनीय होऊन देव घडत नाही.” जर दगड हातातून निसटला, खाली पडला वा भंगला तर ते आमचे नशीब समजून दुसरा दगड हाती घेतो व तो घडविण्याचे कार्य करतो. हाच आमचा उद्योग आहे.
महाराजांच्या सहवासात आलो त्या वेळच्या आणि आताच्या चित्तवृत्ती, प्रवृत्ती, विचारसरणी, दैनंदिन व्यवहारात खूपच फरक पडला होता.
एकदा आईसाहेब (रेणुका देवी) महाराजांकडे आल्या असताना त्यांनी महाराजांना शिष्यगणांविषयी विचारले. महाराजांनी त्यांना दोन व्यक्तींबद्दल विश्वास वाटतो असे सांगितले. “हे दोघे सोडले तर इतर कुणी कामाचे नाही” असे १९७२ साली त्यांनी मला सांगितले होते.
मी महाराजांना विचारले: “यापूर्वी त्यांनी काही शिष्यांची परीक्षा घेतली आहे काय? आणि त्याचे काय झाले?” ते म्हणाले: “यापूर्वी तिघांची परीक्षा घेतली — अण्णासाहेब कोलते नागपूर, नानासाहेब उंटवाले अकोला व श्री कुलकर्णी जळगाव. पण ते तिघेही नापास झाले.”
महाराज पुढे म्हणाले: “आता ह्या दोघांपैकी एक तरी निश्चित पास होईल. लीला जोशी नागपूर व नरेंद्र चौधरी अकोला.”
मी विचारले, “परीक्षा कोण घेणार? केव्हा? कशी?” ते म्हणाले: “आईसाहेब किंवा स्वारी (भगवान दत्तात्रेय) घेतील. जागेपणी घेतली तर सोपी, पण निद्रिस्त अवस्थेतील परीक्षा अत्यंत कठीण.”
त्यांनी सांगितलेले सर्व ऐकूनही नंतर मला त्या गोष्टींचा विसर पडला.
एक दिवस पहाटे मला स्वप्न पडले.
एक पांढरी दाढी असलेले सत्पुरुष, गुडघ्यापर्यंत पांढरे धोतर, हातात कमंडलू व त्रिशूळ. ते शेजारील घरी गेले होते. त्यांनी आन्हिक केले, तीर्थ दिले आणि म्हणाले: “नरेंद्रला बोलावून आण, त्याला आम्ही तीर्थ द्यायचे आहे.”
मी त्यांना नमस्कार करून म्हणालो: “मला तुमचे तीर्थ नको. तुम्ही अशुद्ध व अपवित्र आहात. समाजात दिशाभूल करणारे अनेक भगवे लोक आहेत व तुम्ही काही करत नाही.”
ते म्हणाले: “आम्ही अशुद्ध आहोत हे तू कसे म्हणतोस?”
मी ठाम राहिलो. ते म्हणाले: “तू आम्हाला ओळखले तरी काय?”
मी म्हणालो: “नाथपंथाचे आराध्य, पंथाचे स्वामी, शिरसावंद्य, ज्ञानसागर — भगवान दत्तात्रेय — आपणच आहात.”
मी पुढे म्हणालो: “माझ्या दृष्टीने तुम्ही अशुद्ध व अपवित्र आहात. शुद्ध व्हायचे असेल तर स्वर्गातील पाण्याने आंघोळ करा.”
ते म्हणाले: “स्वर्ग कोठे आहे?”
मी म्हणालो: “देवगाव रंगारी — माझ्या गुरूंचे निजस्थान.”
ते म्हणाले: “तू पाणी आण, मी आंघोळ करीन.”
मी लगेच गंगाळ व बादल्या भरून देवगावचे पाणी आणले आणि त्यांना आंघोळ घातली.
त्यांनी आनंदाने माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आणि अदृश्य झाले.
जाग आल्यानंतरही गळ्यात माळ असल्याचा भास होत होता पण प्रत्यक्ष नव्हती.
तेव्हाच एक पोस्टमन आंतरदेशीय पत्र घेऊन आला. पाठवणारा — “देवगाव रंगारी”. फाटकाबाहेर कोणी नव्हते. पोस्टमन कधीच त्या वेळेला येत नसे.
पत्रात माझ्या स्वप्नातील संपूर्ण प्रसंग स्वतः महाराजांनी लिहिला होता. त्या पत्रात लिहिले होते:
“स्वारींनी सर्व वृत्तांत सांगितला. तू जसा गोरखनाथांनी स्वारींशी वाद केला तसेच केलेस. ते तुझ्यावर पूर्ण प्रसन्न झाले. तुला दिलेली माळ आमच्याकडे ठेवली आहे. योग्य वेळ आल्यावर देऊ.”
१२-०९-१९७१ रोजी मी देवगावला गेलो असता महाराज म्हणाले:
“येथून पुढे घेतलेले पाऊल मागे घेण्याची वेळ येणार नाही. एकनिष्ठ सेवा केल्यास कशाचीच भीती राहत नाही. नाथपंथाचे कार्य म्हणजे गुरुचे गुणगान — गुरुगाथा.”
महाराज पुढे म्हणाले:
“तू चालला तर मी चाललो, तू बोलला तर मी बोललो. जे तू केलं ते मी केलं. मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मी. दोघेही एकच आहोत.”
ज्यांनी माझ्यात हे स्थित्यंतर घडवले, वेद-धर्मज्ञानाची ओढ लावली, मंत्र-तंत्र-उपासनेची दिशा दिली आणि अखेरीस भगवान दत्तात्रेयांची सदेह भेट घडवून दिली — त्या माझ्या सदद्गुरू व्यंकटनाथ महाराजांच्या चरणी माझे सर्वस्व.