अनुक्रमणिका

माहूरगडच्या हवनाला देवीचे वरदान

नाथ पंथाचे नियंत्रक प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय आहेत. त्यांच्याच प्रेरणेनी व आशीर्वादानी नाथपंथातील सर्व कार्य होत असत. ते सर्वांना दिशा देतात. कार्यप्रवृत्त करतात. कार्याच निमित्त करतात. त्याचे समोर अडचणीही निर्माण करतात. प्रश्नांची मालिका उभी करतात. आणि अखेरीस तेच अडचणीही दूर करतात व कठीण वाटणार्‍या प्रश्नांची उत्तर सहज वाटावी एवढी सोपी करतात. यात स्वारींसोबत (श्री दत्त) श्री आईसाहेबही (श्री रेणुका देवी) असतात.

सदा सर्वदा देव सन्निध आहे। कृपाळू पणे अल्प धारिष्ट्य पाहे। समर्थांनी मनोबोधात कार्यकर्त्याला संबोधुन या ओळी लिहिल्या आहेत. त्याचे हे अल्प धारिष्ट्य ही कार्यकर्त्याची स्वल्प परीक्षाच असते. तोच परीक्षा घेतो अन् उत्तर सांगतो. आई लेकराला चालायला शिकवते तशी श्री दत्त गुरु माऊली लेकराला चालायला शिकवते. अन् त्याचा तोल जाऊन तो पडणार इतक्यात कडेवर उचलुन घेते. ही प्रस्तावना करण्याचे कारण असे की, असाच रोकडा अनुभव नाथशक्तिपीठा तर्फे माहुर गडावरील अनुष्ठान केले त्या वेळी सर्वांना आला.

-

नरेंद्रनाथ महाराजांना माहूरगडावर आलेली देवीची आज्ञा

नाथशक्तिपीठाधीश प. पू. श्री सद्गुरु श्री नरेंद्रनाथ महाराज गेल्या महिन्यात माहुरगडी श्री रेणुका आईचे दर्शनास गेले होते. त्या वेळी मातृतीर्था जवळील श्री विष्णूकवींच्या मठामध्ये ते दर्शनास गेले. हा संतकवी श्री विष्णूकवींचा मठ श्री सरस्वतीचे जागृत स्थान आहे. बासर येथे संतकवींना श्री सरस्वतीने सांगितले की तू माहुरला जा. तिथे मी तूझ्या जिभेवर वास करील. त्या प्रभावे तू तिथे श्री रेणुकेची स्तुती गाशील. तो हा मठ. माहुरला श्री महाकाली, श्री महासरस्वती, श्री रेणुका या जगज्जननी वास करतात. या ठिकाणी नाथपंथाचे अनुष्ठान करावे असे त्यांचे मनात आले. सद्गुरु व्यंकटनाथ महाराजांनी आज्ञा केल्यानंतर नरेंद्रनाथ महाराजांनी 1993 सालापासून नाथ पंथाच्या अनुष्ठानाला सुरुवात केली आज या प्रकारच्या अनुष्ठानाला 29 वर्षे पूर्ण होत आहेत. असे अनुष्ठान त्यांनी भारतभर अनेक ठिकाणी केले — विशेष म्हणजे अत्री अनुसया, हिमालय, कुरवपूर, जगन्नाथ पुरी इत्यादी. या अनुष्ठानाची विशेष सिद्धता त्या त्या ठिकाणच्या व्यवस्थापकांना आलेली आहे.

-

माहूरगडावरील दशदिवसीय अनुष्ठानाची योजना

त्याच प्रमाणे माहूर गडावर अशाच प्रकारचे अनुष्ठान करावे असे नरेंद्रनाथ महाराजांच्या मनात आल्यावर त्यांनी दि. ११ फेब्रु. २०२२ ते २०-०२-२०२२ या कालावधीत कुलस्वामिनी रेणुका मातेच्या सानिध्यात श्री देवी पंचायतन याग करण्याची योजना केली. या निमित्ताने — श्री शतचंडी, श्री शाबरीदेवी कवच, श्री हनुमान कवच, महिम्न, पुरूषसूक्त, श्री अथर्वशीर्ष, सूर्य नारायणाची सौरी, रूद्र यांचे संख्यात्मक अनुष्ठान श्री विष्णूकवींच्या मठात करण्याचे ठरले. या अनुष्ठानाचे दशांश हवन व नाथपंथाचे हवन दि. १८/१९/२० फेब्रुवारी रोजी करावे असे निश्चित झाले.

-

प्रकृतीचा अडथळा आणि दैवी कृपेने मिळालेली शक्ती

माहूरला निघण्याचे काही दिवस अगोदर श्री नरेंद्रनाथ महाराजांची प्रकृतीस अचानक त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी एक आठवडा आराम आवश्यक असल्याचे सांगितले. वय 85 असल्यामुळे काळजी गरजेची होती. त्यामुळे अनुष्ठान हवन होऊ शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु श्री महाराजांचा निश्चय ठाम — मस्तकी पडोत दुःखाचे डोंगर। सुखाचे माहेर सोडू नये। “कार्य श्री सद्गुरु व्यंकटनाथांचे आहे. तेच करवून घेतील. मी निमित्तमात्र आहे. मी माहूरला जाणारच!”

या निश्चयाचे फळ — त्यांची प्रकृती फक्त दोन दिवसात चमत्कारिकरीत्या सुधारली आणि डॉक्टरांनी प्रवास व गड चढण्याचीही परवानगी दिली. माहूरला निघण्यापूर्वी दोन महत्वाच्या कार्यकर्त्यांनाही प्रकृतीचा त्रास झाला, परंतु गुरुकृपेने सर्व अडथळे दूर झाले.

-

अनुष्ठानाची सुरुवात आणि तीन ऋतूंचा अनुभव

ठरल्याप्रमाणे अनुष्ठानाला प्रारंभ झाला. अनुष्ठान सुरू झाल्यावर श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणाले की तीनही ऋतुंचा अनुभव सर्वांना येईल. आणि खरोखरच — सुरुवातीला कडक थंडी, नंतर दोन-तीन दिवस तप्त उन्ह, आणि शेवटचे दोन दिवस पाऊस — असा अनुभव माहूरने घेतला.

-

दैनंदिन कार्यक्रम व महासत्तांची उपस्थिती

श्री नरेंद्रनाथांनी दैनंदिन कार्यक्रम आखला — - सकाळी ६ : काकडा - सकाळी ७ : अनुष्ठान प्रारंभ - दुपारी १२ : श्री रेणुका–श्री व्यंकटनाथ नैवेद्य व भोजन प्रसाद - दुपारी ३–६ : अनुष्ठान - सायं ७–९ : सांप्रदायिक भजन

श्री नरेंद्रनाथ महाराज स्वतः पहाटे चारला उठून साधनेला बसत, रात्री साडेअकरा वाजता झोपत. त्यांनी सांगितले की सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या सर्व कार्यक्रमाकडे — भगवान दत्तात्रेय, श्री रेणुका माता, भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान ब्रह्मदेव, श्री समर्थ माधवनाथ महाराज, व्यंकटनाथ महाराज, विघ्नहर्ता गणराया, नवनाथ — या सर्वांचा माहूर गडावर दरबार भरला आहे आणि ते प्रत्यक्ष कार्यक्रम पाहत आहेत. ही प्रचिती सर्वांना आली.

-

नैवेद्य सेवा आणि देवीची कृपा

नैवेद्य नेणाऱ्या कार्यकर्त्यांनी विचारले की पूर्णाहुतीच्या दिवशी नैवेद्य दाखविता येईल काय. विश्वस्त म्हणाले — “एकच दिवस का बरं, तीनही दिवस करा!” महाराज म्हणाले — “केवळ नैवेद्य नको; तीन महावस्त्र, मुखवट्यासाठी शेंदूर, हळद-कुंकू, डोळ्यासाठी काजळही द्या.” ही सेवा प्रत्येकाने आनंदाने स्वीकारली.

-

देवीसमोरील हवनाची अप्रतीम संधी

अनुष्ठानाचा भाग पूर्ण होताच नरेंद्रनाथ महाराज म्हणाले — “श्री रेणुकेच्या चरणाशी अनुष्ठान झाले. आता तिची इच्छा असेल तर हवन तिच्या समोर करण्याची संधी ती देईल.” नाथशक्तिपीठाचा संकल्प नेहमी जनकल्याणाचा आहे. हे अनुष्ठान विश्वशांती, पर्यावरण समतोल, सज्जन शक्तीला बळ देणे यासाठी आहे. देवीसमोर हवन होणे म्हणजे श्री रेणुका आईचा आशीर्वाद आहे. श्री नरेंद्रनाथांचे म्हणणे म्हणजे श्री रेणुका आणि श्री व्यंकटनाथांचीच इच्छा असा कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास. सर्व जण कामाला लागले. श्री रेणुकेने प्रारंभी अल्प धारिष्ट्य पाहिले; पण नंतर भरभरून कृपा केली. आजपासून श्री रेणुकेसमोर हवनाला प्रारंभ होत आहे.

आपल्या सद्गुरूंच्या आनंदाचे कारण व निमित्त होण — या परता अधिक भाग्याचा क्षण दुसरा कोणता असेल बरे!