अचाट यौगिक क्रिया

श्रीसमर्थ योगाभ्यानद व्यंकटनाथ महाराजांनी आपल्या कार्यकाळात म्हणजे १९३६ ते १९९३ च्या काळांत अकोल्याच्या भक्ताला दिलेला प्रसाद पंथाच्या अशाच सिध्दतेची साक्ष देतो. दर्शनार्थी आलेल्या जोडप्याला मूल-बाळ होत नव्हते आणि होणारही नव्हते. डॉक्टरांच्या अनेकविध तपासणीतून हे लक्षांत आले होते की त्या स्त्रीला जन्मतःच गर्भाशय नसल्यामुळे या जन्मात गर्भधारणा होणे शक्य नाही.

परंतु नाथमहाराजांचा निर्णय— त्यांनी त्या महिलेला विभूती लावून नारळ दिला आणि “दोन वर्षात पाळणा हललेलाच” असे सांगितले. दोन वर्षाची मुदत का असे विचारल्यावर ते म्हणाले— “जो भाग शरीरात जन्मतः यायला हवा तो आला नाही; तो निर्माण करून त्याची योग्य ती वाढ झाल्यावरच पुढचा भाग घडेल.”

आणि खरोखरीच ते घडले. दोन वर्षानंतर तिला मुलगी झाली. एवढेच नाही तर नंतर तिला एक मुलगा देखील झाला. हीच तर या पंथाची विशेषता—जे विज्ञानाला शक्य नाही ते नाथ महाराजांनी सहज करून दाखविले.

नाथपंथ आजही आपल्या सिद्धतेने कार्यरत आहे; नाथपंथियांशी आपला संपर्क आला नाही म्हणून हे कळत नाही.


मच्छिंद्रनाथांनी गोरक्षास गुरू उपदेश केला व नाथपंथाची दीक्षा दिली. पुढे त्याला आपल्या बरोबर घेऊन यात्रेस निघाले. अयोनी संबंधातून हाडामासाचा १२ वर्षे वाढ झालेला मुलगा उकिर्ड्यातून सर्वांसमोर बाहेर येतो — केवळ मंत्रून दिलेल्या विभूतीतून ही घटना घडली. प्रचलित विज्ञानाला हे अशक्य.

म्हणे महाराजा योगद्रुमा | सांडिला ठाव दावित्यें तुम्हां | पुढें चाले मागें उगमा | नाथ जातसे सवें सवें ॥ 69॥

तंव तो उकिरडाकेर उद्दाम | गोवर पडिला पर्वतासमान | तेंथे जाऊनि सुमधुम | नाथाप्रती सांगतसे ॥70॥

हे महाराजा तपोजेठी | येथें सांडिली भस्मचिमुटी | ऐसें ऐकोनि नाथ होटीं | हांक मारी बालकातें ॥71॥

हे हरिनारायण प्रतापवंता | मित्रवर्या सूर्यसुता | जरी अससील या गोंवरांत | नीघ त्वरित या समयीं ॥72॥

या गोंवरगिरींत नरदेहजन्म | मिरवला असे तूतें उत्तम | तरी गोरक्ष ऐसें तूतें नाम | सुढाळपणीं मज वाटे ॥73॥

द्वादश वर्षेंपर्यंत बैसलासी गोंवररक्षणांत | म्हणूनि गोरक्षक नाम तूतें | पाचारितों स्वच्छंदें ॥74॥

तरी आतां न लावीं उशीर | हे गोरक्षनाथा निघें बाहेर | ऐसें वदतां नाथ मच्छिंद्र | बाळशब्द उदेला ॥75॥

म्हणे महाराजा गुरुवर्या | गोरक्ष असें मी या ठाया | परी गोवरनगानें गुंफित काया | भार मौळीं विराजला ॥76॥

तेणेंकरूनि शरीरवेष्टण | झालें आहे दडपण | तरी गौरयातें विदारून | बाहेर काढीं महाराजा ॥77॥

ऐसें ऐकूनि बाळउत्तर | लौकरी आणूनि लोहपत्र | मही विदारूनि नगगौर | बाळतनू काढिली ॥78॥

काढिली परी ती तनुलता | बालार्ककिरणीं दिसे समता | कीं धनमांदुसी विद्युल्लता | चमक दावी आगळी ॥79॥

कीं पूर्ण चंद्रप्रकाश पौर्णिमेचा | दिशा उजळे समयीं निशीच्या | तेवीं तनुगर्भ मदनाचा | जनामाजी मिरवला ॥80॥

कीं दुसरा ईश तो चक्रधर | त्यजोनि आतां मूर्तिसार | वीट मानूनि क्षीरसागर | म्हणूनि येथें आला असे ॥81॥

तेथून ते उभयता जगन्नाथपुरीकडे जाण्यास निघाले. वाटेत त्यांना कनकगिरी गाव लागले. नुकताच जन्मलेला गोरक्ष—म्हणजे १२ वर्षे वयाच्या गोरक्षाची परीक्षा घेण्याचा विचार मच्छिंद्रनाथांच्या मनात आला.

ते म्हणाले—“बाळ गोरक्षा, मला भूख लागली आहे; तू गावात जाऊन भिक्षा मागून आण.”

गोरक्ष एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या घरी श्राद्ध होते. ‘अलख’ उच्चारताच स्त्री बाहेर आली. गोरक्षाचे तेजस्वी रूप पाहून तिने ताटभर सर्व प्रकारचे अन्न दिले.

गोरक्षाने ते गुरूकडे आणले. गुरूंनी जेवण केले. त्यांनी वडे चाखून गोरक्षाला म्हणाले—“बाळ, वडे खूप चांगले झाले आहेत; अजून घेऊन ये.”

गोरक्ष पुन्हा त्या घरी गेला. यावेळी ती बाई साशंक झाली आणि “तुझा डोळा देशील तर वडे देईन” असे म्हणाली. गोरक्षाने क्षणात आपला डोळा काढून तिच्या हातावर ठेवला.

हे पाहून ती बाई थरथरली, क्षमा मागितली, आणि भिक्षा दिली.

गोरक्षाने डोळा लपवण्याचा प्रयत्न केला तरी गुरूंच्या नजरेतून सुटले नाही. मच्छिंद्रनाथांनी तो डोळा परत जसाच्या तसा लावून दिला.


आज आपल्याला हे सर्व अविश्वसनीय, अतर्क्य वाटते. हॉस्पिटल, शस्त्रक्रिया नसताना हे अशक्यच वाटते.

परंतु प्राचीन योगविद्या सहजतेने हे करू शकते.

एकदा व्यंकटनाथ महाराजांना विचारले की गोरक्षासन पुस्तकात अतिशयोक्तीपूर्ण दाखविले आहे. त्यांनी विचारले—

“पुस्तकात कसे दाखविले आहे?”

पुस्तकात पायाचे अंगठे स्वतःच्या पोटाकडे वळवून मागे हात नेऊन दोन्ही पायांचे अंगठे धरून ध्यानस्थ बसलेले रूप दाखविले होते.

त्यावर महाराज म्हणाले—

“हे गोरक्षासन आम्ही रोजच घालीत होतो; अलिकडे घालीत नाही.”

मी विचारले—“कधी घातले होते का?” ते म्हणाले—“तुला शंका का येते? हवे तर तुला आत्ताच दाखवू शकतो.”

त्यांचे वय ८० वर्षे. वेळ पहाटेची ३.३०. आणि एक मिनिटात त्यांनी ते गोरक्षासन घालून दाखविले.

डॉक्टरांच्या दृष्टीनेही अशक्य; परंतु योगी सहज करतात.

गोरक्षनाथांनी स्वतःचे बोट घालून बुभूळ काढले—हे मग अशक्य वाटावे का? याच योगसिद्धींचे हे स्वरूप.