अनुक्रमणिका

रामदासस्वामींची नरेंद्रवर कृपा

खरंतर, दासबोध, गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग या ग्रंथांचा आणि माझा कधी संबंध आलाच नव्हता. या ग्रंथाबद्दल त्यांना काहीही माहीत नव्हत. परंतु सीए च्या कोर्सला सुरुवात झाल्यावर हळूहळू तसे योगे घडत गेले. दासबोधाच्या माध्यमातून रामदास स्वामींनी प्रचिती दिली.

एक दिवस एका कंपनीमध्ये ऑडिटसाठी मी गेलो होतो. ऑडिटर म्हणून माझी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. माझ्या मदतीसाठी कंपनीच्या सेक्रेटरीचा पी.ए. असायचा. तो स्टेनो देखील होता. मी ऑडिट करीत राहायचो. तो टाइप करीत राहायचा आणि टाईप करताना मोठमोठ्यांनी श्लोक म्हणायचा. ते श्लोक ऐकून माझे सर्व लक्ष त्या श्लोकाकडे जायचे आणि गाण्याची फर्माईश करावी तसे त्याला “अजून म्हण, अजून म्हण” असे मी विनवीत राहायचो. तो देखील ते म्हणत राहायचा.

एकदा त्याला विचारले, हे श्लोक कुणाचे आहेत? त्याचे काही पुस्तक आहे का? त्यावर तो म्हणाला, “हे तर रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आहेत. कोणत्याही दुकानात पुस्तक मिळेल.” त्याच दिवशी संध्याकाळी मी मनाच्या श्लोकाचं पुस्तक विकत आणलं. संपूर्ण मनाचे श्लोक एका बैठकीत वाचून काढले. त्या श्लोकांचा त्यांचे मनाला विलक्षण आनंद झाला. कुतूहल जागे झाले.

त्या पुस्तकांच्या मागे दासबोध ग्रंथ विक्रीची जाहिरात होती. ती वाचून तो ग्रंथ मिळविण्याचा मी प्रयत्न केला.

माझ्या घरा शेजारीच एक वृद्ध गृहस्थ राहत होते. ते मला म्हणाले, “माझ्याजवळ दासबोध आहे. तुला देऊ का वाचायला?” मी म्हणालो, “द्या, पण मी तो सावकाश वाचीन. परत करायला वेळ लागेल.” त्यावर ते म्हणाले, “सात दिवसात पारायण होते.” मी माझी बाजू स्पष्ट केली, “मला पारायण नाही करायचे. नुसते पुस्तक वाचायचे आहे. त्याला कदाचित वेळ लागेल.”

हो-नाही करत त्या गृहस्थाने हातपाय धुवून सोवळे नेसले. आपल्या देवघरातील ते पुस्तक दिले. म्हणाले, “शुद्धता आणि पवित्रता राख आणि वाचन झाले की मला आणून दे.” त्यांचे हे म्हणणे मला मान्य नव्हतें. त्या ग्रंथाबद्दलची त्यांची आस्था आणि श्रद्धा पाहून मला विशेष वाटले. तरी पण स्वतःच्या मनाचा विचार करून मी म्हणालो, “मी कोणतीही शुद्धता आणि पवित्रता पाळणार नाही. तुमची इच्छा असेल तर मला द्या. मी हा ग्रंथ शुद्ध आणि पवित्रतेने ठेवू शकणार नाही.”

त्या वृद्ध गृहस्थाला काय वाटले माहित नाही; त्यांनी तो ग्रंथ घेऊन जायला सांगितले. वाचन झाले की परत कर म्हणाले. मी देखील वाचायला सुरुवात केली. पारायणाला नव्हे. रात्री अंथरुणावर झोपता झोपता मी ग्रंथ वाचू लागलो.

शुद्धतेचा आणि पवित्रतेचा कोणताच संबंध ठेवला नव्हता. आपल्या मनाला पटेल त्या योग्य या भूमिकेतून वाचन सुरू होते.

पुस्तकाच्या आरंभीचे पान वाचण्यात आले: “ग्रंथमाजी ग्रंथ। लोक पुसती कवण ग्रंथ। येथे विषद केला गुरु शिष्यांचा संवाद। हा आहे ग्रंथराज॥”

अशाच काहीशा त्या ओव्या होत्या. ग्रंथराज हा शब्द वाचताच माझे डोके तडकले आणि मी दासबोध रागाने भिरकावून दिला, फेकून दिला. मनामध्ये विचार आला—३०० ते ४०० वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आणि ४०० वर्षांपूर्वी रामदास स्वामी या ग्रंथाला ग्रंथराज म्हणतात. जणू काही नंतरचे सर्व ग्रंथ याच्या खालच्या स्तराचे. म्हणजे नंतरची प्रजा, आम्ही सारे हे मूर्ख आहोत आणि ते फक्त हुशार.

माझ्या मनांतला, केवढा हा ताठा आणि अहंकार! या मनातल्या विचाराने मी तो ग्रंथ फेकून दिला आणि विचार करीत पडलो.

एक-दोन मिनिटांचा अवधी गेल्यावर माझे मन शांत झाले. कुणीतरी कानामध्ये संवाद करीत होते, “अरे, तुला नाही पटले तर फेकून दे, परंतु संपूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय तू ग्रंथाला कसे दुषण देणार? संपूर्ण ग्रंथ वाच. नाही पटले तर फेकून दे.” कुठली तरी शक्ती अंतर्मनाशी संवाद करीत होती.

मी परत अंथरुणातून उठलो. पुस्तक हातात घेतले, ते मस्तकाला लावले आणि पुढे वाचायला सुरुवात केली.

पुढे मूर्खाची लक्षणे वाचताना जी शक्ती कानात बोलली त्याचे मला प्रत्यंतर आले: “संपूर्ण ग्रंथ वाचल्याविणा । ग्रंथास देई जो दूषण । तो एक पढतमूर्ख ॥”

हे समर्थांचे विधान माझ्या मनाला खरोखरच पटले. खरेच आहे—संपूर्ण विषय जाणून घेतल्याशिवाय तो चुकीचा की बरोबर हे सांगणे सर्वथा चुकीचे आहे हे मला पटले. आपले वागणे मूर्खपणाचे नाही काय? या अनुभूतीनंतर प्रत्येक शब्द आणि ओळ ही मनाच्या कसावर तपासून मी पुढे पुढे वाचत गेलो.

संपूर्ण दासबोधाचे पारायण केवळ सात दिवसांत करतात, पण तो संपूर्ण वाचायला मला जवळजवळ दोन महिने लागले. दोन महिन्यांनंतर ग्रंथाबद्दल विलक्षण आकर्षण वाटू लागले. तो पुन्हा वाचावा असे वाटू लागले. ग्रंथाचे दुसरे वाचनदेखील मी पहिल्याच पद्धतीने केले. परंतु दुसरे वाचन १५ दिवसात पूर्ण झाले.

दुसऱ्या वाचनानंतर माझ्या मनात इच्छा निर्माण झाली—या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे सात दिवसात पारायण करावे. त्याप्रमाणे मी आयुष्यातील पहिले पारायण सात दिवसांत केले.

दासबोध वाचनानंतर माझ्या मनाच्या अवस्थेत आणि विचारसरणीत विलक्षण परिणाम झाला होता. आपल्याला खूप काही ज्ञान आहे, आपल्याला खूप काही मार्गदर्शन मिळत आहे, आपलीही आध्यात्मिक वाट मोकळी होत आहे—असे मला जाणवत होते.

महाराज सहजतेने म्हणाले होते की “सर्व काही आपोआप होईल”, याचे मला प्रत्यंतर येत होते. वाचनाचा योगदेखील सहजतेने आला व मनातील स्थित्यंतरदेखील सहज होताना दिसले.

मला घडविण्यासाठी गुरू स्वतः किती प्रयत्नशील होते ते पहा. ही तर केवळ त्यांचीच कृपा म्हणून असे स्थित्यंतर लगेचच झाले. अन्यथा अशा स्थित्यंतरासाठी जन्म जातो.

सज्जनगडला जाण्याचा योग

पुढे माझ्या जीवनात सज्जनगडला जाण्याचा योग आला. तेथे गेल्यावर तर मला विलक्षण अनुभूती आली. जणू रामदासस्वामी स्वतःच माझ्या बरोबर वावरत होते व तेथील माहिती ते स्वतःच सांगत होते.

तेथील कार्य करणारे वरिष्ठ स्वामी मला माहिती देत होते. मी त्यांच्या जवळ इच्छा व्यक्त केली की, “मला जे कुलपात रामदासस्वामींचे त्यांना मिळालेले वल्कल, मच्छिंद्रनाथांचा सोटा वगैरे जे ठेवले आहेत ते हातात घेऊन त्यांना वंदन करायचे आहे.” त्यासाठी ते काहीही आर्थिक सहाय्य संस्थेला देण्यास तयार होते.

परंतु असे आजपर्यंत घडले नाही व ते नियमबाह्य आहे; त्यामुळे हे कदापि शक्य नाही असे तेथील सर्वच अधिकारी म्हणाले.

परंतु मला ते हातात घेऊन दर्शन घ्यायचेच होते. मी शेवटी रामदासस्वामींच्या समाधीजवळ बसून प्रार्थना करण्यास सुरुवात केली. जवळजवळ मी तिथे पाऊण तास डोळे मिटून ध्यान करीत असेल. दरम्यान कुणी येऊन गेले वगैरे मला काहीच कळले नाही.

पाऊण तासानंतर तेच जेष्ठस्वामी माझ्या जवळ आले आणि म्हणाले, “गेल्या पाऊण तासापासून मी तुम्हाला शोधत आहे. येथे देखील दोन वेळा येऊन गेलो पण तुम्ही कुठेच दिसले नाही. चला लवकर; मी तुम्हाला त्या पिंजर्‍यात घेऊन जातो. तुम्ही मनसोक्त दर्शन घ्या.”

त्यावर मी म्हणालो, “तुमचा म्हणजे रामदासस्वामींचाच नियम आहे; तो मी कसा तोडणार?” त्यावर ते म्हणाले, “आम्हाला अतिशय अस्वस्थ व बेचैन वाटत आहे. तुम्हाला ते दर्शन घडविल्याशिवाय आम्ही स्वस्थ होऊ शकणार नाही.”

त्यांची विनंती मान्य करून मी त्या पिंजर्‍यात गेलो आणि सर्व गोष्टींचे दर्शन मला घेता आले.

रामदासस्वामींनी दिलेली केवढी ही प्रचिती! सज्जनगडावर जोपर्यंत मी होतो तोपर्यंत रामदासस्वामी स्वतः माझ्या बरोबर होते व सर्व माहिती स्वतः देत होते.

या विषयावर मला मिळालेले ज्ञान मी अत्यंत सुलभ शब्दात नवनाथ बोधामृतयोगेश्वरानंदांच्या छायेत या पुस्तकातून प्रकाशित केले आहे.

त्यावरून गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलेल्या ब्रह्मांडाविषयीच्या विज्ञानाचे आकलन स्पष्ट होते. गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे गुरु शिष्याला ज्ञान देत, आपल्या बोधामृताने त्याच्यात परिवर्तन करीत, त्याला आपल्याजवळ आणण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असत.

तेच व्यंकटनाथ महाराजांनी माझ्या बाबतीत केले. मी दूर आहे, महाराजांच्या जवळ नाही—हा माझा व जगाचा विचार असेल. परंतु सद्गुरु हे सदैव सर्वत्र उपस्थित असतात, याची अनुभूती शिष्य नेहमीच घेतो.

दासबोधाच्या पठणाने माझ्या बुद्धीमध्ये व अंतर्मनात परिवर्तन घडले आणि स्वतः रामदासस्वामींनी दिलेल्या प्रचितीमुळे मी आता पूर्वीच्या विचारसरणीचा राहिलो नव्हतो हे मलाच जाणवत होते.

गुरुचिरित्राचे पारायण

गुरुचरित्राच्या तीन वेळच्या पारायणाने मला आलेल्या अनुभूतीमुळे मी भावनेने, मनापासून, अंतःकरणापासून सद्गुरूंच्या—म्हणजे व्यंकटनाथांच्या—जवळ जाऊ लागलो.

गुरुचरित्राच्या पारायणामुळे विचारसरणीत बदल झाला. काही कालावधी गेल्यावर मनात विचार येऊ लागला की गुरूचरित्र हा प्रासादिक ग्रंथ आहे असे म्हणतात. आपण गुरुचरित्राचे पारायण करून पहावे.

आयुष्यात प्रथमच गुरुचरित्राच्या पारायणास सुरुवात केली. पारायणाची सुरुवात केली ती जीवनात विशिष्ट हेतू साध्य व्हावा, या एकमात्र उद्देशाने केली आणि तो खरोखरच साध्य झाला.

उद्देश साध्य झाल्यावर “हा योगायोग होता का?” असे वाटू लागले. म्हणून पुन्हा वेगळ्या उद्देशाने पारायणाला सुरुवात केली. पारायण पूर्ण होताच हाही उद्देश साध्य झाला.

मनाची खात्री करण्याकरिता साधारणतः जे सहज शक्य नाही ते प्राप्त व्हावे या उद्देशाने तिसऱ्यांदा मनामध्ये एक कठीण ध्येय ठेवून पुन्हा पारायणास सुरुवात केली.

“मला मोठ्या गावात सी.ए.चा कोर्स करता यावा, कोर्स करीत असताना मला मानधन मिळावे. सत्प्रवृत्त आणि आध्यात्मिक लोकांच्या भेटी होत राहाव्यात, मी गुरुंच्या सान्निध्यात जावे”—या उद्देशाने गुरुचरित्राचे तिसरे पारायण सुरू केले.

१९५८ ते १९६२ सालच्या दरम्यान सी.ए.साठी एवढ्या सहजतेने अ‍ॅडमिशन मिळत नसे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जागा बदलणे सहज शक्य होत नसे. कोर्स करणार्‍याला डिपॉझिट म्हणून पैसे द्यावे लागत. त्याला पैसे मिळत नसत.

गुरुचरित्राचे पारायण झाल्यावर लवकरच मला नाशिकच्या एका फर्मनी बोलावले. माझ्याकडून पैशाची कोणतीही अपेक्षा न करता त्या फर्मने उलट मलाच दर महा १०० रुपये खर्चाला दिले. हे तर त्यावेळी अशक्य वाटत असे.

मी वस्तुतः धुळे सोडले आणि नाशिकला कोर्स सुरू केला. नाशिकला निरनिराळ्या लोकांच्या सहवासात आलो.

गुरूचरित्राच्या पठणाचा तीन वेळा अनुभव घेतला. हा ग्रंथ प्रासादिक आहे हे पटले. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही ग्रंथांचे सहजतेने वाचन, पारायण झाले आणि विचारांना वेगळीच कलाटणी मिळाली.

माझे पूर्वीचे विचार गेले आणि आता मी नव्याने अध्यात्माकडे, जीवनाकडे पाहू लागलो होतो.