देवगांवला व्यंकटनाथ महाराजांकडे एक देवीचा उपासक आला. तो महाराजांचा भक्त वा शिष्य नव्हता. त्यांनी महाराजांना कधी पाहिलेही नव्हते वा त्यांच्याबद्दल काही माहितीही नव्हती. ते आल्यावर जे गृहस्थ समोर आले त्यांना त्यांनी विचारले की “व्यंकटनाथ महाराज येथेच राहतात का?” ज्यांना विचारले तेच स्वतः महाराज होते, परंतु त्यांना हे माहित नव्हते.
महाराजांना मात्र हा कोण आहे याची पूर्ण कल्पना होती. महाराज म्हणाले, “हो, महाराज येथेच राहतात.” सभोवतालच्या लोकांनां त्यांनी खुणेने सांगितले की आमची ओळख देऊ नका.
तो गृहस्थ अगदी सकाळी पोहोचला होता. तो म्हणाला, “महाराजांचे प्रातर्विधी होईपर्यंत आम्ही आमचे प्रातर्विधी आटोपून घेतो. कुठे जायचे ते सांगावे.”
महाराज स्वतः त्याला घेऊन गेले. टमरेलांत पाणी भरून, हातात घेऊन मागच्या दरवाजापर्यंत गेले. त्याची सर्व व्यवस्था महाराजांनीच केली. स्नानाचीही व्यवस्था त्यांनीच केली. तो स्नानाला गेल्यावर महाराज त्यांच्या गादीवर येऊन बसले.
थोड्या वेळाने उपासक दर्शनासाठी आला आणि पाहतो तर— जे त्याच्यासोबत प्रातर्विधीसाठी गेले तेच स्वतः व्यंकटनाथ महाराज होते!
तो खजील झाला, क्षमायाचना करू लागला. पण महाराज म्हणाले:
“स्वप्नात सांगितलेल्या गोष्टी खर्या असतात का रे बाळ? देवा पेक्षा माणूस मोठा कधी असतो का?”
तो चकित होऊन म्हणाला, “महाराज, आम्ही समजलो नाही आपण काय सांगत आहात ते.”
महाराज म्हणाले:
“तू नाशिकजवळ वणीच्या देवीकडे सहा महिने सप्तशतीचे पारायण केलेस. एके दिवशी देवीने स्वप्नात सांगितले— ‘येथे बसू नकोस. कोल्हापूरला जा. तिथे पारायण कर. तिथे गेल्यावरच तुझे काम होईल.’
पण तुला ते पटले नाही. तू देवीलाच म्हणाला की, ‘मी येथेच पारायण करेन.’ मग देवीच्या संकेतावर पुजार्याने तुला तेथून उठवले. तू कोल्हापूरला गेला. पण तिथेही तुझे तीसरे पारायण अर्धवटच राहिले. कारण देवी पुन्हा म्हणाली, ‘येथून उठ. देवगांव रंगारीला व्यंकटनाथ महाराजांकडे जा. तिथेच तुझे कुष्ठ जाईल.’ म्हणून तू इथे आला आहेस.”
हे ऐकून उपासकाने महाराजांना साष्टांग नमस्कार केला. “क्षमस्व महाराज, माझे मन भरकटले होते. आपण सर्वज्ञ आहात. माझ्यावर कृपा करा.”
महाराज म्हणाले:
“उद्या सकाळी नदीवर जा. बरोबर माणूस येईल. स्नान करून काठावर ये. संपूर्ण अंगाला माती लाव. माती वाळली की पुन्हा नदीत स्नान कर आणि दर्शनाला ये.”
त्याने तसेच केले.
जेथे माती लावली होती तेथे परत आल्यावर पाहतो तो— सर्व अंगावर क्षार पडलेले दिसले.
आणि आरशात पाहतो तर— अंगावरील पूर्ण कोड गेले होते! फक्त कानामागे एक छोटा डाग उरला होता.
त्याने विचारले— “महाराज, हा डाग का राहिला?”
महाराज म्हणाले:
“तू आम्हाला पाहिल्यावर मनात आले— ‘हा तर साधा माणूस आहे! देवीने माझा त्रास का वाढविला?’ देवावरही अविश्वास, आमच्यावरही अविश्वास. म्हणून कानामागचा डाग राहिला.”
तो म्हणाला:
“महाराज, मी वणीला गेलो तिने कोल्हापूरला पाठविले, तिने तुमच्याकडे पाठविले. येथे माझे सर्व शरीर बरे झाले. आता संपूर्ण काम तुम्हीच करा.”
पण महाराज म्हणाले:
“ज्या देवीने तुला येथे पाठवले, तिच्या समोर पारायण करून क्षमायाचना कर. तीच तुझे काम पूर्ण करेल.”
तो पुन्हा वणीला गेला. पारायण केले. देवी प्रसन्न झाली. कानामागील उरलेला भागही पूर्णपणे गेला.
गुरूचरित्रात जे घडले तेच पुन्हा घडले—
- वणीच्या देवीने कोल्हापूरला पाठविले. - कोल्हापूरच्या देवीने व्यंकटनाथांकडे पाठविले. - व्यंकटनाथांनी शरीराचा कुष्ठ रोग घालविला. - परंतु शंकेमुळे कानामागे भाग राहिला. - आणि मग पुन्हा देवीकडे पाठविल्यावर संपूर्ण बरे झाले.
देवाने गुरूकडे पाठवले. गुरूने काम केले. पण पूर्णत्वासाठी पुन्हा देवाकडेच पाठविले.
यातून शिकवण मिळते—
गुरू मोठे नसतात; ते देवाकडेच नेणारे असतात. नाथपंथाचे सर्व सामर्थ्य देवाकडे नेणारे मार्ग आहेत.
व्यंकटनाथ महाराज हे मच्छिंद्रनाथांपासून अखंड परंपरेतील १५वे नाथ. त्यांनी सद्गुरूची भूमिका निभावून काम केले आणि मग शिष्याला पुन्हा देवाकडे पाठविले.
सद्गुरूच नराचा नारायण करू शकतो. प्रारब्ध, संचित, जन्मोजन्मीचे दुःख घालवू शकतो. म्हणूनच त्यांना ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक’ ही पदवी प्राप्त झाली आहे.
आजही भक्त लोक अशा अनुभूती घेत आहेत. म्हणूनच ही लेखमाला साधकाला गुरूचरित्राच्या अखंड धारेचा परिचय करून देते.