शिष्यांनी किंवा भक्तांनी संतांच श्रेष्ठत्व दाखविणे अथवा त्यांचे मूल्यांकन करणे हे सर्वथा चुकीचे आहे.
सृष्टी निर्मिती झाल्यावर ब्रम्हांड कार्याचे तीन भाग पाडले गेले — उत्पत्ती, स्थिती आणि लय. या कार्याची विभागणी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या मध्ये झाली. प्रत्येकाला स्वतंत्र कार्य दिले गेले आणि एकमेकांच्या कार्यात कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही, अशा प्रकारे कार्याची वाटणी झाली.
त्याच प्रमाणे प्रत्येक देवांना विशिष्ट मर्यादेचे कार्य दिले गेले. कोणीही दुसऱ्याच्या कार्यभागात ढवळाढवळ करीत नाही. हीच ब्रम्हांड रचनेची योजना आहे. जसे शक्ती, युक्ती, बुद्धी, चातुर्य हे कार्य हनुमंताकडे दिले तसेच विद्या, कार्यात निर्विघ्नता वगैरे कार्य गणपतीकडे दिले. याचा अर्थ इतर देवांना हे कार्य करता येत नाही असे नसून, या कार्याच्या मर्यादा आहेत; सामर्थ्याच्या नाहीत.
त्याचप्रमाणे संत-महानतांच्या कार्यांना देखील मर्यादा आहेत. त्या मर्यादा त्यांच्या पंथपरंपरेच्या कार्याला अनुसरून टाकलेल्या आहेत. जसे नाथपंथामध्ये *पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश* या पंचमहाभूतांच्या परिणामांमध्ये कलियुगात फरक करण्याचे किंवा पूर्वसंचित–प्रारब्धात बदल करण्याचे कार्य नाथपंथाकडे आहे. याचा अर्थ इतर संतांना ते सामर्थ्य नाही असे नसून, मर्यादा कार्याच्या आहेत.
हे विवेकाने समजून आपापली गुरुभक्ती करीत राहावी.
गुरु हे गुरुच असतात. *“माझे गुरु श्रेष्ठ, पॉवरफुल”* किंवा *“अमुक एक गुरु आमच्या गुरूपेक्षा कमी प्रतीचे”* — अशी भाषा शिष्यांनी किंवा भक्तांनी वापरणे सर्वथा चुकीचे आहे.
मुळात गुरु जे कार्य करतात ते त्यांच्या गुरूंनी सांगितलेल्या कार्यक्षेत्रात, कार्यकक्षेत राहूनच करतात. ते आपल्या गुरुंची आज्ञा पाळत असतात. शिष्यांचे वा भक्तांचे कार्य हा त्यांचा मूळ उद्देश नसतो. ज्या पंथाचे ते कार्यकर्ते असतात त्या पंथाचे उद्देश राबविण्याचे काम ही गुरुसंस्था करीत असते. त्यात शिष्यांचे कार्यही सामावलेले असते.
शिष्यांना किंवा भक्तांना वाटत असते की गुरु आपल्या *उद्धारासाठीच* गुरुपदी बसले आहेत; परंतु गुरुपदाचा अर्थ एवढा सिमीत नाही. गुरु हे भगवान दत्तात्रेयांचे स्वरूप आहेत. त्यामुळे ते विश्वकल्याणार्थच कार्यरत असतात. नाथपंथाचे कार्य हे कलियुगातील चेतन–अचेतन सर्व प्राणिमात्रांसाठी असते.
गुरूंचे कोणत्याही कारणाने मूल्यांकन करणे हे शिष्याला वा भक्ताला शोभत नाही. शिष्यांनी–भक्तांनी निसंदेहपणे आपल्या गुरुंची सेवा करावी व त्यांच्या सांगितलेल्या उपासनेत मग्न रहावे. गुरूंचे मूल्यांकन करण्याची योग्यता शिष्यामध्ये नसते, आणि असे केल्याने तो आपले मन कमकुवत करतो. त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीही होत नाही.
गुरूंच्या अशा प्रकारच्या मूल्यांकनाचा त्यांच्या गुरुकर्मावर काहीही परिणाम होत नाही. त्यांचे कार्य गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सुरूच राहते. परंतु अशा मूल्यांकनामुळे परंपरेच्या सामर्थ्याचे कृपाशिर्वाद लाभत नाहीत.
चंद्रपूरचे एक जोडपे महाराजांकडे आले. तो म्हणाला की “महाराज, मला मुलीच आहेत; आता मुलगा व्हावा अशी इच्छा आहे. बायकोला दिवस आहेत आणि लवकरच प्रसूती होणार आहे.” महाराजांनी काही न बोलता एका कागदावर पत्रिका काढली व त्याच्या हातात दिली. ती होणाऱ्या मुलीची पत्रिका होती.
थोड्याच दिवसांनी त्याने वडिलांना तार दिली — *चौथी मुलगी झाली.* त्याचे वडील महाराजांकडे आले; बाहेरूनच नमस्कार केला. महाराजांनी नमस्काराचे कारण विचारले. ते म्हणाले, “महाराज, चौथी नात झाली; तिची वाढ आहे म्हणून आत येऊ शकत नाही.” महाराज म्हणाले, “अरे, तुझी सून येथेच बसली आहे.”
सासऱ्याला मोठे आश्चर्य! त्याने मुलाला विचारले. मुलाने पत्रिका दाखविली. त्याची बायको महाराजांनी सांगितलेल्या तारखेला डॉक्टरकडे गेली व म्हणाली—“आज माझी प्रसूती आहे.” डॉक्टरने तपासून सांगितले — “अजून वेळ आहे.” पण तिने ऐकले नाही आणि ऑपरेशन टेबलवर जाऊन झोपली. डॉक्टरला वाटले वेडेपणा आहे आणि दुर्लक्ष केले.
महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर त्याचवेळी प्रसूती झाली. डॉक्टरांची तारांबळ उडाली. त्यांनी विचारले—“तुला कसे माहीत?” त्यावर तिने सांगितले—महाराजांनी जन्मापूर्वीच मुलीची कुंडली मांडून दिली होती.
याचा अर्थ — ज्या वेळी ती जन्माला येईल त्यावेळी कोणते ग्रह कुठे असतील, त्यांचा परस्पर संबंध काय, पूर्वसंचित काय आणि सद्य जीवनातील योग काय — हे सर्व त्या पत्रिकेतून समजते. जन्मापूर्वी अशी पत्रिका तयार करणे म्हणजे त्या जीवाचे प्रारब्ध, योग–भोग, आयुष्य, थोडक्यात *जन्मापासून मृत्यूपर्यंत* सर्व ज्ञान असल्याशिवाय शक्यच नाही. हे कार्य नाथपंथाचे असल्यामुळेच महाराजांनी अशी पत्रिका जन्मापूर्वी तयार करून दिली.