श्रीराम आणि मारुतीची प्रथम भेट

श्रीराम आणि लक्ष्मण या दोन्ही भावांना श्रेष्ठ आयुधे धारण करून वीरवेषात येताना सुग्रीवाने पाहिले आणि त्याच्या मनात राम आणि लक्ष्मण यांना पाहून सुग्रीवाचा स्वतःच्या मनावर ताबा राहिला नाही. सुग्रीव धर्मात्मा होता. त्याला राजधर्माचे ज्ञान होते. त्याने मंत्र्यांबरोबर विचार विनिमय करून आपला दुबळेपणा आणि शत्रूपक्षाचे बल यांसंबंधी निश्चित अंदाज घेतला. त्यानंतर सर्व वानरांबरोबर तोही अत्यंत उद्विग्न झाला. सुग्रीवाच्या मनात अत्यंत विषाद दाटला होता. तो राम आणि लक्ष्मणा कडे पाहून आपल्या मंत्र्यांना म्हणाला की निश्चितपणं हे दोन्ही वीर वालीने पाठविलेले दिसताहेत. म्हणूनच ते या दुर्गम वनात हिंडत हिंडत इकडे आले आहेत. त्यांनी दोघांनी कपटाने चीरवस्त्रे धारण केलेली आहेत. आपण त्यांना ओळखू नये म्हणूनच त्यांनी ही युक्ती केलेली असणार. सुग्रीवाच्या सहाय्यक वानरांनी जेव्हा त्या महाधनुर्धर श्रीराम आणि लक्ष्मणांना पाहिले, तेव्हा ते त्या पर्वत तटावरून पळून भीतीने दुसऱ्या उत्तम शिखरावर जाऊन पोहोचले. ते यूथपती वानर त्या कळपाचा श्रेष्ठ प्रमुख सुग्रीवाला चहूकडून घेराव घालून त्याच्या जवळ उभे राहिले. अशा प्रकारे एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर उड्या मारीत आणि आपल्या वेगाने ती पर्वताची शिखरे प्रकंपित करीत ते सर्व महाबली वानर एका ठिकाणी आले. सुग्रीवाचे सर्व सचीव पर्वतराज ऋष्यमूकावर येऊन पोहोचले आणि एकाग्रचित्त होऊन त्या वानरराजाची भेट घेऊन त्याच्या समोर हात जोडून उभे राहिले. तेव्हा वालीकडून काही कपट झाले असणार या शंकेने भयभीत झालेल्या सुग्रीवाला पाहून संभाषणचतुर हनुमान म्हणाला की तुम्ही सर्वजण वालीच्या संबंधाने वाटणारी ही घोर भीती सोडून द्या. हा मलय नावाचा सर्वश्रेष्ठ पर्वत आहे. इथं वालीचं कोणतंही भय बाळगण्याचं कारण नाही. निर्दय वालीच्या भीतीने उद्विग्न होऊन तुम्ही पळता आहात, तो दुष्टात्मा वाली मला इथे कुठे दिसत नाही. तुम्हाला पापाचरणी तुमचा वडील भाऊ वालीच्या मुळे भीती वाटत आहे, पण तो इथे येऊ शकत नाही. हनुमानाच्या तोंडातून बाहेर पडलेले हे बोल सुग्रीवाने ऐकून घेतले. त्यानंतर त्याने उत्तम रीतीने हनुमानाला समजावून सांगितले की या दोन वीरांचे हात लांब आणि डोळे मोठमोठे आहेत. ते धनुष्य, बाण आणि तलवार धारण केलेल्या देवकुमारांसारखे शोभून दिसत आहेत. या दोघांना पाहून कुणाला भय वाटणार नाही? माझ्या तर मनात ते दोन श्रेष्ठ पुरुष वालीनच पाठविले आहेत अशीच शंका येत आहे. तेव्हा कपिश्रेष्ठा, तूही एखाद्या साधारण पुरुषाप्रमाणे इथून त्या दोघांकडे जा आणि त्यांच्या हालचालीवरून, रूपावरून आणि बोलण्याच्या पद्धतीने त्या दोघांची सर्व माहिती बारकाईनं काढून घे. जर ते प्रसन्नचित्त असले, तर माझ्याबद्दल त्यांच्या मनात विश्वास उत्पन्न कर आणि त्यांच्या आगमनाचे कारण विचार. तसेच जर ते शुद्ध आणि सात्त्विक हेतूनं आले असतील तर त्यांना इथे आण, असे हनुमानाला सांगितले.

या आदेशानंतर पवनपुत्र हनुमान भिक्षुकाचे रूप धारण करून ऋष्यमूक पर्वतावरून श्रीराम-लक्ष्मण जिथे उभे होते तिथे गेला. त्याने विनम्रतेने प्रणाम करून मधुर वाणीने विचारले की वीरांनो, तुम्ही कोण? तुमचे स्वरूप, तुमची चाल, तुमच्या भुजांचा विस्तार, धनुष्य-बाण—हे सर्व देवराजांच्या पुत्रांसारखे भासते. या वनात तुम्ही कोणत्या हेतूने आलात? तुमच्या अंगावरची चीरवस्त्रे पण तुम्हांला शोभून दिसत आहेत. तुम्ही दोघे सिंहाप्रमाणे दीर्घश्वास घेता. प्राणिमात्रांना घाबरवणारी तुमची कांति सुवर्णासारखी आहे. तुम्ही पृथ्वीचे रक्षण करणारे असाल असे वाटते. तुमची ही दोन धनुष्ये आणि बाणांचे भाते अतिशय दिव्य आहेत. तुमचे खड्ग सर्पांसारखे प्रखर आहेत. तुम्ही कोण? तुमची ही अद्भुत तेजस्विता पाहून मी वारंवार विचारतोय. माझं नाव हनुमान. मी वायुदेवाचा पुत्र आणि सुग्रीवाचा मंत्री. आमचे राजे सुग्रीव तुम्हांशी मैत्री करू इच्छितात. तुमचे हेतू सात्त्विक असतील तर मी तुम्हांला त्यांच्या भेटीस नेईन.

हनुमानाचे अखंड मधुर, विनयशील भाषण ऐकून श्रीराम आनंदित झाले आणि लक्ष्मणाला म्हणाले — “लक्ष्मणा, हा वानर विद्वान, वाक्पटु, प्रभावशाली आहे. याच्याशी मैत्री कर.” ज्या हनुमानाच्या हृदयात रामाव्यतिरिक्त दुसरे काहीच नसते, अशा त्या महाभक्ताची आणि रामाची पहिली भेट अशी घडली. गुरु-शिष्याची पहिली भेट नेहमीच साधी, अनभिज्ञतेत होते; शिष्याला कळतही नाही की आपण कोठे आलोय, पण गुरु सर्व जाणून वागतात.