सप्तचिरंजीव जे सृष्टीच्या निर्मितीपासून या भूतलावर आहेत त्यात हनुमंताचा समावेश आहे. आज 43 लाख 20 हजार वर्षांचा माणूस जिवंत आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्तीपूर्ण वाटते. परंतु मानव रूप धारण केलेले हनुमान आजही या भूतलावर आहेत. आपले इतिहास धार्मिक ग्रंथ याची साक्ष आपल्याला देतात. सर्व सप्तचिरंजीव यांचे पंचमहाभूतांवर प्रभुत्व आहे. त्यामुळे ते स्वतःला जसे हवे तसे ठेवू शकतात. ते काय करत असतील काय खात असतील कुठे आणि कसे राहात असतील, ऊन वारा पाऊस थंडी यांचा यांना काही उपद्रव होत असेल का, या सर्व मानवी कल्पना आहेत. यांना भूतलावर वावरताना कोणत्याही प्रकारचे ब्रह्मांडाचे, मानवी देहाचे वा जीवन नियंत्रणेचे नियम लागू पडत नाहीत. हे सर्व सप्तचिरंजीव आपल्या इच्छेने मनातील तसे आपल्या पूर्ण सामर्थ्याने वावरतात. पृथ्वी आप तेज वायु आकाश यांच्यावर ज्यांचं प्रभुत्व आहे त्यांना कोणतेही मानवी प्रश्न लागू पडत नाहीत आपल्या साधकाला भक्ताला मार्गदर्शन करून उत्साहित करून भगवत भक्तीला लावणे हेच त्यांचे मूळ उद्देश आहेत मानवी जीवन म्हंटलं म्हणजे त्याला पूर्वसंचित प्रारब्ध, प्राक्तन या सर्व गोष्टी लागू पडतात. सर्व षड्रिपु जीवन आत्म्याला पूर्णपणे ग्रस्त करतात त्यामुळे या मानवाला हे सप्तचिरंजीव कसे गवसते? परंतु भावयुक्त अंतःकरणाने त्यांचं अस्तित्व मान्य केलं तर जिथे कुठे आपणास असू तिथे ते प्रत्यक्षपणे आपल्या समोरच उपस्थित असतात आणि आपल्याला निरनिराळ्या तऱ्हेचे उपाय सुचवतात, बुद्धीला चालना देऊन आपल्याकडून योग्य उपायोजना, उपासना करवून घेण्याचा ते प्रयत्न करीत असतात. या भावनेने आणि मानसिकतेने जर आपण आपले व्यवहार करीत राहिलो तर आपल्याला याची प्रचिती येऊ लागते. जे आपल्याला सर्वात कठीण जाते ते म्हणजे आपले विचार आपली बुद्धी. आपलं मन ते स्थिर ठेवत नाही आणि सतत मनामध्ये प्रश्न निर्माण करून मनाची शक्ती क्षीण करीत राहते. परिणामतः एकाग्र वृत्ती, एकाग्रचित्त आपण होऊ शकत नाही आणि म्हणून इतस्ततः भटकल्यामुळे कार्यसिद्धीचा अनुभव आपण घेऊ शकत नाही. ज्या वातावरणात आपण राहतो, ज्या सभोवतालच्या लोकांमध्ये आपण राहतो, ज्या विचारांचे आपल्यावर सतत आघात होत असतात, विशेषतः टीव्ही, फोन, चलचित्रे, इंटरनेट वगैरे या सर्व विचारांमुळे बुद्धीला चालना मिळून मन अतिचंचल होतं, स्थिर राहत नाही आणि परिणामतः आपण स्थिर प्रकृतीचे, वृत्तीचे होत नाही. जोपर्यंत मन स्थिर होत नाही, प्रकृती स्थिर होत नाही, स्थिर अंतकरणाने एका ठिकाणी बसून आपण कोणतीही उपासना अगर आत्मोन्नतीचे प्रयत्न करत नाही तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती होणारच नाही आणि ज्या वेळेला पुरातन काळातल्या गोष्टी समोर येतात किंवा हल्लीच्या काळात पुरातन काळातल्या सारख्या गोष्टी घडू लागतात त्या आपल्याला केवळ चमत्कार वाटू लागतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे आपल्याला अवघड जाते, किंवा बऱ्याच वेळा हे खोटे आहे हेच आपण ठासून सांगण्याचा प्रयत्न करतो. लहानपणी जय बजरंग बली तोड दुश्मन की नली असे म्हणायचे आणि केवळ या म्हणण्याने आपल्यात स्फुरण येऊन आपल्याला अपेक्षित गोष्टी घडल्याची अनुभूती आपण घेतली आहे. जो बजरंग बली 43 लाख 20 हजार वर्षे उभाच आहे आणि सर्वांच्या कल्याणार्थ आजही जीवनाचा त्याग न करता सर्व जीवांना आधार म्हणून कार्य करीत आहे तो बजरंग बली केवळ एका हाकेने आपल्याला प्रेरणा देतो, धैर्य देतो, बळ देतो, शक्ती युक्ती सर्व काही देतो ही आपण अनुभूती घेतो. बजरंग बलीला हे सांगण्याची गरज पडत नाही की पहा मी तुला धीर दिला आहे, आधार दिला आहे, शक्ती दिली आहे, बुद्धी दिली आहे. आपणच आपल्या शुद्ध अंतकरणाने या गोष्टी मिळाल्या ची पावती अंतरात्म्याला द्यायची आहे एवढंच काय ते. या बजरंग बली ची उपासना कोणाच्याही कामी येते काया वाच्या मनोभावे, वाग्धर्मे अशा पंचतत्वाने मारुती स्वतः अखंड ब्रह्मचारी आहे, अखंड साधनेत आणि उपासनेत आहे. अशा मारुतीची सहजतेने केलेली उपासना ही तात्काळ फळते. श्री समर्थ रामदास स्वामी हे मारुतीचाच अवतार म्हणून प्रसिद्ध आहे. दासबोध हा ग्रंथ त्यांनीच लिहिला आहे.