Table of Contents

आन्हीक

नाथपंथीय गुरुच्या पूजेचा प्रकार हा काहीसा वेगळाच आहे. साधारणतः पूजा म्हटली की देवमूर्तींची उपासना डोळ्यासमोर येते; परंतु नाथपंथाची कार्यपद्धती ही सूर्य, ग्रह, नक्षत्र, तारांगण यांच्या गतीवर आधारित आहे. म्हणजेच ब्रह्मांडाच्या सद्यस्थितीशी पूर्ण एकरूप होऊन पूजा केली जाते. पंचमहाभूत — पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश — यांचा मानवी जीवनावर खोल परिणाम असल्याने आन्हिक ही ब्रह्मांडशास्त्राशी निगडित अशी परंपरा आहे.

व्यंकटनाथ महाराजांची आन्हिक परंपरा

सद्गुरु व्यंकटनाथ महाराज नित्यनेमाने सकाळ-संध्याकाळ आन्हिक करीत. चौरंगाच्या समोरील दोन्ही कोपर्‍यात तेलाच्या समया, त्यांच्या शेजारी तुपाचे दोन निरांजन, आणि मध्यभागी कापूर आरतीची योजना — ही पूजा त्यांच्या परंपरेनुसार सदैव असायची. चौरंगावर कोणत्याही देवतेची मूर्ती नसून नवग्रहांची मुळ पौची ठेवली जात असे. कारण येथे देवतेचे प्रतीक नव्हे तर *ब्रह्मांडाचे मूळ स्वरूप* नवग्रहांद्वारे व्यक्त करण्याची पद्धत आहे.

आन्हिकापूर्वी रामानंदी लावली जाई. पौचीवर दत्त, रुद्र, अथर्वशिर्ष, शाबरी, तसेच विविध देवतांचे मंत्र, कवच व स्तोत्रांच्या माध्यमातून अभिषेक केला जाई. महाराज बहुधा एकांतात, दार लावून, मंदस्वरात आन्हिक करीत असत. त्या वेळी तयार केलेल्या गंधगोळीवर मंत्रसंस्कार व्हायचे आणि ही गोळी व्यक्तीच्या जीवनातील दोष, योगातील व्यत्यय किंवा आवश्यक बदल करण्यासाठी वापरली जाई. असंख्य शिष्यांनी याचे विलक्षण अनुभव घेतले आहेत.

नरेंद्रनाथ महाराजांची आजची आन्हिक परंपरा

हीच परंपरागत आन्हिक पद्धत नरेंद्रनाथ महाराज आजही अविरत करीत आहेत. आन्हिकाचा परिणाम वातावरणावर आणि उपस्थित व्यक्तींवर अत्यंत प्रभावी होतो. पूजा चालू असताना केवळ *शारीरिक उपस्थितीमुळे* देखील व्यक्तीतील विकार आणि मानसिक अस्थिरता कमी होऊ लागते — अशी अनेकांची अनुभूती आहे.

गंधगोळीचा उपयोग आजही महाराज व्यक्तिमत्त्वातील बदल, योगातील सुधारणा किंवा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्यासाठी करतात. पूजेच्या वेळी सर्व देव-शक्ती सांकेतिक रूपाने उपस्थित असल्याचा अनुभव साधकांना येत असतो.

सूक्ष्म तपासणी आणि गुरूंची कृपा

पूजेच्या काळात साधक नकळतच गुरूंच्या सूक्ष्म तपासणीखाली असेतो. त्यांच्या दोषांचे, अडथळ्यांचे ज्ञान गुरूंना त्वरित होते. आन्हिकानंतर शिष्य गुरुंची पाद्यपूजा करतात; त्यानंतर आरती, कर्पूर आरती व सामूहिक प्रार्थना होतात. गुरू स्वतः तीर्थ व प्रसाद देतात आणि हवे असल्यास त्याच वेळी असंभाव्य कार्यही सहज करतात.

सूर्य – नाथपंथातील मुख्य देवता

नाथपंथात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सृष्टीतील सर्व जीवांचा सूर्य हा आत्मा आहे. पूर्व दिशेला सूर्य उगवतो हा केवळ प्रघात; प्रत्यक्षात सूर्याचा प्रवास दक्षिणायन व उत्तरायण या दोन टोकांत विभागला जातो.

नाथपंथाच्या परंपरेनुसार या दोन्ही संक्रमणावेळी सूर्य संक्रमण हवन करण्याचा प्रघात आहे. या हवनातून मिळणारी विभूती मंत्रसाधना, शक्ती-वृद्धी, शस्त्र-अस्त्र सिद्धी आणि लोककल्याणासाठी उपयोगात आणली जाते. नाथपंथीय सिद्धता केवळ स्वतःपुरती नसून सर्व समाजाच्या हितासाठी वापरली जाते.

विविध विशिष्ट हवने

सूर्य संक्रमणाव्यतिरिक्त इतरही अनेक विशिष्ट हवने नाथपंथात होतात. प्रत्येक हवनाचा मूलभूत उद्देश एकच — जनहित आणि जनकल्याण.