पंढरपूर हे नरेंद्रनाथ महाराजांचे आजोळ. त्यांची आजी व्यंकटनाथ महाराजांच्या दर्शनाला गेली होती तेव्हा महाराजांनी तिला सांगितले होते—
“नरेंद्र हा माझा खरा मुलगा आहे. पुढील कार्य तोच करेल.” परंतु हे आजींनी बराच उशिराने सर्वांना सांगितले.
एकदा नरेंद्रनाथ आजोळी गेले होते. तेव्हा आजी त्यानां म्हणाली— “आमच्या उरलेल्या आयुष्यासाठी काय करावे ते सांग.”
नरेंद्रनाथ महाराजांनी तिच्या पतीस म्हणजे आजोबास मंत्रजप करण्यास सांगितले. त्यांनी तो मंत्र आजन्म केला आणि त्यांना अत्यंत शांत मृत्यू आला. मृत्यूची प्रचिती त्यांना आधीच आली होती; शेवटच्या क्षणी कोणताही त्रास झाला नाही.
आजोबांच्या मृत्यूनंतर आजीच्या मनात खोल दुःख होते. एक वर्षभर आजोबा तिला स्वप्नातही दिसले नव्हते.
वर्षश्राद्धाला नरेंद्रनाथ गेल्यावर ती त्यांना म्हणाली—
“तुझे आजोबा गेले, पण एकदाही दर्शन दिले नाही. तू मला त्यांना दाखव.”
नरेंद्रनाथ म्हणाले —
“फक्त तुलाच नाही — तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष दाखवतो. परंतु जिथे ते दिसतील, तिथे सर्वजण सायंकाळी यायला हवेत.”
सायंकाळी सर्वजण चंद्रभागेच्या वाळवंटात नरेंद्रनाथ महाराजांसमवेत गेले. जागा स्वच्छ केली, सतरंजी टाकली, आसन ठेवले, स्टूल ठेवून त्यावर गुरूंचा फोटो ठेवला.
संध्याकाळी भजन सुरू झाले. आरती सुरू होताच—
प्रत्येकाने वेगवेगळ्या स्वरूपात नरेंद्रनाथांचे आजोबा प्रत्यक्ष उभे पाहिले.
आरती संपल्यावर सर्वजण कृतकृत्य होऊन निघून गेले.
नरेंद्रनाथ आवरायला थांबले. सतरंजी काढली आणि जिथे स्टूल होते तिथे त्यानां —
व्यंकटनाथ महाराजांच्या पादुकांचे स्पष्ट ठसे आणि त्यावर न दबलेली ताजी फुले दिसली.
त्या क्षणी उपस्थित असलेले सर्व चार–पाच जण थक्क होऊन उभे राहिले.
नरेंद्रनाथांचे आजी–आजोबा हे व्यंकटनाथ महाराजांचे शिष्य नव्हते. तरीही त्त्यांच्या प्रार्थनेपोटी गुरूंनी एक वर्षांपूर्वी गेलेल्या आत्म्याला प्रत्यक्ष उभे केले.
हीच नाथपंथाची अद्वितीय सत्ता — जीवनावर, मृत्यूवर, पंचमहाभूतांवर आणि संपूर्ण ब्रह्मांडावर.