डॉ. श्रीकांत शास्त्री गदाधर यांचे कीर्तन पुष्प सहावे

ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधणारा नाथपंथ!

अकोला येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अभय पाटील यांनी नाथशक्तिपीठाच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त करताना हिंदू धर्मातील ज्ञानप्रधान दृष्टिकोन अधोरेखित केला. त्यांच्या मते, हिंदू धर्मात आस्तिकता आणि नास्तिकता यांपेक्षाही ज्ञानाला अधिक महत्त्वाचे स्थान आहे. कोणतीही गोष्ट केवळ श्रद्धेच्या आधारावर स्वीकारण्यापेक्षा तिचे ज्ञान, तत्त्व आणि सत्य जाणून घेण्याची भूमिका मांडली आहे.याच विचारधारेचा प्रत्यय नाथपंथाच्या तत्त्वज्ञानातून येतो.

नाथपंथ हा ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालत मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा मार्ग आहे. विज्ञान आणि अध्यात्म हे परस्परविरोधी नसून मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी एकमेकांना पूरक ठरू शकतात, हा विचार नाथपंथाच्या कार्यातून अधोरेखित होतो.

श्रद्धेला ज्ञानाची जोड, ज्ञानाला विवेकाची दिशा आणि अध्यात्माला कर्माची कृतीशीलता देणारे सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज यांचे मार्गदर्शन आजच्या समाजासाठी निश्चितच चिंतनशील आणि दिशादर्शक आहे.