Table of Contents

20.11.26 पहिले पुष्प

पर्वणी आत्मोन्नतीची या भव्य आध्यात्मिक सोहळ्याचा प्रारंभ

अकोला, दि. २० नोव्हेंबर २०२६ : नाथशक्तिपीठाच्या वतीने पूजनीय नरेंद्रनाथ महाराज यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या ‘पर्वणी आत्मोन्नतीची’ या भव्य आध्यात्मिक महोत्सवाचा हा कीर्तन महोत्सव पहिला दिवस आहे. या मुख्य सोहळ्याचे आयोजन दि. ६ जानेवारी २०२७ ते १६ जानेवारी २०२७ या कालावधीत नाथशक्तिपीठ, खरप रोड, अकोला येथे करण्यात येणार आहे. या पर्वामध्ये चतुर्वेद स्वाहाकार, यज्ञ, विविध धार्मिक अनुष्ठाने, अन्नदान, कीर्तन आदी विविध धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वैदिक परंपरेचे जतन, अध्यात्माचा प्रसार आणि समाजाच्या आत्मोन्नतीचा संकल्प घेऊन आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव नरेंद्रनाथ महाराज यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त एक विशेष आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, अकोला येथे नाथशक्तिपीठाच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आकाश फुंडकर, रुहाटिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिद्धार्थ रुहाटिया, नाथशक्तिपीठाधीश्वर नरेंद्रनाथ महाराज, श्री. बाळासाहेब मेहरे, सुप्रसिद्ध कीर्तनकार अजयबुवा अपामार्जने आणि रुहाटिया ग्रुपचे जनरल मॅनेजर श्री. राम पाटील उपस्थित होते.

कीर्तन महोत्सवातून संस्कृती संवर्धनासह समाजप्रबोधनाचा जागर; पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून नाथशक्तिपीठाच्या कार्याचे कौतुक

यावेळी पालकमंत्री श्री. आकाश फुंडकर यांनी कीर्तन महोत्सवाच्या आयोजनाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, अशा प्रकारचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असून भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर करून मनाला प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचे कार्यही अशा कार्यक्रमांमधून होते. नाथशक्तिपीठ अकोला हे वैदिक विद्यालय चालवून तसेच लहान मुलांना वैदिक ज्ञानाचे शिक्षण देऊन अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य करीत आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

रुहाटिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिद्धार्थ रुहाटिया यांनी या महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. आजच्या काळात अशा प्रकारचे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम दुर्मिळ होत चालले आहेत. त्यामुळे अशा भव्य आणि सुव्यवस्थित कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल नाथशक्तिपीठाचे विशेष अभिनंदन आणि आभार मानले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी नाथशक्तिपीठाधीश्वर पूजनीय नरेंद्रनाथ महाराज यांनी पालकमंत्री श्री. आकाश फुंडकर यांना आशीर्वाद दिले.

महोत्सवात सुप्रसिद्ध कीर्तनकार अजयबुवा अपामार्जने यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भक्ती, अध्यात्म, संतविचार आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर संगम त्यांच्या कीर्तनातून अनुभवायला मिळाला. उपस्थित श्रोत्यांनी त्यांच्या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भारतीय वैदिक परंपरा, संतसाहित्य, कीर्तन संस्कृती आणि नव्या पिढीमध्ये आध्यात्मिक मूल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने नाथशक्तिपीठाकडून राबविण्यात येणारे उपक्रम या महोत्सवाच्या माध्यमातून अधोरेखित झाले. संस्कृतीचे जतन आणि समाजप्रबोधन यांचा समन्वय साधणारा हा कीर्तन महोत्सव अकोलेकरांसाठी एक विशेष सांस्कृतिक पर्व आहे.