अनुक्रमणिका

ब्रह्मेशानंद महाराज तपोभूमी भेट

तपोभूमी येथे आगमन

नाथशक्तिपीठाधीश प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज गोव्याच्या पद्मनाभ संप्रदायाच्या श्री क्षेत्र तपोभूमीचे मठाधीश प. पू. ब्रह्मेशानंद महाराज यांच्या आमंत्रणास मान देऊन त्यांच्या मठात गेले असता, प. पू. नरेंद्रनाथ महाराजांचे स्वागत व श्रद्धापूजन पद्मनाभ मठाच्या वैदिकांनी मंत्रोच्चार करून केले.

प. पू. ब्रह्मेशानंद महाराज यांचे कार्य देश–विदेशात विस्तारित असून, नुकतेच ते इंग्लंड येथील परिसंवादात सहभागी होऊन आले आहेत.

एकमुखी दत्तदर्शन व मार्गदर्शन

प्रथम प. पू. नरेंद्रनाथ महाराजांनी एकमुखी दत्ताचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी तेथील वेदशास्त्री व गुरुमाता यांना मार्गदर्शन केले.

दत्तजयंती पर्व प्रारंभ होत असताना गुरुमाता म्हणाल्या— “आपण आमचे येथे भगवान श्री दत्तस्वरूप म्हणून आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केले, ही आमच्यासाठी महद्भाग्याची गोष्ट आहे.”

नाथशक्तिपीठाच्या कार्याची माहिती

यावेळी श्री श्रीकांत शास्त्री यांनी प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या कार्याची माहिती प. पू. ब्रह्मेशानंद महाराजांना दिली.

*वेदमंत्रांच्या माध्यमातून भाग्याचे पुनरुज्जीवन* — या नाथशक्तिपीठाच्या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करत असताना देवतांच्या प्रतिमा अग्नीज्वाळेतून प्रकट झालेल्या पाहून ते आश्चर्यचकित झाले व उद्गारले—

“ये कैसे हो सकता है!”

सत्कार व आशीर्वाद

प. पू. ब्रह्मेशानंद महाराजांनी प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचा शाल–श्रीफळ देऊन सत्कार केला व कार्यउत्कर्षासाठी आशीर्वाद घेतले.

तपोभूमीत या दत्तजयंती सप्ताहात श्री दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार होती. ही प्रतिष्ठापना प. पू. नरेंद्रनाथ महाराजांनी करावी अशी त्यांची अंतरिक इच्छा होती; परंतु प. पू. नरेंद्रनाथ महाराजांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते शक्य झाले नाही.

नाथपंथ प्रसारासाठी सहकार्य

चर्चेदरम्यान प. पू. ब्रह्मेशानंद महाराज म्हणाले—

“तपोभूमीत आपल्या आशीर्वादाने व मार्गदर्शनात नाथपंथाच्या प्रसारासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आम्हाला आनंदच वाटेल.”

त्यांनी पुढे सांगितले की तपोभूमीच्या गोवा चॅनलवरून प. पू. नरेंद्रनाथ महाराजांची नाथपंथ प्रसारक व आध्यात्मिक उन्नतीला मार्गदर्शक अमृतवाणी प्रक्षेपित केली जाईल.

हे चॅनल गोवा राज्यात लोकप्रिय असून आता युरोपातील सर्व देशांमध्ये त्याचे प्रक्षेपण होत आहे.

यानिमित्त प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचे भगवान श्री दत्तात्रेय महात्म्यसूर्य संक्रमणावरील प्रवचन तपोभूमीच्या चॅनलसाठी मुद्रित करण्यात आले.

गोव्यातील परिस्थिती व नाथपंथाची आवश्यकता

प. पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज पुढे म्हणाले—

“गोवा राज्यात विदेशी संस्कृती आणि भोगवादी प्रवृत्तीने धुमाकूळ घातला आहे. अशा वेळी मनुष्य सत्शील, धार्मिक, सत्प्रवृत्त झाला पाहिजे; हीच आजची आवश्यकता आहे.”

या दृष्टीने नाथपंथाची कार्यपद्धती आणि प. पू. नरेंद्रनाथ महाराजांचे मार्गदर्शन यांवर आधारित कार्यक्रमांची आखणी लवकरच केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.