सात वारांची उपासना
सात वारांची ही उपासना ही कोणत्याही दैवतेची नाही. वारा प्रमाणे विशिष्ट देवतेची उपासना सांगितलेली नाही. कोणतेही मंत्र नाही. कोणतेही स्तोत्र नाही. कोणताही जप ह्याच्यात सांगितलेला नाही.
१) प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला हवे की आयुर्मर्यादा म्हणजे जीवनाचा कालावधी. उदाहरणार्थ — 80 वर्षांचे आयुष्य म्हणजे परमेश्वराने प्रत्येक जीवाला स्वतःचा उद्धार करण्यासाठी निर्धारित कालावधी दिलेला आहे. त्या कालावधीतच त्यांनी आत्मोन्नतीचा प्रयत्न केला पाहिजे.
२) देवावर विश्वास आहे किंवा नाही याला जीवनात फारसे महत्त्व नाही. ब्रह्मांड तत्त्वानुसार जन्मापासून मृत्यूपर्यंतचा कालावधी हा पूर्वसंचितानुसार जाईल. असा जर गेला तर अनेक जणांना अनंत जन्मानंतर आत्मउन्नतीची इच्छा होईल आणि त्यानंतर अनेक जन्मांनंतर आपण उन्नत होऊ शकू.
३) ब्रह्मांडामधील पंचमहाभूतांचा प्रत्येक जीवावर नकळत परिणाम होतच राहतो. तो टाळता येत नाही. जर विवेक जागा केला नाही तर जीवन कष्टप्रद व दुःखद असते.
४) देवाला न मानणे हे केवळ अविवेकाचे लक्षण आहे. सज्जन, सत्प्रवृत्त, सुशील होणे हा विवेकीपणा आहे.
५) कोणत्याही तात्विक वादात जाऊन, निसर्गाविरुद्ध जाऊन अथवा सत्पुरुषांच्या विरुद्ध विचार बाळगून त्यांच्या विरोधात वागणे हे केवळ अविवेकी, अविकसित आत्म्याचे लक्षण आहे.
६) जीवनात मौजमजा करू नये अथवा स्वर्गोपभोग घेऊ नये हा अर्थ चुकीचा आहे. आत्मा उन्नत केल्याशिवाय राहू नये — हे लक्षात घ्यावे.
७) आपला आत्मा उन्नत करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने सद्गुरूंच्या शोधात राहायला हवे.
८) जर हे काहीच केले नाही तर जीवन दुःखी, कष्टी, असमाधानी, अतृप्त, अशांत होईल आणि पुढील जन्म अधिक दुःखी, कष्टी, अशांत होईल. हाच ब्रह्मांड तत्त्वाचा नियम आहे. त्यात बदल केवळ सद्गुरूच करू शकतात.
हे मानवा, ब्रह्मांडतत्त्व समजून राहिला नाहीस तर हाल-अपेष्टेत राहशील.
रविवारच्या उपासनेत ब्रह्मांडाचे वर्णन केले आहे. निसर्ग व पंचमहाभुते यांच्या विषयी सांगितले आहे. त्यांचे जीवनावर कसे परिणाम होतात हे सांगितले आहे.
सर्व प्रकारचे जीव—मानवासह—हे ईश्वराचा एक खेळ आहे. ब्रह्मांडात जे काही आहे वा नाही, ते सर्व ईश्वराचेच आहे. त्याची सार्वभौम सत्ता आहे. जे होते ते, आणि जे होत नाही तेही — सर्व त्याचीच मर्जी आहे. हे समजून जीवनाचे धोरण ठेवावे.
हे तत्त्व समजून जर मानव आपले जीवन जगला नाही, तर तो कायमच हाल-अपेष्टेत राहील. हेच निसर्गाचे, ब्रह्मांडाचे तत्त्व समजून घ्यावे.
मानवा, शरीराचे जीवाशिवाचे नाते समजून जीवनाचा प्रवास कर. न करशील जरी हा सायास, वाया जाईल तुझे शरीर! नाही तुला काही पर्याय — नानाविध भोग घेशील!!
मानवाच्या उत्पत्ती नंतर सांगितले आहे की विविध आत्मे — जे परमात्म्याचेच रूप आहेत — ते विविध शरीर धारण करून पृथ्वी, आप आणि आकाश तत्त्वात अवतरले.
शरीर हे आत्म्याभोवती असलेले वेष्टन आहे. आत्माच आपल्या पूर्वसंचितानुसार शरीर धारण करून जन्म घेतो. आत्मा उन्नत करण्यासाठी शरीर हेच माध्यम आहे.
मानव सोडला तर इतर कोणताही देहधारी नराचा नारायण होऊ शकत नाही. अशा प्रकारे शरीराचे महत्त्व सांगितले आहे.
शरीराचे महत्त्व सांगून त्यातील असणाऱ्या जीवाचा, शरीराचा आणि ईश्वरी शक्तीचा संबंध सांगितला आहे. जीवाशिवाचे मिलन ही ब्रह्मांडाची योजना आहे.
जो शरीराचे हे महत्त्व लक्षात घेऊन आत्मोन्नतीचा यत्न करणार नाही, त्याचे सद्य जीवन आणि पुढील सर्व जीवन दुःखी, कष्टीच राहील — हेच ब्रह्मांड तत्त्वाचे सार सांगितले आहे.
आत्मज्ञानाची गुरूकिल्ली
माणूस जन्माला येतो ते “कोऽहं, कोऽहं” करीतच येतो. मूल जन्माला येते तेव्हा ते रडत असते; त्या रडण्यातून “कोऽहं, कोऽहं” हा ध्वनी निघत असतो. “कोण मी? कुठला? कुठून आलो?” — हे त्याचे अंतरात्मा म्हणत असते.
मातेच्या उदरी असताना त्या अंतरात्म्याला पूर्वजन्माची पूर्ण जाणीव असते. त्या नऊ महिन्यांत मातेशी आणि बाहेरच्या जगाशी निगडित सर्व बोलणे तो ग्रहण करतो. ही स्मृती जन्मप्रक्रियेत नष्ट होते, पण त्याचा आवाज तो जन्मल्यावर शोधत राहतो.
आत्मज्ञानाच्या अभावी तो हायहाय करत राहतो. आत्मज्ञान मिळताच पूर्वस्मृती जागृत होतात. त्याच्या आत्मज्ञानसंनिधीचे वर्णन या भागात आहे.
अवनीवरील सर्व मानवांनी आत्मोन्नती साधावी आणि जीवाचा उद्धार करून मुक्त करावे — यासाठीच मानवी जन्म आहे.
जोवर उद्धार होत नाही तोवर जन्म-मृत्यूच्या प्रवाहात अडकून राहावे लागते. जीवनाचा उद्देश हाच आहे.
ही उपासना अध्यात्मज्ञान, विवेक आणि आत्मोन्नती वाढवते. ज्ञान वाढेल तसे मनःशांती मिळेल. गुरूंच्या सान्निध्यात आत्मोन्नती होईल.
जपतप-मंत्र-उपासना-व्रताशिवाय फक्त गुरूंच्या मार्गदर्शनात आत्मोन्नती सुरू होते.
आत्मोन्नती विना केले जे, न येई सवे देहत्यागिता! जीवाचा जीवनप्रवास सदा देई दुःख नि कष्ट.
मी दैवाधीन अशांत का?
मानवाला नेहमीच अस्थिर, अशांत, दैवाधीन असल्यासारखे वाटते. त्याच्या समजुतीनुसार तो चांगले कर्म करतो, चांगला हेतू ठेवतो; तरीही इतर लोक कमी सायास करून अधिक सुखात, समाधानात दिसतात.
मानव हा विचार करत नाही की तो मनात येईल तसेच कर्म करतो. कधी मनात येईल त्यालाच गुरू मानून शांतीच्या शोधात फिरतो.
गुरूंना बुद्धीने ओळखण्याऐवजी अंतर्मनाला जे गवसतील तेच गुरू करावेत. सद्गुरूंच्या अधिष्ठाना शिवाय राहू नये.
निसर्गातील पंचमहाभूतांच्या घटकांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये. या उपासनेत सांगितल्याप्रमाणे वागले नाही तर मानव दैवाधीन आणि अशांतच राहील.
सद्गुरू शिवाय तरणोपाय नाही
संत-सद्गुरूंचे दर्शन सहज उपलब्ध नसते. पूर्वपुण्याई आणि पूर्वसंचिताचा योग नसल्यास ते घडत नाही.
संत मुक्तपणे समाजात असले तरी त्यांच्या दर्शनाची इच्छा सर्वांमध्ये होत नाही. योग नसल्यास इच्छा होतही नाही.
संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय! मग रामनामी आवडी उपजे, प्रेम घडोघडी वाढो लागे! कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे! तुका म्हणे साधन हे सोपे नि गोमटे! परी उपतिष्टे पूर्वपुण्ये.
सद्गुरू शिवाय तरणोपाय नाही. ईश्वरदर्शनही सद्गुरूंच्या कृपाशिर्वादाशिवाय शक्य नाही.
गुरूंशी एकरूप होण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा.
सुख-दुःख ही कर्मफळे आहेत. चांगल्या कर्माचे फळ — स्वर्गोपभोग; वाईट कर्माचे फळ — दुःख.
कोणि नसे रे तारक गुरूविन
इतिहासाने देवांचे वर्णन केले नाही — पिता, आजा वा कोण?
मानव विविध रूपांमध्येच इतिहासात वर्णिला गेला आहे. देव मानवाचे रूप घेऊन अवनीवर अवतरतो. गुरू हेच ब्रह्मा-विष्णू-महेशाचे अविष्कार आहेत.
पोथ्या-पुराणे तपासल्यास कळते की देवही मनुष्यरूप घेऊन पृथ्वीवर कार्य करतो.
देवाने सदैव सद्गुरूंना स्वतःपेक्षा अधिक महत्त्व दिले आहे. अंतरात्माच गुरूंची ओळख करून देतो. बुद्धीला प्राधान्य न देता अंतःकरण सांगेल तसे गुरू करावेत.
आई-वडील जन्म देतात; उद्धार गुरुच करतात.
जन्म-मृत्यूच्या भयाण भोवऱ्यातून फक्त गुरुच जीवाला सद्गती देतात.
जीवनाचे प्रयोजन काय?
जीवाचा जीवनप्रवास हा ईश्वराचा खेळ आहे. उद्धारासाठीच जीवाला जन्म दिला जातो. जीवन-मरणाचे कालचक्र अखंडपणे चालू असते.
मानवी भावना — जन्म-मृत्यूच्या फेर्यातल्या. भावना ईश्वराप्रति वाढवल्या पाहिजेत.
जगी पाहता देव हा अन्नदाता! तया लागली तत्त्वता सारचिंता!! तयाचे मुखी नाम घेता फुकाचे! मना सांग पां रे तुझे काय जाते!!
ईश्वराने कोणताही भेदभाव न करता सर्व जीवांना त्यांच्या कर्मानुसार अभयदान जन्मतःच दिले आहे.
यावर विसंबून अन्न, वस्त्र, निवारा, पोषणाची काळजी देवावर सोडावी आणि भक्तीभाव वाढवावा.
वारांच्या बोधाचा अभ्यास केल्यावर समजते की ज्या ब्रह्मा-विष्णू-महेशाने ब्रह्मांडाचा खेळ मांडला — तोच गुरु रूपाने उद्धारासाठी अवतरतो.
या बोधाची पुरश्चरणे केल्यावर बुद्धी, मन, चित्तवृत्ती पालटतात. अज्ञान जाऊन विवेक वाढतो.
ब्रह्मांडतत्त्व समजण्यासाठी हा बोध सावकाश वाचत, मनन करत राहावे. जीवाचे प्रयोजन काय — हे अखंड पारायण केल्यावर उमगते.
दररोज एक दिवसाचा बोध वाचावा. एकाच दिवशी सर्व वाचू नये.
गुरूंचा उपदेश अद्याप मिळाला नसेल तर मिळेलच. वाचनात खंड पाडू नका.
गुरूंची कृपा मिळून एखाद्या जन्म-मृत्यूच्या फेर्यात ते आपल्याला ब्रह्मांडनायक करतील.
मानव जर ब्रह्मांडतत्त्व समजून राहिला नाही तर जीवाच्या हाल-अपेष्टा होत राहतील.
जीवाशिवाचे नाते समजून वागणे गरजेचे आहे. हे साधण्यासाठी आत्मज्ञानाची गरज सांगितली आहे.
या सर्वाचे पालन न केल्यास मानवाची गती — दैवाधीन, अशांत अशीच राहते.
ब्रह्मांडतत्त्वानुसार सर्व जीवांचा उद्धार होणार आहे. त्यासाठीच ब्रह्मा-विष्णू-महेशाने कर्माचा खेळ मांडला आहे.
पूर्वसंचित-प्रारब्धानुसार प्रत्येक जीव जन्मतो. ईश्वर त्यात बदल करत नाही. पण ब्रह्मा-विष्णू-महेश रूपी गुरुंच्या कृपेने सर्व गुरु हे बदल करतात.
ईश्वराने सर्व जीवांना अन्न, वस्त्र, निवारा, पोषणाचे अभयदान दिले आहे. यावर विसंबून ईश्वरभक्तीत मग्न राहावे. गुरूंवर पूर्ण विसंबून राहावे.
असे जीवन व्यतीत करता करता जीवाचा उद्धार होऊ लागेल — याची अनुभूती घ्यावी.