2. प. पू. सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज विरचित आत्मोन्नती साधना वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधना म्हटली की, एखादे उपास्य दैवत आले. त्याची पूजा पध्दती आली. मंत्र, जप आला. पण इथे असे काहीच नाही. कोणत्याही दैवताला, ईश्वराला, कोणत्याही मंत्र -तंत्राला भजण्यास किंवा जपण्यास यात सांगितले नाही. केवळ अनंत अशा ब्रह्नांडतत्त्वाचाच साधनेत विचार केला आहे. ही साधना व्यापक, सिध्द, व उपयुक्त आहे. साधनेचे व्यापकत्वही साधना व्यापक आहे. याचा परिघ सिमित नाही. कोणतेही दैवत, मंत्र -तंत्र या साधनेचा केंद्रबिंदू नाही. साधनेतुन ब्रह्नांडतत्त्वाचाच प्रामुख्यान विचार केला आहे. या साधनेतून विश्वात्मकतेला साद घातलेली आहे. त्याची आळवणी आहे. निसर्ग, पंचमहाभूत यांचा मानवी जीवनावर क्षणोक्षणी परिणाम होत असतो. या अपरिहार्य परिणामांची संगती आणि उकल साधनेतून करण्यात आली आहे. ब्रह्मांडात जे काही होत आहे किंवा जे काही होत नाही ती सर्व केवळ त्या ईश्वराचीच इच्छा असते. मानव काय किंवा अन्य कोणताही जीव असो त्याच्या इच्छेला ब्रह्मांडतत्त्वाच्या व्यवस्थापनात शून्य महत्त्व आहे. इथे मनुष्य पूर्णपणे हतबल, अगतिक असाच आहे. तेव्हा प्रत्येकाने व्यापक अस ब्रह्मांडतत्त्व अगोदर समजून घेतल पाहिजे. मग या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या व्यापक पसार्यात स्वतःचे अस्तित्व तपासुन बघितले पाहिजे. म्हणजे आपण किती क्षुल्लक आहोत याची त्याला जाणीव होईल. मग अहंकार राहणारच नाही. अहंकाराचे निर्मूलन ही साधकाच्या दृष्टीन साधनेसाठी जमेची बाजु असते.
3. या साधनेच्या स्वरूपात प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी आत्मोन्नतीसाठी स्वयंसिध्द साधन आम्हाला दिल आहे. सिध्दतेच्या बाबतीत या उपासनेची फलश्रुती पाहणे महत्त्वाचे ठरते. पामराचा नर अन् नराचा नारायण होणे. 'ब्रह्मांडनायक ' या देवदुर्लभ पदवीची प्राप्ती होणे या साधनेच्या फलश्रुती म्हणून सांगता येतील. समर्थ रामदास स्वामी म्हणतात तस या देहाचियेनी आधारे। सच्चिदानंद पदवी घेणे। आपल्याला प्राप्त झालेल साधन 'देह' आहे. संचित कर्मानुसार प्रत्येक आत्म्याला देहाची एक खोळ प्राप्त होत असते. मनुष्य देह ही सजीव सृष्टीमध्ये आत्मोन्नतीला साजेशी अशी एकच खोळ आहे. ती सहजासहजी प्राप्त होत नाही. म्हणूनच प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज वारंवार आपल लक्ष पशुदेही नाही गती। ऐसे सर्वत्र बोलती या सूत्राकडे वेधतात. या साधनेन आपल लक्ष आणखी एका गोष्टीकडे वेधल आहे. प. पू. श्री महाराज म्हणतात की, केवळ मनुष्य देहाचीच प्राप्ती झाल्यामुळे जीव हा शिवस्वरूप होऊ शकतो. मात्र हा जीव श्री सद्गुरूंचा अनुग्रहित असेल तरच! कारण घडविणे व घडणे ही आंतर प्रक्रिया गुरू-शिष्य या नात्यातील आहे. या संदर्भातील एक मननीय उदाहरण प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज देत असतात. नाथपंथीय सद्गुरू श्री ज्ञाननाथ माऊली! त्यांनी रेड्याचे मुखातून वेद वदविले. याचाच अर्थ त्यांनी रेड्याचे पूर्व आत्मज्ञान जागविले. त्याच्या पूर्व संस्काराच व स्मृृतींच जागरण केल. ही अद्भूत शक्ती केवळ श्री सद्गुरू या तत्त्वातच आहे.
4. प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी आत्मोन्नती साधनेतून “जीवा-शिवाचे मिलन” ही ब्रह्मांड व्यवस्थापनाची योजना असल्याचे म्हटले आहे. या योजनेसाठी मानवी देह हेच माध्यम असल्याचे वारंवार सांगितले आहे. म्हणून प्रथम शरीराचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. विशेष करून सत्ता, संपत्ती आणि संतती याच्या मागे दमछाक करून घेणार्या जीवास आपण कोण? कुठुन आलो? आपल्या जन्माचे प्रयोजन काय? हे व असले प्रश्नच पडत नाहीत. तिथे मग या प्रश्नांची उकल ही दूरवरच राहते. समर्थ रामदास स्वामी राम मंत्राच्या श्लोकात म्हणतात, तुला ही तनु मानवी प्राप्त झाली। बहु पुण्यकर्मे फळालागी आली। । तिला तू कसा गोविसी विषयी रे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे। । बहु जन्मांची पुण्याई कामी येते तेव्हा मनुष्य जन्माची प्राप्ती होते. अनेक जन्माच्या पुण्याईची किंमत चुकवून हा देह प्राप्त झाला आहे. अस म्हणतात की एखाद्या गोष्टीबद्दल किंमत चुकवावी लागली न की आपण तिची फार काळजी घेतो. पण देहाच्या बाबतीत असे फार क्वचित बघायला मिळते. ईश्वरान आम्हाला भरजरी पोताच महावस्त्र दिलय अन् आम्ही त्याच पोतेर करून टाकलय. अस व्हायला नको. मथितार्थ हाच की, देहाचे मोल समजले पाहिजे. ज्याला समजल तो श्रीगुरूंना शरण जातो. ते कृपा करतात. अनुग्रह देतात. उपासना देतात. ती वाढीस लागली की विवेक जागा होतो. विवेकामुळे जीवनाचे प्रयोजन समजते. जीवाला ब्रह्मांडतत्त्वाचा विशेषाविशेष कळतो. निसर्ग व पंचहाभूतांचा शरीरावर होणारा परिणाम समजुन यायला मदत मिळते. आत्मोन्नतीची तळमळ वाढीस लागते. ब्रह्मांडतत्त्व समजवून घेण्यापासून जीवा-शिवाच्या मिलना पर्यंतचा हा विकास क्रम आहे. तो श्री सद्गुरूंच्या मार्गदर्शनातच पूर्ण होतो.
5. माझे जीवन माझ्या इच्छेने, मताप्रमाणे, म्हणण्या प्रमाणे, विचाराने, धोरणा प्रमाणे मला जसे हवे तसे सुरळीतपणे ठरविलेल्या लक्ष्या पर्यंत का जात नाही? माझ्याच जीवनात नेहमीच कमालीची अस्वस्थता, अशांतता का असते? अशा प्रश्नांचा आपल्याला त्रास होत असतो. कधीकधी आपल सुरळीत नाही यापेक्षा दुसर्याच कस व का सुरळीत आहे याचा तर आपल्याला खुपच त्रास होत असतो. पण आपण हे लक्षात घेत नाही की, या ब्रह्मांड व्यवस्थेत मनुष्य हा अत्यंत अगतिक व निर्बल आहे. श्री सद्गुरू त्याची ही दयनीय स्थिती बदलवून अभिनंदनीय करू शकतात. त्यासाठी आत्मोन्नती साधना आहे. साधनेत श्री सद्गुरूंचे सेवा सान्निध्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपण त्यांचा आश्रय न घेता आपल्या मनाला येईल तसे कर्म करित असतो. इतकच नव्हे तर मनाला येईल त्यांना गुरू मानीत असतो. श्री सद्गुरू चरणांचा आश्रय हा नेहमी अंतःकरणपूर्वकच घेतला पाहिजे. तिथे बुध्दीचे मुळीच काम नाही. अंतर्मनाला भावतील तेच सद्गुरू! त्यांच्या कृपा मार्गदर्शनात निसर्ग व पंचमहाभूतांशी प्रामाणिक राहणे व उपासना कर्म करित राहण्यालाच अग्रक्रम दिला पाहिजे.
6. ईश्वरानी हे जन्म-मरणाच रहाट गाडग का फिरवत ठेवलय? या प्रश्नाच आपण जरूर चिंतन केले पाहिजे. मानवी जन्म हा जीवाला मुक्त होण्यासाठी मिळालेली संधी आहे जन्म हा मौज मजेसाठी नाही. विषयांमध्ये गुंतविण्यासाठी तर नाहीच नाही. आत्मा उन्नत करण्यासाठी मिळालेल हे वरदान आहे. “आत्मा उन्नत कर आणि जीव मुक्त कर” हेच परमेश्वर सांगत असतो. हाच तर त्याचा खेळ आहे. ईश्वराने सर्वांनाच कोणताही भेदभाव न करता हे अभयदान दिले आहे. “जगी पाहता देव हा अन्नदाता। तया लागली तत्त्वता सार चिंता। तयाचे मुखी नाम घेता फुकाचे। मना सांग पा रे तुझे काय जाते। । प. पू. श्री नरेंद्र नाथ महाराज आत्मोन्नती साधनेतून आम्हाला हेच सांगत आहेत. साधनेतुन त्यांनी आपल्याला समर्थांच्या मनोबोधाचादाखला दिला आहे. पण वास्तव हेच आहे की, जे स्वल्प, सोप, फुकाच असत त्याची आपल्याला किंमत नसते. ज्यान आपल्याला मुक्तीच अभयदान दिल त्या परमेश्वराची साधी आठवण देखील आपण काढत नाही.
7. सात लेखांमध्ये आपण आत्मोन्नती साधनेची पृष्ठभूमी पाहिली. नाथशक्तिपीठाधीशप. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी ही साधना सप्तवारांमध्ये दिली आहे. रविवारच्या साधनेपासून पुरश्चरण अथवा पारायण सुरू करावे. रविवारच्या साधनेत ब्रह्मांड निर्मिती, सोमवारी -चाले हे शरीर कोणाचिये सत्ते, मंगळवारी- आत्मोन्नती, बुधवारी -मी दैवाधीन अशांत का आहे, गुरूवारी -संत चरण रज लागता सहज, शुक्रवारी -कोणी नसे रे तारक गुरूविण, शनिवारच्या साधनेमध्ये जीवनाचे प्रयोजन काय? या विषयांचे सखोल चिंतन केले आहे. ईश्वरावर योगक्षेमाचा अवघा भार टाकावा आणि निःशंक व निश्चिंतपणे त्याच्या भक्तीमध्ये रममाण व्हाव. तोच ब्रह्मा-विष्णू-महेश्वर श्री सद्गुरूंच्या स्वरूपात या पृथ्वीवर अवतरला आहे. साधकासी श्री महाराज ही सूचना देतात. सारांशाने ही आत्मोन्नती उपासना आपल्याला सांगते की, १) ब्रह्मा-विष्णू-महशाने हा ब्रह्मांड व्यवस्थेचा खेळ मांडला असून हीच त्रयमूर्ती सद्गुरू स्वरूपात आपला उध्दार करण्या करीता अवतीर्ण झाली आहे. २)जीवनाचे प्रयोजन आत्मा उन्नत करून जीवास मुक्ती देणे हे आहे. ३) मुक्तीसाठी विवेक जागा व्हावा लागतो. श्री सद्गुरूंनी सांगितलेल्या कर्म उपासनेद्वारा विवेक जागा होतो. ४)विवेक जागा झाला की चित्त, वृत्ती, सतेज होऊ लागतात. ५) या साधनेन श्री सद्गुरू अनुग्रहितांच्या आत्मोन्नतीची गती वाढेल६) तसेच साधनेन जे अनुग्रहित नाहीत त्यांना श्री सद्गुरूंची प्राप्ती होईल. ७) ब्रह्मांड तत्त्व, जीवा-शिवाशी नाते समजुन घेण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता असते. ८) आत्मज्ञान देण्याचा अधिकार केवळ श्री सद्गुरूंनाच आहे. ९) ब्रह्मांडतत्त्वानुसार सर्वच जीवांच्या उध्दाराचे अभय दान ईश्वराने दिले आहे. १०) जीव त्याच्या संचित कर्मानुसार जन्माला येतो. ११) जीवाला कर्माचे माध्यमातूनच आत्मा उन्नत करून मुक्त करावा लागतो. १२) ईश्वर संचित, प्रारब्ध व भोगात बदल करित नाही. १३) संचित, प्रारब्ध भोगास बदलविण्याची क्षमता श्री सद्गुरूंमध्येच आहे. श्री सद्गुरू ही ब्रह्मांड व्यवस्थेतील सर्वोच्च, सार्वभौम अशी शक्ती आहे.
8. आत्मोन्नती साधना हा ब्रह्मांड निर्मात्याशी असलेला संवाद आहे. ज्या मुळे वाद तुटतो तो संवाद. असा संवाद हितकारी ठरतो. समर्थ म्हणतात, “तुटे वाद तो संवाद हितकरी। ” आज सर्वत्र संवाद संपलाय. अहंकारमुळे माणसं एकमेकांशी साध बोलायलाही तयार नाहीत. ही भयावह वस्तुस्थिती आहे. रविवारच्या साधनेची सुरूवात करतांनाच सावध करण्या साधकासी। रचिली आत्मोन्नती साधना। । असे म्हटले आहे. अहंकारापासून सावध व्हा! हाच तो श्री नरेंद्रनाथांचा इशारा आहे. पुढे आत्मोन्नती साधना आम्हाला विचार करायला भाग पाडते. पृथ्वीवरील माणूस मी पणाची शेखी मिरविण्यात फारच पटाईत. पण ईश्वरी सत्तेपुढे शेवटी तो निर्बल व अगतिकच आहे, हेच खर! काय आहे त्याच्या हातात? ना जन्म ना मरण. जीवनातील अवघी कमाई, तीही इथेच राहते. त्याचे सोबत येते ते त्याच कर्म. आत्मोन्नती साधना सांगते सत् प्रवृत्त, सत्शिल, सज्जन, विवेकी होण्यासाठी जे केल्या जात ते कर्म. शरीर, मन, बुध्दी, आत्मा यांच्या उन्नतीसाठी केल्या जात ते कर्म. कर्म करा, कर्म करा. शरीर शुध्द करून आत्मा उन्नत करण्यासाठी कर्म करा. कर्म करण्यासाठीच तर तो जगदीश आम्हाला जन्माला घालतो. श्री सद्गुरूंच्या कृपा मार्गदर्शनात असे अनंत जन्म कर्मरत रहा. मग एखादा जन्म असा येईल की त्यामध्ये शरीर शुध्द होईल. जीव उन्नत होईल. अन् आत्मा मुक्त होईल.