16. विवेकप्रिय व विचारी लोकांचे अशी द्वापार युगाची ओळख होती. शास्त्रानुसार युगाचा काळ ८ लक्ष ६४ हजार वर्षांच होत. माणसाचा आकार सरासरी ८ हातांचा झाला होता. चौथे वर्तमान कलियुग. हे ४ लक्ष ३२ हजार वर्षांचे आहे. युगातील माणूस सरासरी ४ हातांचा आहे. कलीच्या प्रभावे बहुतांश लोक स्वंच्छंदी - स्वैराचारी वृत्तीचे असतील. या युगात खोटेपणा, कपट, आळस, झोप, हिंसा, शोक, मोह, भय, आणि दीनता भरपूर प्रमाणात पहावयास मिळेल. ब्रह्मदेवांची युग रचना ही अशी आहे. ती अपरिर्वतनीय आहे. तीन युगांच्या तुलनेत कलियुगाची जडण-घडण विचित्रच झाली अस ब्रह्मदेवांच्याही लक्षात आल. यावरील उपाय म्हणून प्रखर सामर्थ्यशाली असणार्या नाथ पंथाची निर्मिती झाली. तारणहार नाथपंथ”कलियुगातील जीवन नियंत्रित असावे, जन जीवनावरील कलिचा प्रभाव सौम्य व कमी करावा, या दृष्टीने स्वतः श्री विष्णूंनी नाथपंथाची योजना केली. नाथपंथाची ही योजना झाली नसती तर कलियुगाचे भयानक गंभीर परिणाम सामान्य माणूस सहन करू शकला नसता. ब्रह्मांड व्यवस्थेत उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्थांच्या नायकांनीच या पंथाची योजना केली आहे. ही ईश्वरी योजना आहे. नाथ पंथाने सूर्यमंडल, नक्षत्र, तारांगण, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या ब्रह्मांडातील घटकांचा विचार केला आहे. पृथ्वीवरील व आकाशाखाली असणारा जीव व त्याची उन्नती हाच नाथ पंथाचा विषय आहे. लोककल्याण हा उद्देश्य आहे. पंथाचा संबध सृष्टीशी, युगाशी, युगातील प्रजेशी, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी आहे. कलिच्या दुष्परिणांमा पासून स्वतःला दूर ठेवत, सत्प्रवृत्त, सत्शील व सज्जन होऊन आत्मोन्नती कशी साधावी हाच पंथ मार्गदर्शनाचा विषय आहे. याच तळमळीपोटी नाथगुरू श्रीनरेंद्रनाथांनी आत्मोन्नती साधनेचा प्रपंच केला आहे.
17. ब्रह्मा करी उत्पत्ती, विष्णू नियोजि ब्रह्मांड स्थिती। विलयाची कार्य व्याप्ती, महेशाची असे हो। वेदमंत्राच्या आधारे श्री ब्रह्मदेवांनी जीवसृष्टी साकारली. या अलौकिक ब्रह्मांडाचे नियंत्रण त्रैयमूर्तीकडे आहे. ब्रह्मा-विष्णू- महेश हेच अवघ्या निसर्ग आणि जीवसृष्टीचे मालक, चालक व पालकही आहेत. आत्मोन्नती साधना या ब्रह्मांड व्यवस्थेची घडी आपल्याला समजवून सांगते. अशा रितीने ब्रह्मांडाचे अस्तित्व पूर्णतः ईश्वरी इच्छेवर निर्भर झाले. ब्रह्मांड योजनेत मानवाला आपले जीवन सुखी कराचे असेल तर आत्मोन्नती साधनेतून श्री नरेंद्रनाथांनी युक्तिच्या गोष्टी सांगितल्या आहेत. “ सूर्योपासना जो करील, जीवन त्याचे सुखी होईल। दीर्घायुरारोग्य विविध गुण, लाभे सूर्या प्रार्थिता “। सूर्य हा ब्रह्मांडाचा प्राण आहे. आत्मा आहे. “आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने। जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायेते। । सूर्य नारायणाला केवळ नमस्कार जरी केला तरी हजारो जन्म दारिद्र्य येत नाही. शिवाय “आरोग्यम् भास्करादिच्छेत ” सूर्याकडून आरोग्याची कामना करावी असे शास्त्र सांगते. ऐका श्रोते सकळ जन, ग्रह नक्षत्र तारांगण। तैसेच पंचमहाभूते जाण, अंस्तंगत सूर्याच्या। (आत्मो. साधना ४७. ) म्हणून हे मानवा सूर्योपासना महत्त्वाची! ती कर. जन्मोजन्मीच्या हाल-अपेष्टा, दुःख-कष्ट नाहीशी होतील. हाच श्री नरेंद्रनाथांचा संदेश आहे.
18. वाटे जरी नसावे दुःख कष्ट नी भोग, शोधावे त्याचे उगम। आपल्याला प्राप्त झालेल दुःख कष्ट नी भोगास आपले आचार-विचार-कर्म जबाबदार असतात. ही त्रिवेणी आपल्या जीवनातील सुख-दुःखाच उगमस्थान आहे. ज्यांचे जीवनात स्वर्गोपभोग असतील त्यांनी हे आपल्या पूर्व पुण्याईच फळ आहे, हे लक्षात घ्याव. सुख -सुबत्तेचे-ऐश्वर्याचे सोहळे उपभोगतांना अधिक सावध व्हाव. जीवनात जरी असले स्वर्गसुख, जाणावे हे पूर्वपुण्याचे फळ। आपले आचार, विचार, कर्म तसेच आपल्या चित्त, वृत्ती, प्रवृत्ती याचा प्रवाह जाणीवपूर्वक स्वच्छ ठेवावा. इथे प्रदुषण खपवून घेतल्या जात नाही. शरीर शुध्दीचे व आत्मा उन्नतीचे कर्म करित रहावेच लागते. अन्यथा आत्मोन्नती साधना सांगते की, न करशील सायास आत्मोन्नतीचा, र्हास होई पूर्व पुण्य संचिताचा। उपभोगात मग्न राहिलात तर पुण्याईचा ठेवा संपेल. पुढील जन्म पुन्हा दुःख-कष्टाचेच असतील. यावर कुणी अशीही शंका घेईल की, याचा अर्थ स्वर्गोपभोग घेऊच नयेत का? सुखावर आमचा अधिकार नाही काय? या प्रश्नावर, पुण्याईचा ठेवा वाढविण्याची युक्ती श्री नरेंद्रनाथ सांगतात. स्वर्गोपभोग घ्या पण त्यात गुंतू नका. जीवाने सद्गुरूंच्या सेवेत रहाव. इंद्रियांची गुंतवणूक भक्तीत करावी. आपल चरित्र्य व चारित्र्य उज्ज्वल ठेवाव. अशान पुण्याईचा ठेवा निरंतर वाढत राहिल.
19. पशु देही नाही गति, ऐसे सर्वत्र बोलिती। म्हणौनि नरदेहिच प्राप्ति, परलोकीची। या सूत्रातील 'म्हणौनि' या शब्दाला विशेष महत्त्व आहे. नरदेहाच्या प्राप्तीची महती, वेगळेपण हा शब्द सांगतो. मनुष्य सोडून या सृष्टीवर लक्षावधी जीव आहेत. एक मनुष्य सोडला तर कुठलाही सजीव प्राणी आहार, निद्रा, भय, मैथुना पलिकडे व्यवहार करित नाही. ते सर्व या सामान्य चौकटीत अडकले आहेत. म्हणून परमार्थात त्यांना गती नाही, सद्गती नाही. नरदेहाची प्राप्ती ईश्वरी कृपा आहे. आत्मोन्नतीची संधी आहे. या संधीच सोन केल पाहिजे ही जाणीव विकसित करण्याच काम विवेकाच आहे. विवेक हा दृष्टीचा डोळा आहे. मनुष्यत्वाची ओळख आहे. विवेकामुळेच इतर प्राणी मात्रांपेक्षा तो श्रेष्ठ आहे. विवेके क्रिया आपुली पालटावी अस समर्थ म्हणतात ते उगाच नव्हे. पण माणसातील हा विवेक सहजा सहजी जागा होत नाही. या साठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. ब्रह्मांड व्यवस्थापनाच वैशिष्ठ्य समजुन घ्या. ईश्वर इच्छा बलियसी हे या ब्रह्मांडाच अंतीम सूत्र आहे. पण ईश्वर आपल्या संचित -प्रारब्धात बदल वा हस्तक्षेप करित नाही. ब्रह्मांडाच संचलन, नियंत्रण ईश्वरानी दत्त स्वरूप श्री सद्गुरूं कडे सोपविले आहे. सद्गुरू त्याला सत्प्रवृत्त, सत्शील, सज्जन करतात. त्याच्या चित्त, वृत्ती, प्रवृत्तीचा ओघ भक्तीकडे वळवितात. त्याचे कडून शरीर शुध्दीचे, आत्मा उन्नत करणरे कर्म करवून घेतात. पण हे करवून घेतांना ते स्वतःचा उदोउदो करित नाहीत. भगवंताच्याच नामाची उपासना देतात. त्याचेच नाम वाढवितात. विवेकाने समजून रहावे, आत्मा विकसित रहावे। घ्यावे मार्गदर्शन गुरूंचे, वर्षाव होण्या ईश्वरकृपेचे। आत्मोन्नती साधना म्हणते की, सत्कर्म करशील जरी तू, तरीच जीव सुुटेल भोवर्यातूनी। कर्म करणे तुझ्या विवेकावर, तू ठरव तुझी दिशा। । आपली दशा होऊ द्यायची की सद्गुरूंच्या मार्गदर्शनात जीवन प्रवासाला दिशा द्यायची हे आपल्यालाच ठरवावे लागेल.
20. धन ऐश्वर्य समृध्दी, मायेची झाली वृध्दी। जन समुदाय प्रसिध्दी, राहे सर्वथा येथीची। । आत्मोन्नती साधना सांगते की ब्रह्मांड निर्मिती पासून जीवाशिवाचे मिलना पर्यंतच्या विषयांची मांडणी सातवारात केली आहे. घागर मे सागर असे आत्मोन्नती साधनेचे स्वरूप आहे. बहु जन्म पुण्ये फळालागी आली तेव्हा मनुष्य देह प्राप्त झाला. तो सार्थकी लागला पाहिजे. आत्मोन्नती ही केलीच पाहिजे. ही काळजी स्वतःलाच करावी लागणार आहे. ईश्वरानी आम्हाला सजीव सृष्टीमध्ये श्रेष्ठतम केल. मन, बुध्दी दिली. पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय दिलीत. विवेक दिला. चित, वृत्ती, प्रवृत्ती दिली. अन् आम्ही मिळालेल्या अनमोल देहाची गुंतवणूक विषयांमध्ये केली. प्रपंच सर्वतोपरि मानला. त्यासाठीच काबाडकष्ट उपसले. सत्ता, संपत्ती, संतती पाठी स्वतःची लांडगेतोड करवून घेतली. मोठा व्याप केला. अन् स्वतःचा संताप तेवढा वाढविला. ज्यावेळी हातापायातील बळ सरून गेल, दृष्टी अधू झाली, कान बधीर झाले, शरीरास कापर भरल, तेव्हा कळल की प्रपंच नावाचा व्यवहार खोटा आहे. जन्म नावाची अपूर्व संधी आपण वाया गमावली. लहानपणी बाहुला -बाहुलींना सजवल. तारूण्यात स्वतःला नटवल. आयुष्याचे श्वास संपण्याची वेळ आली. तेव्हा आठवल, तेवढ अंतरात्म्याला सजवण्याचे बाकी राहिल आहे. पण वेळ निघून गेलेली असते. सार कमावलेल इथेच सोडून जाव लागते. हा अनुभव कोरोनाच्या काळात आपण सर्वांनीच घेतला आहे. महावस्त्र आहेत पण नेसता येत नाहीत. दागदागिने आहेत पण घालता येत नाहीत. सार काही पेटीच धन. महाल असो वा झोपडी सारेच नजरकैदेत आहेत. जे गेलेत त्यांच्या सोबत कुणीही नाही. पूर्वी म्हणायचे, बायको दरवाज्या पर्यंत, मुल बाळ, आप्त- गणगोत स्मशानापर्यंत, लाकड राख होईपर्यंत सोबत करतील …पण हेही समीकरण बदलल. घरातून बाहेर पडला की कुणीच नाही. आपल जगण- मरण केवळ ईश्वरी इच्छा. इथे सारेच वशीले कुचकामी. तेव्हा सज्जनहो शरीर शुध्द करून आत्मा विकसित करण्यार्या कर्माकडे लक्ष द्या. श्री सद्गुरूंना शरण जा. तरच आपले कल्याण आहे.
21. उध्दारार्थ जीवा जन्मा आलासी, देह, बुध्दी, मन घेऊनी। उध्दरण्या प्रयत्न न करसी, जन्मो जन्मी व्यर्थ शिणसी। । श्री सद्गुरूंच मार्गदर्शन घ्याव. शरीराची शुध्दि करावी. आत्मा उन्नत करावा. ही ब्रह्मांड व्यवस्थापनातील ईश्वरी योजना आहे. या योजनेनुसार मनुष्य जन्म ही त्यानी दिलेली संधी आहे. ज्यानी संधीच सोन केल तो जिंकला. अन्यथा आयुष्याची माती अटळ आहे. लक्षात घ्या, संधी दुसर्यांदा दरवाजा ठोठावत नसते! आमची इंद्रिय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मन हा इंद्रियांचा राजा. मनाचा स्वभाव चंचल खरा पण त्याचा एक गुण आहे. ते ज्याच्यात गुंतवल तिथेच गुंतते. मनाला आवर घातला नाही की ते स्वैर उधळते. इंद्रियांची आम्ही गुंतवणूक करायची ते आमच मुळी ऐकत नाहीत. आमचे वर स्वार होतात. बुडत्याचे पाय डोहाकडे अशी ही अवस्था असते. माऊली ज्ञानेश्वरांनी यावर मार्मिक भाष्य केल आहे. ते म्हणतात, इंद्रिय जे जे म्हणती। ते तेचि जे पुरूष करिती। ते तरलेचि ना तरति। विषयसिंधू। । हे पहा, विकार विषयाकडे खेचतात. विषयात ध्यान पक्क होत. वासना वरचेवर डोक काढते. वासना क्रोधाला जन्म देते. क्रोधान विवेक नाहीसा होतो. विवेकच नाही तर भगवंताची स्मृतीही नाही. देवाचा विसर म्हणजे बुध्दीचा नाश. आणि बुध्दीचा नाश म्हणजे सर्वनाश. असा सर्वनाश ओढवून घेण्यापेक्षा त्या नारायणालाच विषयांचा विषय बनविल पाहिजे.
22. आवरा षड्रिपुंना वेळीच नाश करिती जीवाचा शरीर शुध्द करा. आत्मा उन्नत करा. हे श्री नरेंद्रनाथांच परोपरीन सांगण आहे. हाच आत्मोन्नती साधनेचा गाभा आहे. शरीर शुध्द करा हे नाथांच्या सूचनेतील पूर्वपद. आपण जस जन्माला आलो तस मरेपर्यंत राहिलो पाहिजे. याचा अर्थ निरागस राहता आल पाहिजे. सुसंगती जडली पाहिजे. षड्रिपूच्या कुसंगतीन शरीर मळत. निरागस देह कुरूप होतो. आत्मा उन्नत करायचा असेल तर शरीर शुध्द पाहिजे. शरीर वेष्टन असे आत्म्याचे आत्मा वास करी शरीराते. । शरीर आपल्याला आत्मा उन्नत करण्यासाठी मिळालेल साधन आहे. साधन कस ठेवाव? नित्याच्या व्यवहारातील उदाहरण पाहू. पाणी प्यायच असल तर, हात स्वच्छ धुवून घ्या. ज्या फुलपात्रान पाणी प्यायच असेल ते स्वच्छ घासून, विसळून घ्या, पुसून घ्या. आपण केवढे साशंक असतो. जागरूक असतो. पाणी पिण्याच्या वेळी घेतलेली ही खबरदारी. देह हा ब्रह्मरसाची मुस आहे. ज्या शरीराचे माध्यमातून ब्रह्मांडनायक ही पदवी मिळवायची आहे तो देह किती शुध्द असला पाहिजे. हा विचार महत्त्वाचा. त्यासाठी बुध्दीला निश्चयात्मक बनव. ती सत्याचा कैवार, पक्ष घेणारी असू दे. तिला कुसंगतीन बिघडवू नको. विषयांच्या सक्तीमुळे ती ईश्वर चरणी स्थिर होत नाही. मनाचही तसच. या देहामधील मन हे श्री सद्गुरूंच्या चरणी स्थिर करायच. अमाप सुख मिळत. तुकोबाराय म्हणतात. मना तेथे धाव घेई। राहे विठोबाचे पायी। विठोबाच्या पायी राहणार्या मनात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असेल तर श्री चरणी आपण ते वाहू शकु का? आधी तो केर काढ. मन स्फटिक कर. स्वच्छ नि पारदर्शी कर. मन सर्व इंद्रियांचा राजा आहे. त्याला विकाराच गुलाम बनवू नको.