23. केले कर्म कोरले जाई, सुखदुःखे लिहिले जाई। अंतरात्म्यावरी बीजरूपे। स्वरूपे। । प. पू. श्री नरेंद्रनाथांचा सर्वाधिक भर कर्मावर आहे. शास्त्र वचनाचा हाच दाखला आहे. सुखं, दुःखं, भयं, शोको हर्षो मंगलमेव च। संपत्तीश्च, विपत्तीश्च। सर्व भवतु कर्मणा। । आपले जीवनमान, राहणीमान, सांपत्तिक स्थिती, संकट, सुख, दुःख, भय, शोक, आनंद, दारिद्र्य, …या सर्व गोष्टी कर्माचाच परिणाम आहे. इतकेच नव्हे तर आचार विचार, स्वभाव, योग आणि भोग हेही कर्माचाच परिणाम आहेत. यावर कुणी असाही प्रतिप्रश्न करेल की जर, सुखं, दुःखं, भयं…. हे सर्व कर्माचा परिणाम आहे तर, आम्ही या जन्मी योग्य कर्म करतो. आताच्या आताच आमच्या परिस्थितीचा कायापालट झाला पाहिजे. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी कर्माच्या संदर्भातील आपला गैरसमज दुर करतात. ” पी हळद अन् हो गोरी ” असा न्याय इथे लागू पडत नाही. प्रत्येक वाल्याचा महर्षि वाल्मिकी होत नाही. त्यांना देवर्षि श्री नारद मुनी भेटले. त्यांनी सद्गुरूंच्या भूमिकेतून त्याचा विवेक जागृत केला. त्यांचे कडून जप अनुष्ठान करून घेतले. या कर्मामुळे ते साहित्य जगतातील सर्वश्रेष्ठ रामायण या संस्कृत महाकाव्याचे रचियता झाले. हा त्यांचा दैवयोग होता. पण साधारण पणे आपल्या सर्वांना असेच वाटते की, तुप खाल्याबरोबर रूप याव. एकाच जन्मातील आपल्या कर्मानी आपले पूर्वसंचित आणि व्यक्तिमत्व बदलल्या जात नसते. आपले आचार विचार, स्वभाव, योग, भोग, बदलविणारी ही प्रक्रिया अतिशय धिम्या गतीची असते. अनंत जन्म घालविल्या नंतर कुठे हे शक्य आहे. याचा अर्थ आपण असा काढला पाहिजे की, माझ भाग्य की मला या जन्मी मनुष्य देह मिळाला. त्याहून अधिक भाग्य हे की, माझे योग आणि भोग बदलले पाहिजेत, माझे हातून योग्य कर्म घडल पाहिजे, परमार्थ घडला पाहिजे याची मला जाणीव झाली. आणि महद्भाग्य हे की मला श्री सद्गुरूंंचा कृपाप्रसाद मिळाला. त्या योगे मी योग्य कर्म- उपासना दृढपणे करेल. तसेच सत्शील, सप्रवृत्त होऊन माझी प्रगती करेल. या जन्माची मिळालेली अपूर्व संधी सार्थकी लावेल. व पुढील जन्म ही सुधारेल. आत्मोन्नती साधना आम्हाला हाच वस्तुपाठ देते. कर्माचा संस्कार हा आमच्या आत्म्यावर कोरला जाणार आहे. व हे सर्व बरे वाईट जे ही संस्कार असतील ते माझ्या पुढील जन्माची खोळ ठरविणार आहे.
24. आत्मा शुध्द करावया, शरीर दिले मानवा। बरह्मांडाची हीच योजना, शरीराद्वारे आत्मोन्नती आत्मा शुध्द करावया, शरीर दिले मानवा। ब्रह्मांडाची हीच योजना, शरीराद्वारे आत्मोन्नती। । (आत्मो. साधना)कर्म, जाणतेपणी घडो अथवा अजाणतेपणी त्याचा परिणाम होणारच. आपल्या दैनंदिन कर्माचे आपल्या आत्म्यावर संस्कार होत असतात. शरीर शुध्दीसाठी अन् आत्म्याच्या उन्नतीसाठी नेमक्या कर्माची आवश्यकता श्री सद्गुरूच सांगु शकतात. त्यांच्यायोजनेनुसार कर्म कराव. ते नेमक व उदात्त असल्यामुळे त्याचे संस्कार आत्म्यावर कोरल्या जातात. अशा कर्माची योजना जीवनाला आकार देते. म्हणून श्री सद्गुरूंच्या अनुग्रहाला महत्त्व आहे. त्यांनी दिलेल्या हरिनामाने, जप- तपाने, उपासनेने, उपवासाने हे शरीर जो जितके तापविल्या जाईल, तितके ते शुध्द होत जाते. हेच मुळी तप आहे. तप-तपश्चर्या, उपवास, उपासनेची बैठक या आपल्यासाठी कसोट्या असतात. त्यावर आपण किती खरे उतरतो हा आपल्या चिंतनाचा विषय ठरला पाहिजे. शरीर शुध्द करण्यासाठी व आत्मा उन्नत करण्यासाठी श्री सद्गुरूंचे सान्निध्य त्यांची सेवा लाभली पाहिजे. श्री सद्गुरूंच्या सेवा- सान्निध्याने जीवाला अद्भूत सामर्थ्य लाभते.
25. देह असे पाचा भुतांचा कर्ता आत्मा तेथिचा। देह असला जरी माझा, स्वामित्व नसे माझे। । प. पू. श्री नाथशक्तिपीठाधीश नरेंद्रनाथ महाराज विरचित आत्मोन्नती साधना हे गुरूकृपांजन आहे. या कृपांजनामुळे डोळ्यास नुसती दृष्टी लाभत नाही. दृष्टीचा डोळा लाभतो. आत्मोन्नती साधण्याची गुरूकिल्ली या साधनेतून त्यांनी दिली आहे. ही श्री नरेंद्रनाथांची गुरूकृपा. साधनेतुन परखडपणे आमचा दृष्टीदोष घालविला म्हणून झणझणीत अंजन. असे हे गुरूकृपांजन आहे. देह असे पाचा भुतांचा कर्ता आत्मा तेथिचा। देह असला जरी माझा, स्वामित्व नसे माझे। । आत्मोन्नती साधनेतील या ओव्या आमच्या डोळ्यावरील झापड काढून टाकतात. धुंदीही उतरवतात. गर्भावस्थेपासूनच आमचेवर देहाचेच संस्कार होत असतात. देह कसा असावा. कसा जोपासावा. कसा सजवावा. याचीच चर्चा आम्ही ऐकत असतो. सर्व संस्कार कुडीचेच. केशभूषा, वेशभूषा या बाबत आम्ही नेहमीच काळजी घेतो. चांगल दिसण यावर सारा भर. चांगल असण हे दुय्यम ठरते. देह हा सच्चिदानंद ही पदवी घेण्यासाठी मिळालेल साधन आहे. याचा आम्हाला विसर पडतो. यामुळे साधन असलेल हे शरीर साध्य होत. प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात, देह पाचा भूतांचा बनलेला. या सृष्टीतील सर्व जीवांमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश हे पाच तत्त्व असतात. कोणताही सजीव याला अपवाद नाही. आत्मा याचा कर्ता. या आत्म्यावर कर्माचे जे संस्कार कोरल्या जाणार आहेत ते कोरण्याच साधन म्हणजे देह. सर्व कर्म हे शरीर करेल. परंतु आम्ही कर्ता असलेल्या आत्म्यापेक्षा कर्माच साधन असलेल्या शरीराच्या कौतुकात रममाण होतो. शरीराच पोषण -तोषण करण्यात आपली सारी शक्ती, बुध्दी, युक्ती पणाला लावतो. आपल्या हे लक्षात येत नाही. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी या ओव्यातून नेमकी चूक अधोरेखित केली आहे. हा देह माझा असला तरी त्यावर माझे स्वामित्व नाही. ” हे सूत्र समजवून घेण्यासाठी आपण नित्याची उदाहरणं पाहू या. व्यावहारिक दृष्ट्या आपण असे म्हणतो की, हे घर माझे आहे. याचा मालक मी आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, घर माझे आहे, पण मी म्हणजे घर नाही. मी जेव्हा हे जग सोडून जाईल तेव्हा ते सोबत घेऊन जाता येणार नाही. घरच काय ज्याही व्यक्ति व वस्तु आपण माझ्या आहेत, मी त्याचा मालक आहे म्हणून सांगत असतो त्या सर्व इथेच माघारी राहतात. इथेच आपण सांगत आलेला मालकी हक्क खारिज होतो. खर तर आपण आयुष्यभर या चीजवस्तुंची फुकट राखणदारी करित असतो. आणि त्या चीजवस्तु म्हणजे मीही नसतो. तसेच देहाचे आहे. आत्मोन्नती साधना या वस्तुस्थितीची जाणीव करून देते. मुळात शरीर ही पाचाभुतांची उसनवारी. जे पंच महाभूतांकडून घेतले ते आपल्यातील चैतन्य संपल की पंचतत्त्वात विलिन होत. अविनाशी आत्मा हा आकाश मार्गे भ्रमण करीत राहतो. भ्रमण करीत असलेला हा आत्मा त्यावर कोरल्या गेलेल्या संस्काराला अनुरूप अशा शरीराच्या ठाव ठिकाणा शोधत राहतो. भ्रमण करित करित आत्मा मातेच्या उदरी जाई। पुनरपि जन्मा येई नवमास पूर्ण होता. जन्म घेत रहा. जन्म घेत रहा. तेव्हा कुठे तरी कुठल्या जन्मात शरीर शुध्द होईल आणि आत्मा उन्नत होईल. देह त्यागा उपरी तो चि आत्मा, भ्रमीत राहे जन्मोजन्मी। लिहित राही केले कर्म, शुध्द आत्मा होई पर्यंत। । आत्म्याच्या या भ्रमण यात्रेला केव्हा विराम मिळतो? या प्रश्नाच उत्तर साधनेच्या या ओव्या देतात. आत्मा शुध्द झाल्याशिवाय या भटकंतीला विराम नाही. तर मग चला मिळालेला हा जन्म अपूर्व संधी प्रत्येक जीव परमात्म्याचा अंश आहे. त्या मुळे जीवाला त्याचा जीवन प्रवास माहित आहे. असे असूनही जीवाची भटकंती होते. जीवन नौका भरकटते. परमात्याशी अनुसंधान तुटण्यानी अस होते. जीवाने परमात्म्याशी अनुसंधानात असलेच पाहिजे. अनुसंधानासाठी कर्म केल पाहिजे. कर्मानी परमात्म्याशी एकरूपता साधल्या जाते. भटकंतीमुळे जीव योग-भोगाच्या फेर्यात अडकून राहतो. जो पर्यंत शरीर शुध्द होऊन आत्मा उन्नत होत नाही तोवर पुनरपि जननम् पुनरपि मरणम् पुनरपि जननी जठरे शयनम्। आलाच. जन्म मृत्यूच रहाट गाडग फिरतच राहणार. ब्रह्मांडाची हीच योजना आहे. या योजनेमध्ये किती जन्म घ्यायचे, किती भटकंती करायची हे ज्याच त्यानी ठरवायच आहे. मानु या. श्री गुरूमार्गी होऊ या. आत्मा उन्नत करणारे कर्म करू या.
26. सांग रे बा मानवा, चाले हे शरीर कोणाचिया सत्ते? । स्वामी कोण ब्रह्मांडाचा? आत्मोन्नती साधना आपल्यापुढे चिंतनासाठी प्रश्न मालिका ठेवते. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी या ओव्यां मधून तीन प्रश्न विचारले आहेत. पहिला, हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते? दुसरा, या ब्रह्मांडाचा स्वामी कोण? आणि तिसरा तुला कोण बोलवितो? या प्रश्न मालिकेस जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचा संदर्भ आहे. ही प्रश्न मालिका पुढील अहंकाराच मूळ समूळ उपटून टाकणारी आहे. कोण हालवी वृक्षाची पाने? विचार करी मानवा. विचारा अंती लक्षात येत की अरे हो, माझ्या म्हटल्या प्रमाणे तर झाडाच पानही हालत नाही. क्षुल्लक असा तो पाला-पाचोळा माझ ऐकत नाही. तर माझ शरीर माझ्या सत्तेन कस चालत असेल. माझी इंद्रिय माझ ऐकत असतील का? त्यांचेवर माझ नियंत्रण असेल. मीच माझा स्वामी होऊ शकत नाही तर मग ब्रह्मांडाचा स्वामी तर फार फार दूरची गोष्ट झाली. या सृष्टीचा कर्ता धर्ता असल्याच्या थाटात आजवर मी स्वैर वागत होतो. या प्रश्न मालिकेनी मला माझी जागा दाखवली. प. पू. श्री नरेंद्रनाथांनी सोमवारच्या साधनेतून समर्थ रामदास स्वामींचेही कवित्व आपल्यापुढे ठेवले. शरीराच मूळ किती अमंगळ आहे याच हे वास्तव दर्शन! रजस्वलेच्या विटाळी या शरीराचा जन्म. आतील शारीरिक यंत्रणा किती गलिच्छ तर सोन्याच्या ताटात दिव्यान्न जरी जेवलो तरी त्याची विष्टाच होणार. गंगेच पाणी हे तीर्थ! पण आम्ही प्यायलो की त्याचे मूत्र होणार. श्री नरेंद्रनाथ महाराज नेहमी सांगत आले की आमच्यापेक्षा गाय बरी. गो मूत्र घरात ठेवल तर वातावरण पवित्र आणि शुध्द करते. तिच्या शेणान सारवलेली भूमी पवित्र होते. आमच्या शरीराच मूळ अमंगळ आमची आंतरिक यंत्रणा किळसवाणी. असे असतांना या शरीराने अहंकाराचा फणा का काढावा? याचा मी विचार केला पाहिजे. शरीरा विषयी वाटणारी अहंता आणि ममता तुटावी यासाठी संत सद्गुरू शरीराच किळसवाण वर्णन करित असतात. ते जन्म सार्थकी राहण्याच साधनच रहाव साध्य होऊ नये हा त्या पाठीमागे उद्देश असतो. श्री नरेंद्रनाथ आपल्या मार्गदर्शनातून एक संस्कृत वचन नेहमीच सांगत आले आहेत. पुनदार्राः, पुनर्वितं, पुनः क्षेत्रं, पुनः सुत। पुनःशुभाशुभं कर्म, शरीरं न पुनः पुनः। । अर्थात पत्नी, संपत्ती, जमीन जुमला, पुत्र, शुभाशुभ कर्म या आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होणार्या गोष्टी आहेत केवळ मानवी देह असा आहे की, जो आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. म्हणून मिळालेल्या याच जन्मात जीवताचे सार्थक करावे. ते कसे साधले जाईल याचाच रात्रंदिवस विचार करावा. आपण रविवारच्या उपासनेत ब्रह्मांडाची निर्मिती पाहिली. अवघी सजीव सृष्टी हे ईश्वराचे खेळणे आहे. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात की, ईश्वर जरी ब्रह्मांडाचा कर्ता असला तरी तो ब्रह्मांड नायक नाही. ब्रह्मांडाचा कर्ता ईश्वर, परि तो नसे ब्रह्मांड नायक। ब्रह्मांडनायक असे देहधारी, गुरूस्वरूपे संचारिती। । श्री सद्गुरू या ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी आहेत. चराचरावर त्यांची सत्ता आहे. अकोल्यातील पाचव्या अतिसौरीत आठवडी कीर्तन सेवा आयोजित केली होती. अकोल्यातील नामवंत कलाकार तबला वादनासाठी यायचे. त्या दिवशी अकोल्यातील संगीताचे प्राध्यापक पू. नरेंद्रनाथांच्या दर्शनाला आले. आम्ही दोघे सोबत गेलो. महाराज, हे प्राध्यापक … ते म्हणाले मी ओळखतो. आज हे तबला वाजवणार आहेत. महाराज म्हणाले. त्यांनी विधान केल होत. आम्हाला मात्र तो प्रश्न वाटला. आम्ही दोघांनीही एकाच वेळी नाही म्हटले. त्यांनी आमचेकडे पाहिल न पाहिल्यासारखे केले. आम्ही दर्शन घेऊन दहा पाऊल पुढे टाकली. माझा भ्रमणध्वनी खणखणला. तिकडून आवाज, दादा आता ७. ३० वाजले आज मी तबल्यासाठी येऊच शकत नाही. अकोल्यापासून ५० कि. मि. दूर आहे. दुसर्या कुणाला बोलवून घ्या. प्राध्यापक म्हणाले चला आधी महाराजांच दर्शन घेऊ. आम्ही त्यांचे समोर उभे झालो. प्राध्यापक म्हणाले मी तबल्याची साथ करतो. महाराज आमचेकडे पाहून मंद हसले. आम्हाला पडणारा प्रश्न त्यांनी चुटकीसरशी सोडविला. गोंधळा शिवाय क्षणार्धात. माझ्यावर, कलावंतावर आणि प्राध्यापकावर त्यांची निर्विवाद सत्ता सिध्द झाली. हे आपल्या तर्क-बुध्दी पलिकडच असत. आम्हाला घडवितांना ते साक्षात श्री ब्रह्मदेव असतात. आपल्या कृपा दृष्टीन आमच पालन पोषण करतांना करतांना ते श्री विष्णू असतात. आणि आमच्यातील खल वृत्तीचा संहार करून सन्मार्गावर लावणारे श्री महादेव असतात सद्गुरू! तीनही शक्ति जेथे एकवटल्या ते सद्गुरू श्रीदत्तात्रय स्वरूपी असतात.
27. पंचप्राण पंचमहाभूते, असती गुरूंच्या आज्ञेत। गुरू न दावी स्वरूप आपुले जरी तो श्रेष्ठ ईश्वराहूनी। । नाथशक्तिपीठाधीश श्री नरेंद्रनाथांनी आत्मोन्नती साधनेतून श्रीगुरूंची महती गायीली आहे. ईश्वरू होय जरी कोपता। गुरू रक्षेल परियेसा। परी गुरू कोपेल एखाद्यासी। कोणी न रक्षे तयासी। । हे सद्गुरूंच सामर्थ्य आहे. गुरूकार्य करणे म्हणजे श्री गुरूगीता गाण. श्री सद्गुरू चरणांवर शुध्द प्रेम जडल की ते सर्वतोपरी मार्गदर्शन करित असतात. ते सार्वभौम सत्ताधीश आहेत. पंचमहाभूतांवर आणि पंचप्राणांवर त्यांची निर्विवाद सत्ता असते. प. पू. व्यंकटनाथ महाराज हे श्री नरेंद्रनाथांचे सद्गुरू. त्यावेळी डायल फोन नव्हते की आजच्या सारखे भ्रमणध्वनी. श्री नरेंद्रनाथ महाराज चार्टड अकाऊन्टट असल्यामुळे कामा निमित्त नगरला गेले होते. लाॅजच्या तिसर्या मजल्यावर रात्रीचे वेळी मुक्कामी होते. अचानक त्यांना पू. व्यंकटनाथ महाराजांचा आवाज आला. ते म्हणाले, “बाळ आम्ही येथेच आहोत. तू येथून कुठेही जाऊ नको”. आणि थोड्याच वेळात लाॅज हादरायला लागला. काॅट भिंतीवर आदळू लागला. छतावरची माती खोलीत पडायला लागली. वीज गेली. हा भूकंपाचा झटका आहे हे श्री नरेंद्रनाथांच्या लक्षात आल. त्यांनी निर्णय घेतला. जीव वाचवायचा असेल तर तिसर्या मजल्यावरून उडी मारू या. पायात पटकन जोडे घातले. खिडकीशी गेले. आता उडी मारायची. जे होईल ते पाहून घेऊ. तितक्यात पुन्हा आवाज आला, “बाळ, आम्ही तुला सांगितल न की कुठेही जाऊ नकोस”. त्या आवाजात आज्ञेची जरब होती. त्या सरशी महाराज काॅटवर स्वस्थ बसले. थोड्यावेळानी सार कस शांत झाल. ते खाली उतरले. सर्वत्र ढिगारे होते. होय तो कोयनेचा भूकंप होता! पुढे श्री नरेंद्रनाथांची व व्यंकटनाथांची प्रत्यक्ष भेट झाली. कारे बाळ, “तिसर्या मजल्यावरून उडी मारली असती तर काय झाले असते “…. व्यंकटनाथ महाराजांच्या या उद्गारात वात्सल्य होते. सामर्थ्याची प्रचिती होती. पंचमहाभूतांवर असणार्या त्यांच्या सत्तेची साक्ष देणारे ते उद्गार होते. प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचीही पंचमहाभूतांवर अशीच निर्विवाद सत्ता आहे. नाथपंथाच्या प्रसार-प्रचारासाठी ते अनसुया आश्रमी गेले होते. हिमालयातील हा अतिशय दुर्गम भाग आहे. तेथील रहिवासी तुम्ही इथे हवन करूच शकत नाही असे म्हणाले. त्यांचे म्हणण्यात तथ्तही होते. कारण तिथे खर्या अर्थाने मुसळाधार पाऊस पडत असतो. महाराज म्हणाले, आम्ही येथेच हवन करू. अन् पाऊस आला तर…. महाराज म्हणाले, आम्ही त्यांना सांगु हे तुमचच हवन आहे. याने की आप गिरती बारीश रोकेंगे! झाल या महाराजांच्या बोलण्याची बातमी झाली. नरेंद्रनाथ, गिरती बरसात रोखेंगे! हा मथळा उत्सुकतेचा विषय ठरला. आणि सर्वांनी याचा अनुभव घेतला की, ज्या वेळी पावसाच पाणी यज्ञकुंडामध्ये पडणार तेव्हा महाराजांनी विभूती घेऊन यज्ञकुंडावरून हात फिरवल्या सारख केल. जणू पाऊसाच आच्छादन त्यांनी दूर केल. जोरदार पडायला आलेला पाऊस तिथून निघून गेला. हवनाची पूर्णाहूती झाल्यावर महाराज म्हणाले लवकर आवरा. आणि आवरून होत नाही तर तीन दिवस थांबलेल्या वरूण राजाने अनावर वृष्टीस प्रारंभ केला. हे सद्गुरूंच सामर्थ्य आहे. अशा सार्वभौम शक्तीच कृपाकवच प्राप्त करण्यासाठी हे मना त्यांच्या चरणी शध्द प्रेम जडव.
28. देव म्हणती गुरूला, होईन तुमच्या दासाचाच दास। प्राप्त करीन गुरूकृपा, ब्रह्मांडनायक होण्या। । ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली युग रचना अपरिवर्तनीय आहे. त्यातील सत्य, द्वापार व त्रेता युगांची निर्मिती चांगली झाली. कलियुग या तीघांचे मानाने फारच खडतर बनले. या युगाची स्थिती अत्यंत दारूण व विषम अशी झाली. खोटेपणा, कपट, आळस, झोप, हिंसा, खेद, शोक, मोह, भय आणि दीनता या युगात अधिक राहिल. तप, सत्य, दया, दान हे धर्माचे असलेले पाय शक्तिहीन होतील. हिंसा, असंतोष, खोटेपणा आणि द्वेष हे अधर्माचे पाय मजबुत होतील अस श्री विष्णूंच्या लक्षात आल. अपरिवर्तनीय अशा खडतर कलियुगाची निर्मिती तर झाली. आता यात बदल शक्य नाही. कलियुगातील जीवन नियंत्रित असावे. सज्जन, सद्भक्तांचे संरक्षण व्हावे. युगाचे अंतर्गत परिवर्तन घडवून आणता यावे म्हणून स्वतः श्री विष्णूंनी नाथपंथाची योजना केली. कृत, द्वापार व त्रेता युगांप्रमाणे सामान्य जनांची वृत्ती, त्यांचे सामाजिक जीवन, नैतिकता व जीवन मूल्यांची पातळी उंचविण्यासाठीच श्रीकृष्णानी द्वापार युग संपता संपता नाथपंथाची योजना केली. योगेश्वरांनी ही योजना केली नसती तर, कलियुगाचे भयानक परिणाम सामान्य माणूस सहन करू शकला नसता. ईश्वरी योजने नुसार भगवंताचे पार्षद नवनारायण, नवनाथ म्हणून अवतार घेतील असे ठरले. पंथ प्रखर सामर्थ्यवान झाला. देदीप्यमान झाला. नाथ पंथातील नाथगुरूंची कृपा संपादन करावी. पंथामध्ये नाथगुरू म्हणून कार्य कराव. सामान्य जनांचा उध्दार करावा. असा मोह हरिहरांना झाला. श्रीमहादेवांनी व श्री विष्णूंनी आपण होऊन तशी इच्छा व्यक्त केली. व नाथ पंथामध्ये त्यांनी अवतार घेतला. हे दोन्ही अवतार कुटुंब संस्थेतील आहे. मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ व त्यांचे शिष्य श्री गहिनीनाथ यांचे शिष्य निवृत्तीनाथ व त्यांचे शिष्य श्री ज्ञाननाथ नाथ पंथाची अशी अखंड गुरूपरंपरा आहे. त्यातील नाथगुरू श्री निवृत्तीनाथ हे श्री शंकरांचा व ज्ञानेश्वर माऊली श्री विष्णूंचा अवतार आहे. त्यांनीही दासांचे दास होऊन गुरूप्रसादाचा मेवा चाखला. साक्षात ईश्वरही श्रीगुरूकृपेचे इच्छुक आहेत. हा श्री सद्गुरूंचा महिमा आहे. म्हणून दत्तात्रेय स्वरूपी श्री सद्गुरूनाथाचे भजन चूकवू नये. ही प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांची आज्ञा आहे. नितनियमाने भजन करी जो उणे न त्या भासे श्री नाथांचे वचनचि ऐसे खोटे हो कैसे भजनाच्या संदर्भात नाथशक्तिपीठाच अधिष्ठान असणार्या श्री व्यंकटनाथांचा हा वचननामा प्रसिध्द आहे. संत कबीराच्या सुप्रसिध्द दोह्याची यावेळी आठवण होते. गुरू गोबिंद दोऊ खडे। काके लागुं पांय। बलिहारी गुरू अपने। गोबिंद दियो बताय। । संत कबिर म्हणतात मी तर निःशंक मनाने श्री सद्गुरूनाथांच्या पायी मस्तक टेकवेल. त्यांच्याच तर कृपा प्रसादे मला हरि दिसणार आहे. म्हणून तयाचे भजन चूकवू नये. गुरूकृपा झाल्याशिवाय ईश्वर भक्तीकडे चित्त, वृत्ती, प्रवृत्तीचा प्रवाह वळतच नाही. श्रीगुरूकृपेवीना भरकटलेल्या जीवाच्या चित्त, वृत्ती, प्रवृत्तींचा ओघ हा विषयाकडेच धाव घेतो. याचे कारण ही अविद्या असते. मनुष्याला पाच प्रकारचे क्लेश असतात. अविद्या हा त्या पैकी एक आहे. हा दूर झाला की आध्यात्मिक प्रगतीची वाट मोकळी होते. हा क्लेश श्रीगुरू कृपेमुळेच नष्ट होतो. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळे देहबुध्दी शिरजोर होते. ती शिरजोर झाली की देह म्हणजे मी हे समीकरण पक्क होत. देहबुध्दीमुळे अहंकार आणि ममतेला उत येतो. जेवढ देहबुध्दी स्मरण वाढत जाईल तेवढ देवबुध्दीच विस्मरण होत. श्रीसद्गुरू जीवाला घडवितात. प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात की, ” अखंड गुरू परंपरेने ज्यांना गुरूपदाचा अधिकार मिळाला आहे तेच खरे सद्गुरू आहेत. सद्गुरू अविद्या नावाचा क्लेश दूर करतात. आध्यात्मिक ज्ञान देतात. आध्यात्मिक उन्नती करून देतात. माणसातले काम, क्रोध, मद मत्सर हे विकार कमी करतात. त्याला सज्जन, सत् प्रवृत्त करतात. ईश्वर प्रेम निर्माण करतात. त्याचा भक्तीभाव वाढवितात. संसारामध्ये त्याला सर्व तर्हेचे मार्गदर्शन करतात. त्याला 'गुरूपदी ' नेण्याच्या दृष्टीने घडवित असतात. जे विधिलिखीत आहे त्याच्यात कुणीही बदल करू शकत नाही परंतु सद्गुरू ते सहजतेन करू शकतात. हे त्यांचे सामर्थ्य आहे. शिष्याच्या कर्मानुसार पाहिजे तो बदल सद्गुरू करू शकतात. तत्त्वतः पाहिले तर ब्रह्मा, विष्णू, महेश रूपी भगवान दत्तात्रय हेच सर्वांचे गुरू आहेत. ” अशा भगवान दत्तात्रेयस्वरूपी सद्गुरूंच्या कृपेसाठी स्वतः ईश्वर सुध्दा आतुर आहे. याचे उदाहरण नाथपंथात आपण पाहिल आहे. श्री सद्गुरू हे अविनाशी तत्त्व आहेत. त्यांना शरण जाऊन आपले क्लेश दूर करू या.