29. सदा सेवीत सद्गुरूनाथ, कर्म करी शुध्द नी पवित्र। शुध्द होता देह आत्मा, गुरू करिती ब्रह्मांड नायक। । श्री सद्गुरूंची सेवा- सान्निध्य जीवाला अद्भूत सामर्थ्य देते. त्याच्या सहवासामुळे, जीव शुध्द होतो. शुध्द जीवाकडून पवित्र कर्म घडतात. उपासनेची बैठक पक्की होते. आत्मा उन्नत होतो. अनन्य शरणांगत भाव वाढत जातो. शिष्य तोचि गुरू, गुरू तोचि शिष्य अशी समरसता साधल्या जाते. आणि एक क्षण असा येतो त्या वेळी शिष्याला गुरू गुरूपणा देतात. आमोन्नती साधनेतील या दोन ओव्या म्हणजे नाथशक्तिपीठाधीश प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचा दिव्य आध्यात्मिक जीवन प्रवास आहे. या जगात एकही गोष्ट ईश्वर निर्मित नाही. ईश्वर असतोच कुठे? हा श्री नरेंद्रनाथांच्या विचाराचा आरंभ बिंदू होता. प. पू. व्यंकटनाथांची भेट ही त्यांच्या आयुष्याला वळण देणारी घटना ठरली. या भेटीन त्यांच अंतर्मन ढवळून निघाल. पू. व्यंकटनाथांना गुरू म्हणून स्वीकारतांना त्यांनी काही कसोट्या लावल्या. मात्र अनुग्रहानंतर स्वतःच शिष्यपण पणाला लावल. श्रीगुरूंच्या कसोटीला उत्तीर्ण होण्याचा अभ्यास ते सतत करित राहिले. त्यातूनच त्यांच साधकपण विकसित होत गेल. ऐके दिवशी आदिगुरू दत्तात्रेयांनी त्यांची परीक्षा घेतली. परीक्षेतून श्रीगुरूनिष्ठा सिध्द झाली. समर्पण. जप-तप-अनुष्ठान श्री गुरूंनी सांगितलेल कर्म करीत राहणे. असा दिनक्रम चाले. कर्मातून चित्त शुध्दी, देह शुध्दी अन् आत्मा पूर्ण उन्नत झाला. श्रीगुरूं विषयीच्या श्रध्दाभावाने प्राप्त झालेल ज्ञान. आता आत-बाहेर केवळ श्रीगुरू. अवघ जग गुरूमय झाल. विश्वास गुरू वचनाचा. ध्यास केवळ गुरूंचा. श्वास घ्यायचा तोही गुरूंसाठी. केवळ व्यंकटांचा छंद. मासा जसा पाण्यासाठी तडफडतो तसा. ध्यास वाढत गेला. एकरूपता साधल्या गेली. सेवेची पराकाष्ठा झाली. सेवा म्हणजे सक्ति-आसक्ति पलिकडचा शुध्द, निर्भेळ भाव. अर्थात भक्ति. अळीस भ्रमराचा ध्यास। होता भ्रमरपणा ये तिस। सोडी ती मग जीवपणास। भोगी आनंद। जाय तुटोनिया भवबंध। । असा आनंदी आनंद चाललेला होता. गुरू शरणांगत व ईश्वर सन्मुखता ओतप्रोत भरलेली होती. एक दिवस स्वतः पू. श्री व्यंकटनाथ महाराज म्हणाले, “तू चालला तर मी चाललो, तू बोलला तर मी बोललो, जे तू केल ते मी केल, जे मी केल ते तू केल, मी म्हणजे तू व तू म्हणजे मी”! गुरू गुरू पणा दे शिष्याला अनन्य झाल्यावरती। दासगणू म्हणे भेद नुरे ज्योतिस मिळाल्या ज्योती। । दअसा हा सोहळा संपन्न झाला. व्यंकटनाथांनी श्री नरेंद्रनाथांना नाथगुरू म्हणून पंथकार्य करण्याची आज्ञा दिली. गुरूपदी आरूढ झाल्यावरही, ब्रह्मांडनायक झाल्यावरही ते स्वतःचा परिचय श्री व्यंकटनाथ माझे गुरू आहेत असा देतात. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात की, मानवी जीवन हे केवळ कर्म करण्यासाठीच प्राप्त झाल आहे. हे कर्म केवळ श्री गुरूच सांगु शकतात व करवून घेऊ शकतात. गुरूंनी केलेले संस्कार हे त्या जीवावर जन्मोजन्मी कार्य करित राहतात. लोकानुग्रह कार्या करसी कर्मे आर्या कर्मातीता सदया जय जय सद्गुरू नाथ। असे हे सद्गुरू असतात. पामराचा नर आणि नराचा नारायण करण्याची सिध्दता हे श्री सद्गुरूंचे सामर्थ्य आहे. मिळालेला हा जन्म त्यांच्या कृपा प्रसादाने सार्थकी लागावा व आत्मोन्नतीच्या दिशेने आम्हा सर्वांची वाट मोकळी व्हावी. ही सद्गुरू चरणी प्रार्थना.
30. बी पेरता रोप जन्म घेते, हळू हळू पूर्ण वाढते। वाढविती पंचमहाभूते देती पुष्पादि फळे। । कोण वाढवी भूवरी रे? हा एक साधा प्रश्न. पण याच नेमक उत्तर देतांना गोंधळ उडतो. याच खर उत्तर आहे. 'पंचमहाभूत'! नाथ शक्तिपीठाधीश प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज मंगळवाराच्या आत्मोन्नती साधनेतून पंचमहाभूते मनुष्याला कस पोसतात, याची जाणीव करून देतात. या ओव्या वाचल्यावर माझ अस लक्षात आल की, आजवर मी या पंचमहाभूतां प्रति कधीच कृतज्ञता बाळगली नाही. उलट माझ्या विपरित वागण्याने प्रदुषितच केले आहे. या ओव्या पंचमहाभूतांकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी बहाल करतात. मुण्डकोपनिषद म्हणते, “ परमात्मा विराट आहे. द्यु लोक हे त्याच मस्तक. चंद्र-सूर्य हे त्याचे नेत्र. दिशा या श्रोत्र. अवघ विश्व त्याच ह्रदय आहे. धरिणी त्याचे पाय आहेत”. हे त्याच 'समष्टी' रूप आहे. मनुष्य हा त्या विराटाचे 'व्यष्टी' रूप आहे. सजीव प्रजा निर्माण करण्यापूर्वी त्यान जाणीव पूर्वक पंचमहाभूत निर्माण केली. पंचमहाभूत तसे अवघ्या सजीवांनाच सांभाळतात. अवघ्यांमध्ये मनुष्य आलाच. आत्मोन्नती साधना म्हणते की, ऐसेचि येता जन्मासी। सांभाळ करी पंमहाभूते। पंचतत्वे देती आकार, रंग रूप गुण अंगी बाणी। । ही पंमहाभूत मनुष्याला कशी पोषक ठरतात याचा आता विचार करू या. शरीरात आकाश, वायु, अग्नि, जल, आणि पृथ्वी ही पंमहाभूत विद्यमान असतात. आपल्या शरीरात ही पंमहाभूत त्यांच्या त्यांच्या गुणांचा धर्म प्रकट करित असतात. आकाश या महाभूताचा गुण शब्द आहे. मनुष्य कानाने ऐकतो. स्पर्श हा वायूचा गुण, मनुष्य हा त्वचेने स्पर्श अनुभवतो. रूप तेजाचा गुण आपण नेत्रांनी रूप न्हाहाळतो. रस जलाचा गुण. आपण जीभेने रसास्वाद घेतो. गंध पृथ्वीचा गुण. नाक आपल्याला गंधाची जाणीव करून देते. परमेश्वरास, मनुष्याला आपल्यासारख बनवायच होत. त्यान मनुष्याच शरीर देवतांच निवास स्थान बनवल. आणखी सुंदर, उदात्त व उन्मन कराव म्हणून मन आणि बुध्दीही दिली. आणि स्वतः परमेश्वर ह्रदयामध्ये विराजमान झाला. म्हणून मनुष्य सजीव रचनेत सर्व श्रेष्ठ ठरला.
31. मानव ईश्वराची कलाकृती, कोणिही न निर्मूशके जी। निर्मित असे बहू गोष्टि, परी मानव न निर्मू शके शरीर। मनुष्याच शरीर कस बनत व कार्य करत याची सखोल ज्ञान चर्चा आपल्या प्राचीन वाङमयात केली आहे. पृथ्वीला अन्न म्हटल्या गेल आहे. पृथ्वीतून धान्य, रसभरित फळ निर्माण होतात. आपण खाल्लेल्या अन्नाच्या स्थूलाचा मळ, मध्यम भागातून मांस, आणि सूक्ष्म भागातून मन तयार होते. आपल्या आहारावर आपल मन तयार होणार आहे. जलाचेही असेच. स्थुलातून मुत्र, मध्यम भागातून रक्त, आणि सूक्ष्म भागातून प्राण तयार होतो. तेजाच्या स्थुलभागातून अस्थि, मध्यम भागातून मज्जा, आणि सूक्ष्मतम भागातून वाक् तयार होतो. परमेश्वर हा विश्वनियंता आहे. म्हणूनच त्याने विचारपूर्वक प्रत्येकाचा आहार विहार नेमून दिला आहे. आपापले धर्म नेमून दिले आहे. आज मी विपरित कर्म करतो. स्वधर्म सोडून वागतो. कधीकधी विचार केला तर मन आणि बुध्दी नसलेल्या पशुंचा व्यवहार हा मनुष्या पेक्षा सुंदर आणि उदात्त असल्याचे जाणवते. मांजर कितीही तहानलेली असू देत ती कोल्ड ड्रिंक पित नाही. तिच ते पेय नाही. वाघ गवत नाही. तो त्याचा आहारच नाही. पण मनुष्य आहार -विहारापासून भरकटला. त्याच्या तेजस्वीतेवर परिणाम झाला. तो मलुल झाला. कोमेजला. त्याचे मन, प्राण आणि वाक् शक्ति क्षीण झाल्या आहेत. म्हणून परमात्मा श्रीकृष्णानी गीतेतून युक्ताहार विहारावर विशेष भर दिला आहे प. पू. नरेंद्रनाथ महाराजांनी आत्मोन्नती साधनेतून आम्हाला परोपरिन हाच विचार करायला लावला आहे. मनुष्य ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ रचना आहे. तिला नासविणे हा त्या विधात्याचा अपमान आहे. आपल शरीर शुध्द करणे आत्मा उन्नत करणे हाच आपल्याला प्राप्त झालेला स्वधर्म आहे. स्वधर्म शोधावा लागत तो प्राप्त होतच असतो. स्वधर्माचे पालन करा. ही श्री नरेंद्रनाथांची सूचना आहे. या सूचनेत आपल्या उध्दाराची तळमळ आहे. आपल्याला प्राप्त झालेल हे साधन ईश्वराची कृपा आहे. त्यानी दिलेल्या बुध्दीने त्याला कसे पहायचे? याच श्री सद्गुरू मार्गदर्शन करतात
32. साधण्या आत्म्याचा विकास सद्गुरूंची धरावी कास। सद्गुरू वाचोनी आत्म्यास कोणी न घडवी सर्वदा। । आत्मोन्नतीच्या पथावर चालतांना श्री सद्गुरूंची कृपा हिच आमची शिदोरी असते. आत्मोन्नती साधायची असेल तर सद्गुरू वाचोनी अन्य दुसरी सोय नाही. संताच्या मांदियाळीनही हेच सांगितल आहे. सद्गुरू वाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी। “ माझ्या इच्छेन, माझ्या सोयीन, … अस करून चालणार नाही. आज करू, मग करू असा अविचार करूनही भागणार नाहीआळस मोडून काढला पाहिजे. तातडी केली पाहिजे. समर्थ रामदास स्वामींनी आळश्याची ओवीबध्द कथा सांगितली आहे. त्याचा सारांश असा आहे की, एक मनुष्य अतिशय आळशी होता. भुकेला झाला. अनायासे त्यास सर्व प्रकारची उपलब्धताही मिळाली. बसायला चंदनाचा पाट. जेवणासाठी सोन्याच ताट. सुगंधाचा घमघमाट. समोर पंचपक्वानांनी भरभरून असलेल ताट. पण हा काही जेवेना. मुलखाचा आळशी होता. कारे बाबा, जेवत नाहीस? हा म्हणाला कोण तुकडा मोडेल? बर, घास भरवू का? हा म्हणाला घास भरवला तरी कोण चावेल? बारीक कुस्करून तोंडात भरवतो न, चावायचा त्रासच उरणार नाही. हा म्हणाला, कुस्करून तोंडात टाकले तरी कोण गिळेल? शेवटी सुकाळ असूनही दुष्काळ असल्या सारखा अन्नान्न करून तडफडून मेला. तात्पर्य आळस मोडून घाई करायला पाहिजे. आम्ही रेंगाळलो की, आयुष्य नासणार. पुन्हा हाल अपेष्टा नि कष्टाचे पाढे घोकत आयुष्य काढाव लागेल.
33. सद्गुरूविण दुसरे काही नाही। भवसागर तरूनी जाण्या। अज्ञान अहंकारादी गुण, त्यागणे आवश्यक आत्मोन्नती साधण्या. । । जन्म. कौंटुंबिक दृष्ट्या आनंदाचा सोहळा. पण पारमार्थिक दृष्टिकोनातून जन्म म्हणजे विस्मरण. आत्म्याच परमात्म्याशी असलेल्या नात्याच विस्मरण! मी कोण? जन्मापासून कोSहं कोSहं चा आक्रोश सुरू होतो. जीवाच - शिवाशी असणार नात विस्मरणात जात. आईच्या गर्भात असल्यामुळे अप्रत्यक्षपणे भूमीशी संपर्क येतो, कारण आईचे पाय जमिनीला लागलेले असतात. पण अप्रत्यक्ष असल्यामुळे अहंकाराची तीव्रता कमी असते. पण जसा प्रत्यक्षपणे या जीवाचा स्पर्श भूमीशी होतो तसा अहंकार उत्पन्न होतो. वाढीस लागतो. अहंकार हा भूमीचा गुण आहे. ज्याचाही तिला स्पर्श होईल त्यात तो निर्माण होणार आहे. पुढे पुढे जीवाचा हा अहंकार जसा जसा वाढेल तसे तसे भगवंताशी असणार्या नात्याचे विस्मरण वाढत जाते. भगवंता विषयीच स्मरण केवळ सद्गुरू जागवू शकतात. परमात्म्यान प्राण्यांपैकी कुणीतरी आपल्या सारख व्हाव म्हणून मानवामध्ये आपल मन आणि बुध्दीची स्थापना केली. बुध्दीच्या द्वारेच मनुष्याला परमेश्वराचे अस्तित्व जाणवते. त्यासाठी ही बुध्दी सत् पक्षाचा कैवार घेणारी असली पाहिजे. ती निश्चयात्मक झाली पाहिजे. ती निश्चयात्मक झाली की परमेश्वराचे ठिकाणी स्थिर होते. त्याला मी कोण हे कोडे उलगडते. नात्याच स्मरण होते. हे ज्ञान देण्याचा अधिकार श्री सद्गुरूंचा आहे. श्री सद्गुरूंना शरण जाव. म्हणाव, माझ्या ठिकाणी असलेल्या बुध्दीला निश्चयात्मक करा. जेणेकरून ती भगवंताचे चरणी स्थिर राहील. मनाच्या चंचलतेला पूर्ण विराम द्या. जेणेकरून ते तुम्हाला समर्पित करता येईल.
34. रत राहोनी सद्गुरू सेवेत, नित्य नेमे साधना करित। अंगिकारोनी गुरूभक्ति, आत्मोन्नती साधावी। । विवेक ठरवतो की माझा देह देवाच मंदिर व्हाव. श्री सद्गुरू हा विवेक जागा करतात. अन्यथा देह विकारांची धर्मशाळा झालाच म्हणून समजा. माझा देह विकारांची धर्मशाळा म्हटल की कुणीही याव कसही याव. केव्हाही याव. वाट्टेल तसा धिंगाणा घालावा. सगळ अस्ताव्यस्त, उध्वस्त कराव. माझा देह देवाच मंदिर म्हटल की, चैतन्य, पावित्र्य आल. मंदिर परम सुखशांती च निधान आहे. दुधामध्ये ज्या प्रमाणे लोणी तसा देहामध्ये चक्रपाणी असतो. पण साधारण डोळ्यांना हे सत्य दिसत नाही. त्यासाठी काही शिस्तबध्द संस्कार करावे लागतात. श्री सद्गुरू आवश्यकते संस्कार करतात. जस दुधावर योग्य वेळी योग्य संस्कार केले की नवनीत मिळत. श्री सद्गुरू हा संस्कार करतात. तप, मंथन, तप असा हा त्रिवेणी संस्कार आहे. दुध तापविल नाही तर नासते. आयुष्य तपाने तापविल नाही तर तेही नासते. तापविलेल्या दुधाला विरजण घालतात व मंथन करून लोणी मिळवितात. श्री सद्गुरू मी कोण? कोठून आलो? जन्माच प्रयोजन काय? माझा स्वधर्म कोणता? या सारख्या प्रश्नांवर विचार मंथन घडवून आणतात. आत्ममंथन करायला लावतात. मंथनानी निष्कलंक चरित्र व चारित्र्याच लोणी मिळत. सद्गुरूनां हे नवनीत आवडत. लोण्यालाही तापविण्याचा संस्कार केला की तुप होते. मग हे जितक जुन होत जाईल तितक गुणधर्मान श्रेष्ठ ठरत. निष्कलंक झाल्यावरही पुन्हा तप आलच. श्री सद्गुरू आपल्याला अस घडवितात. आपल्या आत्म्यावर जप, तप, अनुष्ठान, हवन, उपासना, प्रबोधन, उद्बोधनाद्वारे संस्कार करतात. जेणेकरून आपला देह शुध्द व आत्मा उन्नत होतो.
35. मानव म्हणे मी कितीकांते, दिले अन्न वस्त्र निवार्याते। करि पालन पोषण जगाचे, म्हणे देव काय करि। परमेश्वर हा विश्वनियंता आहे. त्या सम तो दुजा नसे कुणी, असेच त्याचे वर्णन करता येईल. त्याची ब्रह्मांडरचना अफाट आहे. त्यांची संख्या अनंतकोटी आहे. त्यातील एका ब्रह्मांडावर आपण आहोत. अनंतकोटी ब्रह्मांडातील सृष्टि, विसृष्टि मधील घटकांची संख्याही असंख्यच! दोन अंकी बेरीज-वजाबाकी साठी गणकयंत्र वापरणारे आम्ही अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री गुरूंना व अनंतकोटी ब्रह्मांडाचे निर्माण करणार्या ईश्वराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. देव आहे कुठे इथून आमच्या प्रश्नाला सुरूवात होते. ती देव काय करतो इथवर जाते. त्याच देण अनंत हस्ते आहे. ते घेतांना आमचे होन हात किती अपुरे आहेत याची आम्हाला जाणीव असायला हवी. आपली बुध्दि, मति, गति, प्रगती, शक्ति, दृष्टि, आवाका, जाणीव …. . यांना पदोपदी मर्यादा आहेत. असे असूनही आपण सर्वज्ञाचे थाटात वावरतो. मी केल मी दिल अशीच आमची भाषा असते. प. पू. श्रीनरेंद्रनाथांची आत्मोन्नती साधना, ज्ञानांजन आहे. ते आपल्या देहबुध्दीच्या अहंकाराची धुंदी खाडकन उतरविते! अशा वेळी समर्थ रामदासांच डफगाण आवर्जून आठवत. समर्थ चाफळहून परळीस निघाले. मार्गात पालीस पौष मासातील जत्रा भरली होती. जत्रेत दोन शाहीर परस्परांवर चढ टाकत होते. समर्थांना पाहताच त्या दोघांनीही साष्टांग नमन केले. त्यावेळी समर्थांनी त्या दोघांवर चढ टाकला. चढातील प्रश्नावली सुरू झाली-किती पृथ्वीचे वजन। किती आंगोळ्या गगन। सांग सिंधूचे जीवन किती टांक। । किती आकाशीचा वारा। किती पर्जन्याच्या धारा। तृण भूमीवरी चतुरा। संख्या सांग। । वायुसरसे उडती सांग अणूरेणू किती। लक्ष चौर्यांशीची उत्पत्ती संख्या सांग। । अठरा भार वनस्पती। भूमंडळी पाणी किती। पुष्पे फळे जाती किती। संख्या सांग। । बीज वडी आणि पिंपळी। किती आहे भूमंडळी। सर्व धान्याची मोकळी। संख्या सांग। । सर्व सरितांची वाळू किती। सिंधूसागरी वाळू किती। हरखूं आहे किती। संख्या सांग। । रामदासाचा विनोद। सांडी अहंतेचे बीज। मग स्वरूपी आनंद सुखी राहे।