30-05-22 ११२ लेखांमध्ये मी आपल्याला माहिती दिली होती की भूमी, आप, तेज आणि वायू या चार महातत्वामध्ये बारा राशी विभागल्या गेल्या आहेत त्या अशा
Worship and remedies according to the zodiac 3
सृष्टीवरील सर्व मानवजात ही बारा राशींत विभागली आहे. ह्या बारा राशी चार तत्त्वांमध्ये कशा विभाजल्या आहेत, हे आपण पाहिले आहे.
भूमितत्त्वात : वृषभ, मकर व कन्या ह्या राशींचा समावेश आहे. जलतत्त्वात : मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशींचा समावेश आहे. अग्नितत्त्वात : मेष, सिंह व धनू ह्या राशींचा समावेश आहे. वायुतत्त्वात : मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा समावेश आहे.
आज आपण अग्नितत्त्वाच्या राशींबद्दल विचार करू
त्रेतायुगामध्ये प्रभावी असलेल्या अग्नितत्त्वाचे निजगुण शील असलेल्या मेष, सिंह व धनू राशी
मेष,सिंह व धनू ह्या तिन्ही राशीच्या लोकांनी आपली उपासना ही दक्षिण दिशेकडे तोंड करून करावी. जीवनातील सर्वच महत्त्वाची कामे ही दक्षिण दिशेपासूनच सुरू करावीत. ह्या लोकांच्या जीवनातील भरभराटीची दिशा म्हणजे दक्षिण. सर्व प्रकारचा अभ्यास, ज्ञानसाधना ही दक्षिणेकडूनच सुरू करावी. सर्व प्रकारच्या फायद्याचा प्रयत्न हा दक्षिण दिशेकडूनच करावा. अग्नीचे जे निजतत्त्व शील त्याची सिद्धता प्राप्त करणे हे दक्षिण दिशेकडूनच सुलभ आहे. ब्रह्मांडाशी अग्नीतत्त्वाचा जो काही संबंध आहे त्याप्रमाणे मेष, सिंह, धनू राशींच्या लोकांचा जो काही ब्रह्मांडाशी संबंध आहे त्या तत्त्वानुसार उपासनेला दक्षिण दिशेकडून मिळणारी ऊर्जा ही जास्त प्रभावी आहे, तसेच ती जास्त फलदायी आहे. ह्या राशींच्या लोकांना महिन्याचे दुसरे पंधरा दिवस, म्हणजे पंचांगातील वद्य पक्ष हा उत्तम फल देणारा आहे. प्रत्येक महिन्याचा वद्य पंधरवडा हा ह्या लोकांच्या उपासनेला चांगला असतो. शुद्ध पंधरवडा हा त्यामानाने कमी फलदायी असतो. वद्य पंधरवड्यात सर्व प्रकारची फलदायी, तसेच महत्त्वाची कामे करून घेणे योग्य राहील. उपासना ही नित्यनियमाने बाराही महिने अखण्ड चालू राहिली पाहिजे.
दिवसाचे चार प्रहर असतात. सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत पहिला प्रहर,माध्यान्हापासून सूर्यास्तापर्यंत दुसरा प्रहर, सूर्यास्तापासून मध्यरात्रीपर्यंत तिसरा प्रहर, तर मध्यरात्रीपासून सूर्योदयापर्यंत चौथा प्रहर असतो.
ब्रह्मांडातील पाचही तत्त्वे ही वेगवेगळी असली तरी त्या प्रत्येकाचाएकमेकांवर फार मोठा अंमल असतो. ह्या पंचमहाभूतांच्या तत्त्वांचा, सूर्यमंडळाच्या भ्रमणाचा, नक्षत्रह्नतारांगणाच्या भ्रमणाचा सर्वांवरच सतत परिणाम होत असतो. ह्या भ्रमणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की मेष, सिंह, धनू राशींच्या लोकांसाठी ह्या भ्रमणसंक्रमणाचा दुसर्या आणि तिसर्या प्रहरात होणार्या भ्रमणकाळातील दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत जी ही उपासना केली जाईल, त्या उपासनेला फलदायी परिणाम राहतील. ह्याच कालावधीत केलेल्या विविध योजना ह्या चांगल्या प्रकारे होऊ शकतील. शक्य झाल्यास कामाची नवीन सुरवात ह्या कालावधीत करावी. ती लाभदायी ठरेल. आपल्या जन्मनक्षत्र मंत्राचा जप रोज ह्या वेळेत करावा.
माणसाला दोन नाकपूड्या असतात. डाव्या नाकपूडीतून जो शास चालतो त्याला चंद्रनाडी म्हणतात व उजव्या नाकपूडीतून जो श्वास चालतो त्याला सूर्यनाडी म्हणतात. शरीरातून होणारा श्वासोच्छवास हा आपसूक नाडी बदलत असतो. ही नाडी केव्हाही आपोआप बदलते. श्वासोच्छ्वासाचा आणि शरीरातील ग्रहांचा, पिंडाचा आणि संपूर्ण ब्रह्माण्डाचा सततच संबंध असतो. अग्नितत्त्वाच्या लोकांचा म्हणजेच मेष, सिंह, धनू राशीच्या लोकांचा जो काही ब्रह्माण्डाशी संबंध आहे त्यानुसार सूर्यनाडी ज्या वेळी सुरू असेल त्या वेळी ह्या लोकांच्या शरीराशी, मनाशी, ग्रहांशी, वातावरणाशी जो संबंध असतो त्या वेळी ह्यांच्याकडून जो काही व्यवहार होईल तो त्यांच्या हिताचा असेल. सूर्यनाडी सुरू असताना साधना करावी, अभ्यास करावा, नियोजन करावे, सर्व महत्त्वाची कामे करावीत. जर सूर्यनाडी सुरू नसेल, तर ती सुरू करण्याचा प्रयत्न करून कामे केली तरी चालते. ह्याकरिता डावी नाकपूडी बंद करावी आणि उजवी नाकपूडी सुरू करण्याचा प्रयत्न करावा. काम सुरू करताना जरी उजवी नाकपूडी सुरू असेल तरी अशा वेळी चालू शकते.
ह्या तिन्ही राशींच्या लोकांची वासना रूपात व स्पर्शात असते. जन्ममरणाच्या भोगांची तीव्रता कमी करण्यासाठी ही वासना नियंत्रित करणे जरूर आहे. ह्या लोकांनी मोहावर नियंत्रण करीत राहावे.
ह्या तिन्ही राशींच्या लोकांनी भगवान दत्तात्रेय व प्रभू श्रीरामचंद्र ह्यांची पूढील उपासना रोज करावी
१. ॐ श्री दत्तात्रेयाय नम: | २. ॐ श्रीं क्लीं रामरामाय नम: |
हे मंत्र रोज १०८ वेळा म्हणावेत. ही उपासना रोज दुपारी १ ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान करावी. उपासनेच्या वेळी तोंड दक्षिण दिशेकडे करून बसावे. तसेच बद्रिनारायण, सज्जनगड ह्या धामांची यात्रा जीवनामध्ये निदान एकदातरी करणे फायद्याचे राहील. भारतामध्ये जी निरनिराळी धामे आहेत त्या सर्वांचे महत्त्व आहे, परंतु हे महत्त्व राशीपरत्वे पाहिले तर ते करणे योग्य ठरेल. ही यात्रा केल्यावर चित्त स्थिर होऊ लागते, मन शांत होऊ लागते व एकंदरीत उत्साह वाढतो.
प्रभू श्रीरामचंद्र हे युगपूरुष होऊन गेले. ते स्वत:, त्यांचे कार्य, त्यांच्या कार्याचे परिणाम हे सर्व जलतत्त्वाचे होते. युगपुरुषाचे महत्त्व हे केवळ त्या युगापूरते राहत नाही, तर ते युगानुयुगे प्रभावी असते. भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करावा.
मेष, सिंह, धनू राशींचे लोक हे चतुर्वर्णांपैकी क्षत्रिय वर्णाचे असतात. ही माणसे तमोगुणी असतात. मेष, सिंह, धनू ह्या अग्नितत्त्वाच्या राशी असल्यामुळे अग्नितत्त्वाचे जे निजतत्त्व शील आहे, ते ह्या राशींच्या लोकांच्या हाडामांसात, रोमारोमांत भिनलेले आहे. त्यामुळे जीवनात केवळ शीलाचाच विचार करावा, हे मूळ तत्त्व ह्या लोकांमध्ये एवढे भिनलेले आहे, की ते राशीतून प्रत्येकाच्या स्वभावात आले आहे. अग्नीचा संबंध हा व्यवहाराशी आहे. हे लोक व्यवहारतज्ञ असतात. यांना व्यावसायिक उलाढाल, व्यवहार हा सहजरीत्या साध्य होतो. ह्या लोकांनी लोभ व द्वेषावर नियंत्रण ठेवावे.
आता प्रत्येक राशीचा स्वतंत्र विचार करू.
- मेष रास :-ह्या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाची वस्ती खैराच्या वृक्षाखाली आहे. अग्नितत्त्वाचे निजतत्त्व ह्या राशीच्या लोकांचे निजतत्त्व
ह्या वृक्षामध्ये आहे. ह्या वृक्षाच्या खाली केव्हाही उपासना केली तर ती चांगलीच आहे. तथापि मेष राशीच्या लोकांनी ह्या वृक्षाखाली पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान पूर्वेकडे तोंड करून खालील जप अवश्य करावा. हे सर्व मंत्र रोज कमीत कमी १०८ वेळा म्हणावेत.
१. ॐ हं श्रीं मंगलाय नम: | २. ॐ अंगारकाय विद्महे |भूमिपूत्राय धीमहि |तन्नो भौम: प्रचोदयात् ॥ ३. ॐ भूमिपूत्रो महातेजां जगतां भयकृत् सदा| वृष्टिकृत् वृष्टिहर्ताच पीडां हरतु मे कुज: | ॐ क्रां क्रिं क्रौं स: भौमाय नम:॥
सिंह रास :-ह्या राशीचा स्वामी सूर्य आहे. रवीची वस्ती रुईच्या झाडाखाली आहे. रुईखाली दालचिनी अगर कस्तुरी अशा वस्तू जाळाव्यात.
पूर्वेकडे तोंड करून दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान पूढील मंत्र रोज कमीत कमी १०८ वेळा म्हणावेत.
१. ॐ र्हीं सूर्याय नम: | २. ॐ भास्कराय विद्महे | महातेजाय धीमहि |तन्न:सूर्यो प्रचोदयात् | ३. ॐ ग्रहाणामादिरादित्यो लोकरक्षणकारक: |विषमस्थान संभूतां पीडांहरतु मे रवि: ॐ र्हीं श्रीं सूर्याय नम: |
धनू रास :-ह्या राशीचा स्वामी गुरू आहे. गुरूचे वास्तव्य औदुंबराच्या झाडाखाली आहे. ह्या झाडाखाली बसून कापूर, कस्तुरी, अगरबत्ती जाळावीत. पश्चिमेकडे तोंड करून पहाटे ४ ते ६ च्या काळात पूढील मंत्र रोज कमीत कमी १०८ वेळा म्हणावेत.
१ ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नम: | २ ॐ गुरुदेवाय विद्महे | बृहस्पतये धीमहि | तन्नो गुरु: प्रचोदयात् ॥ ३ ॐदेवमंत्री विशालाक्ष: सदालोकहितेरत:|अनेकशिष्यसंपूर्ण: पीडांहरतु मे गुरु:| ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स:गुरवेनम: |
सारांश
मेष, सिंह, धनू ह्या राशींच्या लोकांनी दु. १ ते सं. ५ च्या दरम्यान दक्षिणेकडे तोंड करून भगवान दत्तात्रेयाच्या, रामाच्या व आराध्य देवतेच्या मंत्रांचा जप करावा. इतर दैवतांचा जप असेल तर तोही ह्याच वेळेत करावा.
आपल्या जन्मनक्षत्र मंत्राचा जप रोज ह्या वेळेत करावा.
ह्या लोकांनी सूयर्र्नाडीवर सर्व महत्त्वाची कामे, योजनादी कामे वा अन्य महत्त्वाची कामे करावीत. कोणत्याही कामासाठी वद्य पक्षाला विशेष महत्त्व द्यावे. बद्रिनारायण ह्या धामाला एकदा तरी जाऊन यावे. राशिस्वामीचा वरील जप व इतर ग्रहांचा जप त्यांच्या सांगितलेल्या वेळेत सांगितलेल्या दिशेकडे तोंड करून करावा.
वर दिलेल्या मंत्रांचा स्पष्ट, शुद्ध उच्चार व त्याबद्दलची माहिती नाथशक्तिपीठातून स्पष्ट करून घ्यावी.
अधिक माहितीसाठी नाथशक्तिपिठाने प्रकाशित केलेले हा खेळ प्राक्तनचा की पूर्व संचितांचा हे पुस्तक प्राप्त करून घ्या.