पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 131

नाथपंथाचे कार्य भगवान दत्तात्रेयांच्या तंत्राप्रमाणे आणि देखरेखीखाली चालू असते. देव स्वतः  कोणातरी पृथ्वीवरच्या माणसाकडे आपल्या भक्ताला पाठवतो ही कल्पनाच मुळी मानवी मनाला, बुद्धीला मानवत नाही. जे काम देव  स्वतः करू  शकतो त्यासाठी त्याने आपल्या भक्ताला पृथ्वीवर कार्य करणाऱ्या गुरूकडे का पाठवावे ?
विठ्ठलनाथ महाराज आंसपूर

भगवान दत्तात्रेयांनी विठ्ठलनाथांना नरेन्द्रनाथांकडे पाठविले

देव स्वतः  कोणातरी पृथ्वीवरच्या माणसाकडे आपल्या भक्ताला पाठवतो ही कल्पनाच मुळी मानवी मनाला, बुद्धीला मानवत नाही. जे काम देव  स्वतः करू  शकतो त्यासाठी त्याने आपल्या भक्ताला पृथ्वीवर कार्य करणाऱ्या गुरूकडे का पाठवावे ? हा प्रश्न लक्षात घेण्यासारखा आहे.

मुळात नाथपंथाचे स्वामी स्वतः भगवान दत्तात्रेय आहे संपूर्ण नाथपंथाचे कार्य त्यांच्या तंत्राप्रमाणे आणि देखरेखीखाली चालू असते. पंथाचं कार्य करणारा गुरु हा त्यांनीच निवडलेला व मान्य केलेला असतो

ज्या भक्तांना अशा सद्गुरु कडे पाठवले जाते, त्या भक्ताला त्या सद्गुरुंची कल्पना नसते.  तो सरळ देवाची उपासना करू लागतो व देवाकडून कौल मागत़ो. देव आपल्याला कौल देतो, आपल्याला मार्गदर्शन करतो ,आपल्याशी बोलतो, हे समजायला देखील भक्ताला त्या देवाशी भावनेने, अंतर्मनाने उत्तम रीतीने समरस  व्हावं लागत.

 पंथकार्य  करणाऱ्या गुरुकडे, देवाने आपल्या भक्ताला पाठवले की त्याला गुरु मार्गदर्शन करून आपल्या कृपाछत्राखाली ठेवून त्याच्याकडून कर्म, भक्ती, साधना करवून त्याच्यामध्ये स्थित्यंतर करू शकतात. प्रत्येक वेळेला भक्त देवाशी एवढा समरस होऊ शकत नाही, शिवाय नाथपंथ हा ब्रम्हा विष्णु महेश यांच्याच निर्णयाने अस्तित्वात आलेला आहे. पंथ हा जणू  निर्मितीचाच एक भाग आहे म्हणून सर्व तऱ्हेच्या शक्ती चांगल्या आणि वाईट या दोन्ही शक्ती, ह्या नाथपंथ कार्य करणाऱ्या गुरुंना  सहाय्यभूत होत असतात.

 पंथ कार्य करणाऱ्या  गुरूंना या सर्व शक्ती सदैव सहाय्य करीत असतात.

एक दिवस नागनाथशास्त्री, करपात्री स्वामींचे शिष्य, अकोल्याला आले त्यावेळी  नरेन्द्रनाथांकडे बरेच जण बसले होते. त्यावेळी एक अ‍ॅम्बेसिडर गाडी घरासमोर थांबली व त्यातून एक भगवे वस्त्र धारण केलेला जटा दाढी असलेला भस्म लावलेला एक साधू दारासमोर आला व म्हणाला की, महाराज, आपकी अनुमती हो तो अंदर आ सकता हुँ  क्या?

त्यावेळी नरेन्द्रनाथ म्हणाले की, कौन है, अंदर आ जावो. ती व्यक्ती आतमध्ये आली व काकांना पाहून दत्त-दत्त असा उच्चार करीत नाचू लागली. त्या अनोळखी व्यक्तीला पाहून त्याला परिचय विचारला त्यावेळी नागनाथशास्त्री  सांगू लागले की, आंध्र प्रदेशातील अन्सापूर येथील हे रहिवाशी असून भगवान दत्तात्रेयाचा संचार यांच्यात सदैव होत असतो.

नरेन्द्रनाथ म्हणाले की, काय कामासाठी आले आहे. ते म्हणाले मी विठ्ठलनाथ महाराज आहे. माझ्या गावी मी खूप मोठे मंदिर बांधले आहे गावाच्या जवळ असून देखील कोणीच कधीच दर्शनाला येत नाहीत. नवग्रह, मारुती, महादेव इत्यादी देवांच्या मूर्तींची स्थापना करून, 27 लाख रुपये खर्च करुन हे सर्व  बनवले आहे. मंदिरात दान पेटी कुठेच नाही तरीही कोणीच दर्शनाला येत नाही, त्यावेळी माझ्या गुरुंना मी प्रार्थना केली  व सांगितले की यातून मार्ग दाखवा.

दत्ताने प्रत्यक्ष येऊन मला सांगितले की, आम्ही अकोल्याला आहोत. त्या ठिकाणी तू ये म्हणजे तुझे कार्य होईल. असे सांगून आपले घर व आपणांस दाखवले. हे ऐकल्यावर तेथे उपस्थित सर्वांना खूप विशेष वाटले. दुसर्‍या दिवशी जाण्यापूर्वी काकांनी त्यांना विभूती दिली व सांगितले की, तुमच्या मंदिराभोवती रात्री झोपण्यापूर्वी सगळीकडे ही विभूती टाका व त्यानंतर कोणीच मंदिराबाहेर जाऊ येऊ नका. दुसर्‍या दिवशी जे काही बाहेर निघेल ते झाडून एका बाजूला करा व जाळून टाका.

त्यांनी आपल्या गावी पोहोचल्यावर नरेन्द्रनाथांनी सांगितल्याप्रमाणे केले. दुसर्‍या दिवशी पाहतात तो मंदिराभोवती मंतरलेल्या बाहुल्या, लिंब निघाले. जे जाळल्यावर अतिशय घाण वास येऊ लागला आणि त्याच्यानंतर त्या दिवशी पासूनच आपोआप लोक दर्शनास येऊ लागले. हे सर्व आंसपूरला त्यांच्या गावी झाले होते. ते आंसपूरलाच होते. हे आश्चर्य पाहिल्यावर नरेन्द्रनाथांनी त्यांच्या या मंदिरात यावे अशी इच्छा त्यांनी नागनाथशास्त्रीं जवळ बोलून दाखविली. नागनाथशास्त्रींनी त्यांना सांगितले की, नरेन्द्रनाथ आंसपूरला मंदिरात यावे ही तुमची इच्छा असेल तर -दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा- या मंत्राचा 21 लाख जप करा म्हणजे नरेन्द्रनाथांची भेट होईल व ते येतील. त्याप्रमाणे त्यांनी तो जप केला.

पुढे कोटगीरच्या हवनानंतर विठ्ठल महाराजांकडे अन्सापूरला जाण्याचा योग आला. तेथे गेल्यावर हजारो लोकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करीत नरेन्द्रनाथांचे भव्य स्वागत त्यांनी केले. त्यानंतर नरेन्द्रनाथांनी त्या ठिकाणी पंथाचे परंपरागत आन्हिक केले व त्यानंतर त्या हजारो लोकांनी तेलगू भाषेतील त्यांचे पद, भजन म्हणत फुलं वाहत पाच तास अखंड नरेन्द्रनाथांची पूजा केली. त्या पूजेनी नरेन्द्रनाथांच्या रुपाने कार्य करीत असलेले समर्थ सदगुरु योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज संतुष्ट झाले. नरेन्द्रनाथांच्या मुखातून सर्वांना आशीर्वाद देते झाले. नरेन्द्रनाथांचे बोलणे नागनाथशास्त्रींनी तेलगू भाषेत भाषांतरित करून सांगितले.

त्या मंदिरात पिंपळ, कडू लिंब व औदुंबर व त्याखाली दक्षिणमुखी मारुती होता. महाराजरूपी नरेन्द्रनाथ म्हणाले की, जो कोणी गुरुवारी किंवा शनिवारी मारुतीचे दर्शन घेईल व आपली मनोकामना सांगेल ती तात्काळ त्या ठिकाणी पूर्ण होईल. पंथाच्या सामर्थ्यावर त्या ठिकाणी सर्वांसाठी कल्पवृक्षच निर्माण केला. हे ऐकल्यावर सर्व लोक त्या वृक्षाखाली जाऊन आपली कामना मागून ती पूर्ण होते का याची प्रचिती पाहू लागले. त्यावेळी नरेन्द्रनाथांच्या पूजेसाठी बसलेल्या मुख्य यजमानाला नरेन्द्रनाथांनी नारळ प्रसाद म्हणून दिले व सांगितले की, ज्यावेळी तुला माझ्या भेटीची इच्छा असेल त्यावेळी या नारळाला हळद-कुंकू लावून आपली कामना सांग ती तात्काळ पूर्ण होईल.

हे ऐकल्यावर त्याने नमस्कार केला व झाडाखाली जाउन आपली कामना मागितली. म्हणाला की जर कस्टम ऑफिसरने माझा माल सोडला तर मी महाराजांना 1100/- रु. देईल. त्यावेळी संध्याकाळचे 4.30 वाजले होते. नरेन्द्रनाथांना निरोप देऊन सर्वलोक आपल्या घरी पोहचले. यजमान घरी पोहचला त्यावेळी 6.30 वाजले होते. दाराबाहेर एक टेंपो उभा होता हे पाहून त्याला अश्चर्य वाटले. टेंपोतील एक माणूस त्याला म्हणाला की, क्या, साहब, एक घंटेसे हम आपकी राह देख रहे है, साडे चार बजे साहबने बोला उनका सामान टेंपोमें भरकर ले जाव वो जहाँ चाहेंगे वहा सामान उतार दो, एक पैसा भी मत लेना. हे ऐकल्यावर त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले.

नरेन्द्रनाथांनी सांगितल्याप्रमाणे त्या कल्पवृक्षाखाली मागितलेली कामना तात्काळ पूर्ण झाल्याचे पाहून खूप धन्य वाटले. रात्री आठपर्यंत सर्व माल गोडावूनमध्ये उतरवून घेतला व घरी येऊन बायकोला म्हणाला की,माझी कामना पूर्ण झाल्यावर मी महाराजांना पैसे देण्याचे कबूल केले आहे. माझे वचन मला पूर्ण करायचे आहे. उद्या सकाळीच महाराज कोटगीरहून अकोल्याला जाणार आहेत तेव्हा माझी त्यांची भेट कशी होणार त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू झाला होता बायको त्याला म्हणाली की, महाराजांनी दिलेल्या नारळाला हळद-कुंकू लावून आपली भेटीची इच्छा सांगा तिही निश्चितच पूर्ण होईल.

त्याप्रमाणे पूजा करुन गाडीवर एकटाच निघाला. मनामध्ये नरेन्द्रनाथांचे स्मरण चालूच होते. इकडे नरेन्द्रनाथ नागनाथशास्त्रींशी बोलत बसले होते. झोपण्यापूर्वी थंड दूध नरेन्द्रनाथ पीत असत. बाजूच्या घरातील फ्रिजमध्ये दूध ठेवले असायचे ते दूध आणण्यसाठी श्रीकांतशास्त्री छत्री घेऊन बाहेर गेले त्यावेळी रस्त्यावर कोणीच नव्हते. लाईटच्या प्रकाशात तो पाऊस खूपच छान वाटत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजू पाहत पावसात चालल्यानंतर दूध घेऊन श्रीकांतशास्त्री घरात आले. दार लावले आणि त्याचवेळी नरेन्द्रनाथ म्हणाले की, श्रीकांत, दार उघड, बाहेर कोणी तरी उभे आहे. त्यांनी  पटकन उत्तर दिले महाराज बाहेर कोणीच नाही मी आताच पाहून आलो. तरीही नरेन्द्रनाथांनी दार उघडण्यास सांगितले. दार उघडून पाहतो तो दारात ती व्यक्ती उभी होती.

हे पाहून श्रीकांतशास्त्रीच्या मनात विचार आला की, दरवाजापासून नरेन्द्रनाथ बसले ते अंतर जवळपास 40 फूट होते. धो धो पावसात काकांना आवाज कसा काय ऐकू गेला. त्यावेळेला कळले की, प्रत्येकाच्या मनातले सर्वकाही महाराज  जाणू शकतात. त्यावेळी व्यंकटनाथ महाराजांच्या भजनातील ही ओवी अनुभवास येते –

अनंत कोटी ब्रह्मांडाचे दृश्य दिसे त्या दूर दूरचे, जाणे तोची मन मुंगीचे, कां नच जाणे तुझेच मन हे,       देव जागा हृदयी आहे,  तुझे कर्म रे पाहत राहे

त्यावेळी त्याने ती घडलेली सर्व हकीगत नरेन्द्रनाथांना सांगितली व रक्कम रु1,100/- त्यांच्या संकल्पा प्रमाणे दिले.

नागनाथशास्त्री हे सर्व पाहत होते.  त्यांच्या मनात विचार येऊ लागले की, किती सहज नरेन्द्रनाथांच्या सान्निध्यात लोकांच्या कामना परिपूर्ण होतात. या ठिकाणी गुरुच्या कृपेचे सामर्थ्य त्यांना कळले. अनेकांना ते नरेन्द्रनाथांच्या सहवासात आणायचे किंवा त्यांच्या स्वतःच्या उपाय योजनांनी जर एखादे कार्य साध्य झाले नाही तर त्या लोकांना नरेन्द्रनाथांकडे आणायचे. बराच कालावधी नरेन्द्रनाथांच्या सहवासात घालवल्यानंतर त्यांना आपल्यातील उणेपण दिसू लागले. अध्यात्मिक उन्नती गाठायसाठी नरेन्द्रनाथांनी सांगितलेली उपासना करु लागले. विनासायास उपासनेच्या अनुभूती त्यांना येऊ लागल्या. कारण अखंड गुरु परंपरेने चालत आलेल्या अधिकारी व्यक्तीमुळेच चित्तशुध्दी होऊन अध्यात्मिक उन्नती होते.

वेदाचार्य लक्ष्मीकांतशास्त्री जोशी वझुरकर यांनी नरेन्द्रनाथांना विचारले की, नागनाथशास्त्रींची उन्नती किती कालावधीत होईल. त्यावेळी महाराज म्हणाले की, जर ते अखंड सहवासात राहतील तर यापुढील नऊ वर्षानी अध्यात्मिक उन्नती होईल. हे ऐकल्यावर लक्ष्मीकांत शास्त्रींना अध्यात्म मार्ग किती अवघड आहे असे वाटले. त्यावर महाराजांनी सांगितले की, सुरुवातीपासून गुरुच्या सहवासात राहून त्यांची सेवा केल्यास ते कृपा करतात. त्यांची तात्काळ उन्नती होते. नुसते शरीर तापवून व्रत, वैकल्य, उपास-तपास, दान-धर्म, यात्रा, देव धर्म इ. परंपरागत मार्गांनी अध्यात्मिक उन्नती लवकर होऊ शकत नाही. कारण गुरूशिवाय कल्पांतीही मुक्ती नाही असा गुरूचा महिमा अगम्य, अगोचर आहे  वेदांनीसुध्दा ज्या तत्त्वाचे वर्णन करतांना नेती नेती संबोधले आहे तिथे संसारी माणसाला आपला प्रपंच करीत अध्यात्म कसे करायचे हे प्रत्यक्ष आचरणातून नरेन्द्रनाथांनी दाखवले आहे.

सद्गुरूंची पूर्ण कृपा झाल्यावर आणि शिस्तीत पंथ कार्य केले तर सामर्थ्यशाली देवता कार्याला सहाय्यभूत होत असतात.

Leave a Reply