वाल्मीकी ऋषींचा जीवनप्रवास
नरेंद्रच्या सद्य जीवनाची ही गती पहा आणि वाल्या कोळी जो पुढे वाल्मिकी ऋषी झाला त्याच्या जीवनाची गती पहा म्हणजे जीवनात स्थित्यंतर कसे घडते हे लक्षात येईल. सर्वांनाच माहीत आहे, वाल्मीकी ऋषी हे पूर्वाश्रमीचे वाल्या कोळी होते. वाटमारी, रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना धर–पकड–मार–लूट करणे हा त्याचा व्यवसाय. पाप-पुण्याचा विचार न करता प्रपंचासाठी त्याचा हा उपद्व्याप चालू होता.
ब्रह्मर्षी नारदांनी केलेली स्थित्यंतराची सुरुवात
एके दिवशी ब्रह्मर्षी नारदमुनींच्या लक्षात ही गोष्ट आली. वाल्याचे प्रारब्ध, पूर्वसुकृत, संचित अत्यंत अनुकूल होते; सर्व योग चांगले असूनही त्याचे जीवन अशा अंधःकारात का घसरले असेल? हे समजून घेण्यासाठी नारदमुनी ब्राह्मणाचे रूप घेऊन त्याच्या समोर उभे राहिले.
वाल्या कोळीने नेहमीप्रमाणे त्या ब्राह्मणाला पकडले. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, “तू मला मारू नकोस. तुला जे हवे ते मी देईन; पण आधी एक प्रश्नाचे उत्तर दे. तुझ्या या नित्य व्यवहारातून निर्माण होणाऱ्या पापात तुझ्या पत्नीला अर्धा हिस्सा मान्य आहे का? तू तिला हे विचारून ये.”
ब्राह्मणाच्या आग्रहामुळे वाल्या कोळी घरी गेला. पत्नीला विचारताच ती सरळ म्हणाली, “ह्यांच्या कृतीतून होणाऱ्या पापाशी माझा काही संबंध नाही. हे जे आणतात त्यावर मी प्रपंच चालवते.” पत्नीचे उत्तर ऐकून वाल्या विचारात पडला; मनात उद्विग्नता निर्माण झाली आणि त्याला उपरती झाली.
तो ब्राह्मणाजवळ परत आला व म्हणाला, “मी पुढे काय करू?” तेव्हा नारदमुनींनी सांगितले, “तू 'राम राम' जप कर.” पण त्याला 'राम' उच्चारताच येईना. म्हणून नारदमुनी म्हणाले, “तू 'मरा मरा' म्हण.” 'मरा मरा' म्हणता म्हणता तो उच्चार आपोआप 'राम राम' झाला आणि त्याचे तप सुरू झाले.
तो तपात इतका तल्लीन झाला की काळाचा भानच राहिले नाही. तो वारुळात लुप्त झाला आणि वाल्या कोळीचा वाल्मीकी ऋषी असा दिव्य रूपांतरण झाला. त्यांची तपसिद्धी इतकी प्रखर की प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मापूर्वीच त्यांनी संपूर्ण रामायणाची रचना केली.
पूर्वसंचित आणि प्रारब्धाचा अनिवार प्रभाव
वाल्याच्या जीवनावरून हे स्पष्ट होते की एक सामान्य जीवसुद्धा, ज्याचे बाह्य जीवन वाईट दिसत असले तरी, त्याचा पूर्वेतिहास महान असू शकतो आणि त्या पूर्वजन्मीच्या संचित-कर्मामुळे त्याला योग्य वेळी सिद्धमहात्म्यांचा स्पर्श मिळू शकतो.
ब्रह्मर्षी नारदमुनी — भगवान विष्णूचे परमभक्त, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्रिकालज्ञ — हे जाणून होते की जीवाचा जीवनप्रवास अखंड असतो. गर्भस्थापनेच्या वेळी जीव आपले पूर्वजन्मीचे कर्मगाठोडे घेऊन येतो. त्या कर्मानुसार त्याच्या जीवनातील घटना घडतात.
वाल्याचे प्रारब्ध चांगले असतानाही प्रत्यक्ष जीवनात ऋषीत्व दिसत नव्हते. म्हणून नारदमुनींनी तप:सामर्थ्याने त्याच्या जीवनात स्थित्यंतर करण्याचे ठरवले आणि ते साध्य केले. जसे नारदांनी वाल्याचे जीवन बदलले तसेच योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांनी नरेंद्राच्या जीवनात स्थित्यंतर घडवले.
सद्गुरूंनी सांगितलेले वचन स्पष्ट होते — “आम्ही दगड हातात घेतो, घाव देत देत त्याला मूर्तीचे रूप देतो आणि मग ती मूर्ती जीवंतपणे कार्य करू लागते.” जसे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले, तसेच अशक्यप्राय वाटणारे कार्य सद्गुरू सहजतेने करतात.
गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायातील ओवी (८२) सांगते:
अतिव्याकूळ अंतःकरणी । कष्टला भक्त नामकरणी । निंदा-स्तुती आपले वाणी । करिता होय परियेसा ॥
जीवाच्या अंतर्मनात गुरूविषयी ओढ निर्माण झाली की निंदा–स्तुती गौण ठरते आणि सद्गुरू स्वतः जीवाला उचलतात. नरेंद्राचाही प्रवास तसाच होता.