श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

जसा भाव तसे फळ

पर्वतेश्वराची दृढ श्रद्धा

गुरुचरित्र अध्याय ४७ मध्ये सिद्धयोगी नामधारकाला श्रीगुरु एक अपूर्व कथा सांगतात. ही कथा श्रवण केली असता सर्व इच्छा पूर्ण होतात असे माहात्म्य सांगितले आहे. श्रीगुरू गाणगापुरात असताना त्यांची ख्याती सर्वत्र झाली होती. त्याच गावात पर्वतेश्वर नावाचा एक गरीब शेतकरी श्रीगुरूंचा परमभक्त होता. तो काया, वाचा, मनाने गुरूंची सेवा करीत असे.

त्याचा एक नेम होता—श्रीगुरू नित्य स्नान-संध्यासाठी संगमावर जात असताना ते दिसले की तो धावत पाय पडत असे. कित्येक दिवस हा नेम सुरू होता; पण श्रीगुरू त्याच्याशी बोलत नसत.

श्रीगुरूंची परीक्षा

एका दिवशी श्रीगुरूंनी विचारले, “तू नित्यनेमाने नमस्कार करतोस, हे कष्ट का? तुझी इच्छा काय?” पर्वतेश्वर म्हणाला, “माझ्या शेताकडे आपली कृपादृष्टी असावी. चांगले पीक यावे.”

श्रीगुरूंनी विचारले, “काय पेरले आहेस?” तो म्हणाला, “ज्वारी.” प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी सांगितले, “तुझा माझ्यावर विश्वास असेल तर मी परत येईपर्यंत तुझ्या शेतातील हे पूर्ण पीक चार बोटे खाली ठेवून कापून टाक.”

पर्वतेश्वर म्हणाला, “आपला शब्द मला प्रमाण.”

लोकांचा विरोध – पण पर्वतेश्वराचा निर्धार

शेतकरी गावात अधिकार्‍याकडे गेला, पिक कापण्याची परवानगी घेतली आणि दुप्पट धान्य देण्याचे वचन दिले. गडी घेऊन शेत कापण्यास सुरुवात झाली. बातमी ऐकून त्याची बायको-मुले रडत आली, गावकरी निंदा करू लागले—“एका संन्याशाच्या सांगण्यावर हा मूर्खपणा करतो!”

पण पर्वतेश्वर डगमगला नाही. त्याने संपूर्ण पीक कापून टाकले.

श्रद्धेला फळ मिळण्याची वेळ

तो श्रीगुरूंना संगमावरून घेऊन आला. गुरूंनी हसत म्हणाले, “अरे, मी गंमतीने सांगितले—तू खरेच कापलेस!” तो नम्रपणे म्हणाला, “आपली आज्ञा मला प्रमाण.”

प्रसन्न होऊन श्रीगुरू म्हणाले, “जसा तुझा भाव तसे फळ.” ते मठात गेले.

चमत्कारिक फळ — गुरुकृपेचा प्रत्यय

काही दिवसांनी प्रचंड वादळ झाले. मुसळधार पावसाने संपूर्ण गावातील पिके बुडाली, ओला दुष्काळ पडला. पण पर्वतेश्वराच्या शेतातील ज्वारीच्या बुडख्यांना असंख्य अंकुर फुटले. पीक जोराने वाढले. शतपटीने धान्य आले.

गाव दुष्काळात होता आणि पर्वतेश्वराच्या शेतात गावाला पुरेल इतके धान्य आले. बायकोने पती व श्रीगुरूंना क्षमा मागली. सर्वजण श्रीगुरूंच्या दर्शनाला गेले. गुरूंनी आशीर्वाद दिला, “तुमच्या घरी लक्ष्मी अखंड राहील.”

तो अधिकार्‍याला दुप्पट सारा देऊन उरलेल्या धान्यातील निम्मे धान्य गावकऱ्यांना दान करू लागला. गुरुकृपेने त्याचे कुटुंब सुखी झाले.

या कथेतून मिळणारा बोध

सिद्धयोगी म्हणाले, “श्रीगुरूंच्यावर ज्याची दृढ श्रद्धा आहे त्याच्या घरी दीनता, दारिद्र्य राहत नाही. भावभक्तीने सेवा करणार्‍यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. लक्ष्मी अखंड राहते.”

अशा प्रकारे ‘जसा भाव तसे फळ’ हा गुरुचरित्रातील सत्तेचाळीसावा अध्याय समाप्त होतो.

नाथ शक्तिपीठातील अनुभव — आजही तेच तत्त्व सत्य

नाथ शक्तिपीठासाठी भौरद (अकोला) येथे चार एकर शेती कराराने घेतली होती. पाच–सहा महिन्यांचा अवधी होता; पण तात्पुरते बांधकाम व विहीर करण्यासाठी काही जागा आधी ताब्यात घेण्याची गरज होती.

शेत विकणारा शेतकरी गरीब पण श्रद्धावान होता. त्याने म्हटले, “माझे पीक निघून गेले आहे; झाडे निर्जीव झाली आहेत. आता काही येणार नाही. तुम्ही संपूर्ण शेत वापरा.”

आम्ही केवळ गरजेपुरती जागा घेतली; बाकीचे शेत तसेच ठेवले. मार्च ते मे या दोन महिन्यांत, जिथे पराठी उभी होती, तिथे देवकृपेने पुन्हा कापूस आला—जवळजवळ पूर्वीइतकाच!

शेतकरी गुरुकृपेने भारावून गेला. नंतर शेती पूर्णपणे ताब्यात दिली.

निष्कर्ष — आजही गुरुकथा जिवंत आहेत

गुरुचरित्रातील प्रसंग आजही तंतोतंत अनुभवाला येतात. साशंक न राहता, प्रांजळ आणि शुद्ध भावनेने, जीवनातील विहित कर्मे करीत राहावे. श्रद्धा असेल तिथेच चमत्कार जन्माला येतो — जसा भाव तसे फळ.