श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

गोरक्षनाथांनी पर्वत सुवर्णाचा केला

सौराष्ट्र गावाहून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ फिरत फिरत तेलंगणात गेले. तेथे गेल्यावर त्यांनी गोदावरीच्या संगमावर स्नान करून आत्मलिंग शिवाची पूजा केली. तेथून ते औंढा नागनाथ, परळी वैजनाथ वगैरे सर्व तीर्थे उरकून गर्भगिरी पर्वतावर वाल्मीकी ऋषींचे स्थान आहे. तेथे ते अरण्य फार घनदाट होते. अशा त्या घनघोर व भयाण अरण्यातून प्रवास करण्याची वेळ येताच मच्छिंद्रनाथ दचकले.

त्यांना एवढे घाबरण्याचे कारण म्हणजे स्त्रीराज्यातून निघतांना मैनाकिनीने त्याच्या झोळीत टाकलेली सोन्याची वीट होती. ती वीट वाटेत चोर नेतील, या भीतीने त्यांच्या जिवाची घालमेल झाली होती. गोरक्षनाथांच्या लोभाची परीक्षा पाहण्यासाठीच ही सर्व भीती होती. मच्छिंद्रांना भीती कशाची असणार? तरी ते गोरक्षांना जवळ घेऊन सारखे विचारू लागले —“काय रे, त्या अरण्यात चोरांची भीती नाही ना?”

हे ऐकून ‘‘गुरूंना चोरांचे भय का?’’ असा विचार गोरक्षांच्या मनात आला. ‘‘गुंरू जवळ काही तरी मौल्यवान असले पाहिजे, त्यामुळे भीती वाटत असेल’’—असा त्यांनि तर्क केला. या भीतीच्या निवारणाचा विचार करीत ते मुकाट्याने चालत होते.

इतक्यात एका ठिकाणी पाणी दिसले. मच्छिंद्रनाथांनि गोरक्षांना जरा थांबायला सांगितले आणि झोळी त्याच्याकडे देऊन शौचास गेले. झोळी जड लागल्यामुळे गोरक्षाने झोळीत काय आहे ते पाहिले. सोन्याची वीट दिसताच ‘‘हेच गुरूंच्या भीतीचे कारण’’ हे त्यांना समजले. त्याने ती वीट फेकून दिली व विटेच्या आकाराचा दगड त्यात ठेवला.

मच्छिंद्रनाथ शौचाहून आल्यावर पुढे चालू लागले. पूर्वीसारखे त्यांनी पुन्हा विचारले, ‘‘पुढे काही भीती नाही ना?’’ गोरक्षनाथ म्हणाले, ‘‘भीती सगळी मागेच राहिली. आता अजिबात काळजी नका करू.’’

हे उत्तर ऐकून मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले. त्यांनि सोन्याच्या विटेची गोष्ट सांगितली आणि भीती पुन्हा बोलून दाखविली. ते ऐकून गोरक्ष म्हणाला, ‘‘आता आपल्याला डर नाही.’’

मच्छिंद्रनाथांनी विटेची तपासणी केली. पण झोळीत सोन्याची वीट नसल्याचे दिसताच ते गोरक्षाला चांगलेच रागावले. मोहाने ते रडू लागले, गडबडा लोळू लागले आणि वेड्यासारखे नाचूही लागले.

मच्छिंद्रनाथांचे हे जिव्हारी लागणारे बोल ऐकूनही गोरक्ष शांत राहिला. त्याने गुरूंचा हात धरून त्यांना पर्वतशिखरावर नेले. तिथे जाताना गोरक्षाने पर्वतावर सिद्धयोग मंत्र जपून संपूर्ण पर्वत सुवर्णाचा केला.

गोरक्ष म्हणाला, ‘‘गुरुदेव, जेवढे सोने पाहिजे ते घ्या.’’ हे अघटित कृत्य पाहून मच्छिंद्रनाथ गोरक्षाची वाहवा करू लागले. त्याला आलिंगन देऊन म्हणाले, ‘‘बाळा गोरक्षा! तुझ्यासारखा परीस असताना मी सोन्याच काय करणार?’’

मच्छिंद्रनाथ म्हणाले, ‘‘माझ्या मनात असा हेतू होता की, आपल्या देशात गेल्यावर साधुसंतांची पूजा करावी, भंडारा घालावा.’’ गोरक्षाने या इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर गोरक्षनाथाने गंधर्वास्त्र मंत्र योजून भस्माची चिमटी स्वर्गाकडे फेकली. तत्क्षणी चित्रसेन गंधर्व येऊन वंदन करून विचारू लागला—‘‘काय आज्ञा?’’ गोरक्ष म्हणाला, ‘‘आणखी गंधर्वांना बोलाव. बैरागी, संन्याशी, जपी-तपी, साधूसंत, देव, गंधर्व, दानव, किन्नर सर्वांना येथे आण. आम्हाला अन्नदान घालायचे आहे.’’

चित्रसेनाने शंभर गंधर्व आणले व सर्वांकडे आमंत्रण पाठवले. थोड्याच वेळात याज्ञवल्क्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मीकी, शुक्राचार्य, दत्तात्रेय आदी अनेक मुनिगण तेथे आले.

गोरक्ष म्हणाला, ‘‘जेवणासाठी मंडळी जमली आहेत. वाटेत टाकून दिलेली तुमची सोन्याची वीट मी आणून देतो.’’ मच्छिंद्रनाथ म्हणाले, ‘‘तुझ्यासारखा उत्तम शिष्य असताना मला सोन्याची काय चिंता!’’

नंतर गोरक्ष अन्नदानाच्या कामाला लागला. अष्टसिद्धींना बोलावून स्वयंपाकाची कामे दिली. अनेक पक्वान्ने तयार झाली. सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे केली.

कुबेर स्वतः आला आणि म्हणाला, ‘‘तुमचा सोन्याचा पर्वत इथेच राहू द्या. सर्वांना वस्त्रे-भूषणे मी देतो.’’ त्याने तसे दिले. गोरक्षनाथांनी तो सुवर्ण पर्वत कुबेरालाच दान दिला.

अशा प्रकारे गोरक्षनाथांनी निर्जीव वस्तूवर प्रभाव करून पर्वत सोन्याचा केला व तो कुबेराला दान दिला.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/नवनाथ/गोरक्षनाथांनी-पर्वत-सुवर्णाचा-केला.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)