कलियुगांत नाथपंथाला वेगळे महत्त्व का
धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व राहिल. राजे चोरासारखे लोकांना लुबाडतील. चोरी, खोटे बोलणे, विनाकारण हिंसा इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्मे करून लोक उपजीविका चालवितील.
परंतु काळ एवढा बदलेल की धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्यबळ आणि स्मरणशक्ती यांचा लोप होत जाईल. कलियुगामध्ये ज्याच्याकडे धन–संपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सदगुणी मानतील. धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत शक्तीच प्रभावी ठरेल.
विवाह संबंध एकमेकांच्या आवडीने ठरतील. व्यवहारात कपटालाच जास्त महत्त्व असेल. स्त्री आणि पुरुषाचे श्रेष्ठत्व त्यांच्या *रतिकौशल्यावरून* ठरेल.
ब्राह्मण्याची ओळख फक्त ‘जानवे’ एवढीच राहील. बाह्यवेषावरून आश्रम ठरेल आणि त्यावरूनच दुसऱ्या आश्रमात प्रवेश असेल. पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही. बोलण्यातली चातुर्यपूर्ण वाक्येच पांडित्य समजली जातील.
गरिबी हेच दुर्जनत्वाचे लक्षण मानले जाईल, आणि दांभिकपणा हे साधुत्वाचे लक्षण समजले जाईल. प्रसाधनालाच स्नान समजले जाईल. डोक्यावर केस राखणे हे सौंदर्याचे लक्षण समजले जाईल.
आपले पोट भरणे हा मोठा पुरुषार्थ असेल आणि ठासून बोलण्यालाच सत्य मानले जाईल.
राजे लुटारू, लोभी व क्रूर असतील; ते प्रजेचे धन व बायका पळवतील. कधी कोरडा दुष्काळ पडेल, तर कधी निरनिराळे कर लादले जातील. कधी कडक थंडी पडेल, कधी हिमवर्षाव होईल; कधी तुफान, कधी उष्णता वाढेल, कधी पूर येतील — असे उत्पात वारंवार होत राहतील.
या युगाची स्थिती अत्यंत दारुण व विषम असते. भूकंप, उल्कापात, अनावृष्टी इत्यादी दैवी उत्पात सतत होत राहतील. पारंपारिक संघर्ष वाढीस लागेल. वेदशास्त्राची प्रामाणिकता समाप्त होईल.
लोक अकाल मृत्यूला सामोरे जातील. कोणी गर्भातच, कोणी बालपणी, कोणी यौवनात, तर कोणी वृद्धावस्थेत — पूर्ण आयुष्य न भोगता काळाच्या स्वाधीन होतील. प्रजा गुणहीन बनेल.
वेदशास्त्राच्या अध्ययन–अध्यापनाची परंपरा उच्छिन्न होईल. शूद्र ब्राह्मणत्वाचा स्वीकार करतील; ब्राह्मण शूद्र बनतील. राजे चांडाळासारखे आचरण करतील. पुरुष आचारहीन होतील; स्त्रिया असत्य भाषिणी व मद्य–मांस सेवन करणार्या होतील.
सर्व वर्णांचे स्त्री–पुरुष धनलोभाने ग्रासलेले असतील. धर्माचा विक्रय होईल. चोरी, डाका, हत्या, द्रोह, अग्निसंकट हे सतत घडत राहील.
कलियुगाची ही परिस्थिती ब्रह्मदेव अथवा अन्य कोणीही बदलू शकत नाही. म्हणूनच नाथपंथाची निर्मिती करावी लागली.