श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

ज्ञाननाथांची प्रखर सिद्धता

गुरुचरित्राच्या सत्ताविसाव्या अध्यायात कर्मविपाक सिद्धांत सांगितला आहे. दोन विप्रांनी वेदांवर वाद घाला अथवा जयपत्र द्या असे म्हटले होते. गुरूंनी अनेक तऱ्हेने त्यांना समजावून सांगितले होते, पण ते ऐकायला तयार नव्हते.

तेवढ्यात एक माणूस रस्त्याने जात होता. त्याला गुरूंनी बोलावले आणि जमिनीवर सात रेषा काढून त्याला त्या ओलांडायला सांगितले. त्यांनी प्रत्येक रेष ओलांडताना त्या त्या जन्माची त्याची अख्यायिका सांगितली.

त्याच प्रमाणे चांगदेवांना देखील आपली निरजिव वस्तूवर सत्ता दाखवली. ज्ञाननाथांनी देखील रेड्याला सात रेषा ओलांडायला सांगितल्या आणि प्रत्येक जन्माची ओळख त्या रेड्याला द्यायला लावली.

कुटुंब व्यवस्थेतून जन्म घेतल्यावर देखील कार्याची सिद्धता तेवढीच प्रखर आहे, हे ज्ञानेश्वरांनी निरनिराळ्या प्रकारांनी दाखवून दिले.


चांगदेवांची परीक्षा

चांगदेव एक थोर योगी होते. ते नाथपंथी नव्हते, परंतु हटयोगी होते. त्यांना हटयोग चांगलाच साधला होता. चांगदेव हे सद्य युगातील म्हणजे कलियुगातीलच होते.

कलियुगातील तत्त्वानुसार या युगात मानवी जीवन हे एकशे वीस वर्षाचे असू शकते. याचा उल्लेख वेदांमध्ये देखील आहे. परंतु चांगदेव हे १४०० वर्षे या भूमीवर होते. मृत्यू आला की आपल्या योगसामर्थ्याने तो टाळायचा आणि पुन्हा योगसाधनेत राहायचे. असे करत करत दरवेळेस मृत्यू टाळून ते १४०० वर्षे या भूमीवर होते.

पुढे ज्ञाननाथांचा जन्म झाला आणि त्यांची कीर्ती ऐकता ऐकता यांना असे वाटले की आपण आपल्या योगसामर्थ्याने ज्ञाननाथांना भेटायला जाऊ आणि आपल्या सामर्थ्याचा परिचय त्यांना देऊ. वयाने लहान असलेल्या ज्ञाननाथांची कीर्ती सर्वत्र पसरली होती.

त्यांची कीर्ती आपल्यापेक्षा जास्त कशी, या भावनेने चांगदेव त्यांच्या भेटीसाठी गेले.


पडक्या भिंतीवरून दाखवलेली सिद्धता

एकदाचा प्रसंग. सकाळची वेळ होती. ही सर्व भावंडे गावातल्या एका पडक्या भिंतीवर बसलेली होती.

ज्ञाननाथांची कीर्ती ऐकून १४०० वर्षांची तपश्चर्या असलेले योगी चांगदेव त्यांच्या भेटीसाठी आले. ज्ञाननाथ वयाने लहान पण कीर्तीने मोठे होते.

त्यांना कसे भेटावे हे चांगदेवांना कळले नाही. शेवटी आपला रुबाब दाखवण्यासाठी ते एका जंगली चवताळलेल्या वाघावर बसले. हातात एक जहरी नाग चाबूक म्हणून घेतला.

आकाशमार्गाने उडत उडत वेगाने निघाले व ज्ञाननाथांच्या समोर आले.

ज्ञाननाथांनी भिंतीला म्हणाले:

“चल बाई, एवढे मोठे योगी आले आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समोर चल.”

असे म्हणताच ती जीर्ण भिंत, बसलेल्या भावंडांसह, चालत चालत चांगदेवांच्या समोर आली.

चांगदेव अचंबित झाले — *वन्य जीवांवर प्रभुत्व दाखवण्यासाठी मी आलो आणि यांनी तर निर्जीवावर प्रभुत्व दाखविले!*

ज्ञाननाथांची महानता लक्षात घेऊन चांगदेव त्यांना शरण गेले.


पंचमहाभूतांवरील सत्ता

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश — या पंचमहाभूतांवर नाथांची सत्ता आहे हे नवनारायणांनी दाखवून दिले होते. त्याच प्रमाणे ज्ञाननाथांनी ते सिद्ध केले.

ज्ञाननाथांच्या कृपेने चांगदेवांची १४०० वर्षांची तपश्चर्या एका क्षणात लयास गेली. हे योगीजनांच्या सहज सिद्धतेचे उदाहरण होते.


रेड्याच्या मुखातून वेद — कर्मविपाकाचे प्रात्यक्षिक

ज्ञाननाथांनी, जीवाच्या जीवनावर असणारी अलौकिक सत्ता दुसऱ्या उदाहरणातूनही दाखवली.

भूदेवांनी आपल्या वडिलांवर लावलेले आरोप दूर करण्यासाठी ज्ञाननाथ शुद्धीपत्र मागण्यासाठी गेले.

भूदेवांनी टिंगल उडवत विचारले, “बाळ, तुझे नाव काय?” ज्ञाननाथ म्हणाले, “ज्ञानदेव.”

नेमके तेवढ्यात एक शेतकरी रेडा घेऊन चालला होता.

भूदेव म्हणाले: “याचेही नाव ज्ञानदेव आहे. मग काय, तुझ्यातील वेदज्ञान यालाही असायला पाहिजे. हा वेद म्हणू शकतो का?”

ज्ञाननाथ म्हणाले, “होय.”

ज्ञाननाथांनी जमिनीवर सात रेघा काढल्या — गतसात जन्मांचे प्रतीक. रेडा प्रत्येक रेघ ओलांडताना त्या त्या जन्माची ओळख सांगत होता.

सातवा जन्म ओलांडल्यावर ज्ञाननाथ म्हणाले:

“मागील जन्मी तू यजुर्वेदी ब्राह्मण होतास. वेद म्हणत होतास. आता म्हणून दाखव.”

आणि त्या रेड्याने वेदपठण सुरू केले.

भूदेव स्तब्ध झाले.


नाथपंथाची अखंड परंपरा

ज्ञाननाथांनी मिळवलेले ज्ञान निवृत्तीनाथांकडून प्राप्त झाले होते. त्यांनी पंथाची अखंडता पुढे चालवली.

ज्ञाननाथांनी सत्यमलनाथांना गुरूकार्य करण्याची आज्ञा केली. तेथून ही सिद्धता परंपरेने:

सत्यमलनाथ → गुप्तनाथ → परमहंसजी → ब्रह्मानंद → परमानंद → काशीनाथ → विठ्ठलनाथ → विश्वनाथ → माधवनाथ → व्यंकटनाथ

… अशा अविचल रूपाने पुढे गेली आणि 1993 च्या महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहिली.

त्याच नाथपंथाचे कार्य आजही सिद्धतेने सुरू आहे.

बहुतांश लोक पैसा आणि कीर्तीच्या मागे लागून जीवनमूल्य विसरले असले तरी नाथपंथ आपले उद्दिष्ट विसरलेला नाही.

जीवोद्धार, आत्मोन्नती आणि आध्यात्मिक प्रगती — हीच नाथपंथाची अखंड ध्येयपरंपरा आहे.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/निवृत्तीनाथ-ते-विश्वनाथ/ज्ञाननाथांची-प्रखर-सिद्धता.txt was सर्वात शेवटचा बदल: on 31-Jan-2026 (21:38)