अकोला सांस्कृतिक व आध्यात्मिक नगरी
अकोला हे विदर्भातील एक सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वैभवाने नटलेले नगर. मयूरगंगा अथवा मोरणा नदीच्या किनारी वसलेले हे शहर राजराजेश्वर नगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. कारण येथे असलेले श्री राजराजेश्वर महादेव हे ग्रामदैवत स्वयंभू मानले जाते. शतकानुशतके अकोल्यातील लोकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले हे मंदिर आजही तितक्याच भक्तिभावाने उजळून निघते.
राजराजेश्वर महादेवाची आख्यायिका
मोरणा नदीच्या पश्चिम किनारी स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे. शिवलिंगासमोर असदगड नावाचा किल्ल्यासारखा उंच गड दिमाखात उभा असून, त्या गडाचा राजा अकोलसिंह म्हणून ओळखला जात असे.
अकोलसिंहाची पत्नी अत्यंत भक्त असणारी भाविक राणी. ती रोज उशिरा रात्री स्नान करून, शुचिर्भूत होऊन, श्री महादेवाच्या दर्शनासाठी निघत असे. तिची ही नित्य सेवा पाहून राजाच्या मनात एके दिवशी संशय निर्माण झाला. त्याने राणीचा गुप्तपणे पाठलाग केला. राणीने देवदर्शनासाठी केलेल्या या पवित्र प्रवासावरच संशय घेतल्याचे कळताच ती अत्यंत व्यथित झाली. देवळात पोहोचताच तिने वेदनांनी भरलेल्या आवाजात महादेवांना प्रार्थना केली— “हे देवाधिदेवा, भोळ्या शंकरा… मला तुझ्यात सामावून घे!” तिच्या आर्त भक्तीने भोळानाथ प्रसन्न झाले. म्हणतात, त्या क्षणी ती महादेवाच्या तेजात विलीन झाली. आजही हे स्थान त्या भक्तीची साक्ष देते. शिवमंदिराच्या शेजारीच आदिगुरू श्री दत्तात्रेयांचे प्राचीन मंदिर असून, हे दोन्ही स्थळ अकोल्याच्या अध्यात्मिक ओळखीचा कणा मानले जाते.