श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: आत्मोन्नती साधना ७

आत्मोन्नती साधना ७

42. “ मिरवी यशस्वंत लक्ष्मिवंत म्हणोनी, परि मन खाई एकांती। काही केल्या मन स्थिर न होई, हिंडतसे सुखशांतीते। । ” अखिल ब्रह्नांडा मध्ये ज्ञान देण्याचा सर्वाधिकार श्री सद्गुरूंचाच आहे. ईश्वरान ब्रह्मांडाची निर्मिती केली. मात्र त्यानींही हा अधिकार आपल्याकडे ठेवला नाही. ज्ञानामुळे परम शांतीचा लाभ होतो. श्री सद्गुरू अनुग्रहित शिष्यात ज्ञानाचे दृढीकरण करत असतात. ज्ञानाचे दृढीकरण जस जसे होते तसतसे अज्ञानाची लक्षण आपल्यामधून पसार व्हायला लागतात. मोह, ममता, अहंता ही अज्ञानाची त्रिवेणी आहे. जीव या त्रिवेणीत मनसोक्त बुडतो. मग त्याची भाषा मी पासून सुरू होते आणि माझेवर संपते. पंचसमासी मध्ये समर्थांनी बध्द जीवाच्या या भाषेचा उल्लेख केला आहे. माझी माता, माझा पिता। माझे पुत्र, माझी कांता। माझे बंधु, माझी सुता। जामात माझे। । माझे घर, माझा संसार। माझी जन्मभूमी सार, माझे सोयरे अपार। शेत वाडे पशु। । माझे शरीर माझी संपत्ती। माझे वैभव, माझी संतती। सर्वांचा अभिमान चित्ती, दृढ जाला। । ऐसे माझें माझें म्हणता। अभिमानें वोझें वाहतां। आयुष्य वेचिले अवचितां। मरोन गेला। । या मी व माझे च सार काय निघाल. समर्थ म्हणतात संसारातील वासनेत स्वतःला गुंतवून स्वतःचा अभिमान धरणारा प्राणी अनंत यातना भोगतो. प्रपंचाचे अस ओझ वाहणार्‍यास समर्थ 'कुटुंबकाबाडी ' म्हणतात. आत्मोन्नती साधनेत प. पू. नरेंद्रनाथांनी कुटुंबकाबाड्याच असच वर्णन केल आहे. अथक प्रयत्नानी अपार संपत्ती मिळविली. त्यातून स्वर्गोपभोग निर्माण केले. लोकांमध्ये यशस्वंत, लक्ष्मीवंत म्हणून स्वतःला मिरविले. पण शांती समाधान काही मिळेना. दशदिशेला हिंडतो आहे. सार असून काहीच नाही अशी ही स्थिती. हेच अज्ञान. सद्गुरू हे अज्ञान घालवितात.

43. “ जन्मोजन्मीची आस, गुरू मिळावा मज विशेष। योगायोगे लाभती सत्पुरूष, शांती लाभे त्यांचे समीप। । ” स्मृतींनी श्री सद्गुरूंच यथार्थ वर्णन केल आहे. “ ब्रह्मैवगुरूरूपेण वतिष्ठते “। ब्रह्म या तत्त्वाला जेव्हा बध्द जीवाचा कळवळा आला. त्याचा उध्दार करण्यासाठी हे तत्त्व मानवी स्वरूपात प्रगट झाल. आपण सरसगट गुरू आणि सद्गुरू समानार्थी समजत असतो. मात्र ते तसे नाही. गुरू ही व्यक्ति आहे. सद्गुरू हे तत्त्व आहे. हे तत्त्व चार-चौघांसारखेच वाटते. दिसते. म्हणूनच आम्ही त्यांचे बाबत नेहमीच चूकत असतो. त्यांना ओळखणे. त्यांचे चरणांशी निष्ठावंत राहणे. त्यांचे सेवेकरिता सान्निध्य लाभणे. त्यांचे विषयीचा शरणांगत भाव सतत वाढता असणे. त्यांच वचन वेद प्रमाण मानणे. या सर्वांसाठी आपल प्रारब्ध आणि संचित चांगल असाव लागत. अन्यथा कलि तेवढ सद्गुरू तत्त्व सोडुन जीवाला अन्यत्रच भटकवतो. संतकवी श्री दासगणू महाराजांनी ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज शेगांव यांची आरती गायीली आहे. संतकवींनी या आरती मधुन श्री सद्गुरू तत्त्वाच स्वरूप, कार्य स्पष्ट केल. सद्गुरू हे सत्, चित् स्वरूप आहेत. हे तत्त्व सत् आहे. ज्ञानस्वरूप आहे. जड-मुढ जीवांना तारण्यासाठी ते अवतीर्ण झाले आहेत. संतकवी पुढे म्हणतात. होऊ न देशी त्याची जाणीव तू कवणा. सद्गुरू हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. मानवाच्या तर्क, बुध्दि, शक्ति, युक्ति च्या पलिकडे जाऊन कार्यरत राहणार हे तत्त्व आहे. ते मानवी स्वरूपात असल्यामुळे या तत्त्वाशी आम्ही माणूस म्हणूनच व्यवहार करित असतो. इथेच आमची घोडचूक होते. मात्र जो त्यांचा होईल. त्यांचे चरणी निष्ठावंत भाव ठेवील. त्याचे ते कल्याण करतात. त्यांच्या कार्याच स्वरूप स्पष्ट करतांना संतकवी म्हणतात की, “व्याधी वारून केले कैका संपन्न. ” आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक अशा त्रिविध व्याधींनी हा जीव होरपळला जातो. परिणामी शांती, सुख, समाधान, चित्त, वित्त अस सारच काही गमावून बसतो. सद्गुरू त्याचे कडून उचित कर्म, उपासना करवून घेतात. त्याचेतील दोष वजा करतात. त्याच चित्त, वृत्ती, प्रवृत्ती सज्जन, सत्शील करतात. गुरूमार्गी जीवाचा त्रिविध ताप नाहीसा होतो. नाही तरी त्याची तीव्रता तरी बोथट होते. जशा व्याधी नाहीशा व्हायला लागतात तसा गुरूमार्गी जीव संपन्न होत जातो.

44. ” संत सद्गरू असती परमेश्वर, ज्ञानाचा ते अथांग सागर। स्वप्रयत्ने स्थित्यंतर घडविती, साधकात क्षणोक्षणी। ” ''व्यवहारात आपण जो श्रीमंत असतो त्याचे गुण गातो. त्याच्या मागेपुढे करतो. त्यान पश्चिमेला पूर्व म्हणाव. आपण त्यालाही हो म्हणतो. आपला स्वार्थ व चोचले पुरविणारा म्हणून आपण त्याचा उदो उदो करतो. वेळप्रसंगी त्यान केलेला अपमानही गोड मानून घेतो. संतही श्रीमंत असतात. त्यांच्या संगतीला आलेल्या प्रत्येकास ते श्रीमंत बनवितात. आपण श्रीमंत कस झालो याची युक्ति ते सांगतात. आपल्या जवळच महाधन ते खुशाल लुटतात. मात्र कुणाचाही अपमान करित नाहीत. संतांजवळ विषय सुखाच्या समृध्दीची श्रीमंती नसते. मुळात ती समृध्दि नसते. ती चंचल आहे. नाशीवंत आहे. संताजवळ परमार्थाच महाधन असत. त्यायोग ते ईश्वराचे समचरण मिळवितात. तुका म्हणे धन। ज्याचे निज नारायण। अशी अविनाशी श्रीमंती त्यांची असते. तुकोबारायांनी मी श्रीमंत कसा झालो. याच रहस्य उलगडून दाखविल आहे. “काही पाठ केली संतांची वचनं। अति आदर ठेवोनिया। । संत हेच सद्गुरू असतात. त्यांच्या वचन आणि चरणांवर निष्ठावंत भाव ठेवल्यास आपण ही श्रीमंत होऊ. आत्मोन्नती साधना हेच सांगते. जुन्या दासबोधात श्री समर्थ रामदासांनी संतांची महती गायीली आहे. समर्थ म्हणतात, संत शांतीचे सागर। संत सर्वस्वी उदार। ज्ञान वरूषते जलधर। सर्वस्वावरी। । संत कळवळ्याच लेण आहेत. विनाकारण कृपा करणे हा संतांचा स्वभाव. देहाचही तसच आहे. आम्ही त्रिविध तापाच्या उष्णतेन होरपळतोय. आता नाश अटळ आहे. अशा वेळी संत नावाचा कृपाघन दाटून येतो. सर्वांवरच ज्ञानाची कृपा बरसणे सुरू होते. ज्ञानाची लालसा असणारे या वर्षावात भिजताहेत. पहिल्या ओलाव्याने मातीला सुंगध येतो. तसा ज्ञानसुंगध दरवळायला लागतो. ज्यांचा अहंकार आडवा येतो. ते ज्ञान वर्षावात भिजत नाहीत. ते कोरडे ठण्ण् राहतात. रखरखीत. त्यांची घमंड शुष्कपणाला आमंत्रण ठरते. ते जीवनातील खर्‍या आनंद, सुख, समृध्दीला मुकतात. समर्थ संत, सद्गुरू समानार्थी मानतात. संत आनंदाचे स्थळ। संत सुखचि केवळ। नाना संतोषाचे मूळ। ते हे संत। । आत्मोन्नती साधना संग जया जैसा। लाभ तया तैसा। या नियमाची आठवण करून देते.

45. ” स्पर्श होता गुरूंच्या शरीराशी, पालटू लागे दुर्मती। बुध्दीत होऊनी परिवर्तन, विवेके अज्ञान जाईल. “। । प. पू. नाथशक्तिपीठाधीश श्री नरेंद्रनाथ महाराज विरचितआत्मोन्नती साधना सांगते की, श्री गुरूंच्या कृपाकटाक्षाने भवरोगाची सारी लक्षण नाहीशी होतात. दुर्मती सुमती होते. जो मुढ आहे तो ज्ञानी म्हणून सर्वांच्या प्रशंसेस पात्र होतो. नारद पुराणामध्ये आदिगुरू श्री दत्तात्रेयांचे स्तुतीगान आहे. श्रीनारदांनी आदिगुरू श्री दत्तात्रेयांना “सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भजे “। अस म्हटल आहे. भूत भविष्य व वर्तमानातील कुठलाही संप्रदाय, पंथ असोत त्या पंथाचे श्रीसद्गुरू हे श्री दत्तात्रेयांचेच प्रतिनिधी असतात. नव्हे त्या श्रीगुरूंना श्री दत्तात्रेयच मानले पाहिजे. या दृष्टीन श्री सद्गुरूंच कार्य वरील ओवीमध्ये श्री नारदांनी मांडल आहे. 'भवरोग ' हा सर्वात गंभीर आहे. रोग जडल्याची काही लक्षण दिसून येत असतात. अहंकार हे भवरोगाच लक्षण! पाठोपाठ काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आपल डोक वर काढायला लागतात. माणूस आंधळा होतो. त्याला स्वार्थापलिकडे काहीच दिसत नाही. त्याची बुध्दि अंतःकरणाच काही एक ऐकत नाही. त्याची मती बिघडते. ती माती खाते. संताच्या भाषेत ती अमृत सोडून कांजी प्यायला लागते. श्रीगुरूंच्या स्पर्शामध्ये कृपाच असत. दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती औंदुबर क्षेत्री चातुर्मास्या करिता आले. कृष्णेच्या पलिकडच्या तीरावर भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. मंदिरात आपल्याला विद्या येत नाही म्हणून अवघे टोचून बोलतात. यास्तव तू मला विद्या दे. अन्यथा मी माझे प्राण देईन. अस साकड कोल्हापुरच्या ब्राह्मणपुत्रान देवीस घातल. नुसत साकड घातल नाही तर आज जीभ कापून दिली. उद्या मस्तक कापेन असा निर्धार व्यक्त केला. तेव्हा देवीन दृष्टांत दिला. म्हणाली पैलतीरी महाचंद्रमौलीचा अवतार वास्तव्यास आहे. त्याला शरण जा. तो औंदुबरी शरण आला. जीझीभ तोडल्यामुळे त्यास बोलता येईना. श्रीगुरूंना त्याची कणव आली. त्याच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला. त्या स्पर्शान त्याची जीभ त्याला प्राप्त झाली. इतकेच नव्हे तर तो सहाही शास्त्रात पारंगत झाला.

46. ” तैसेचि नामस्मरण करता, ईश्वर भक्ति वाढता। स्वरूप ईश्वराचे कळू लागे वैराग्य ज्ञान बाणू लागे “। । आत्मोन्नती साधनेतून श्री नरेंद्रनाथांनी नामस्मरण -विष्णोस्मरण या भक्तीचा महिमा गायिला आहे. नाम हे जीवाच्या आत्मोन्नती प्रवासातील अत्यंत महत्त्वाचे पाथेय आहे. नामशिवाय या मार्गावरील प्रवास बिनधोक होऊच शकत नाही. नामस्मरण कसे करावे याबाबत काही मार्गदर्शक तत्त्व आहे. आपण नाम घेतो ते फलद्रुप झाल पाहिजे. ते होत नसेल तर आपलेकडून नामाचे अपराध घडतात असा त्याचा अर्थ आहे. जग्दगुरूं तुकोबारायांनी नवविधेतील नामस्मरण भक्तीला विठ्ठलाच्या शपथेवर 'साधन पै सोपे' अस म्हटल आहे. शांतीब्रह्म संत एकनाथांनी नामाची अपार शक्ति कथन केली. “जेवढी नामाची शक्ति। तेवढे पाप नाही त्रिजगतीं। अस नाथ म्हणतात. नामामुळे अक्षय आनंद का मिळतो याच सुंदर विश्लेषण माऊली ज्ञानेश्वरांनी केल आहे. “सततं कीर्तयन्तो मां ” या वर भाष्यात माऊली म्हणते, “नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचें ”! भगवंताच्या नामस्मरणामुळे नामस्मरण घेण्यापूर्वीची सारी पातक नाहीशी होतात. आत्मोन्नती साधनेतून प. पू. श्री नरेंद्रनाथ नामाचा आणि जीवाचा सहसंबध स्पष्ट करतात. भुकेल्याचा अन् अन्नाचा जसा निकटचा संबध आहे तसा जीवाचा अन् नामाचा संबध आहे. भूक लागल्यावर आपण जेवण करतो. जेवणार्‍याला जशी प्रत्येक घासाबरोबर तृप्ती होऊ लागते. जीवनशक्ति मिळू लागते. भूक नाहीशी होते. असे तीन फायदे एकाच वेळी होतात. त्याच प्रमाणे जो मनुष्य भगवंतांना शरण जातो. त्यांचे नाम घेतो. त्याला ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होते. त्याच्या स्वरूपा विषयीचा अनुभव येतो. तसेच इतर विषय वस्तुंबद्दल वैराग्य निर्माण होते.

47. ” करिता ऐसे तपःश्चरण, वाढो लागे गुरूप्रति प्रेम। वाढता वाटे स्वजन त्यजुनी, गुरू सन्निधची रहावे “। । आत्मोन्नती साधनेच्या या ओवीमध्ये “करिता ऐसे तपःश्चरण ” अस म्हटल आहे. या ओवीमधील ऐसे या शब्दाला विशेष महत्त्व आहे. ऐसे म्हणजे अनुग्रहित शिष्याने श्री सद्गुरूंनी दिलेल नाम कस जपल पाहिजे, या विषयी श्री नरेंद्रनाथ महाराजांना आपल्या सर्वांच लक्ष वेधायच आहे. अनुग्रहितानी निरपराध नामधारक झाल पाहिजे. यासाठी पहिले नामाच माहात्म्य जाणल पाहिजे. महत्त्वाच म्हणजे नामाचे अपराध समजुन घेतले पाहिजे. ते कसोशिन टाळले म्हणजे नाम साधना फलद्रुप होते. पद्मपुराणामध्ये या विषयीचा श्लोक आला आहे. ” सन्निंदाSसति नामवैभव कथा श्रीशेषयोर्भेदधीः। अश्रध्दा श्रुतिशास्त्रदेशिकगिरां नाम्न्यर्थवादभ्रमः। नामास्तीति निषद्धवृत्ति विहितत्यागो हि धर्मान्तरैः। साम्यं नाम्नि जपे शिवस्य च हरर्नामापराधा दश। । सन्निंदा अर्थात संताची निंदा, असति नामवैभव कथा अर्थात दुष्ट पुरूषाला नामाचा महिमा सांगणे, श्री शेषयोर्भेदधीः अर्थात श्री शिव श्री विष्णू यांच्यात भेद पाहणे, अश्रध्दाश्रुतिगीराम म्हणजे वेद वचनांवर अविश्वास, अश्रध्दाशास्त्रगिराम, अर्थात स्मृति, गीता, भागवत, पुराणं यांचेवर अविश्वास, अश्रध्दादेशिकगिराम, अर्थात श्रीगुरूवचनांवर अविश्वास, नाम्न्यर्थवादभ्रम, नाममाहात्म्य हे केवळ स्तुतीरूप आहे ते खर नाही असा भ्रम होणे, नामास्तौति निशिध्दवृत्ती अर्थात स्वतःवासनातृप्तीसाठी केलेल गैरवर्तन, विहितत्यागो धर्मान्तरैः, म्हणजे आपल्या विहित धर्माचा त्याग करून अन्य धर्माचा आश्रय घेणे, साम्यं नाम्नि शिवस्य च हरे म्हणजे शिव-विष्णूंच्या नामासोबत अन्य इंद्रादि देवांमध्ये साम्य पाहणे. असे हे दहा अपराध आहेत. या दहा अपराधांना टाकुन घेतलेल्या नामामुळे अंतःकरणात श्री गुरूंविषयीच प्रेम दाटून येत. श्री गुरूंचे सेवा-सान्निध्य वाढु लागते.

48. “घडविण्या जीव इंद्रियांना, रहावे गुरूंच्या मार्गदर्शनात। सगुणरूपी सद्गुरू असती, अवतार ब्रह्मा विष्णु महेशाचा “। । सगुण स्वरूपात श्री सद्गुरू हे ब्रह्मा-विष्णू-महेशाचाच अवतार असतात. त्यांच्या मार्गदर्शनात राहून इंद्रियांना वळण लावाव. काम हा ज्ञानाचा शत्रू आहे. इंद्रिय, मन, बुध्दि ही त्याची वसतीस्थान आहेत. येथे ठाण मांडून तो शरीरावर आपली हुकुमत गाजवितो. काम हा सर्वनाशाला कारणीभूत ठरतो. विषयाचे ध्यान म्हणजे काम. हे अगदी लहान सहान असल तरी घातकच! योगेश्वर कृष्णांनी या विघातक, विध्वंसक साखळीच वर्णन केल आहे. काम हा क्रोधाला आमंत्रण देतो. क्रोधामुळे मोह वाढतो. बुध्दि अविवेकी होते. अविवेकी बुध्दि माणसाला भ्रमिष्ट व विषय सुखाच्या भोगाकरिता कासाविस करते. ही अशी बुध्दीभ्रंश अवस्था सर्वनाशाला कारणीभूत ठरते. माऊली ज्ञाननाथांनी भावार्थदीपिकेत या वर मार्मिक भाष्य केल आहे. माऊली म्हणतात या रजोगुणांनी काम-क्रोधाला जन्माला घातल. तमोगुणांनी याचे लाड पुरविले. याला प्रमाद, विचारशून्यता अर्थात अविवेकाचे पद बहाल केले आहे. यामुळे माऊलींनी काम-क्रोधाला ईश्वराचे भजन करणार्‍या लोकांचे मारेकरी, आत्मज्ञानाच्या अमोल ठेव्यावरील सर्प आणि विषयांच्या दरीमध्ये लपून बसलेले वाघ म्हटल आहे. काम-क्रोधादि विकार किती दुष्ट व भयानक आहेत हे सांगतांना माऊली म्हणते, ” हे जळेंवीण बुडविती। आगीवीण जाळिती। न बोलता कवळिती। प्राणियांते। । हे शस्त्रेविण साधिती। दोरेंविण बांधिती। ज्ञानियांसी तरी वधिती। पैज घेऊनी। । हे चिखलेवीण रोविती। पाशेंवीण गोविती। हे कवणाजोगे न होती। आंतुवटपणे। श्री सद्गुरू कर्म उपासनेच्या माध्यमातून आपल्या इंद्रियांना वळण लावतात. इंद्रिय भक्तिमार्गाकडे वळली की, मनाच विषयात लोळण बंद होत. ते ईशचरणी धाव घेत. मन स्थिर झाल की बुध्दि स्वतंत्र होते. कामाच वसतीस्थान स्वतंत्र होतात. आपली वाटचाल परब्रह्म प्राप्तीसाठी निर्धोक होते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनान हे शक्य होते. म्हणून आत्मोन्नती साधनेतून प. पू. श्री नरेंद्रनाथ म्हणतात की ” घडविण्या जीव इंद्रियांना, रहावे गुरूंच्या मार्गदर्शनात। ” श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय.