श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

नाथशक्तिपीठ महाशिवरात्री उत्सव

शं करोति इति शंकराः. अर्थात जो सर्वांचे मंगल, कल्याण करतो तो शंकर. श्री महादेव हे उद्भव, स्थिती आणि लयाचे संचालन करणारी देवता आहे. शिवजी हे व्याकरणाचे प्रणेते आहेतआहेत. “नृत्यावसाने नटराज राजो ननाद डंका नवपंच वारम्। म्हणून व्याकरणाचे चौदा नाद आहेत. ते पुरूष आहेत. जगन्माता पार्वती या प्रकृती स्वरूप त्यांच्या अर्धांगिनी आहेत. वास्तविक पाहता चिता भस्म हे अपवित्र परंतु त्याचा शिवांना स्पर्श होताच ते परं मंगलमय होते. हा त्यांचा अगाध महिमा. श्री शिव हे ज्ञानाची गंगोत्री आहेत. सामर्थ्याचे बाबतीत अतुलनीय आहेत. प्रखर वैराग्याचे धगधगीत कुंड आहेत. अंतःकरणापासुन केलेल्या उपासनेला लवकर पावणारे, इतकेच नव्हे तर कळत-नकळत झालेल्या आराधनेमुळे प्रसन्न होऊन वर देणार दैवत म्हणून श्री महादेवांची ख्याती आहे. आपल्या भक्ताच्या शत्रूला रडविणारे अशी सुकीर्ति त्यांची गायिली जाते. श्री शिवमहिम्न रचियता श्री पुष्पदंत म्हणतात, माझ्या अल्प मतीने श्री शिवांचे वर्णन काय करावे, अहो ” असितगिरीसमं स्यात् कज्जलं सिंधुपात्रे। सुरवरूतरूशाखा लेखनी पत्र मुर्वि। लिखति यदि गृहित्वा शारदा सर्वकालम्। तदपि तव गुणामीश पारं न याति। । अर्थात अवघ्या धरतीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पवृक्षाच्या डहाळीची लेखणी केली आणि स्वतः श्री शारदा सर्वकाळ आपल्या गुणांच लेखन करीत राहिल्यात तरीही आपल्या गुणवर्णनाचा ठाक लागणार नाही. याचा अर्थ असा की आपले गुणवर्णन करणे हे अशक्यप्राय आहे. श्री शिवांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते देव- दानव -मानव या तिघांनाही पूज्य आहे. अशा दैवतांचा राजा असलेल्या शिवाच्या आराधनेचे, उपासनेचे उपवासाचे (उपवास=जवळचे सान्निध्य) पवित्र पर्व महाशिवरात्री आहे.

महाशिवरात्रीचे संदर्भात पुराणांमध्ये व व्रत कथनामध्ये अनेक कथा सांगितल्या जातात. शिवपुराणातील ही कथा तर प्रसिध्दच आहे. एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपुर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला. पारधी बाण सोडणार तेवढयात त्यातील एक हरीण पुढे येउन पारध्याला म्हणाला, हे पारध्या तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे, माझी कर्तव्ये मला पार पाडुन येउ दे’, हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली. दुरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवायचा मंत्र गजर कानावर येत होता. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणुन एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली. हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हंटले ’की आता मला मार मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे तेंव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तीने म्हंटले ‘त्यांना नको मला मार मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे’. त्वरीत हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली, ‘आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे’. ते पाहाता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म की जो दया आहे तो दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहुन हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाआशिर्वाद दिला. सर्वांचा उध्दार केला. हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता.

महाशिवरात्रीची आणखी प्रसिध्द असलेली एक पुराणकथा अशी आहे. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपुर्ण गोष्टींची निर्मीती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातुन हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपुर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवमहिम्न स्तोत्र, शिवलिलामृत, महारूद्र, रूद्रसूक्ताचे श्रध्दापूर्वक पठण करतात. भजन, गायनाचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेउन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरीता आराधना केली जाते.

महाशिवरात्रीच्या पवित्र मंगल पर्वावरच नाथशक्तिपीठाचे अधिष्ठान असलेल्या प. पू. श्री व्यंकटनाथांनी पूर्वसूचना देऊन महासमाधी घेतली. मच्छिंद्रनाथांपासुन सुरू झालेल्या नाथ परंपरेतील ते १५ नाथगुरु आहेत. नाथशक्तिपीठाधीश प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांना त्यांनी १८ वर्षांपूर्वीच, म्हणजे 1975 साली “आम्ही या दिवशी महासमाधी घेऊ” अस सांगितल होतं. महाशिवरात्रीच्या चार महिने अगोदरच उत्तराधिकारी म्हणून पंथकार्य करण्याविषयी सांगितले होते. १९९३ च्या महाशिवरात्री पासुनच प. पू. श्री नरेंद्रनाथांच्या गुरुकार्याचा पंथकार्याचा श्रीगणेशा झाला आहे. म्हणूनच नाथशक्तिपीठ परिवारासाठी महाशिवरात्रीचे हे पर्व अतिशय महत्त्वाचे आहे.

अकोला येथील नाथ शक्तिपीठामध्ये सहा उत्सवांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्री उत्सवाचे दरम्यान सूर्यास्ता पासुन पारण्याचे सूर्योदया पर्यंत प्रहर पूजा केली जाते. या वेळी श्री नरेंद्रनाथ महाराज नाथशक्तिपीठातील शक्तिदरबारातील श्री महादेवांची आराधना करतात. यावेळी रूद्र, रूद्रसूक्त, श्री शिवमहिम्नाच्या पठणांची आवर्तन केली जातात. बेलाचे त्रिदल पान वाहून हा महाअभिषेक संपन्न होत असतो. रात्रभर जागरण केले जाते. महाशिवरात्रीचे पर्वावर प्राकृतिक स्थितीमध्ये विशेषतः उत्तर गोलार्धात महाप्रचंड उर्जा प्रवाहित असते. या सजीव सृष्टीमध्ये केवळ मनुष्याचाच कणा हा सरळ उभा आहे. इतर सजीवांना एकतर कणा नाही किंवा तो जमिनीला समांतर आहे. त्यामुळे ते या उर्जेचा लाभ प्राप्त करू शकत नाहीत. जे मनुष्य पाठीचा कणा ताठ ठेऊन शिव उपासना करतात त्यांच्या मध्ये ही उर्जा संक्रमीत होत असते. हे जागरणाचे आध्यात्मिक महत्त्व आहे.

शक्तिपीठामध्ये महानिशिथ कालाचे हवन केल्या जाते. या महाशिवरात्रीला रात्री १२.१० वाजेपासून रात्री १ वाजे पर्यंत हे हवन केले जाईल. प्रहर पूजेच्या दरम्यान रात्रभर स्वानंद सुधा या नाथ सांप्रदायिक भजनाच्या सातही वारांचे भजन स्वतः श्री नरेंद्रनाथ महाराज हर्मोनियम वाजवून सर्वांबरोबर सभामंडपामध्ये रात्रभर भजन करतात. ही भजनं खरोखरच आगळीवेगळी आहेत. यातून नकळत अध्यात्मज्ञान होतं. गुरूंची कृपा लाभु लागते आणि भजनाचा मनापासून आनंद वाटतो. जर काही मानसिक ताण तणाव असेल तर तो भजन झाल्यावर पूर्णपणे गेलेला असतो. पारण्याचे दिवशी श्री महादेवास रूद्राभिषेक, प. पू. श्री व्यंकटनाथांची महापूजा, महाआरती केल्या जाते. या उत्सवास आपण सर्वांनी नाथशक्तिपीठामध्ये येऊन श्री शिव व श्री गुरुकृपेचा लाभ घ्यावा.

थोडक्यात जीवनामध्ये तुम्हाला सुख-शांती-समाधान हवे आहे का? मग महाशिवरात्रीचे व्रत करा. तुम्हाला तुमचं लग्न होत नाही का? चांगला पती किंवा चांगली पत्नी हवी आहे का? मग महाशिवरात्रीचे व्रत करा. तुम्हाला चांगले विद्यार्जन करायचे आहे का? मग महाशिवरात्रीचे व्रत करा. तुम्हाला यश कीर्ती हवी आहे का? मग महाशिवरात्रीचे व्रत करा. तुम्हाला जीवनात केलेले पाप कमी करायचे आहे का? मग महाशिवरात्रीचे व्रत करा. तुम्हाला त्रासदायक मृत्यू नको आहे का? मग महाशिवरात्रीचे व्रत करा. तुमच्या आर्थिक समस्या दूर करायच्या आहेत का? तर महाशिवरात्रीचे व्रत करा. तुमच्या वादविवादातून तुम्हाला सुटका हवी आहे का? तर महाशिवरात्रीचे व्रत करा. थोडक्यात काय, तुम्हाला जे हवे ते मिळवण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करा. ज्यांना ज्यांना असे वाटते त्यांनी सर्वांनी हे व्रत करावे. ज्या काही पौराणिक कथा आहेत त्याप्रमाणे आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने वैराग्य सोडून वैवाहिक जीवनात पदार्पण केले. काहींच्या मते महाशिवरात्रीला भगवान शंकर साक्षात पिंडीतून प्रकट झाले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत म्हणून भगवान शंकराचे विशिष्ट पद्धतीने उपासना केली तर भोलेनाथांच्या कृपेचा वर्षाव होतो. हे व्रत कसे करावे तर या दिवशी उपवास करावा. नुसते पाणी पिऊन शक्य असेल तर तसे करावे अन्यथा फलाहार करावा किंवा उपासाचे विशिष्ट पदार्थ खावेत. रात्रीच्या तीन प्रहारांना दूध, पंचामृत यांचा अभिषेक करून पिंडीवर जलाचा अभिषेक करावा. पिंडीवर रुद्र, महिम्नस्तोत्र किंवा शंकराच्या नावाचा जप करत बिल्वार्पण करावे. मध्यरात्रीच्या निषिथ कालामध्ये हवन करावे. त्यात तीळ, बेलाच्या समिधा, बेल पत्र यांचे हवन करावे. अशा प्रमाणे पूजा झाल्यावर दोन प्रहारांच्यामध्ये भजन करावे. सूर्योदयानंतर पूर्णाहुती करून नैवेद्य दाखवावा व पारण्यासाठी लोकांना आमंत्रित करावे.

नाथशक्तिपीठामधे दरवर्षी अशा तऱ्हेने महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. आपण त्यात सहभागी होऊ शकता.