आत्मोन्नती साधना २
9. अहंकार न आवरे मला, घात करी पदोपदीला। आत्मोन्नती साधना अहंकाराला ' घातकरी ' म्हणते. अहंकारामुळे आपण स्वतःला कर्ता- धर्ता समजायला लागतो. देहबोली, भाषा बदलते. याला वाढवले. त्याचा सांभाळ केला. पण समाजात अशी अनेक माणसं आपण पाहतो. ती कळकट, मळकट असतात. त्यांना खायला मिळत असेल नसेल माहित नाही. कुठेतरी आडोशाला झाडाखाली राहणारी, अक्षरशः गटारातल पाणीपिणारी. त्यांना कोण बर वाढवतो. सांभाळतो. या वृक्ष वेली त्यांची जोपासना कोण करत. ऋतुमाना प्रमाणे किडे मुंग्या, झाड-झुडुपं उगवतात अन् नाहीशी होतात. पुन्हा उगवतात त्यांच जीवनचक्र कोण फिरवत. उद्भिज, अंडज, स्वेदज, जारज अशा ८४ लक्ष योनी. त्यांच्या जीवनमानाचे संचालन कोण करत. विवेकान हे सार कळू शकत. पण अहंकार आडवा येतो. आत्मोन्नती साधना विवेक बहाल करते. बुध्दीला विवेकाच अधिष्ठान लाभत. ती ईश्वर चरणी स्थिर होते. मन शांत होत. … अहंकार तेवढा दूर सारता आला पाहिजे. समर्थ रामदास स्वामी मदाला खेदाचे कारण मानतात. अहंकारान विवेक, विवेकान विचार, विचारान गुण ग्राहकता नाहीशी होते. सर्वांनाच तुच्छ लेखण्याचा अपराध हातून घडतो. श्री नरेंद्रनाथ महाराज सांगतात अशाचा संग धरलास तर मिळालेल अनमोल आयुष्य कवडीमोल ठरेल. ते ठरू नये यासाठी हा संवाद आहे.
10. जो कुणी जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे. जन्मापासून मरणापर्यंत जीवनप्रवास त्याचा त्यालाच करावा लागणार आहे. तेव्हा जन्म, मृत्यू व हा प्रवास सुखावह करून घ्यायला सर्वांनाच आवडेल. अशा सर्वांसाठी प. पू. श्री नरेंद्रनाथ विरचित 'आत्मोन्नती साधना ' आहे. जन्म, मृत्यू व जीवन प्रवास गोड करणे हेच तर अध्यात्म आहे. जन्म माझा, मृत्यू माझा आणि दरम्यानचा जीवन प्रवासही माझाच. तो सुखानुकुलित करण्यासाठी मलाच प्रयत्न केले पाहिजे. यात दुसरा कुणीही बदल करणार नाही. करू शकतही नाही. ' सत्कर्म योगे वय घालवावे ' ही आत्मोन्नती साधनेची महत्त्वाची शिकवण आहे. एकदा करून, जमेल तस, करतोच की, …. अशी भाषा बोलून चालणारच नाही. 'वय घालवावे' यावर आत्मोन्नती साधनेचा भर आहे. सत्कर्म करशील तर आत्मोन्नती होईल. पुढचा जन्म सुधारशील. कुकर्म करशील तर या जन्मी व पुढचे जन्मी अधिक दुःख कष्ट भोगशील. ही साधना आत्मोन्नतीसाठी जीवाला तयार करते. मी ईश्वराला मानतो या भांडवलावर त्याचा कृपाभिलाषी होता येत नाही. मी सर्वांसाठी उपयोगी आहे, माझी सत्कर्मात रूचि आहे, मी सत्शील आहे, चित्त-वृत्ती-प्रवृत्तीन सज्जन आहे. तरच मी ईश्वराला निश्चित प्रिय होईल.
11. वाढवी मोहमाया निरंतरी। स्वर्गोपभोग सुख न देई कधी। जमविली मोहमाया जरी। नसे अंत वांछेला। । सुखांनी हात जोडून उभ रहाव. दुःखांनी जीवनातून निघून जाव. ही आपल्या सर्वांची स्वाभाविक अपेक्षा असते. आम्ही सुखासाठी भौतिक साधनांची निवड करतो. माया जमवून सुख मिळवणे व सुख मिळविण्यासाठी माया जमविणे या दुष्टचक्रात आमच अवघ आयुष्य सरत. आमच्या इच्छेला अंतच नसतो. भौतिक साधन आम्हाला सुख देतात. पण त्या सुखाला एक नियम लागु आहे. “एकदाच अनुभव त्याचा आरंभ अंत सौख्याचा ”! ही साधन ज्या क्षणी आम्हाला सुख देतात तोच सौख्याचा अंतिम क्षण असतो. जीवाची तृष्णा वाढत जाते. पण मोह काही सुटत नाही. मोह विकाराला माऊली ज्ञानेश्वरांनी ' काळसर्प ' म्हटले आहे. विवेक हे मोहाच्या विषबाधेवरील रामबाण औषध आहे. सद्गुरू योगेश्वरांनी अर्जुनातील विवेक जागविला. विवेक जागा झाला, तसे नष्टो मोहः अस अर्जुन बोलला. आत्मोन्नती साधना श्रीगुरूमुखातून आलेली आहे. प. पू. श्री नरेंद्रनाथांनी विरचित केली आहे. ही साधना आमचा विवेक जागवेल. आम्हाला मोह-मायेच्या दुष्टचक्रातून सुखरूप बाहेर काढेल.
12. ज्ञान दिले गुरूवरा तू ब्रह्नांडाचे, अज्ञान घालविण्या भक्तजनांचे रविवारच्या आत्मोन्नती साधनेत प. पू. श्री नरेंद्रनाथांनी ब्रह्मांड निर्मिती व व्यवस्थापन या विषयांवर प्रकाश टाकला आहे. ईश्वरानी ब्रह्मांडाची निर्मिती केली. पण ज्ञान देण्याचा अधिकार स्वतः कडे ठेवला नाही. सार्वभौम अशा श्री सद्गुरू तत्त्वाकडे ज्ञान देण्याचे अधिकार आहेत. आध्यात्मिक साहित्यात ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान असा आहे. स्वतःला स्वतःची ओळख कळणे. समर्थ रामदास स्वामी आत्मज्ञानाला ' पहावे आपणासी आपण ' अस म्हणतात. श्री गुरूं कडूनच आत्मज्ञान मिळते, अस माऊली ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. आत्मज्ञान जीवनाला कृतार्थ करते. दुःखरहित करते. सुमन आणि शुध्दमति। जो अनिंदक अनन्यगति। या आत्मज्ञानाच्या चार कसोट्या आहेत. संत-सद्गुरूंच्या वचनांवर दृढ श्रध्दा ठेवल्याने मन सुमन होते. विषय वासनांमुळे बुध्दी मळते. चंचल होते. वैराग्याचे योगाने ती स्वच्छ, शांत- स्थिर केली की शुध्दमति होते. शरीरान, वाचेन, मनान जो कुणाचीही निंदा करित नाही तो खरा अनिंदक. संत-सद्गुरू यांचे चरण व वचनांशिवाय अन्य कोणत्याही साधनाचा जो आश्रय करित नाही. त्यास अनन्यगति म्हणावे. या चार कसोट्यांवर जो खरा उतरतो तोच तरतो. श्री सद्गुरू कृपेन त्यास आत्मज्ञान लाभते. तो समाधानी पावतो. दुःखरहित होतो. यासाठी आत्मोन्नती साधनेच चिंतन आहे.
13. कोण मी कुठून आलो, काय म्हणूनी मी जन्मलो। काय उद्देशाने जन्मा आलो, का मी आलो भूमीवरी। । रविवारच्या साधनेतील ही प्रश्नावली म्हटल तर सोपी. पण विचार करता लक्षात येत की, आपल्या मनातील उत्तर ही काही योग्य नाहीत. ब्रह्मांड निर्मितीच रहस्य व त्यातील जीवाशी संबधित हे सारे प्रश्न आहेत. अशीच प्रश्नावली कालडीच्या बालसंन्याशालाही पडली होती. आत्मज्ञानाच्या शोधात तो निघाला होता. नर्मदा तटावरील एका गुहेत तो उभा आहे. समोर ज्योतिर्मय झालेले श्री सद्गुरू गोविंदपाद ध्यानमग्न आहेत. बाल संन्याशाचे आगमनान त्यांची समाधी उतरते. सद्गुरूं समोर तो जिज्ञासा आपली प्रकट करतो. स्वामिन्नहं पृथिवी न जलं न तेजो। न स्पर्शनो न गगनं न च तद्गुणा वा। । नापिन्र्दियाण्यपि तु विध्दि ततोSवशिष्ठो। यः केवलोस्ति। परमः स शिवोहमस्मि। । पुढे हे बालक सनातन हिंदु धर्माला नव संजीवनी देणारे अखिल विश्वामध्ये पूज्यपाद आदि शंकराचार्य या नावान ख्यात झाले. या प्रश्नावलीचा भावपूर्ण अनुवाद संतकवि दासगणू महाराजांनी केला. ना पृथ्वी ना जल तेज मी पवन आकाश वा इंद्रिये। हे शब्दे कळते विचार करतां तें प्रत्ययाला न ये। । आहे त्याहूनी अन्य मी जगिं कसा याचाच येवो खरा। स्वामी प्रत्यय तो मला जवळिं हो या लेकरासि करा। । कळण ही झाली माहिती. प्रत्यय म्हणजे ज्ञान. विवेकामुळे ज्ञान होत. हा विवेक जागा करून आत्मज्ञान देण्याचा अधिकार श्रीसद्गुरू या तत्त्वाचा आहे. आत्मोन्नती साधनेतील ही प्रश्नावली श्री नरेंद्रनाथांच्या कृपेन आपणही समजवून घेऊया.
14. मानवा न उमगे हे सारे, विस्तारावे काय करावे। काहीच नसे हाती तयाचे, निर्बल असे तो। । ब्रह्मांड निर्मिती व आपला जन्म या विषयीची प्रश्नावली सहजासहजी उमगत नाही. जन्माला आल्यावर आपल पाऊल जमिनीला लागल की स्वतः मध्ये अहंकार निर्माण होतो. भू तत्त्वाच हे वैशिष्ट्यच आहे. अहंकारामुळे तो स्वतःला कर्ता समजतो. वाटे अवनीवरील मानवासी ब्रह्मांडी कर्ता तोचि। संपूर्ण ब्रह्मांडाच अस्त्तित्वच ईश्वरी इच्छेवर आहे. तरीही माणूस सार काही माझ्यामुळे आहे असा डांगोरा पिटत असतो. खरा कर्ता तो 'ईश्वर'. सर्मर्थांनी माणसाला हेच बजावून सांगितल आहे. ” मी कर्ता ऐसे म्हणसि। तेणे तू कष्टि होसि। राम कर्ता म्हणविसि पावसी येश, कीर्ति प्रताप। “ जीव उन्नत करून आत्मा मुक्त करणे हे आपल्या जन्माचे प्रयोजन आहे. यासाठी ईश्वरान आपल्याला जन्मास घातल आहे. अहंकारामुळे सार मुसळ केरात जाते. तो दुःखी कष्टी होतो. माणसाचा जन्म व्यर्थ जाऊ नये म्हणून आत्मोन्नती साधना आहे. ही साधना अनंतकोटी ब्रह्नांडाच्या पसार्यात जीवाचे क्षुल्लक स्थान दाखवून देते. यामुळे त्याचा अहंकार नाहीसा होतो.
15. विःष्णू सांगती ब्रह्मयासी, आपण सृजन करावे सृष्टीसी। पंचमहाभूते जीव सृष्टी, आणावे स्वरूपासी। । अपौरूषेय वेदांनंतर चक्रपाणी श्री विष्णूंनी व श्री महेशांनी अवतार घेतला. श्री ब्रह्मा विष्णूंच्या नाभीतील कमलात स्थित होते. श्रीविष्णूंच्या सूचनेवरूनब्रह्मदेवांनी बारा हजार सहस्र वर्षे ॐकार साधना केली. अवघ्या सृष्टी निर्माणाची अद्भूत क्षमता असूनही त्यांनी तपश्चर्या केली हे विशेष! श्री विष्णूंचे आज्ञेवरून ब्रह्मयांनी कृत, त्रेता, द्वापार व कलि ही चार युग निर्माण केली. श्री गुरू चरित्रात देखील युगनिर्मितीचे कथाकथन आहे. युगांची काही वैशिष्ट्य आहेत. कालावधी आहे. पहिल युग कृत किंवा सत्य या नावान ओळखल जात. या युगातील लोक सत्यप्रिय, सत्यवचनी, वैराग्यशाली व ज्ञानी होते. ब्रह्मकार्याला व रूद्राक्ष धारणाला विशेष महत्त्व होते. असत्य वचन आणि निंदा केवळ अपवादात्मक होत्या. या युगामध्ये माणूस सरासरी १६ हातांचा होता. शास्त्रा प्रमाणे या युगाचा कालावधी १७ लक्ष २८ हजार वर्षांचा होता. दुसर त्रेता युग. शास्त्रानुसार त्रेता युग १२ लक्ष ९३ हजार वर्षांच होत. युगातील माणूस १२ हातांचा होता. कालदृष्ट्या हे युग सत्य युगापेक्षा लहान होते. माणसाच्या उंचीतही चार हातांची घट झाली. या युगात यज्ञापेक्षा तपाला जास्त महत्त्व होते. या युगात तपा पेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा कैवल्य प्राप्तीला श्रेष्ठतम मानले जाई. सत्य, जप, तप, ज्ञान यांचा या युगात बोलबाला होता.