श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

आत्मोन्नती साधना ६

36. ” ईश्वराच्या अनुमती विना, मानव बदलू पाहे ब्रह्मांड रचना। हेचि न कळे मानवा, कारण असे अशांतीचे। । “ ईश्वरानी अनंतकोटी ब्रह्मांड निर्माण केलीत. सृष्टी निर्माण केली. विशेष सृष्टी म्हणजे मनुष्य प्राणी निर्माण केले. मनुष्याच शरीर कस बनत व कार्य करत याची सखोल ज्ञान चर्चा आपल्या प्राचीन वाङमयात केली आहे. पृथ्वीला अन्न म्हटल्या गेल आहे. पृथ्वीतून धान्य, रसभरित फळ निर्माण होतात. आपण खाल्लेल्या अन्नाच्या स्थूलाचा मळ, मध्यम भागातून मांस, आणि सूक्ष्म भागातून मन तयार होते. आपल्या आहारावर आपल मन तयार होणार आहे. जलाचेही असेच. स्थुलातून मुत्र, मध्यम भागातून रक्त, आणि सूक्ष्म भागातून प्राण तयार होतो. तेजाच्या स्थुलभागातून अस्थि, मध्यम भागातून मज्जा, आणि सूक्ष्मतम भागातून वाक् तयार होतो. परमेश्वर हा विश्वनियंता आहे. त्याने विचार पूर्वक प्रत्येक सजीवाचा आहार, विहार नेमून दिला आहे. आपापले धर्म नेमून दिले आहे. ईश्वर म्हणाला, ” माणूस माझा पिंड आहे. त्यान सुनियोजितपणे ईश्वरीय शक्तिनां माणसामध्ये वसवल. त्यास तपस्वी, तेजस्वी व तत्पर केल. आपली सर्वश्रेष्ठ रचना म्हणून त्यान माणूस प्रस्तुत केला. आज ही सर्वश्रेष्ठ रचना अस्थिर, अशांत आहे. ईश्वरीय रचनेला बदलविण्याच्या उन्मादात त्यान स्वतःला धोक्यात घातल आहे. माणूस वगळता इतर सजीवांना आपला आहार, विहार, स्वधर्म सांभाळलाय. मांजर कितीही तहानलेली असली तरीही ती कोल्डड्रिंक पित नाही. वाघ कितीही भूकेला झाला म्हणून गवत खात नाही. माणूस त्याचा स्वधर्म विसरला. आहारा-विहारापासून दूर गेला. भगवंताच्या चरणांना मुकला. काळ-वेळेचे त्याचे भान सुटले. विपरित कर्माकडे त्याचा ओढा वाढला. ईश्वराच्या नियोजित व्यवस्थेवर त्यान आघात केलेत. नीतिनियम पायदळी तुडवले. आत्मोन्नती सोडुन इतर उद्योगात मन रमवले. याच्या त्याच्या तेजस्वीतेवर परिणाम झाला. तो मलुल झाला. कोमेजला. त्याचे मन, प्राण आणि वाक् शक्ति क्षीण झाल्या आहेत. तो अशांत, अस्थिर झाला. सदैव गोंधळलेल्या स्थितीत तो वावरतो आहे. ईश्वराच्या नियोजित व्यवस्थेवर आम्ही आघात केले. नीतिनियम पायदळी तुडवले. आत्मोन्नती सोडुन इतर उद्योगात मन रमवले. प. पू. नरेंद्रनाथ महाराजांनी आत्मोन्नती साधनेतून आम्हाला परोपरिन हाच विचार करायला लावला आहे. मनुष्य ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ रचना आहे. तिला नासविणे हा त्या विधात्याचा अपमान आहे. आपल शरीर शुध्द करणे आत्मा उन्नत करणे हाच आपल्याला प्राप्त झालेला स्वधर्म आहे. स्वधर्म शोधावा लागत नाही. तो प्राप्त होतच असतो. पंचमहाभुतांची कृपा हवी असेल तर, स्वधर्माचे पालन करा. त्याच क्षणापासून आपण ताजेतवाने व्हायला लागु. उपसनेला दृढ चालवा. तपाने तेजस्वीता वाढेल. आपल्या कोमजलेल्या चित्त, वृत्ती, प्रवृत्ती टवटवीत होतील. अस्थिरता, अशांतता जाईल.

37. “ देव मानीती गुरूंसी, जे घडविती मानवासी। गुरू सांगती सर्वांसी, देवची विधाता ब्रह्मांडी। । ईश्वरानी अनंत ब्रह्मांड निर्माण केली. जीवसृष्टी निर्माण केली. अवघ्या ब्रह्मांडाचा पालनकर्ता म्हणून प्रत्येक जीवाच्या अन्न, वस्त्र, निवार्‍याची व्यवस्था केली. आणि अदृष्य झाला. संत माहात्म्यांनी त्याचा निवास स्वर्गात सांगितला आहे. तिथून तो दिव्य दृष्टीन सार काही अवलोकन करतो. मानवाला न उमगणारा ब्रह्मांडाचा खेळ हा खेळिया तिथून खेळतो. पृथ्वीवर तो सार्वभौम झाला नाही. तो मान त्यान श्री सद्गुरू या तत्त्वाला दिला. श्री सद्गुरू स्वतः सार्वभौम आहेत. तर्क बुध्दीच्या पलिकडे जाऊन ते हव ते करू शकतात. कतुर्मकर्तुम अन्यथा कर्तुम हे सामर्थ्य आहे. संचित कर्माला अनुसरून माणसाला जन्माला घालण हे ईश्वरी कार्य! जन्माला आलेल्या जीवावर कर्माचे संस्कार करण हे श्री सद्गुरूंच कार्य! श्री सद्गुरू अनुग्रहित जीवास जसा जन्माला आला तसा स्वीकारतात. संस्कारानी पाहिजे तसा घडवितात. अनुग्रहितांची आत्मोन्नती करवून घेतांना सद्गुरू त्याला ईश्वराची उपासना देतात. ईश्वराचे नाम देतात. स्वतःचा उदोउदो कधीच करवून घेत नाहीत. ईश्वर आणि श्री सद्गुरू हे दोघेही परस्परांचा उचित सम्मान करतात. परस्परांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करित नाहीत. इतकच काय साध डोकावूनही पाहत नाही. आध्यात्मिक उन्नतीसाठी जीव सज्जन, सत्शील, सत्प्रवृत्त, सत्कर्मी, लोकोपयोगी असावा लागतो. सद्गुरू उपासना आणि प्रभूनामस्मरणाने त्याच्यातील दोष वजा करतात. काम क्रोधादि विकारां मुळे अशांत अस्थिर झालेल मन शांत करतात. त्याचा विवेक जागा करतात. जे सत् आहे त्या बद्दल माहित असण हा एक भाग झाला. यास विवेक म्हणता येत नाही. तर जे जे सत् आहे त्याच आचरण करावयास लावण हे विवेकाच काम आहे. दुर्योधन कृष्णाला म्हणाला, ” जेवढा धर्मराजाचा अभ्यास आहे, तेवढाच माझा देखिल आहे. परंतु ती माझी प्रवृत्ती नाही. या नाहीचे कारण विवेकाचा अभाव. दुर्योधनाचा विवेक जागा नसल्यामुळे तो तस बोलला. शस्त्र शास्त्रांच्या ज्ञाना मध्ये, शक्ति-युक्ति मध्ये तो सरसच होता. पण त्याचा विवेक आंधळा होता. सद्गुरू विवेक जागा करतात. अशा श्री सद्गुरूंचे मी काय वर्णन करावे. समर्थ रामदास स्वामींनी देखील अखेर “ सद्गुरूवर्णवेना, हेचि गे माझी वर्णना ” अस मान्य केल. तिथे मी त्या तत्त्वाला शरण जाणच योग्य!

38. “इह जन्मीचे कर्म केवळ, पुढील जन्मीची दिशा ठरवी। गुरू करतील मार्गदर्शन। जाणोनी जीवाचे पूर्व संचित। । ” श्री सद्गुरू आपल्याला घडविण्याच ब्रीद सांभाळतातच! मग आपण का घडत नाही? यात दोष आपलाच आहे. आपल कुठे चूकत, याचा विचार करावा. विचार करता लक्षात येत की, आपला निर्धार कमी पडतो. या संदर्भात समर्थ रामदास स्वामींच वचन सुप्रसिध्द आहे. “ बहू नाही वाडाचार, आता एकचि निर्धार ” अशी मनःस्थिती जोवर होत नाही तोवर आम्ही घडणार कसे. श्रीगुरूंनी दिलेल नाम, त्यांनी दिलेली साधना, उपासना यालाच धरून राहणे हाच आमचा निर्धार झाला पाहिजे. विषयांच ध्यान तुटावे म्हणून श्रीगुरूंकडे जावे. “ गुरू सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी ”, या संत वचनावर पक्की श्रध्दा ठेवावी. आपण हरएक उद्योग करित राहतो. त्यातून काहीही साधले जात नाही. उलट खुप सार्‍या चिंता मात्र वाढतात. अनेक विषयांमध्ये आपण लक्ष घालतो. त्यामुळे समाधान गमावून बसतो. श्री गुरूंचे सामर्थ्यवर अवघा भरवसा असावा. श्रीसद्गुरू हे एक तत्त्व आहे. अशा दृष्टीन त्यांच्याकडे बघाव. त्यांना पूजाव. आपण ती देहधारी व्यक्ति आहे अस म्हणून त्यांचेकडे पाहतो. मग आपल्याला त्यांच्या सामर्थ्याची कशी जाणीव होईल. त्यांची पंचमहाभुतांवर असलेली सत्ता कशी समजेल. सद्गुरू सार्वभौम सत्ताधीश आहेत. ते जीवाचे पूर्वसंचित जाणोनी उचित असे मार्गदर्शन करतात. योग्य कर्म, उपासना करवून घेतात. आपुले या जन्मीचे कर्म आपला पुढील जन्म ठरविणार आहे. भ्रमित न होता उपासनेचा नेम चालवावा. सद्गुरूंच्या कृपेन ज्ञान प्राप्त होत. प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात की, “आपल्याला ज्ञान प्राप्त होत आहे. याच पहिल लक्षण म्हणजे व्यावहारिक आणि व्यावसायिक उपजिविकेसाठी मिळालेल ज्ञान हे तुच्छ वाटते. ”

39. “ पंचमहाभुतांवर गुरूंची सत्ता, परि ओळख न देती कदा। गुरूंचे सामर्थ्य न उमगे शिष्या, भ्रमीत होई मानव म्हणूनी। । सद्गुरूंनी करवूृन घेतलेल कर्म आणि साधना ही तारक असते. या कर्म साधनेमुळे पंचमहाभुत आपल्यावर कृपावंत होतात. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही पाच तत्त्व आहेत. आपल्या शरीरामध्ये पायाच्या अंगठ्या पासून मस्तका पर्यंत ही पाच तत्त्व आढळतात. या प्रत्येक तत्त्वाचा एक गुण विशेष आहे. एक दैवत आहे. एक युग आहे. एक स्थायीभाव आहे. सत्य युगामध्ये पृथ्वी म्हणजे भूमि या तत्त्व प्रबळ होते. अंगठ्या पासून गुढघ्या पर्यंत शरीरा मध्ये हे भूमि तत्त्व असत. चतुर्भुज ब्रह्मा हे या युगाच दैवत आहेत. द्वापार युगात जल या तत्त्वाचे प्राबल्य असत. गुढघ्या पासून बेंबी पर्यंत शरीराचा भाग हा आप तत्त्वाचा आहे. पितांबरधारी नारायण हे या युगाचे दैवत आहेत. त्रेता युगात अग्निचे प्राबल्य होते. बेंबीपासुन ह्रदया पर्यंतचा शरीर भाग तेज तत्त्वाचा आहे. त्रिलोचन महारूद्र या युगाच दैवत आहेत. वर्तमान कलियुगात वायु हे तत्त्व प्रबळ आहे. सर्वशक्तिमान ईश्वर हे या युगाच दैवत आहेत. ह्रदयापासून भृकुटी पर्यंतचा शरीर भाग वायुन व्यापला आहे. पाचव आकाश तत्त्व आहे. आकाश हे पोकळ असत. शिवाय आकाशाच नियंत्रण सर्व त्त्वांवर असत. गौरवर्ण महादेव हे या युगाच दैवत. परंतु कोणताही मानव आकाश तत्त्वाचा नसतो. प. पू. श्री नरेंद्रनाथांनी ब्रह्मांडातील मानवी जीवनाची सप्त वर्गीय नियंत्रण योजना सांगितली आहे. पंचमहाभुत, वर्ण, युग, निजतत्त्व, गुण, जन्मपत्रिका, राशी अशी ही सप्तवर्गीय नियंत्रण योजना आहे. ब्रह्मांडातील संपूर्ण मानव या योजने बाहेर जाऊच शकत नाही. आपले संबध शरीरच या पंचमहाभुतांची देण आहे. या तत्त्वांना कसे आनंदित करावे. यांची नेमकी पुजा कशी करावी. या पाच तत्त्वांची पुजा कशी संपादन करावी. कोणते उचित कर्म करावे. या बाबत प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज मार्गदर्शन करतात.

40. “संसारी जन सुख स्वार्थाचे, दुःख संकटी नाही कुणाचे। म्हणुनी बंध तोडुनी मायेचे, सद्गुरू चरण घट्ट धरावे। । ” जीवनाला श्री सद्गुरूंच कृपाकवच असलच पाहिजे. संसारात ज्यांचे साठी आपण अपार कष्ट उपसतो अशी अनेक नाती असतात. त्यांचे सुखात आपण नाचलो. ज्यांच्या दुःखान आपण कळवळलो. ते सगे सोयरे (? ) आपण दुःख संकटात असतांना आपल्या सोबत नसतात. रिकाम्या डब्यांच्या घरात उंदिर देखील राहत नाहीत. ही तर माणस आहेत. ही जगरहाट आहे. एका जुन्या कवितेची या वेळी आठवण येते. “खडबड हे उंदिर करिती। कण शोधायाते फिरति। परि अंती सोडोनि जाती। गणगोत तसे आपणाला। । ” जग सुख स्वार्थाच! दुःख संकटी नाही कुणाच! ही इथल्या गणगोताच्या वागण्याची रित. अशा वेळी आपुला कैवार घेणारे श्री सद्गुरूच असतात. म्हणून सर्व मायेची मायिक अर्थात खोटी नाती तोडावी. सद्गुरूंचे चरण घट्ट धरावे. सद्गुरू आपल्या जन्माला येण्याचे प्रयोजन सांगतात. जिंवत राहण्यासाठी स्वस्थ व निरामयतेसाठी अन्नरस आवश्यक असतो. तसेच शरीराच्या आणि आत्म्याच्या पोषणासाठी साधना आवश्यक असते. आपण वर्षभराच एकदाच जेवून टाकतो का? अस करून अन्नरस तर साठणार नाहीच. शरीराचे भरण, पोषण, तोषण होणारच नाही. उलण मरण ओढवेल. अजीर्ण होईल. यातना होतील. पंच पक्वांनाच एकदाच जेवलात. समाधान होईल का? सकाळी सुग्रास आकंठ जेवलात तरी सायंकाळी भूक लागतेच. तसे उपासना-साधना-जप-तप-हवन-अनुष्ठानाचे बाबतीत का असू नये? जस अन्नरस हा शरीराला पुष्ट, संतुष्ट करतो. तस श्री सद्गुरूंनी दिलेल नाम हे आत्म्याला पुष्ट, संतुष्ट, करत. कर्म उपासनेन शरीर व आत्मशुध्दी होते. आत्मोन्नती साधण्यासाठीचा हा गुरूमार्ग आहे. हे समजून आपण वागलो नाही तर आपल जीवन काहीच नाहीचा पाढा बनेल.

41. “माणूस श्रम करी बैलापरीशरीर मन झिजवि नानापरि। न लाभे सुख तीळभरी, अहर्निश जीवनभर। । ” एखादी व्यक्ति, घटना-प्रसंग आपल्या दुःखाचे वा सुखाचे कारण आहे हा आपला भ्रम असतो. मुळात आपली कर्म हिच आपल्या सुख-दुःखाच कारण असतात, हे खर आहे. लक्ष्मणाचा या बाबतचा एक संस्कृत श्लोक सुप्रसिध्द आहे. “सुखस्य दुखस्य न कोSपि दाता। परो ददातीति कुबुध्दि रेखा। अहं करोमीति वृथाभिमानः। स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकाः। सर्व जगच कर्म फलानी बांधलय. सुख मिळविण्यासाठी निवडलेल्या साधनांमध्ये आपण चूक करित असतो. भौतिक साधनं, पैसा आपली दुःख नाहीशी करतील हा आपला विश्वास असतो. अनुभव मात्र विपरित येतो. भौतिक साधन, पैसा आमच दुःख हलक करितच नाही पण चिंता मात्र वाढवितात. समाधान मिळत नाही पण हव्यास मात्र वाढवितात. भौतिक साधन आनंद देतात. पण त्यांच्या आनंद सौख्य देण्याचा आरंभ बिंदू हाच मुळी सौख्याचा अंत असते. म्हणून सौख्य, आनंद तात्कालिक स्वरूपाचे ठरतात. आपल्या सुख दुःखाच कारण आपले वासना विषय असतात. यापासून सुटायचा एक उपाय आहे. तो म्हणजे आपल्या वासनेचा, विषयाचा विषयच 'नारायण' करणे. तुकोबाराय असोत की समर्थ, दोघेही यासाठी संतसंग सांगतात. तुकोबाराय म्हणतात, ” संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनि जाय ”. मगच ईश्वराचे नामात मन रंगत. समर्थ म्हणतात, “ संतसंगे जन्म चूकति यातना ”. या तनाच्या यातना चूकवायच्या आहेत का, मग संत संग धरा. संत हेच सद्गुरू. त्यांना शरण जाव. ते आपल्या पदरात सुखाच माप भरभरून ओततात. आपल्या वासनेचा विषय नारायण करतात.