श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

दत्तात्रय अवतार

ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली, तेव्हा चौदा भुवनांची रचना केली. दहा दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी, काम असे षड्विकार उत्पन्न केले. मरीची, अत्री, अंगीरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले. यांपैकी अत्री ऋषींची पत्नी अनसूया.

अनसूया अत्यंत पतीभक्त होती. तिची भक्ती इतकी अलौकिक की तिला त्रास होऊ नये म्हणून सूर्यही कमी तापत असे, वाराही मंद वाहत असे. अशी शक्ती पाहून इंद्रादी देव घाबरले आणि त्रिदेवांकडे गेले.

त्रिदेवांनीही अनसूयेच्या सत्त्वाची परीक्षा घ्यावी असा निर्णय घेतला.

ते तिघे भिक्षुकाच्या रूपात अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते; आश्रमात अनसूया एकटीच होती.

भिक्षुक स्वरूपातील त्रिदेव म्हणाले :

“आम्ही अतिशय भूकेलेले ब्राह्मण आहोत. आपण इच्छाभोजन देता, अशी कीर्ती ऐकून आलो आहोत.”

अनसूयाने त्यांचे पादप्रक्षालन करून स्वागत केले. पण ते म्हणाले :

“आम्ही स्नानादिक करून आलो आहोत. अत्री ऋषी येईपर्यंत थांबू शकत नाही. आत्ता भोजन दिले तर थांबतो, नाहीतर निघून जातो.”

अनसूयेच्या मनात संघर्ष — अतिथीला भोजन न देता कसे जाऊ देणार?

तीने त्यांना आत बसविले. ते म्हणाले :

“एक इच्छा आहे—तू आम्हाला नग्नावस्थेत भोजन वाढशील तरच ते स्वीकारू.”

अनसूयेला जाणवले—ही परीक्षा आहे. तिने मनात स्थिर केले : “मी पतिव्रता आहे. पतिव्रतेचा धर्म पाळणे माझे कर्तव्य.”

ती स्वयंपाकघरात गेली, विवस्त्र झाली आणि मनात म्हटले—अतिथी म्हणजे माझी मुलेच.

ती बाहेर आली— पाटावर बसलेले त्रिदेव अदृश्य! त्यांच्या जागी तीन बालके रडत होती!

अनसूया आश्चर्यचकित झाली. परत जाऊन वस्त्र नेसले आणि बाहेर आली. वात्सल्य उमटले—तीने त्या तिन्ही बालकांना स्तनपान घातले आणि पाळण्यात ठेवले.

अत्री ऋषी आले तेव्हा अनसूयाने सर्व सांगितले. अत्रींनी अंतर्ज्ञानाने ओळखले—ही बालके म्हणजे त्रिदेवच.

तेव्हा त्रिदेव साक्षात प्रकट झाले आणि वर मागण्यास सांगितले.

अनसूया–अत्री म्हणाले :

“आपण बालरूपात आलेलेच आहात; आमचे पुत्र म्हणून येथेच रहा.”

त्रिदेवांनी वर दिला आणि आपल्या स्थानी गेले.

बालकांचे नामकरण झाले— ब्रह्मा : चंद्र, विष्णु : दत्त, महेश : दुर्वास.

कालांतराने दुर्वास ऋषी तीर्थयात्रेला निघाले, चंद्र तारांगणात रमले. विष्णुमूर्ती दत्त मात्र तेथेच राहून अत्री–अनसूयेची सेवा करू लागले.

हेच दत्तात्रेय गुरूपरंपरेचे मूळ पीठ.