गुरू सेवेने सर्वच लाभते
भगवान दत्तात्रेय – गुरुचरित्र अध्याय ४३ (भाग १) : विणकरास मल्लिकार्जुन दर्शन
एकेकाळी तुकाराम महाराज, रामदासस्वामी, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, भगवान श्रीकृष्ण हे देहरूपाने पृथ्वीवर आले. त्यांनी त्या काळातील परिस्थितीत वास्तव्य केले आणि *भविष्यकाळातील पिढ्यांसाठी* आपले साहित्य ठेवून दिले. ते आज देहरूपाने नाहीत, पण त्यांचे लिखाण अजरामर आहे. त्यामुळे आज त्यांच्या सत्संगाचा सहवास नसला तरी त्यांचे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करते.
ब्रह्मा–विष्णू–महेश यांचे अवताररूप भगवान दत्तात्रेय, तसेच नवनाथ, यांनी कलियुगातील साधकांच्या उद्धारासाठी अवतार धारण केले. *गुरुचरित्र*, *नवनाथ भक्तिसार*, तसेच मां भगवतीवरील सप्तशती—हे सर्व ग्रंथ त्यांच्या संकल्पनेनुसार लोकांच्या उद्धारासाठी निर्माण झाले.
रामदासस्वामींचा दासबोध, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, आणि श्रीकृष्णाची गीता—हे अवतारी पुरुषांनी स्वतः लिहिलेले ग्रंथ आहेत. आज त्यांचा प्रत्यक्ष सहवास उपलब्ध नसला तरी, त्यांचे ग्रंथ अभ्यासपूर्वक व मननपूर्वक वाचले, तर जीवनात शांती, स्थिरता आणि आध्यात्मिक उन्नती सहज मिळू शकते.
आज आपण गुरुचरित्राच्या ४३व्या अध्यायात गुरूभक्तीविषयी सांगितलेले विचार पाहू.
नित्यनियमाने गुरुंचे दर्शन घेणे, त्यांना वंदन करणे, एकनिष्ठेने त्यांची सेवा करणे—गुरुचरण हीच माझी यात्रा असा मनोभाव धारण करणे आवश्यक आहे.
“आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम् — तथा सर्वदेवनमस्कारः केशवं प्रती गच्छति।”
कोणत्याही देवतेची उपासना केली तरी त्या नमस्काराचा फळ ज्याची आपण भक्ति करतो त्यालाच मिळते—हा नियम. म्हणून गुरूंच्याच ठिकाणी सर्व काही आहे या भावनेने सेवा केली तर गुरूप्रसाद निश्चित मिळतो.
श्रीगुरूंचे अनेक शिष्यभक्त होते. त्यातील एक विणकर (कोष्टी) हा गुरुंचा परमभक्त होता. दिवसभरातील काम संपवून संध्याकाळी तो मठात येत असे, परिसर झाडून स्वच्छ करीत असे आणि श्रीगुरुंना लांबून नमस्कार करीत असे. हा क्रम अनेक दिवस चालत होता.
शिवरात्र जवळ आल्यानंतर विणकराचे आई–वडील आणि गावातील लोक म्हणाले— “श्रीशैल यात्रेला चल. शिवरात्रीला श्रीमल्लिकार्जुनाचे दर्शन घेतले की मोठे पुण्य मिळते.”
तो म्हणाला— “मी येणार नाही. माझा श्रीशैल पर्वत इथेच आहे. श्रीगुरूंचा मठ हाच श्रीशैल, आणि श्रीगुरू हेच माझे मल्लिकार्जुन. त्यांच्या चरणांचा त्याग करून मी कुठेही जाणार नाही.”
लोक त्याला हसले आणि निघून गेले. तो मात्र गुरुसेवेत मग्न राहिला.
नेहमीप्रमाणे तो मठाची झाडलोट करीत होता. श्रीगुरूंनी विचारले, “सगळे लोक यात्रेला गेले, तू नाही गेलास?”
तो म्हणाला— “स्वामी, तुमच्या चरणांशी माझी यात्रा आहे. सर्व तीर्थे जेव्हा तुमच्या चरणाशी आहेत, तेव्हा लोक दगडाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दूर-दूर का जातात—हे मला समजत नाही.”
माघ वद्य चतुर्दशी—शिवरात्र. विणकराने उपवास केला होता. तो संगमात स्नान करून गुरुंचे दर्शन घेण्यासाठी आला.
श्रीगुरु म्हणाले— “अरे, तू यात्रा पाहिली आहेस का कधी? श्रीशैल कसा आहे ते पाहिले का?”
विणकर म्हणाला— “स्वामी, तुमचे चरणदर्शन हीच माझी यात्रा. तुमच्या दर्शनाने मला सर्व यात्रांचे पुण्य मिळते.”
त्याचा भक्तिभाव पाहून श्रीगुरू म्हणाले— “चल, मी तुला यात्रा दाखवितो. आत माझ्या पादुकांना घट्ट धर आणि डोळे मिट.”
विणकराने तसे केले— एका क्षणात श्रीगुरूंनी त्याला श्रीशैल्य पर्वतावर नेले. डोळे उघडल्यावर त्याला श्रीशैल पर्वत प्रत्यक्ष दिसला.
श्रीगुरू म्हणाले— “लवकर जा, दर्शन घे, क्षौर–स्नान कर.”
विणकर पूजेकरिता गेला. तिथे त्याला स्वतःचे आई–वडील आणि गावातील लोक दिसले. ते म्हणाले— “तू आमच्यासोबत आला नाहीस, मग इथे कसा आलास?”
विणकर म्हणाला— “मी तुमच्या मागे कसा येणार? श्रीगुरू आणि मी आजच दुपारी निघालो. गुरूंनी मला एका क्षणात इथे आणले.”
कोणालाच त्याचा विश्वास बसला नाही.
मंदिरात जाऊन त्याने जे पाहिले ते अद्भुत— शिवलिंगावर साक्षात श्रीगुरू बसलेले होते! माणसे शिवपूजा करीत होती, पण पूजा प्रत्यक्ष गुरूंचीच होत होती.
तो म्हणाला— “स्वामी, तुम्हीच शंकर, तुम्हीच मल्लिकार्जुन. तुम्ही जवळ असताना लोक इतक्या दूर का येतात?”
श्रीगुरू म्हणाले— “परमेश्वर सर्वत्र आहे, हे खरेच आहे. आणि साधकाने गुरूसेवेतच मग्न राहावे—हा हाच बोध आहे.”