श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

समाधिस्त गुरूंच्या शिष्याला दत्तदर्शन

देवा संबंधी जी आपली कल्पना आहे ती सुपरमॅन सारखी म्हणजे देव म्हणजे माणूसच परंतु त्याच्या कला किंवा शक्ती या अचाट आणि अफाट असतात. देवाकडून आपल्याला अपेक्षांचा डोंगरच असतो पण देव कसा आहे, तो काय करतो, कसं करतो, त्याच्या मर्यादा काय हे आपण कधी विचारात घेतच नाही.

देवाचे प्रखर तेज आणि दर्शनाची मर्यादा

सूर्यनारायणावरून आपण देवाची कल्पना करण्याचा प्रयत्न करू. सूर्य कितीतरी कोटी मैल आपल्यापासून दूर आहे तरीही त्याची उष्णता आपल्याला सहन होत नाही. उन्हाळ्यात तर केवळ उन्हामुळे आगी लागतात. जर ही सूर्यनारायणाची प्रखरता आहे तर हा सूर्यनारायण जसा आहे तसा आपल्या प्रखर तेजाने आपल्या जवळ आला तर काय होईल याची कल्पना करा. सर्व जळून भस्मसात होईल. इतक्या प्रखर तेजात जे जवळ येईल ते तात्काळ भस्मसात होईल ही त्या सुर्याची प्रखरता आहे. अशीच प्रखरता प्रत्येक देवाची आहे आधुनिक भाषेत बोलायचं तर प्रत्येक देवाचा ऑरा म्हणजे त्यांचे वलय हे प्रखर आहे त्याचा परिणाम सूर्यासारखाच आहे त्यामुळे प्रत्यक्ष देवाचं दर्शन त्याच्या प्रखर तेजाने आपण घेऊ शकत नाही ते तेज सहन करण्याची आपली क्षमता नाही.

देवाचे सौम्य रूप आणि गुरुंची कृपा

प्रत्यक्ष देवाच दर्शन व्हावं अशी अपेक्षा असेल तर देवाला सौम्य रूप धारण करून आपल्याजवळ यावे लागेल आणि देवानी आपलं रूप सौम्य करणे हे केवळ गुरूंच्या इच्छेवर आणि कृपेवर अवलंबून आहे ज्या वेळेला गुरुंच्या आशीर्वादाने देवदर्शन होते त्यावेळेला दर्शन देणारी देवता भक्ताच्या वलयाला मानवेल एवढ्याच तेजाने प्रकट होते अशा प्रकट होण्याने त्यांच्या सामर्थ्यात काहीही फरक पडत नाही सामर्थ्य हा त्यांच्या अंगभूत भाग आहे.

देव प्रसन्न होणे व गुरुचे अनन्य कार्य

देवाची आराधना करून भक्ती करून देव प्रसन्न होतो याचे उदाहरण म्हणजे नामदेव. परंतु असा देव प्रसन्न होऊनही आपल्यात जे स्थित्यंतर अपेक्षित आहे ते होत नाही. माणसाचे प्रारब्ध बदलणे पूर्वसंचित बदलणे त्याचा स्वभाव बदलणे त्याचे योग बदलणे त्याला ज्ञान देऊन पूर्ण ज्ञानी करणे हे परमेश्वराच्या हाती नाही हे फक्त गुरुचे काम आहे.

नामदेव आणि विसोबा खेचरांचे गुरुस्थान

संतांच्या मेळाव्यात नामदेवाला ‘कच्च मडकं’ म्हटल्यावर त्याला वाईट वाटले. नामदेव विठ्ठलाकडे गेला आणि विठ्ठलाने सांगितले की गुरु केल्याशिवाय आत्मोन्नती होत नाही. नामदेव म्हणाला देवा तुम्हीच माझे गुरु का होत नाही त्यावर विठ्ठल म्हणाला मला कोणाचाही गुरु होता येत नाही. विठ्ठलाने सांगितले की उद्या सूर्योदयापूर्वी गावाबाहेर महादेवाच्या मंदिरात जो असेल तो तुझा गुरु. त्याठिकाणी एक फाटका माणूस महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला नामदेवाने पाहिला आणि चिडला पण त्या माणसाचे पाय नामदेव जिथे ठेवत असे तिथे नवीन पिंड प्रकट होत असे हे पाहून नामदेवाने ओळखले की हा विसोबा खेचर आहे आणि त्याच्या पायावर मस्तक ठेवले.

गुरुचा अधिकार देवापेक्षा श्रेष्ठ

विठ्ठलाने नामदेवाला गुरुंकडे पाठवून आत्मोन्नती केली. गुरूंचा अधिकार एवढा महान की देवाला आपले देवत्व बाजूला ठेवावे लागले आणि गुरुंच्या इच्छेने भक्तासाठी कार्य करावे लागले.

व्यंकटनाथ महाराज आणि दत्तदर्शन — नागपूर प्रसंग

नागपूरला व्यंकटनाथ महाराजांची गादी आहे आणि ते वारंवार अण्णासाहेब कोलते यांच्या घरी जात. अण्णासाहेबांची आई कधीच काही बोलत नसत. एक दिवस महाराजांनी तिच्या मनातील विचार ओळखले की “माझे गुरु गेले; हे माझ्या मुलाचे गुरु; माझे काम कोण करेल?” ते म्हणाले तुमचे काम मी करतो. त्या म्हणाल्या मला दत्ताचे प्रत्यक्ष दर्शन हवे आहे. महाराजांनी रात्री ११ ते २ उपासना सांगितली. सहा महिने झाले काहीच फरक पडला नव्हता तरी महाराज म्हणाले भांडे घासायला वेळ लागतो.

यतीची परीक्षा आणि अविचल उपासना

एक यती आला आणि म्हणाला उपासना थांबव नाहीतर मारून टाकीन. त्याने त्रिशूळ फेकला जो वृद्ध बाईंच्या हाताला लागला पण त्या हलल्या नाहीत. व्यंकटनाथ महाराजांनी उपचार केले व साधना थांबवू नका असे सांगितले. पुन्हा यती आला आणि म्हणाला काहीही माग मी देतो परंतु त्यांनी नकार दिला आणि केवळ दत्तदर्शनाचीच मागणी केली.

दत्तात्रेयांचा प्रत्यक्ष अवतरण

एके दिवशी त्या उपासना करीत असताना औदुंबराच्या झाडासह स्वयं भगवान दत्तात्रेय प्रकट झाले. त्यांनी विचारले तुला काय पाहिजे. त्या म्हणाल्या जन्मोजन्मी मला माझे गुरु मिळावे. भगवान दत्तात्रेयांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्या धन्य झाल्या.

गुरुचिंतनाचा अंतिम सार

नाथपंथात अशक्य काही नाही. गुरूंची कृपा झाली की अशक्य साध्य होते. गुरुकार्य म्हणजे शिष्यांना भक्तांना घडवणे यात कीर्ती, मोबदला किंवा अपेक्षा नसते. गुरुंच्या सान्निध्यात जीवनाची कालक्रमणा करीत राहणे हेच साधकाचे कार्य आहे.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/नरेंद्रनाथ/समाधिस्त-गुरूंच्या-शिष्याला-दत्तदर्शन.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)