श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

मारूतीच्या स्तवनाने समुद्र दर्शनास

आला युग निर्मिती झाल्यानंतर युगाचे चार भाग केले गेले. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. हे चार युग मिळवून एक मन्वंतर होतं. एक मन्वंतर म्हणजे 43 लाख 20000 वर्षे होतात. पहिल्या त्रेता युगात, रामाने जसा जन्म घेतला तसा मारुतीने देखील घेतला, परंतु रामाने आपला देह अर्पण करून त्रेतायुग संपवलं. हनुमान हे सप्तचिरंजीवापैकी एक आहेत. ते अखंड चिरंजीव आहेत. पहिल्या त्रेतायुगात जन्म घेतल्यावर आज 99व कलियुग आहे म्हणजे 99 पूर्ण करून द्वापार युग पूर्ण होऊन कलियुग सुरू झालं तरी आज रामभक्त हनुमान अजूनही जिवंत पणे या पृथ्वीवर वावरत आहेत. जोपर्यंत सूर्य चंद्र तारांगण आहेत तोपर्यंत रामभक्त हनुमान अखंडपणे चिरंजीव पणे या पृथ्वीवर वावरतच राहतील.

शक्ती, युक्ती, बुद्धी, भक्ती, श्रद्धा, सेवा, चातुर्य, तरलता, तत्परता, आणि केवळ उस्फुर्त आणि समर्पित जीवन हे भगवान हनुमंताचं वैशिष्ट्य आहे. हनुमानाच्या श्रद्धायुक्त भक्तीने हे गुण कोणातही सहजतेने येऊ शकत हा चमत्कार नसून ही केवळ अनुभूती आहे. आज जीवनामध्ये कोणत्याही तऱ्हेचे दुःख असेल तर हनुमंताची भक्ती करावी आणि पिंपळाच्या झाडाला सव्वालाख प्रदक्षणा माराव्यात म्हणजे जीवन सुखकर होते. विशेष सायास न करता नित्यनेमाने हनुमान दर्शन घेऊन हनुमानाची उपासना करीत राहिले तर जीवनातील ग्रहदोष अथवा कोणत्याही प्रकारचा दोष हे सर्व सौम्य होऊ लागतात.

माणसाच्या जीवनामध्ये भक्तीयुक्त अंतकरणाची वाढ होऊ लागते आणि माणूस विवेकी आणि सश्रद्ध होतो. मारुतीच्या उपासनेने पूर्वजन्मीचे दोष जाऊन आपण दोषमुक्त होत असल्याची अनुभूती साधक घेऊ शकतो. केवळ मारुती समोर उभा राहून नमस्कार करून प्रदक्षिणा मारल्या तरी ही अनुभूती घेता येते ज्यांना शक्य आहे त्यांनी हनुमानाचे स्तोत्र सकाळ संध्याकाळ म्हणत राहावे आपोआप जीवन सुखकर होताना आपल्याला लक्षात येईल.

भीतीच्या प्रसंगी भीमरूपी स्तोत्राचे महत्त्व

कधीही, कोणत्याही क्षणी भिती किंवा तीव्र भयाची भावना मनात आली (अशुभ शक्ती, एकांतवास, काळोख किंवा कोणताही फोबिया) की लगेच काळवेळ मुहूर्त न बघता समर्थ रामदास स्वामी विरचित भीमरुपी_महारुद्रा हे १७ ऋचांचे स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी. सोयरसुतक आहे किंवा मांसाहार केलाय कसं म्हणायचं? वगैरे भंकस गोष्टी त्याक्षणी डोक्यातून काढून टाका. म्हणा आणि त्याक्षणी भिती कमी होत असल्याचा अनुभव घ्या. छातीची धडधड वाढणे, तणाव, अशक्तपणा, भूक न लागणे, अपचन अशा मनोशारिरीक त्रासांवरही हे स्तोत्र रामबाण इलाज आहे.

किती वेळा बोलू? कुठल्या दिशेला तोंड करुन म्हणू? मनातल्या मनात म्हणू का मोठ्याने? ह्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करा. अतोनात त्रास होत असेल तेंव्हा बरं वाटेपर्यंत नॉनस्टॉप म्हणणे सुरु ठेवा. अनेक ठिकाणी गुढ आणि भयप्रद घरांमधून कोणाचाही रक्षण मारुती स्तोत्र करेल यावर पूर्ण विश्वास ठेवा.

श्री भीमरुपी_महारुद्रा स्तोत्र (समर्थ रामदासस्वामी)

  • भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती। वनारि अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १॥
  • महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें। सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥ २॥
  • दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा। पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥ ३॥
  • लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना। पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४॥
  • ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें। काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥ ५॥
  • ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती। नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी ताठिल्या बळें ॥ ६॥
  • पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं। सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७॥
  • ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू। चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८॥
  • कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे। मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९॥
  • आणिला मागुती नेला आला गेला मनोगती। मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥ १०॥
  • अणूपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे। तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें ॥ ११॥
  • ब्रह्मांडा भोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके। तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२॥
  • आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा। वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३॥
  • धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही। पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४॥
  • भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही। नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥ १५॥
  • हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली। दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकलागुणें ॥ १६॥
  • रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू। रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥ १७॥
  • इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम श्री मारुतिस्तोत्रम् सम्पूर्णम्

मारुतीच्या नित्य उपासनेचा आम्ही घेतलेला अनुभव

मारूतीच्या स्तवनाने समुद्र दर्शनास आला पंथ कार्य करणार्‍यांवर मारूतीरायाची कृपा कशी असते याचा एक अनुभव येथे सांगतो. पंथ कार्या निमित्त नरेंद्रनाथ महाराज ओरीसा मधील कोणार्क येथे गेले होते. नाथपंथाचे सूर्योपासनेचे महत्त्वाचे हवन म्हणजे मकर संक्रमणाचे हवन तेथेच होणार होते. जगन्नाथपुरीला जावून दर्शन घेवून हवनाचा कार्यक्रम होणार होता.

अनेक भक्त, शिष्य सोबत होते. जगन्नाथाचे दर्शन झाले, नियोजित मकर संक्रमणाचे हवन पार पडले. त्या नंतर महाराजां सोबत असलेल्या सर्वांनीच आग्रह धरला की सायंकाळच्या उपासनेसाठी समुद्र किनारी जावे आणि समुद्राच्या साक्षीने देवतांचे आवाहन करून नित्य उपासना करावी. सर्वांच्या मनात होते की आपली उपासना दैवतां पर्यंत पोहोचते कां व आपल्याला काय अनुभूति येते.

महाराज म्हणाले ज्या ठिकाणी लाटांचे पाणी येऊच शकत नाही, त्याही पलिकडे बर्‍याच आंतरावर उपासनेसाठी बसा. मारूतीरायाची कृपा झाली तर सागर आपल्याला भेटण्यास येईल. सर्वजण शिस्तीत बसले. महाराज दुसर्‍या रांगेत मध्यभागी बसले होते. बाकीचे सर्व एकामागे एक अशा ओळीत बसले होते.

समुद्राचे दिव्य दर्शन

नित्य नियमानुसार सायंउपासना सुुरू झाली. उपासना सुरू असतांना जिथपर्यंत आपली दृष्टी जाईल तेथपर्यंत समुद्राची लाट अखंड पण मंद गतीने येतांना दिसत होत्या. होता होता उपासना हळू हळू पुढे पुढे जाऊ लागली. समुद्रामध्ये सर्वकांही नित्य क्रमाने सुरू होते. उपासनेमध्ये ज्यावेळी मारूतीची नित्य उपासना सुरू झाली त्या वेळी समुद्राच्या लाटांमध्ये कांहितरी स्थित्यंतर होत आहे असे भासत होते.

हनुमानाची उपासना करीत असतांनाच समुद्रातील एक तिरपी लाट अर्ध्यातूनच आली व सर्वांच्या लक्षात येण्या आधीच नरेन्द्रनाथांच्या उजव्या पायाच्या आंगठ्याला स्पर्श करून परत गेली. सर्वांनाच केवळ आश्चर्य वाटले.

लाटांना अजीबातच जोर नव्हता. त्यातून समुद्राच्या वाळवंटात समुद्राचे पाणी येवून गेल्याच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. त्या खुणांपर्यंत पाणी येण्याएवढा जोर लाटांना नव्हता. तिथपर्यंत समुद्राची लाट येण्याची अजीबातच शक्यता वाटत नव्हती.

पण दिव्य असा नाथ पंथ आहे. मारूतीने पंथाला दिलेल्या वचनाची अनुभूती आली. मारूतीरायाचे स्तवन सुरू असतांनाच ही अनुभूती सर्वानाच आली. प्रत्यक्ष समुद्राने आपली सीमा सोडून सद्गुरुच्या पदक्षालनासाठी व आपले सामर्थ्य, पवित्रता वाढविण्यासाठी पंथकार्य करणार्‍या सद्गुरूंचे पादस्पर्श केले.

प्रभावी नाथपंथाचे प्रभावी सद्गुरू समोर आलेले पाहून समुद्रस्थित अनेक देवतांची ही किमया पाहून सर्वांनाच गहिवरून आले.

जय श्री राम जय श्री राम जय श्री राम


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/नरेंद्रनाथ/मारूतीच्या-स्तवनाने-समुद्र-दर्शनास.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)