श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

नाथ महाराजांचे दैनंदीन जीवन, पूजा व उपासना पद्धती

नाथ पंथीय गुरुंच्या पूजेचा प्रकार काही वेगळाच आहे. साधारणतः पूजा म्हटली की देवाच्या निरनिराळ्या मूर्तीची पूजा होत असतांना आपण पाहतो. नाथपंथाच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी या सूर्य, ग्रह–नक्षत्र, तारांगण यांच्या भ्रमणावर आधारित आहेत. म्हणजे आज आत्ताची ब्रह्मांडाची काय परिस्थिती आहे, त्या प्रमाणे बदलत्या स्थितींमध्ये अस्तंगत राहायचे.

आपण ब्रह्मांडाकडे पाहिलं तर पंचमहाभूत — पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश — यांना सर्व महत्त्व आहे. या प्रत्येक तत्वाचा मानव जीवनाशी खोलवर संबंध असतो.

सद्गुरू व्यंकटनाथ महाराज नित्य नियमाने आन्हिक करायचे. रोज सकाळी व संध्याकाळी आन्हिक करायचे. आन्हिक म्हणजे पूजा.

चौरंगावरील पूजा रचना

त्यांची परंपरेप्रमाणे चालत आलेली पूजा कशी असायची? तर चौरंगावर पूजा करायचे. चौरंगाच्या समोरील भागात दोन्ही कोपर्‍यात तेलाच्या समय्या असायच्या. त्या दोन समयांच्या बाजूला दोन तुपाचे निरांजन असत.

मध्यभागी देवतांच्या आसनासाठी व्यवस्था असते — मूळ नवग्रहांची पौची. याच्या सोबत दोन तुपाच्या दिव्यांच्या मध्यभागी कापूर आरतीची योजना केलेली असते.

उजव्या बाजूला दूध आदी नैवेद्य; पुजा करणाऱ्याच्या समोर मध्यभागी ताम्हण; आणि उजव्या हाताला पाण्याचा तांब्या असतो. कोणत्याही देवतेची मूर्ती या चौरंगावर नसते. ब्रह्मांडाचे मूळ स्वरूप हे नवग्रहांच्या पौचीवरून व्यक्त केले जाते.

आन्हिकाची प्रक्रिया

गुरू महाराज सोवळं नेसायचे आणि आन्हिकाला सुरुवात करायचे. आन्हिकापूर्वी रामानंदी लावायची. पौचीवर निरनिराळे कवच, काही विशिष्ट देवतांची स्तोत्रे, मंत्र इत्यादी म्हणायचे.

महाराज आन्हिक मोठ्याने करीत नसत. बराच वेळा ते दार लावून एकांतात आन्हिक करीत असत.

आन्हिक चालू असताना गंध उगाळून तयार ठेवायचा. घड्याळासारखी दिसणारी वस्तू — म्हणजे पौचीवर ठेवलेल्या गंध गोळीवर — मंत्रांचे संस्कार व्हायचे. त्या गंधगोळीचा उपयोग व्यक्तीमत्त्वात किंवा योगांत बदल करण्यासाठी केला जायचा. गुरूंच्या इच्छेनुसार तिचा हवा तसा उपयोग होई.

या गंधगोळीचे अनुभव अनेक शिष्यांनी, भक्तांनी घेतले आहेत आणि आजही घेत आहेत.

अभिषेक आणि स्तोत्रपठण

पौचीवर होणारा अभिषेक हा पंथाचे दैवत — दत्त, रुद्र, अथर्वशिरः, शाबरी देवी — यांच्या मंत्रांनी केला जातो. अभिषेकामध्ये निरनिराळ्या देवतांची स्तोत्रे वा गीते वाचली जातात.

आन्हिकाचा आणि त्या वातावरणाचा सभोवतालच्या लोकांवर अत्यंत मोठा परिणाम होत असतो. पूजेच्या वेळी केवळ शारीरिक उपस्थितीमुळे त्यांच्यातील दोष–विकार हळूहळू कमी होऊ लागतात.

नवग्रह आणि अध्यात्मिक परिणाम

नवग्रह म्हणजे प्रत्येक जीवाच्या जीवनाचा लेख लिहिण्याची भाषा. ज्योतिषशास्त्राप्रमाणे, सद्य जीवनातील अडचणी ह्याच ग्रहांद्वारे स्पष्ट केल्या जातात.

आपल्या चित्तवृत्तीत प्रवृत्तीला आकार देऊन ते सतत संस्कार करतात. हे संस्कार योग्य रीतीने घडविण्याचे कार्य सद्गुरू करीत असतात.

आन्हिक काळात बसलेल्या भक्तांना आणि शिष्यांना विशेष स्फूर्ती मिळते — ही अनुभूती आन्हिकाच्या कालावधीत घेतली जाते.

सर्व देवता व शक्तींनी नाथपंथाला अबाधित वरदान दिले आहे. या सर्व शक्ती आन्हिकाच्या वेळी सूक्ष्मरूपाने उपस्थित असतात.

गंधगोळी, तीर्थ आणि दिव्य अनुभव

पूजेसाठी केलेला गंध हा मूर्तीवर लावण्याचा प्रकार नसून, त्याची घट्ट गोळी करण्यात येते आणि त्याचा उपयोग गुरू महाराज आपल्या संकल्पानुसार करतात.

ही गोळी म्हणजे एक प्रकारची दिव्यशक्तीच आहे — अशी अनुभूती शिष्य घेत असतात.

पूजेच्या वेळी झालेले तीर्थ हेदेखील अत्यंत प्रभावी असते. प्रत्येक व्यक्तीची अंतर्बाह्य आध्यात्मिक तपासणी सूक्ष्मपणे, त्यांच्या नकळतच, होते. त्या व्यक्तीतील दोषांचे ज्ञान गुरूंना ताबडतोब होते.

गुरूंची संकल्पित पूजा झाल्यावर शिष्य पाद्यपूजा करतात. सामुदायिक आरती, कर्पूर आरती, प्रार्थना इत्यादी होतात. गुरू स्वतः तीर्थ व प्रसाद देतात आणि इच्छेनुसार इच्छित कार्य सहजतेने घडवतात.

सूर्य — नाथपंथाची मुख्य देवता

या दैनंदिन पूजेमध्ये सूर्य ही मुख्य देवता असते आणि त्याच्या अनुषंगाने इतर देवता असतात. नाथपंथात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सूर्यनारायण ही अशी देवता आहे की संपूर्ण जग तिचे अस्तित्व आणि गुण प्रत्यक्ष अनुभवते. सृष्टीतील सर्व जीवांचा सूर्य हा आत्मा आहे.

पूर्व दिशा वैज्ञानिक दृष्ट्या उत्तर टोका ते दक्षिण टोका अशा पट्ट्यात येते. सूर्य त्या पट्ट्यावर कणाकणाने भ्रमण करतो.

उत्तरायण – दक्षिणायन व सूर्य संक्रमण

सूर्य उत्तर टोकापासून दक्षिण टोकाकडे जातो — दक्षिणायन. दक्षिण टोकापासून उत्तर टोकाकडे जातो — उत्तरायण.

मकर संक्रांतीपासून (१४–१५ जानेवारी) सूर्य दक्षिण टोकापासून पुढे सरकत उत्तर टोकाकडे जातो आणि १६ जुलैला उत्तर टोकाला पोहोचतो. तेथे तो पुन्हा दक्षिणाकडे वळतो — ह्याला कर्क संक्रमण म्हणतात.

म्हणून, मकर संक्रमण व कर्क संक्रमण ही दोन्ही सूर्यउपासनेत अत्यंत महत्त्वाची.

सूर्य संक्रमण हवन

नाथपंथाच्या परिपाठानुसार या दोन्ही संक्रमणांना सूर्य संक्रमण हवन करण्याचा प्रघात आहे.

या हवनातून निर्माण होणारी विभूती मंत्रसाधना, शक्ती, शस्त्र–अस्त्र, दैवी कार्य, व मानवी जीवनाच्या कल्याणासाठी वापरली जाते.

नाथपंथीयांनी तत्त्वांचा उपयोग स्वतःपुरता न ठेवता सदैव जनकल्याणासाठी केला आहे.

अनेक विशेष हवने देखील होतात — त्यांचा उद्देश एकच: जनहित व जनकल्याण.

सद्गुरू व्यंकटनाथ महाराज परंपरेप्रमाणे दर मकर संक्रांत व कर्क संक्रांतीला हवन करीत असत व अनेक लोक दूरवरून उपस्थित राहत असत.

नाथपंथाची ही हवन परंपरा मागील सुमारे ५००० वर्षांपासून अखंडित सुरू आहे.