ज्ञानेश्वर महाराज
मानवाने जीवनात कोणत्या विचार-बुद्धीने वागावे, याबाबतीत ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर मार्गदर्शन केले आहे. आळंदीचे संत ज्ञानेश्वर कोणाला माहित नाहीत? ज्ञानेश्वरांचं जीवन पाहिलं तर ते अत्यंत खडतर असं होतं. कर्मांनी, विचारांनी आणि ज्ञानांनी ते खरोखरच ज्ञानेश्वर होते.
मुळात ते विष्णूचा अवतार होते. त्यांच्या जन्माची कहाणी इतिहासाला धरून पाहिली तर लक्षात येईल की स्वतः विष्णूनें ज्ञानेश्वर म्हणून जन्माला येण्याचे द्वापारयुग संपता-संपता घोषित केले होते. तसेच शंकराने देखील निवृत्तीनाथ म्हणून जन्माला येईल असे त्याच वेळेस घोषित केले होते.
म्हणजे ज्ञानेश्वरांचे जे जीवन तेच विष्णू-अवताराचे जीवन. विष्णूनेंच ज्ञानेश्वर म्हणून अवतार धारण केला होता.
संपूर्ण वेदांवर त्यांचं प्रभुत्व होतं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश — या पाचही महातत्त्वांवर त्यांचं प्रभुत्व होतं. असं असताना देखील त्यांनी आपला जीवनप्रवाह समाजाच्या दृष्टीने खडतर ठेवला.
समाजात राहून समाजाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. “माणसाला माणूस म्हणून पहा, माणूस म्हणून रहा आणि माणूस म्हणून जगा” हे त्यांचे सांगणे होते. माणूस कसा असावा हे त्यांनी त्यांच्या जीवनचरित्रावरून निरनिराळ्या तऱ्हेने समजावून सांगितले.
परंतु त्या वेळेचा काळ आणि त्यावेळच्या समाजातील मानव त्यांना ओळखू शकले नाहीत व समजू शकले नाहीत. त्यांचा अवतार मानवकल्याणासाठी होता. कलियुगात माणसाची जी दैना अवस्था झाली आहे, ती कशाप्रकारे चांगली होऊ शकते, यावर त्यांनी निरनिराळ्या प्रकारे प्रकाश टाकला.
ज्ञानेश्वर म्हटलं की वारकरी पंथ समोर येतो — *“हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी”* हे ते सतत सांगत आले. *“जन्मो-जन्मी ईश्वराचं नाव घेत रहा, घेतच रहा; आपोआप केव्हातरी कोणत्यातरी जन्मात जीवाचा उद्धार होईल”* — हेच त्यांना सांगायचे होते.
रामदास स्वामींनी हे वेगळ्या शब्दात सांगितले — *“अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे; मुख्य परमात्मा आतुडे तदनंतरें.”*
सामान्यतः कोणत्याही जीवाचा उद्धार एका जन्मात किंवा चालू जन्मात होईल ही कल्पनाच भ्रामक आहे.
आपल्या चित्तवृत्ती, प्रवृत्ती, सदाचार लक्षात घेतले तर आपल्याला कळेल — द्वापारयुगातील जीवन जसे होते तसे आपले नाही; त्रेतायुगातील जीवन तसे नाही; आणि सत्ययुगाची आपण कल्पना करतो आणि वाटच पाहतो.
कुठे पंचवीस-तीस फूट उंच, धडधाकट, ईश्वरभक्त असा सामान्य माणूस आणि कुठे पाच-सहा फूटाचा, फाटक्या अंगाचा कलियुगातील माणूस?
आपल्या जीवनात असंख्य प्रश्न आहेत — जीवनासंबंधी, शरीरयष्टी-संबंधी, स्वास्थ्य-संबंधी, कौटुंबिक व समाजातील जीवनाशी संबंधित.
जो-तो आपल्याच उद्देशाने प्रेरित होऊन स्वार्थात आणि मोहचक्रात अडकलेला आहे.
जीवनात जशी जमेल तशी ईश्वरभक्ती करून असंख्य गोष्टींची कामना आपण परमेश्वराकडे करतो. सतत आपले प्रारब्ध, पूर्वसंचित, नशीब यांची आपल्याला आठवण येते.
जीवनातील यश-अपयश व आपली मनोकामना — या आपली मन:शांती हिरावून घेतात.
धीर, गंभीरता, शांत प्रवृत्ती, स्थिर विचार — या दृष्टीने जीवनाकडे पाहण्याचा आणि जीवनात काही करण्याचा आपल्याला वेळच मिळत नाही.
संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी मानवी जीवनाबद्दल काही विचार मांडले आहेत. त्यावर प्रत्येकाने मनन–चिंतन करण्याची गरज आहे.
हे १० विचार अतिशय सुंदर आहेत. आपण अवश्य वाचा, मनन करा, चिंतन करा — आणि नव्या विचारांनी आपल्या जीवनप्रवाहाकडे पाहा. आणि नंतर ठरवा — *आपण आपल्या जीवनात किती आणि का दुःखी व्हावे?* कर्म करणे हेच एकमेव साधन आहे.
ज्ञानेश्वरांनी मांडलेले १० विचार
१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती-धर्मात व्हावा, आई-वडील कसे असावेत — हे माझ्या हाती नव्हते. त्याबद्दल तक्रार न करता, निसर्गाने दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून मी माझे जीवन सुखी करू शकतो.
२) मी स्त्री व्हावे की पुरुष, काळा की गोरा — माझ्या शरीराची ठेवण आणि अवयव — हेही माझ्या हाती नव्हते. परंतु जे काही मिळाले आहे त्याची निगा राखणे व योग्य काळजी घेणे हे माझ्या हातात आहे.
३) माझ्या आई-वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, स्वभाव — हेही माझ्या हाती नव्हते. ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे सदैव लक्षात ठेवावे.
४) सगळ्यांनाच सर्व सुख मिळत नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यातही काही दुःख असणारच. दुःखांचे भांडवल न करता, त्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.
५) इतरांनी माझ्याशी कसे वागावे हे माझ्या हाती नाही. परंतु मी त्यांच्याशी प्रेमाने, संयमाने आणि मृदुभाषेने वागणे हे माझ्या हातात आहे.
६) आयुष्यातील घटना माझ्या नियंत्रणात नसतात. पण त्या वेळी सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन हे माझ्या हातात आहे.
७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. हे असे का? तसे का? असा वैताग करण्यापेक्षा — *जे चूक आहे ते मी तरी करणार नाही* — असे ठरवता येते.
८) कधीतरी मला दुःख येणारच — ही जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी लोकांना मदत करावी.
९) आज यश, सुख, समृद्धी असली तरी ती केव्हाही नष्ट होऊ शकते. म्हणून अहंकार दूर ठेवावा.
१०) जे मिळाले नाही त्याबद्दल दुःख करण्याऐवजी — जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहावे. जग सुंदर करण्याची संधी मिळाली तर ती गमावू नये.
हे सर्व विचार ज्ञानेश्वरांनी त्यांच्या खडतर जीवनाच्या अनुभवानंतर सर्व जीवांच्या उद्धारासाठी मांडले आहेत.
अभ्यासू वृत्तीने पाहिलं तर हे विचार ज्ञानेश्वर म्हणण्याऐवजी भगवान विष्णूने स्वतः मांडले आहेत, असे समजणे योग्य राहील.
ब्रह्मांडात उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी विभागणी आहे. स्थितीचे कार्य विष्णूकडे आहे. म्हणून जन्मापासून मृत्यूपर्यंत आपले जीवन विष्णूच्या योजनेप्रमाणेच चालणार आहे.
हे लक्षात घेऊन आपण कोणत्या विचारधारेने जीवनाकडे पाहायचे आणि जीवनप्रवाह ठेवायचा हे आपल्या विवेकाने ठरवावे.
हे सात्विक जीवन-सारांश आपणास आपल्या जीवाचा प्रवास समजून घेण्यासाठी समर्पित करीत आहे.