गुरु आणि गुरुकार्य समजणे गरजेचे
माधवनाथ महाराजांना विविध साधुसंतांनी संकेत देऊनच गादीवर बसवले होते. त्यांच्या जन्मापूर्वीही एका साधूने अशी साक्ष दिली होती की एक अलौकिक व अद्वितीय आध्यात्मिक कार्य करणारा सत्पुरुष जन्म घेणार आहे. माधवनाथ महाराजांनी नाथपंथाच्या परंपरेनुसार संपूर्ण आयुष्य पंथकार्यात घालवले. व्यंकटनाथ महाराजांना त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच पंथकार्यासाठी सिद्ध करणे सुरू केले. अनेक कठोर परीक्षा घेऊन त्यांना त्या कार्यासाठी तयार केले.
व्यंकटनाथांना मधवनाथांनी उत्तराधिकारी केले
गुरुपदी बसवण्याची वेळ आल्यावर, कोणताही सामाजिक सोहळा न करता, पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर एकांतातच माधवनाथ महाराजांनी व्यंकटनाथांना स्वतःच्या गादीवर दाटदूट करून बसवले. त्या क्षणी व्यंकटनाथांना असे वाटले की कदाचित आपल्याकडून काही चूक झाली असावी आणि गुरु रागावले असावेत. परंतु प्रत्यक्षात माधवनाथ महाराजांनी आपल्या गूढ परंपरेनुसार आपलीच गादी व्यंकटनाथांना अर्पण केली होती. फार तर एक-दोन मिनिटेच ते त्या गादीवर बसले असतील .
त्या वेळी माधवनाथ महाराज म्हणाले:
“आम्ही आता जातो. तू हे कार्य सांभाळ. सर्व कार्य आम्हीच करवून घेऊ. तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस. कोणाला घाबरू नकोस. ज्याला गरज पडेल तो तुझ्याकडे येईल, आणि त्याचे कार्य तू कर. तुझे गुरु बंधू आहेत, त्यांचा तू काहीही विचार करू नकोस. सर्व काही आपोआप घडेल. तू फक्त समोर राहून पंथ कार्य करत पंथ राहा .” असे सांगून ते तेथून निघून गेले. व्यंकटनाथ महाराजही परत गुरूंच्या सेवेकरिता सिद्ध झाले.
नाथपंथाच्या इतक्या मोठ्या परंपरागत अधिकाराने आणि अद्भुत आध्यात्मिक सामर्थ्याने परिपूर्ण अशा गादीवर ,व्यंकटनाथ महाराज कसे बसले व माधवनाथ महाराजांनी काय व कसे बोलले—हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी जे म्हटले त्यापेक्षा त्याचा परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. माधवनाथ महाराजांनी समाधी घेतल्यावर, त्याच सामर्थ्याने व्यंकटनाथ महाराजांनी पंथकार्य पुढे नेले.
लोकांचा भ्रम - कलीचा प्रभाव
कालांतराने कलियुगाचा प्रभाव घराघरांत वाढला. त्यामुळे, जरी कार्याची आज्ञा माधवनाथांनीच दिली होती, तरी लोकांमध्ये असा भ्रम निर्माण झाला की व्यंकटनाथ महाराज नाथपरंपरेतील नाहीत, त्यांना गादी वर बसवले नव्हते , माधवनाथांनी कोणालाही आपला उत्तराधिकारी नेमला नाही आणि त्यामुळे माधवनाथांनंतर कार्य थांबले. व्यंकटनाथ महाराज हे जणू स्वयंभू आणि स्वयंघोषित आहेत — असा गैरसमज काही भक्त आणि शिष्यांमध्ये निर्माण झाला.
माधवनाथ महाराजांचे शिष्यमंडळ गुरूंच्याबद्दल निष्ठा दाखवण्याच्या प्रयत्नात, अनपेक्षितपणे स्वतः गुरूंनाच कमी लेखू लागले. गुरूंच्या तत्त्वांचा, कार्याचा, धोरणांचा आणि कृतींचा विचार न करता, स्वतःच्या मनाने गुरूंच्या नावावर निर्णय घेऊ लागले. नाथपंथात अनुग्रह देण्याचा अधिकार हा केवळ कार्यरत गुरूंचाच आहे. परंतु काही लोक समाधीवरूनच मंत्र सांगू लागले आणि “हेच गुरुमंत्र आहे” असे म्हणू लागले. समाधीचे कार्य वेगळे, समाधिस्थ गुरूंचे कार्य वेगळे आणि वर्तमान गुरुंचे कार्य वेगळे — याचे भान त्यांना उरले नाही.
समाधी घेणाऱ्या गुरूंनी सर्व सत्ता, सामर्थ्य आणि कार्यपद्धती नवीन गुरुंवर सोपवूनच समाधी घेतलेली असते. भक्तांची भावना किंवा मतमतांतरे यांचा त्या निर्णयांशी संबंध नसतो. त्यामुळे गुरुकार्य, गुरुनीती आणि परंपरेचे स्वरूप सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे.
माधवनाथांनी व्यंकटनाथ महाराजांना आपला उत्तराधिकारी मनालाच नाही , असा प्रचार विश्वस्तांकडून होऊ लागला आणि समाजातील लोक त्यावर विश्वास ठेवू लागले. पण गुरुचा अधिकार स्वतःकडे ठेवणे — हे चुकीचेच आहे, हे त्यांना कधी कळणार?
माधवनाथ महाराजांच्या काळात जसा विरोध झाला, तसाच काहीसा विरोध व्यंकटनाथ महाराजांनाही सहन करावा लागला. संत परंपरेत अनेकदा असे दिसून येते की, ज्यांनी समाजाच्या प्रचलित रुढी-परंपरांच्या पलीकडे जाऊन अध्यात्माचा मार्ग स्वीकारला, त्यांना सुरुवातीला लोकांकडून संशय, गैरसमज किंवा विरोध पत्करावा लागतो. व्यंकटनाथ महाराजही याला अपवाद नव्हते.
व्यंकटनाथ महाराजांच्या दैनंदिन वाङ्मय किंवा चरित्राचा अभ्यास केला तर एक गोष्ट अत्यंत ठळकपणे जाणवते—“प्रपंच करूनही संत होणे” आणि “जगात राहूनही जगापासून अलिप्त राहणे” ही त्यांची जीवननीती. याचा अर्थ असा की—
1. प्रपंच करूनही संत होणे व्यंकटनाथ महाराजांनी संसार, कौटुंबिक जबाबदाऱ्या, दैनंदिन कर्तव्ये ही सर्व कामे करत असतानाही अंत:करणाने ते सदैव अध्यात्माशी जोडलेले होते.
- त्यांनी कधीही संसार त्यागून वनवास, संन्यास किंवा विरक्तीद्वारा अलिप्तता साधण्याचा मार्ग निवडला नाही.
- उलट, ते लोकांमध्ये राहून, कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना अंतर्मनाने सतत परमेश्वराचे स्मरण करत राहिले.
- त्यामुळे त्यांच्या जीवनातून सामान्य माणसालाही “संतत्व हे फक्त जंगलात जाणाऱ्यांचे नाही; ते घरात राहूनही साधता येते” हा संदेश मिळतो.
2. जगात राहूनही जगापासून अलिप्त राहणे याचा अर्थ—
- मनाने संसारात ‘अडकू’ न जाणे,
- बाह्य परिस्थितींनी प्रभावित न होणे,
- सुख-दु:ख, निंदा-स्तुती, मान-अपमान यांमध्ये समत्व राखणे.
व्यंकटनाथ महाराज जगात होते, लोकांशी व्यवहार करत होते, संकटे व विरोध स्वीकारत होते; पण त्यांच्या मनात संसाराबद्दल मोह, लोभ, अहंकार नव्हता. त्यांना आलेला विरोधही त्यांनी वैरभावाने नाही, तर शांती, करुणा आणि समजुतीने स्वीकारल
म्हणून व्यंकटनाथ महाराजांचे चरित्र हे एक अद्वितीय उदाहरण ठरते—जगातील जबाबदाऱ्या पार पाडूनही, मनाने परमेश्वराशी एकरूप राहून ‘संत’ कसे होता येते याचे.
व्यंकटनाथ महाराज हे विष्णूंचे अवतार होते. काहींना ते रामरूपात दिसत, तर काहींना कृष्णरूपात. ते योगाभ्यानंद होते—योगियांचे राजा. द्वापारयुगातील आपले रूप त्यांनी शिष्यांना दाखविले होते. 20 फुटी देह आणि 18 इंचाचे चरणचिन्ह काही शिष्यांना प्रगट झाले. त्यांच्या **“स्वानंद सुधा”** या भजनांमध्ये आत्मज्ञान आणि आत्मानुभूती देणारा मधुर रस ओतप्रोत आहे. **“जीवन दर्शन”** हे त्यांचे चरित्र अवश्य वाचावे.
व्यंकटनाथ महाराजांच्या काळातील घटनांच्या वर्णनात दिसते की “भाव जैसा तसे देव” हे अतिशय खरे आहे. माधवनाथांनीच चित्रकूटचे पारंपरिक स्थान देवगाव रंगारी येथे आणले आणि नाथपंथाचे कार्य देवाधिदेवांच्या आदेशानुसार पुढे सुरू केले. माधवनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर व्यंकटनाथ महाराजांनी, 1936 पासून, आपल्या गुरुंच्या आज्ञेवरून गुरुकार्य सुरू केले. व्यंकटनाथांचे बालपणापासून माधवनाथांनीच घडवले होते.
व्यंकटनाथ महाराज परिचय
देवगाव—त्यांचे जन्मगाव. त्याच ठिकाणी, त्याच गादीवरून व्यंकटनाथ महाराजांनी गुरुकार्याचा प्रारंभ केला. माधवनाथ महाराज ब्रह्मचारी होते, परंतु व्यंकटेशाचे लग्न त्यांनीच केले होते. म्हणून संसार आणि परमार्थ हे दोन्ही त्यांना सारखे साधावे लागत होते.
गुरू आज्ञेप्रमाणे व्यंकटनाथ महाराजांनी कार्य सुरू केले, पण त्यांना जाणवले की माधवनाथांचे शिष्य देवगावला येतच नव्हते. गुरुबंधुंचा विरोध त्यांना काळाला होता. परंतु गुरुनी दिलेली आज्ञा असल्याने त्यांनी विरोधाची पर्वा केली नाही आणि कार्यातच मग्न राहिले. माधवनाथ महाराजांच्या शिष्यांपैकी फार थोडेच लोक त्यांच्या बाजूला होते. उरलेले सर्व चुकीचे, गैरसमजुतीचे विचारांत, अहंकारात आणि “आम्हाला का विचारले नाही?” अशा क्षुद्र भावनेत अडकून गेले.
व्यंकटनाथ महाराजांचे जीवन व व्यक्तिमत्व विलक्षण होते. साधी राहणी—धोतर, कुर्ता , उपरणे, फेटा, चष्मा—पण सतत अलौकिक घटनांचे दर्शन आणि अनुभव त्यांनी भक्तांना घडवले. आयुर्वेद, जडीबुटी, वनस्पती, ज्योतिष, नक्षत्र—यांचेही ज्ञान त्यांना होते. त्यांचे शिष्य विविध जातीधर्मातील अहेत त्यांचे कार्य अनन्यसाधारण आहे.
एकदा नरेन्द्रनाथ ह्यांच्याशी बोलताना त्यांनी स्वतःबद्दल सांगितले—
“जो आहे स्वयमेव निर्गुण निराकारी स्वयंभू सदा।
ज्याचे नाव तसेच स्वरुप जगी वर्णवेना कदा॥
“गाती ध्याती त्रिदेव ज्यासी वाहे सुमने विश्वांतरी सदा।
जो सर्वदा दृश्य स्वरुपी दिसे—तोच सद्गुरू व्यंकटप्रभू खरा॥”
व्यंकटनाथ महाराजांनी नवनाथांच्या कार्याची महती लोकांपर्यंत पोहोचवली. असंख्य लोकांच्या व्याधी दूर केल्या, अनेकांना भक्तिमार्गाला लावले. “स्वानंद सुधा” मधील भजने अत्यंत प्रासादिक आहेत. त्यांच्या केवळ श्रवणानेही आध्यात्मिक अनुभव मिळतो.
त्यांनी अखेरपर्यंत, अखंडपणे, जीवोद्धारार्थ असामान्य कार्य केले.
समाधी घेऊन 26 वर्षे झाली तरी—
“ॐ नमो भगवते व्यंकटनाथाय। स्मरणमात्र संतुष्टाय। महाभय निवारणाय। महान ज्ञान प्रदाय।चिदात्मने ॐ ॥”
या मंत्राची अनुभूती आजही साधकांना मिळत आहे. त्यांच्या अतुलनीय सामर्थ्याची हीच मोठी साक्ष.