श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

शिष्यच गुरकार्याचा भेद करतात

आधी माधवनाथांनी व्यंकटनाथांना गादीवर कसे बसवले, हे सविस्तर सांगितले आहे. सन्यास जीवन जगल्यानंतर समाधी घेण्यापूर्वी, देवगाव सोडून जीवनाच्या शेवटच्या प्रवासाला निघण्यापूर्वी माधवनाथांनी व्यंकटनाथांना पुढील कार्याची आज्ञा केली. माधवनाथ म्हणाले—

“ऐक, आम्ही आता अकोला–नागपूर करून हिंगणघाटला जाऊ. पुढचे कार्य तुला करायचे आहे. कोणाची काळजी करू नको, कोणाला भीऊ नको. सर्व काही आपोआप होईल. मंदिराचा जीर्णोद्धार, वार्षिक कार्यक्रम, बालाजींचा उत्सव — सर्व नीट करत जा. ज्याचे पोट दुखेल तो तुझ्याकडे येईल. कार्य करता करता सर्व काही आपोआप घडेल. कोणाचीही चिंता करायची नाही. गुरूबंधूंचा विचार करायचा नाही. कार्य पंथाचे आहे. आम्हीच सर्व काही करणार. तू समोर राहून गुरूकार्य करत रहा.”

हे बोलून माधवनाथांनी समाधी घेण्यापूर्वीच व्यंकटनाथांना गादीवर बसविले आणि पंथकार्य पुढे सुरू ठेवण्याची आज्ञा दिली. पंथाची सर्व सिद्धता व्यंकटनाथांना देऊन त्यांनी परंपरेचा सूत्रधार पुढे चालू ठेवला.

नाथपंथाचा गाभा म्हणजे — गुरुपरंपरा योग्य रीतीने पुढे नेणे आणि पंथकार्याचा उद्देश साधत राहणे.

गादीवर बसवून माधवनाथांनी देवगाव सोडले. माधवनाथ थोर योगी व ज्ञानी होते. आपल्या जीवनाचा शेवटचा टप्पा त्यांना माहीत होता. मृत्यू माहित असूनही अखेरच्या क्षणापर्यंत पंथकार्य करत राहणे — हेच त्यांचे जीवन होते.

नाथपंथात गोरक्षनाथ म्हणतात—

“दोन जीवनांची मधली रेष म्हणजे मृत्यू. रेषेच्या अलीकडे आणि पलीकडेही जीवनच आहे.”

म्हणजे जीवाचा प्रवास अखंड आहे. मृत्यू सामान्यांना भयावह; पण नाथांना तो एक औपचारिक क्षण.

गुरुचरित्रातही सांगितले आहे— देह पंचमहाभूतांचा, पंचमहाभूतात विलीन होण्याकरिता.

दत्तात्रेयांचे वैशिष्ट्य म्हणजे — ते देह सहजतेने पंचमहाभूतात विलीन करतात आणि आवश्यकता भासल्यास क्षणार्धात नव्या देहात प्रकट होतात.

नाथपंथातील सद्गुरू मृत्यूला महत्त्व देत नाहीत. जीवनधारा कुठे बदलायची — हा त्यांचा स्वतःचा निर्णय असतो. कार्य संपले की मृत्यू स्वेच्छेने स्वीकारतात. “देह गेला तरी देव राहे.”

देवगाव सोडण्यापूर्वी माधवनाथांनी व्यंकटनाथांना सर्व पूर्वसूचना दिल्या आणि स्वतः अकोला गाठले. दुसऱ्या दिवशी व्यंकटनाथही अकोल्याला गेले आणि अम्मांना — माधवनाथांच्या शिष्येला — सांगितले की महाराज समाधी घेणार आहेत. हे ऐकून त्या व्यंकटनाथांवर रागावल्या. नंतर व्यंकटनाथांना देवगावला रवाना करण्यात आले.

देवगावला गेल्यावर व्यंकटनाथांना अचानक ताप आला — तो १०६° पर्यंत गेला. जीव जातो का राहतो, अशी अवस्था झाली. याच मार्गाने व्यंकटनाथ महाराज कुठेही परत जाऊ शकणार नाहीत — अशी पंथातील तजवीज होती.

त्या दरम्यान माधवनाथ निरनिराळी गावे करून नागपूर–हिंगणघाट मार्गे जात होते. ते सतत म्हणत — “समाधी इंदोर.”

डॉ. देशमुखांनी त्यांना कारने सोबत नेण्याची इच्छा व्यक्त केली. महाराज म्हणाले —

“तू हिंगणघाटचा निरोप मिळाल्यावर ये. तुझ्या गाडीतून मला खूप दूरचा प्रवास करायचा आहे.”

डॉक्टरांना आनंद झाला; परंतु अर्थ समजला नाही.

१९३६ साली, हिंगणघाट येथे समाधीपूर्वी त्यांनी स्पष्ट सांगितले—

“माझ्या देहाला काही महत्त्व नाही. देह कुठेही पडला तरी माझी आत्मज्योत देवगावला व्यंकटेशात विलीन होईल. ज्याने त्याची सेवा केली त्याने माझी सेवा केली. जो त्याला मुकला, तो मला मुकला.”

त्यांनी सांगितले — “अस्थी–राख काहीही नेऊ नका.” तरीही शिष्य संभ्रमात होते.

चंद्रपूरजवळील हिंगणघाट. उत्सव सुरू. सकाळचे स्नान सुरू होते. महाराज झोपाळ्यावर ध्यानस्थ.

तेव्हा एक मुलगा झोपाळ्याखालून जात असताना दोर तुटला. झोपाळा कोसळला; मुलगा चेंगरला गेला. बाहेर काढण्याआधीच मृत झाला.

उत्सवात महाराजांना त्रास होऊ नये म्हणून त्याला बाजूच्या खोलीत ठेवले आणि वातावरण शांत ठेवले.

महाराजांनी डोळे उघडताच विचारले— “कहाँ है वो बच्चा?”

लोकांनी तो मुलगा असलेल्या खोलीत नेले. महाराजांनी दार लावून घेतले.

काही वेळात — मुलगा जिवंत बाहेर धावत आला.

महाराज म्हणाले—

“आत्ताच आम्हाला समाधी घ्यावी लागेल.”

आणि त्यांनी पूर्वनियोजित वेळी समाधी घेतली.

प्राण हिंगणघाट येथे सोडला; ब्रह्मरंध्रातील प्राण इंदोर येथे.

हा प्रवास त्यांनी डॉ. देशमुखांच्या कारमधून केला. अनेक प्रसंगी त्यांनी डोळे उघडून शिष्यांकडे पाहिले.

इंदोर येथे अंत्यसंस्कार झाले. आजही इंदोरमध्ये त्यांच्या समाधीचे मंदिर आहे.

ज्या क्षणी माधवनाथांनी प्राण सोडला, त्याच क्षणी देवगाव येथील व्यंकटनाथांची प्रकृती सुधारली. समाधी झाल्यावरच ते देवगावबाहेर पडू शकले.

पुढील घटनांमध्ये, माधवनाथांनी स्पष्ट आज्ञा दिली असतानाही शिष्यांनी त्या पाळल्या नाहीत. काहींनी राख–अस्थी मंदिरात ठेवून स्मारक तयार केले. त्यांनी व्यंकटनाथांना गादी दिल्याची गोष्ट स्वीकारली नाही. देवनाथांना अनुग्रह दिला म्हणून तेच अधिकृत मानले.

दीपप्रकाश पोथी 1923 ला लिहिली. त्यांनंतरच्या 13 वर्षांचा उल्लेख पोथीत नाही. म्हणून 1923 नंतर काय घडले — याचा मागोवा कोणीच घेतला नाही.

34 वर्षे देवगावातील पंथकार्य सर्वांच्या नजरेसमोर होते, पण शिष्यांना ते समजलेच नाही.

माधवनाथांच्या समाधीला 80 वर्षे झाली. नवीन पिढी समाधी मंदिरात जे ऐकते तेच सत्य मानते. पण खरी परंपरा, खरा इतिहास — याचा शोध कोण घेणार?

पंथाला याची चिंता नाही. पंथकार्य चालूच आहे.

“माझे गुरू खरे”—या समजुतीवर पंथ चालत नाही. गुरूकार्य म्हणजे भक्त–शिष्य निर्माण करणे नाही. कलियुगातील विस्कळीत जीवनाला दिशा देणे, ईश्वरभक्त निर्माण करणे, परंपरेवर विश्वास ठेवणे, आणि युगधर्म राखणे — हेच खरे गुरूकार्य.

शिष्य वा भक्त हे फक्त माध्यम. परंतु प्रत्यक्षात शिष्यच अनेकदा गुरूंच्या योजनेत अडथळा आणतात.

समाधी मंदिर हे फक्त स्मारक. गुरू शिष्याला गुरुपदी बसवून कार्य सोपवतात — हे विसरले जाते. समाधी मंदिर म्हणजेच गुरूंचे कार्य — या चुकीच्या समजुतीमुळे पुढील गुरुयोजना नजरेआड होते.

व्यंकटनाथ महाराज म्हणत—

“हाथी चलता है और कुत्ते भोंकते हैं.”

नाथपंथी गुरू राज्यकर्त्यांवर, भक्तांवर वा शिष्यांवर अवलंबून नसतात. ते फक्त गुरूंच्या आज्ञेने आणि पंथाच्या संकेताने चालतात.