शिष्याच्या इंद्रियांवर गुरूंचीच सत्ता
**⬛ मी आणि सद्गुरू व्यंकटनाथ महाराज**
मी महाराजांच्या सान्निध्यात आल्यापासून माझ्यात जे स्थित्यंतर झाले, त्याचे वर्णन आधीच्या लेखात दिले आहे. सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर मी गुरूंना विचारले—“माझ्या खाण्या–पिण्यावर काही बंधन आहे का?” त्यावर गुरूंनी सांगितले—“काहीही बंधन नाही. तुला जे करावेसे वाटेल ते तू कर.”
परंतु या बोलण्याच्या वेळी माझ्या मनातले विचार वेगळे आणि सद्गुरूंच्या मनातले विचार वेगळे होते. मला वाटले—अपल्याला काहीही खाण्या–पिण्याची मोकळीक आहे. पण शिष्य–सद्गुरू संबंध हे व्यावहारिक नसतात. शिष्याला घडवणे, त्याला गुरुपदी नेणे—हे गुरूंचे सततचे कार्य असते. गुरूंचा शिष्याच्या इंद्रियांवर, मनावर, जीवावर पूर्ण ताबा असतो—हे शिष्याला अनुभवाने समजत जाते.
—
**⬛ 12 वर्षांचा सहवास आणि घडलेला प्रसंग**
सन् 1969–70 च्या सुमारास, गुरूंच्या सहवासाला 12 वर्षे पूर्ण झाली होती. मी महाराजांना म्हणालो—“पहिल्यांदा आल्यापासून जवळपास एक तप पूर्ण झाले.” त्यावर महाराज म्हणाले—“तुझा अर्धा भाग पूर्ण झाला आहे; उर्वरित भाग लवकरच पूर्ण होईल. तुला प्रचिती येत राहील.”
गुरूंच्या संपर्कापूर्वी मी मित्रांसोबत मांसाहार, मद्यपान, तसेच धूम्रपान करत असे. परंतु सहवासात आल्यावर मी माझ्या मनानेच हे सर्व सोडून दिले—गुरूंनी कधी बंधन घातले नाही.
धुळवडीचा दिवस. मित्रांचा परिपाठ—एकत्र बसून मांसाहार, मद्यपान. पण 12 वर्षांत कोणालाही मला आग्रह करायची हिंमत नव्हती. त्या दिवशी मात्र माझ्या मनाचा बांध तुटला. मनात आले—
“गुरूंना सर्व माहीत आहे; ते म्हणतात—जे वाटेल ते कर. तर आज इच्छा पूर्ण करावी.”
सर्व मित्र जेवत बसले. मीही बसलो; पण माझ्या ताटात नेहमीप्रमाणे पुरणपोळी, भाजी, श्रीखंड होते. मनात विचार—
“कोणीतरी माझ्या ताटात मांस वाढले तर मी खाईन.”
आणि तसेच घडले—शेजारी बसलेल्या मित्राने ताटात मांस वाढले.
मी मनात गुरूंचे स्मरण करून घास तोंडात नेऊ लागलो.
—
**⬛ चमत्कारिक अनुभव**
घास तोंडात जात असतानाच अचानक हाताला जोराचा शॉक बसल्यासारखे झाले. हात आपोआप बाजूला फेकला गेला आणि महाराजांचा आवाज स्पष्ट ऐकू आला—
“बाळ, खाऊ नको. आम्ही येथेच आहोत. बाजूला टाकून दे, हात धुवून ये आणि जेवण पुढे सुरू कर.”
नकळत तेच झाले. त्या क्षणानंतर अभक्ष खाण्याची इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली.
नंतर महाराज म्हणाले—
“तू जे खाणार होतास ते आम्हीच खायचे. ज्या दिवशी आमच्या इच्छेविरुद्ध काही घडेल, त्या दिवशी ते होणारच नाही. आता गेली का तुझी इच्छा?”
—
**⬛ सद्गुरू शिष्यावर अखंड परिश्रम घेत असतात**
व्यंकटनाथ महाराजांनी आपल्या आगळ्या–वेगळ्या पद्धतीने मला घडविले. माझी वृत्ती, अंतर्मन तपासले. शिष्याला घडवण्यासाठी सद्गुरूंना किती सहन करावे लागते! “जित्याची खोड जात नाही” म्हणतात—काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या गुणांचा नाश करून शिष्याला सत्त्वगुणी बनवणे हे अत्यंत कठीण कार्य आहे.
पण शिष्याला गुरुपदी नेण्यासाठी गुरु हे सर्व करतात—आणि अखंड करीत राहतात.