श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

नवनाथ पंथातले व्यंकटनाथ महाराज

सद्गुरू व्यंकटनाथ महाराज माझे सद्गुरू. नाथपंथांमध्ये अखंड गुरुशिष्य परंपरेने त्यांनी नाथपंथाचे जीवनभर कार्य केलं. त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं सामर्थ्य, त्यांचा महात्म्य, त्यांची शिकवण, त्यांचे विचार — या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जी भक्तीगीत तयार केली आहेत ती स्वानंद सुधा या नावाने प्रकाशित झाली आहे.

सद्गुरू व्यंकटनाथ महाराज असताना आम्ही सर्व त्यांचे शिष्य आणि गुरूबंधू–भगिनी हे त्यांच्या उपस्थितीत हे भजन करत असत. ही सर्व सिद्ध भजनं आहेत. या प्रत्येक भजनाला स्वतःचा इतिहास आहे.

प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये कसं वागावं, कसं करावं, काय करावं, स्वतःला कसं घडवावं, अध्यात्मिक ज्ञान काय आहे ते कसं प्राप्त करावं, आपले व्यवहार कसे असावेत — एकंदरीत आपल्याला घडवण्याचा जो अनेक प्रकारचा मार्ग आहे, त्या मार्गावरील शिकवण ही प्रत्येक गीतातून त्यांनी दिली आहे.

काकडा आणि पहाटेची साधना

काकडा हा त्याचा पहिला भाग आहे. सूर्योदयापूर्वी म्हटला जातो. या काकड्यात पहाटेच्या निसर्गाचे वर्णन केले आहे. पहाटे निसर्ग कसा असतो, त्याचा परिणाम कसा असतो, त्या वेळेला आपण उपासना–साधना केली तर त्याचा परिणाम आपल्यावर कसा होतो, साधना कशी करावी, आपले गुरु कोण, त्यांचे सामर्थ्य काय, निसर्ग गुरूंना कशी मदत करतो — याचे वर्णन प्रत्येक गीतात उत्तम रीतीने केले आहे.

हे रोज म्हटल्याने किंवा श्रवण केल्याने आपल्याला हळूहळू त्याचं ज्ञान होऊ लागतं.

संध्याकाळची भजनव्यवस्था

त्याचप्रमाणे संध्याकाळी भजनासाठी व्यवस्था केली आहे. प्रत्येक वाराचं भजन वेगळं आहे. प्रत्येक बाराच्या प्रत्येक पदातून काही ना काही शिकवलं गेलं आहे. अध्यात्म हा कळत–नकळत आपल्याला समजायला लागतो.

मला हे ज्ञान केव्हा प्राप्त झालं हे कळतच नाही, अशा प्रकारे या प्रत्येक भजनांचा प्रत्येकावर परिणाम होतो.

जे ज्ञान अनेकांनी सांगून, अनेक ग्रंथ वाचून, अनेक ठिकाणी जाऊन मिळू शकत नाही — ते ज्ञान अत्यंत सहजतेने या भजनांनी प्राप्त होतं.

भजन हे रोज संध्याकाळी म्हटले पाहिजे.

भजनांचा परिणाम

या भजनांचा परिणाम आपल्या आत्म्यावर, आपल्या पिंडावर होतो. एवढेच नाही तर आपले दैनंदिन व्यवहार, विचारसरणी, कार्यक्षमता, निर्णयक्षमता, भवितव्य — या सर्वांवर होतो. सर्वांगिण परिणाम होऊन आपोआप आपण घडू लागतो आणि गुरूंची कृपा हळूहळू प्राप्त होऊ लागते.

गुरूंच्या भजनांमध्ये एका ठिकाणी म्हटलं आहे:

“इच्छा मात्रे हार्दि तुझ्या, रोग व्याधी समस्त होते, प्राप्ती भजन करता तेज ये नित्य नित्य.”

केवळ भजन केल्याने आपलं दुःख, दारिद्र्य, संकट, चिंता दूर होतात. जीवनात पाहिजे त्या गोष्टीसाठी योग्य मार्ग मिळू शकतो.

भजन करता–करता रोज निरनिराळ्या पद्धतीने म्हणता–म्हणता आपल्यात हळूहळू परिवर्तन घडतं — शरीरात, योगात. हे परिवर्तन होत होत आपण आपले जीवन सुखी करू लागतो.

नित्यनियमाने भजनाचे महत्त्व

या भजनामध्ये एका ठिकाणी म्हटलं आहे:

“नित्यनियमाने भजन करे जो उणे न त्या भासे श्रीनाथांचे वचनची ऐसे खोटे हो कैसे”

महाराज प्रत्यक्ष असताना अनेकांनी या अनुभूती घेतल्या आहेत.

नित्यनियमाने भजन केल्यास आपले असंख्य प्रश्न स्वतःच मार्गी लागतात. मनशांती लाभते. निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता वाढते. अनेक गोष्टी, ज्या अन्यथा सिद्ध होऊ शकत नाहीत, त्या साध्य होऊ लागतात.

“विद्यार्थ्यास विद्या, अन्न भुकेल्यासी” ही या भजनांची फलश्रुती आहे.

सिद्ध परंपरा आणि व्यंकटनाथ महाराज

ही सर्व पदे या सिद्ध पुरुषांची, म्हणजे अखंड गुरुपरंपरेने हे कार्य करत आलेल्या व्यंकटनाथ महाराजांची आहेत.

मच्छिंद्रनाथ पासून जी परंपरा सुरू झाली ती थेट व्यंकटनाथ महाराजांच्या पंथापर्यंत (१९९३) आली आहे. या परंपरेमध्ये अनेक अघटित गोष्टी सहजतेने घडत आलेल्या आहेत.

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांवर त्यांचे प्रभुत्व होते.

व्यंकटनाथ महाराजांची रहाणी अत्यंत साधी, बोलणं अत्यंत साधं, सरळ; परंतु प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व — हा त्यांचा विश्वास आणि सामर्थ्य — प्रत्येक कृतीतून दिसत होता.

ज्ञानेश्वर महाराज विष्णूचे अवतार होते, पण किती सहजतेने जीवन जगले. कुणाला कधी कल्पना आली नाही की हा विष्णूचा अवतार आहे. देव पृथ्वीवर सुखासाठी येत नाही — तो त्याचं कार्य करतो आणि परत निघून जातो.

व्यंकटनाथ महाराज हे देखील विष्णूचे अवतार होते. ते पूर्णपणे सामान्य लोकांप्रमाणे राहत. तसेच दिसत. परंतु त्यांचं सामर्थ्य अघटित — जे त्यांच्या मनाला येईल ते केवळ संकल्पाने घडत असे. केवळ त्यांच्या मनोसंकेताने गोष्टी साध्य होत असत.

हेच त्यांचं व्यक्तिमत्त्व.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/नवनाथ/नवनाथ-पंथातले-व्यंकटनाथ-महाराज.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)