श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

पाशुपत राजास श्री रामाचे प्रत्यक्ष दर्शन

जीवाचा उद्धार आणि सृष्टीचे नियम

जीव जन्माला आल्यावर प्रत्येक जीवाचा उद्धार होऊन त्याला मुक्ती मिळणार हे विधाता सांगत असतात; याचा अर्थ जीव आपले कर्म करीत करीत केव्हातरी कोणत्यातरी जन्मात पूर्णत्वाला जाऊन मुक्त होणार. सृष्टी उत्पत्ती आणि रचनेतील हा महत्त्वाचा भाग आहे की सर्व काही नियमबद्ध आणि शिस्तबद्ध आहे. माणसाच्या हाती जीवात जीव आहे तोपर्यंत सत्कर्म करत राहणे हेच आहे; बाकी गोष्टी यथावकाश आपोआप घडत राहतात. त्याप्रमाणे योगी येऊन जीवाचा उद्धार होत राहतो. वाल्या कोळीचं पाहा—ब्रह्मर्षी नारदांनी वाल्याचा वाल्मिकी ऋषी केला. जर नारद भेटलेच नसते तर वाल्या आपल्या प्राक्तनानुसारच जीवन जगत राहिला असता. म्हणजेच सृष्टीच्या नियमाप्रमाणे जीवन घडण्यासाठी जे योग यावेत ते आल्यामुळे वाल्या वाल्मिकी झाला; अन्यथा झाला नसता. ह्या तत्त्वाप्रमाणे कुळाचे वंशज यांच्यावरही बंधने असतात. जसे राम सूर्यवंशातले. म्हणून सूर्य हा त्या वंशाला जबाबदार.

पाशुपत राजा आणि रामदर्शनाची अभिलाषा

मच्छिंद्रनाथांच्या जीवनचरित्रात अशीच एक घटना घडली की सूर्यवंशातल्या राजाने प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची अभिलाषा धरून त्यांची मनोभावे पूजा–अर्चा केली; तरीही दर्शन झाले नाही. ते मच्छिंद्रनाथांनी कसे घडवले ते पाहू. मच्छिंद्रनाथ प्रभूरामचंद्राच्या दर्शनासाठी अयोध्येकडे निघाले. अयोध्येत तेव्हा पाशुपत नावाचा राजा, जो रामाचा वंशज होता, राज्य करीत होता. तो आपल्या सैन्यासह प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी देवळात आला. देवळात अफाट गर्दी जमली होती. त्याच वेळी मच्छिंद्रनाथ आले आणि द्वारापर्यंत कसातरी पोहोचले. द्वारपालांनी त्यांना अडवले आणि उद्धटपणे वागले. मच्छिंद्रनाथ ऐकत नाही असे पाहून त्यांनी त्यांना मागे ढकलले. हे पाहून मच्छिंद्रनाथांना संताप आला; पण सेवकांचा दोष नसल्याने त्यांनी राजालाच धडा शिकवायचे ठरवले.

मच्छिंद्रनाथांनी अस्त्राचा उपयोग केला

मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्र मंत्र विभूतीवर टाकून रामाचे नाव घेतले. राजा देवाची पूजा करून साष्टांग नमस्कार घातला आणि जसेच त्याचे मस्तक भूमीला टेकले तसेच मच्छिंद्रनाथांनी ती विभूती राजाकडे फेकली. त्या बरोबर राजा जमिनीवर चिटकून राहिला. तो उठू शकत नव्हता. राजाने प्रधानाला काहीतरी करण्यास सांगितले. प्रधानाने चौकशी केली असता देवळाच्या द्वाराशी एका यतीचा अपमान झाला असल्याचे समजले. प्रधानाने मच्छिंद्रनाथांची क्षमायाचना केली आणि राजाला मुक्त करण्याची विनंती केली. मच्छिंद्रनाथांनी अस्त्रांचा उपयोग करून राजाला जमिनीपासून विभक्त केले. एवढी दाट गर्दी असूनही ते द्वारपालांपर्यंत पोहोचले—हे त्यांच्या सिद्धतेचे आणि अद्भुत गुणांचे लक्षण.

नाथांचा दिव्य प्रयोग — संकल्पशक्तीचे तत्त्व

मच्छिंद्रनाथांनी वापरलेली अस्त्रे ही संकल्पशक्तीने विभूतीवर प्रयोग करून फुंकरून वापरतात. विभूती ज्यांच्या दिशेने संकल्पित केलेली असते तेथेच परिणाम होतो. विभूती त्या व्यक्तीवर प्रत्यक्ष पडणे आवश्यक नसते. दिशा, अंतर, वेळ—कशाच्याही मर्यादा नसतात. भूमीवरील कोणत्याही भागातून कोणत्याही दिशेला परिणाम घडवता येतो—हेच नाथपंथाचे वैशिष्ट्य. राजाने सर्व वृत्तांत ऐकला आणि मच्छिंद्रनाथांच्या दर्शनामुळे धन्यता मानली. त्याने शोडषोपचार पूजा केली आणि नम्रपणे उभा राहिला. त्याची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथांनी त्याला वर मागण्यास सांगितले. राजा म्हणाला, ‘‘मी प्रभू रामचंद्रांचा सूर्यवंशी वंशज आहे; म्हणून मला रामांचे प्रत्यक्ष दर्शन घडवावे.’’

सूर्यासोबत युद्ध — पंथकार्याचे रक्षण

राजाची ही विनंती ऐकून मच्छिंद्रनाथांनी सूर्यावर विविध अस्त्रे वापरण्यास सुरुवात केली. त्यावेळी सूर्याबरोबर जणू एक युद्धच झाले. मच्छिंद्रनाथांच्या सिद्धतेपुढे सूर्य काहीच करू शकला नाही. सूर्य निश्‍चेष्ट झाला. त्यामुळे ब्रह्मदेव, विष्णू, शिव, वरुण, अश्विनीकुमार, कुबेर, गंधर्व इत्यादी देव तातडीने मच्छिंद्रनाथांकडे धावत आले. यावरून पंथाची सिद्धता, प्रखरता आणि व्यापकता स्पष्ट होते. कोणतीही तयारी न करता, तत्क्षणी आणि स्वार्थरहितपणे लोककल्याणासाठी अस्त्रे वापरणे—ही नाथांची परंपरा आहे. राजा सूर्यवंशी असल्याने सूर्याची कृपा त्याच्यावर असणे अपेक्षित होते. रामदर्शन घडविणे, सूर्याला सावध करणे आणि पंथकार्याचे रक्षण करणे—या सर्व गोष्टी साधण्यासाठी सूर्याबरोबरचे युद्ध आवश्यक झाले.

प्रभू रामचंद्रांचे प्रत्यक्ष प्रगटन

भगवान विष्णूंना सूर्याच्या वर्तनाबद्दल मच्छिंद्रनाथांनी तक्रार केली. विष्णूंनी पूर्वीच सहाय्य करण्याचे वचन दिले होते. त्यांनी प्रथम सूर्याला सावध करण्यास सांगितले. मच्छिंद्रनाथांनी सांगितले की ‘‘प्रथम पाशुपत राजास रामदर्शन घडवितो; त्यानंतर सूर्याला सावध करतो.’’ हे ऐकताच प्रभू रामचंद्र स्वतः तेथे प्रकट झाले. राजाला अप्रतिम आनंद झाला. राजाने आणि मच्छिंद्रनाथांनी रामदर्शन घेतले. रामाने मच्छिंद्रनाथांना आलिंगन दिले. त्याच वेळी मच्छिंद्रनाथ म्हणाले, ‘‘ज्यावेळी मंत्रप्रयोगांत तुझे नाव येईल त्यावेळी तू प्रत्यक्ष कार्य सिद्धीस नेण्याचे वचन दे; अन्यथा युद्धाला तयार राह.’’ राम म्हणाले, ‘‘भगवान दत्तात्रेयाचा वरदहस्त तुझ्या मस्तकावर आहे, नरसिंहावतार तुला वश आहे; मग मी तुला सहाय्य का करणार नाही? मंत्रात माझे नाव आले की मी तुझ्या पंथाला पूर्ण सहाय्य करीन. आपण दोघेही एकच आहोत.’’ त्यानंतर रामाने सूर्याला सावध करण्यास सांगितले.

सूर्याचा परिवर्तन आणि पंथसहयोग

मच्छिंद्रनाथांनी सूर्याला सावध केले. सूर्याने विष्णूंशी विचारणा केली आणि मच्छिंद्रनाथांना भेटीसाठी बोलावले. सूर्याच्या तेजाचा विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन मच्छिंद्रनाथ सूर्यदर्शनासाठी गेले. स्वतः विष्णूंनी सूर्याला मच्छिंद्रनाथांची इत्थंभूत माहिती दिली. सूर्याने नाथपंथाच्या मंत्रविद्येस सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे आश्वासन दिले. अशा प्रकारे वंशदैवतेकडून पाशुपत राजाला रामदर्शन घडवून देण्याचे आदेश मच्छिंद्रनाथांनी दिले. जर रामाने हे मान्य केले नसते तर त्यांनी रामाशीही युद्ध केले असते—याची रामाला कल्पना होती. म्हणूनच राम स्वतः प्रकट झाले आणि दर्शन देऊन नाथपंथाला सहाय्याचे वचन दिले. कलीयुगातील दोष दूर करण्यासाठी नाथपंथाची योजना केली आहे, हे प्रभू रामचंद्रांना माहीत होते. सृष्टी निर्मितीचे दोष दूर करण्यासाठी कृष्णानेही ही योजना केली होती. म्हणूनच राम मच्छिंद्रनाथांना सहाय्यभूत झाले.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/नवनाथ/पाशुपत-राजास-श्री-रामाचे-प्रत्यक्ष-दर्शन.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)