भगवान शंकर आणि विष्णु द्वारे नाथपंथाचा विस्तार
द्वापार युग संपता संपता कृष्णाने नाथपंथाची योजना केली आणि नारायणाच्या नऊ पार्षदांनी नाथपंथाची स्थापना करून नाथपंथाचे कार्य केलं.
हे सर्वच्या सर्व नवनाथ नारायणाचे पार्षद होते, त्यामुळे ब्रह्मांडामध्ये ते स्वैर संचार करायचे. यांचे मुळातले कार्य हे आध्यात्मिक होते त्यामुळे आध्यात्मिक दृष्टीने ते सर्वत्र वावरत होते. गाईचा गोठा ही त्यांचे राहण्याची अत्यंत प्रिय जागा आहे. यांचं पंचमहाभूतांवर प्रभुत्व आहे. ब्रह्मांडाच्या तत्वाच्या विरोधात जाऊन एखादी गोष्ट साध्य करणे हा त्यांचा अधिकार आहे जो इतर कोणत्याही देवाला नाही.
केवळ मनाच्या संकल्पनेने त्यांच्या मनात येईल ते कार्य ते करीत असत. मग ते ब्रह्मांडाच्या तत्वात बसले नाही तरीही ते करण्याचा त्यांचा अधिकार आहे.
नवनारायणांनी योनी संबंधातून प्रगट होऊन शरीर धारण करून माणसासारखा माणूस दिसेल असे राहून या भुतालावर कार्य केले आणि प्रखर पंथाची नियोजन करून त्याला पंथकार्याची सिद्धता दिली.
जे कार्य केवळ हे नाथ करू शकतात ते कार्य नाथपंथाचा अधिकारी भविष्यात करू शकेल अशी सिद्धता त्यांनी नाथपंथाला दिली. त्यांचा वेश म्हणजे वाढवलेल्या जटा, अंगभर रुद्राक्षाच्या माळा, हातात कंथा, झोळी आणि विभूती घेऊन ते फिरायचे. ‘आलख निरंजन, आदेश’ हे त्यांचे घोषवाक्य असायचे.
नवनारायणांनी आपले अवतारकार्य संपवल्यावर हा पंथ योनी संबंधातून आलेल्या सद्गुरुंकडे सोपविला. योनी संबंधातून पंथकार्य करणार्या सद्गुरूंचे राहणे हे सामान्य लोकांसारखे आहे. कंथा, झोळी, चिमटा वगैरे हातात काही न घेता हे वावरू लागले. त्यांची केशभूषा, वेशभूषा, भाषा आणि संबोधण्याचे प्रकार हे अयोनी संबंधातून आलेल्या नाथां सारखे नव्हते; ते सामान्य जनतेसारखेच होते.
हे जरी असले तरी पंथाची सिद्धता, सामर्थ्य व कार्य करण्याची हातोटी पूर्वीसारखीच आहे.
—
योनी संबंधातून पंथकार्याला भगवान शंकर व विष्णु यांनी सुरवात केली. भगवान विष्णु व शंकर यांनी योनी संबंधातून पंथ पुढे आणला. नवनारायणांची जीवनशैली, कार्यपद्धती, राहणी, सामर्थ्य व नारायणांचे पार्षद म्हणून त्यांची भूमिका ही भगवान शंकर, विष्णू व कविनारायण म्हणजेच चैतन्य स्वामी मच्छिंद्रनाथ यांनी मिळून ठरविली होती.
जोपर्यंत कलियुग आहे तोपर्यंत नाथपंथ कार्य अबाधितपणे कार्यरत राहील अशी योजना ह्या शक्तींनी केली होती. नवनारायणानंतरच्या कार्यात नाथपंथ कार्याला सर्व देवदेवता व सर्व वामशक्ती यांनी सहाय्यभूत राहण्याचे वचन दिले होते आणि त्याप्रमाणे ते कार्य करीत होते.
विशेष म्हणजे स्वतः भगवान शंकर (आदिनाथ) व भगवान विष्णू यांनी या पंथकार्यात पुढे भाग घेण्याचे ठरविले होते. आजदेखील नाथपंथाचे कार्य सुरू आहे; त्यावर नवनाथांचेच संपूर्ण नियंत्रण आहे. कार्य कोणी करावे हा निर्णय आजदेखील भगवान दत्तात्रेय स्वतः घेतात, आणि हे नवनारायण देखील त्या कार्यात तेवढेच सतर्क आहेत.
ज्या परंपरेचा येथे उल्लेख केला आहे ती मच्छिंद्रनाथांपासून सुरू असलेली नाथपरंपरा आहे. सर्व नाथांनी आपला कार्यकाळ संपविल्यानंतर फक्त गहिनीनाथच राहिले होते. ते ब्रह्मगिरीच्या पर्वतावर एका गुहेत समाधी लावून बसलेले होते. तशी त्यांना त्यांच्या गुरूंची म्हणजे गोरक्षनाथांची आज्ञा होती.
—
शंकर–विष्णू अवताराची पूर्वपीठिका
कुलकर्णी नावाचे एक सात्त्विक घराणे होते. विठ्ठलपंत व त्यांची पत्नी तेथे राहत असत. विठ्ठलपंतांना साधनेची, वेदांची व पौराणिक ज्ञानाची खूप आवड होती. आपण संन्यास घ्यावा व जीवन सार्थक करावे असे त्यांना प्रकर्षाने वाटत असे. संसारात मन रमत नसे.
एकदा अपरात्री झोपेतून उठून त्यांनी गाढ झोपलेल्या आपल्या पत्नीला उठविले व विचारले की ‘‘मी संन्यास घेऊ का?’’ पत्नी गाढ झोपेत होती. पती उठवीत आहे म्हणून ती जागी झाली. विशेष विचार न करता ‘हो’ म्हणाली.
पडत्या फळाची आज्ञा समजून विठ्ठलपंत त्याच रात्री घर सोडून निघून गेले. ते सरळ एका आश्रमात गेले व तेथे विद्यार्थी म्हणून राहू लागले.
—
सकाळी उठल्यावर पत्नीने काही वेळ पतीचा शोध घेतला, पण नंतर लक्षांत आले की आपण अनवधानाने संमती दिली. पत्नीच्या संमतीशिवाय संन्यास घेता येत नाही, म्हणून त्यांनी संमती घेतली होती. हे सर्व अभाविकपणे व शुद्ध मनाने घडले होते.
बराच कालावधी गेल्यावर विठ्ठलपंतांचे गुरू भिक्षा मागत मागत त्यांच्या घरी आले. त्यांना भिक्षा दिल्यावर त्यांनी ‘‘पुत्रवती सौभाग्यवती भव’’ असा आशीर्वाद दिला. ते ऐकताच त्या बाई म्हणाल्या: ‘‘आशीर्वाद परत घ्या किंवा भिक्षा परत द्या.’’
गुरूंनी कारण विचारले. त्या म्हणाल्या की ‘‘माझ्या पतीने संन्यास घेतल्यामुळे हा आशीर्वाद फळणार नाही.’’ गुरूंनी विचारताच ओळख पटली की तिचा पती म्हणजे त्यांचाच विद्यार्थी विठ्ठल.
गुरूंनी सांगितले: ‘‘आजपासून १५ दिवसांनी पौर्णिमेला तुझा पती घरी येईल.’’ तसेच झाले. वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करून प्रदक्षिणा घालून घरी येत असताना विठ्ठल त्यांच्या पुढे उभे होते.
त्या पतीच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला. संसार पुन्हा सुरू झाला. गुरूंच्या आज्ञेने विठ्ठलपंतांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम पत्करला.
त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताई अशी संतसंतती प्राप्त झाली.
अशा प्रकारे नवनारायणानंतरच्या नाथपंथाच्या कार्याची पूर्वपीठिका तयार झाली.