श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

नरेन्द्रनाथांचे कार्य : व्यंकटनाथांचा माझ्यावरचा आशीर्वाद

महाराजांच्या सान्निध्यातील माझी साधना

महाराजांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांच्या अनुग्रहाने मी व्यक्तिगत साधना, उपासना, जप, तप, अनुष्ठान हे सर्व करत राहिलो. व्यवसायाचे दैनंदिन जीवन जसे आवश्यक होते तसे सुरूच होते. महाराज नेहमी मला सांगत, “निदिध्यास ठेवलास आणि माशाप्रमाणे गुरूसाठी जीव तडफडत राहिला तर अंतकाळी आम्हीच दर्शन देऊ. आम्हीच तुला जन्म दिला आहे, अंतकाळी आम्हीच येऊ, दुसरे कोण येणार? आम्ही निजस्वरूपाने सर्वत्र आहोत.” माझी आध्यात्मिक उन्नती नेमकी काय होत आहे हे मला कधीच जाणवले नाही, त्यामुळे मी नेहमीच गोंधळात असे. एकदा महाराज म्हणाले की, “तुझी आध्यात्मिक प्रगती किती झाली हे आम्ही आमच्या मुखाने सांगत नाही, अतिशयोक्ती वाटेल; पण योग्य वेळ आली की तुला स्वतः कळेल.”

आध्यात्मिक प्रगतीचे गूढ संकेत

सन १९७१ साली महाराज म्हणाले, “षट्चक्राची तुझी अर्धी बाजू साधली आहे. तुझ्या पाठीशी आमची प्रभावी आणि प्रचंड शक्ती असताना तू अनाठायी भीती बाळगू नकोस. सर्व काही व्यवस्थित होणार आहे. नाथपंथाचे तुझे इच्छित कार्य आमच्या आशीर्वादाने निश्चित होईल. जसा विवेकानंद–रामकृष्ण–कालीमाता हा फोटो आहे, तसाच तू, मी आणि आईसाहेब (जगन्माता देवी) असे एकत्र राहू.” त्यांनी मला ठाम सांगितले की माझे कार्य विवेकानंदांच्या कार्यासमान असेल आणि तो मजबूत आशीर्वाद त्यांनी त्याच वेळी दिला.

जप–तप व हवनाचे फळ

सन १९८९ साली ते म्हणाले, “जप, तप, अनुष्ठान आणि हवनाने चित्तशुद्धी आपोआप होते. मंत्रशक्तीचा अनुभव तुला मिळेल. कार्याची जबाबदारी आम्ही तुझ्यावर टाकली आहे.” सन १९९३ मध्ये महाराजांनी समाधी घेतली, परंतु त्याआधीच त्यांनी माझ्यावर पंथकार्याची संपूर्ण धुरा सोपवली होती. मूर्तिजापूर येथील शेवटच्या हवनावेळी ते म्हणाले, “तुझी इच्छा आहे की आम्ही सर्वांसमोर सांगावे की पुढे तूच आमचे कार्य करशील. पण हे लोकांसमोर जाहीर करण्यासारखे नाही. गुरूचे कार्य हे परंपरागत अद्वैत परंपरेचे आहे. इतरांचा मानणे-न-मानणे याला काहीच अर्थ नाही. तू निमित्त आहेस; कार्य आम्हीच करणार आहोत. काहीही भीती बाळगू नकोस.”

गुरूंच्या समाधीनंतरचा संभ्रम आणि तळमळ

समाधीनंतर माझ्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली. शिप विथाऊट कॅप्टन अशी अवस्था होती. “कार्य सुरू कसे करायचे? कोणता आधार घ्यायचा? पंथाबद्दल लोकांच्या मनात असलेली भीती कशी दूर करायची?” असे असंख्य प्रश्न मला त्रस्त करत होते. मी श्री समर्थ रामदास स्वामींपासून तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांना जणू साकडे घालत होतो. माझ्यातील तळमळ इतकी तीव्र झाली की “जैसे जळाविण मासोळी तैसा तुका तळमळी” हीच माझी अवस्था झाली.

संक्रमणानंतरची पहिली पावले

१६ जुलै १९९३ चे हवन मी नेहमीच्या पद्धतीने केले, पण कार्याची दिशा अजून स्पष्ट नव्हती. १९९४ च्या संक्रमण हवनावेळी गुरुजींसोबत दोन मुले आली होती. त्यातील श्रीकांत गदाधर म्हणाला, “माझी इच्छा पूर्ण व्हावी एवढीच प्रार्थना.” हवन उत्तमरीत्या पार पडले. तरीही माझ्या मनातील प्रश्न सुटत नव्हते. “आपल्याला काही येत नाही, गुरूंनी शिकवलेले काही आठवत नाही” अशा भावनांनी मन व्यापले होते. त्यावर महाराजांनी मला ठाम शब्दांत सांगितले होते, “तुला वाटते आम्हाला काही येत नाही? गुरू आपल्या धाटणीने शिष्याला घडवतात. तू जसा आहेस तसा आम्ही घडवलेला आहेस.”

पहाटे मिळालेले दिव्य मार्गदर्शन

तीव्र तळमळीचे तीन दिवस गेले. चौथ्या दिवशी पहाटे, उठण्यापूर्वी माझ्या कानात स्पष्ट मंत्र सांगितला गेला. त्या क्षणी मनाला अचानक दिशा मिळाली. विचारांना स्थिरता आली. “गुरूंनी समाधीनंतरही मार्गदर्शन केले” या आनंदाने माझे मन भरून आले. त्या मंत्राच्या चिंतन–मननातून पंथकार्याची दिशा गवसली — कार्य असे तत्त्वाधिष्ठित असावे जे सर्वांना मान्य होईल, बुद्धीमान लोकांनाही पटेल आणि ज्याचे प्रभुत्व संपूर्ण ब्रह्मांडावर असेल. ही लक्षवेधी मापदंड पूर्ण करणारी गोष्ट एकच — वेद.

वेदाधिष्ठित पंथकार्याची सुरुवात

वेद अपौरूषेय आहेत, ब्रह्मदेवाने त्यावर १२ हजार वर्षे पुरश्चरण केले आहे, सृष्टी, मानवता आणि प्रत्येकाच्या जीवनाचा आधार वेदांमध्येच आहे. म्हणून मी समाजामध्ये वेदमंत्रांच्या माध्यमातून भाग्याचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले. वेदांचे औपचारिक शिक्षण मी कधी घेतले नव्हते, संस्कृत विषयही नव्हता. तरीही माझ्याकडून हे कार्य करवून घेणे हे पंथसामर्थ्याचे द्योतक होते. कार्य गुरूंचे; निमित्त मी.

अखंड परंपरेच्या गुरुकार्याची पुढील वाटचाल

या दिव्य मार्गदर्शनानंतर मी अखंड परंपरेच्या गुरुकार्याला सुरुवात केली.

हिमालयातील साधूंचे आशीर्वाद (2002)

सन २००२ साली मी शिष्यांसह हिमालयात गेलो. तेथे जप–अनुष्ठान केले. आश्चर्य म्हणजे आम्ही साधूंना भेटायला फिरत नव्हतो, तर साधूच माझ्या दर्शनासाठी स्वतः येत होते. अनेक भक्त, अनेक परदेशी साधक यांना मी पंथकार्याची प्रचिती दिली. त्यांच्यातील एका साधूने सर्वांसमोर भाकीत केले: “आनेवाले नजीक के भविष्य में आप ऐसा भवन निर्माण करने जा रहे हो जिसकी दुनिया में कोई मिसाल नहीं। एक शक्तिपीठ बनेगा जो लोगोंके बहुत उपयोगी होगा.”


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/नरेंद्रनाथ/नरेन्द्रनाथांचे-कार्य-व्यंकटनाथांचा-आशीर्वाद.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)