सुवर्ण महोत्सव
उत्सवाची पार्श्वभूमी
सर्व नाथभक्तांना विनंती. माझे समर्थ सद्गुरू श्री योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज हे माझ्या घरी १९७२ साली प्रथम आले होते. तेव्हापासून ते नेहमीच माझ्याकडे येत असत व राहत असत. त्यांच्या आज्ञेवरून त्या काळातच गुरुवारच्या भजनाला सुरुवात झाली.
येत्या जुलै २०२२ मध्ये या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. १९७२ सालापासून समाधी घेईपर्यंत महाराज माझ्या घरी अखंड येत होते व तेव्हापासूनच दर गुरुवारीचे भजन आजही अखंडपणे सुरू आहे.
सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची इच्छा
पन्नास वर्षांचा हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपण सर्वांनी मिळून हा भजनसोहळा उत्साहाने व एकत्र राहून साजरा करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.
जुलै किंवा ऑगस्ट २०२२ मध्ये हा कार्यक्रम माझ्या घरी महाराजांच्या गादीच्या सान्निध्यात करण्याचा मानस आहे.
माधवनाथ महाराज, व्यंकटनाथ महाराज, तसेच नाथपंथातील सत्पुरुषांचे भक्त आणि या विषयांमध्ये गोडी असणारे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहावेत, ही माझी तळमळ आहे.
व्यवस्थापन व निमंत्रण
गुरुबंधू, नाथभक्त व नाथप्रेमी असे मोठ्या प्रमाणावर सर्वांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. सर्वांची व्यवस्था — राहणे, खाणे–पीणे, नाश्ता, चहापाणी इत्यादी — योग्यरीत्या करण्याची जबाबदारी माझीच असेल.
प्रत्येकाला व्यक्तिगत निमंत्रण देण्याची माझी इच्छा आहे. त्याकरिता कृपया आपला फोन नंबर, व्हॉट्सअॅप नंबर, ई-मेल आयडी माझ्याकडे पाठवावा. मी व्यक्तिगत निमंत्रण व कार्यक्रमपत्रिका या माध्यमातून पाठवीन.
या निमित्ताने सर्व नाथभक्तांचा मोठा मेळावा घडावा, हा प्रयत्न आहे. आपण सर्वांनी खुल्या मनाने सहकार्य केले तरच हे शक्य होईल.
कार्यक्रमाची रूपरेषा
तीन दिवसांचा हा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्याचा मानस आहे :
- भजन
- पूजन
- नाथ संकीर्तन
- व्यंकटनाथ महाराजांची जीवनकथा
- नाथपंथाचा उगम व आजपर्यंतचे कार्य
- व्यक्तिगत समस्या ऐकून त्यावर उपाययोजना व उहापोह
तीन दिवसांचा हा कार्यक्रम पूर्णतः निशुल्क राहील. भोजनादी व्यवस्था माझ्याकडूनच राहील. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक सहाय्याची अपेक्षा नाही.
सहकार्याची विनंती
आपण कृपया खालील फॉर्म भरून सहकार्य करावे. आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत — नरेंद्र चौधरी (उर्फ नरेंद्रनाथ महाराज), अकोला