रुद्राध्याय महिमा
आत्मा, देह आणि जन्मोजन्मीची नोंद
गुरुचरित्र अध्याय ३४ मध्ये सांगितल्याप्रमाणे, जन्माला आलेला प्रत्येक जीव हा आपल्या जीवाच्या दीर्घ जीवनप्रवासातील एक टप्पा जगत असतो. आधी किती जन्म झाले आणि पुढे किती जन्म होणार हे गणित कुणालाच समजत नाही. प्रत्येक जन्मात जे चांगले–वाईट कर्म आपण करतो, त्याची नोंद आत्म्यावर होत राहते. गर्भधारणेच्या क्षणापासूनच आत्म्याचे बीज देहाशी एकरूप होते. त्यामुळे शरीराला जे दुःख होते तेच आत्म्यालाही स्पर्शते.
मात्र मुक्त सज्जन, गुरुपरंपरेतील नाथ, किंवा सिद्धपुरुष यांच्या देहातील वेदना त्यांच्या आत्म्याला स्पर्श करत नाहीत. ते निर्विकार राहतात. जन्मोजन्मीची सुखदुःखे आत्म्यावर आघात करून संस्कार निर्माण करतात.
दुःख व व्याधींचे मूळ कारण
व्याधी, मानसिक ताण, वेदना यांना आपण औषधांनी कमी करण्याचा प्रयत्न करतो; परंतु हा त्रास फक्त क्षणिक कमी होतो, त्याचे मूळ कारण नाहीसे होत नाही. दुःखाचे खरे निर्मूलन हे धर्म, उपासना व साधना यांच्या माध्यमातूनच शक्य होते.
गुरुचरित्र या अध्यायात नमूद आहे की रुद्रभक्तांची उपासना व रुद्राध्यायाचे सामर्थ्य हे दुःख, व्यथा आणि पूर्वसंचिताने आलेल्या अडचणी कमी करण्यात विशेष प्रभावी असते. पूर्वसंचित कर्म नष्ट होईपर्यंत दुःख शमणार नाही — हा वेदांचा नियम.
कर्मयोग व उपासनेची अनिवार्यता
भगवान कृष्ण म्हणतात: *“कर्मण्येवाधिकारस्ते…”* — कर्म करीत राहणे हेच धर्म. फळाची अपेक्षा न करता उपासना, जप, साधना अखंड करीत राहणे आवश्यक आहे. रामदास स्वामी म्हणतात: “अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे.”
नाथशक्तीपीठ प्रकाशित “हा खेळ प्राक्तनाचा की पूर्वसंचिताचा” या ग्रंथातही याच कर्मसिद्धांताचे विवेचन आहे. शंकराचार्य व अनेक शास्त्रज्ञांनीही या विचारांची प्रशंसा केली आहे.
पराशर ऋषी व राजकुमाराची कथा
पराशर ऋषींनी राजकुमाराचे पूर्वजन्म कर्म सांगितले असता राजा व्याकुळ झाला. राजकुमाराचे आयुष्य केवळ बारा वर्षे असल्याचे कळल्यावर तो ऋषींना विनवू लागला.
पराशर ऋषी म्हणाले: “काळ कुणाच्याही ताब्यात नाही. परंतु महादेवांची सत्ता मृत्यूवरसुद्धा चालते.”
सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती, प्रलय यांचे परिपालन करण्यासाठी ब्रह्मदेवांनीच रुद्राध्याय वेदांमध्ये दिला. रुद्राध्यायाला *अव्यय* म्हणतात कारण रुद्र आणि रुद्रपठक यांचा कधीच नाश होत नाही.
रुद्राध्यायाचे अग्नीस्वरूप
सूर्य ही आरोग्यदेवता मानली जाते आणि सूर्याचा मूलस्वरूप अग्नीत आहे. आधुनिक विज्ञानही सूर्याला धगधगता अग्निगोल मानते. त्याच अग्नीचे प्रतीक म्हणजे रुद्र.
महादेवाचे लिंग हे अग्नीची ऊर्ध्वगामी ज्योत दर्शवते. पूर्वजन्मकृत पापे व्याधीच्या रूपात प्रकट होतात. रुद्राध्यायाच्या उपासनेने ती पापे दग्ध होतात.
ऋग्वेदातील प्रार्थना: *“त्वा दत्तेभि रुद्र शंतमेभि:”* — हे रुद्रा, तुझ्या औषधीसमान उपकारांनी मला शतायुष्य लाभो.
म्हणूनच रुद्राध्याय हा औषधरूप मानला जातो.
रुद्रजपाचे सामर्थ्य
यमाने आपल्या दूतांना सांगितले की पापी जीवांना न्यायासाठी आणा. दूत पृथ्वीवर गेले तेव्हा रुद्रजपाचा प्रभाव अनुभवून घाबरून परत आले. यम म्हणाले:
“जिथे रुद्रजप होतो तिथे मृत्यूचे भय नाही.”
परंतु — अर्थ न समजता, अभक्तीने किंवा चुकीच्या पद्धतीने रुद्रजप केला तर पापच लागते — असे ब्रह्मदेवांनी यमाला सांगितले.
रुद्रजपाने अभिषेक करून त्याच पाण्याने स्नान केल्यास मृत्यूभय दूर होते. शतरुद्र किंवा अतिरुद्र करणाऱ्यांचे आयुष्य वाढते.
राजकुमाराचा अपमृत्यू टळणे
पराशर ऋषींनी राजाला सांगितले की शंभर वेदविद ब्राह्मणांना बोलावून महादेवाला शतरुद्राभिषेक करावा. राजाने साग्रसंगीत अभिषेक केला. अभिमंत्रित पाण्याने कुमाराला स्नान घातले. आणि — त्याचा अपमृत्यू टळला.
नाथपरंपरा आणि रुद्राध्याय
नाथपरंपरेतील श्री गुरुमूर्तींमध्ये महेशरूप अंतर्भूत असल्याने त्यांना रुद्राध्यायाची अतिशय प्रीती आहे. त्यामुळे श्री गुरूंची पूजा रुद्राध्यायानेच करावी, अशी सिद्धांनी नामधारकास सांगितले आहे.