योग्यांचे भ्रमण
नरदेह म्हंटला की तो पंचमहाभूतांचा पुतळा आलाच. त्याशिवाय देह तयार होऊच शकत नाही. पंचतत्वाचा देह क्षणात निर्माण करायचा किंवा निर्माण झालेला देह क्षणांमध्ये पंचतत्वात विलीन करून पाहिजे तिथे सदेह पुन्हा अवतरणे केवळ अशक्य आहे. परंतु योगी लोकांना ते सहज शक्य आहे.
आपण आपला देह हा जितके अंतर प्रत्यक्षपणे पार करता येईल तितकेच अंतर, जेवढा वेळ ज्या माध्यमातून जाऊ त्याला लागेल तेवढ्या वेळेत हा देह जाऊ शकतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नरदेह न्यायला वेळ हा लागणारच. एका गावाहून दुसऱ्या गावाला देह न्यायचा म्हणजे तो कुठल्यातरी माध्यमातून—बसने, रेल्वेने किंवा अन्य प्रकारांनी—जावा लागणार. त्याला जो वेळ लागेल तेवढा वेळ प्रवास करावा लागेल. प्रवास करून शरीर थकेल हा भाग वेगळाच.
योगी पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणापासून कोणत्याही ठिकाणी क्षणार्धात सदेह जाऊ शकतात. भगवान दत्तात्रेय ह्यांचे वर्णनच आहे की *स्मर्तृगामी क्षणे क्षणे* — म्हणजे, क्षणार्धात जिथे स्मरण करू तिथे ते सदेह प्रगट होणार.
नवनाथ परंपरेतले व्यंकटनाथ महाराज हे देखील त्यांच्या इच्छेनुसार केव्हाही कुठेही सदेह जात असत, तसेच ते पाहिजे ते रूप धारण करून अवतरत असत. कोणत्याही जीवाचा देह म्हंटला म्हणजे तो पाच तत्वांचा. त्यामुळे पाहिजे तो देह, पाहिजे त्या जिवाचा देह ते क्षणार्धात धारण करून पुन्हा आपल्या देहात परत येत असत.
अकोला ते कोल्हापूर रेल्वेने प्रवास करायला दीड दिवस लागतो. तेवढे अंतर ते केवळ एका क्षणातच पार करायचे — अकोल्याहून सदेह कोल्हापूरला जाऊन आले.
—
1972 ची गोष्ट आहे. मी अकोल्याला नवीन घर बांधले होते. नुकतेच मी आणि पत्नी गिरनार पर्वताला जाऊन आलो होतो, म्हणून त्या घराचे नाव गिरनार ठेवले होते. आयुष्यातली पहिलीच वास्तू होती. सद्गुरूंच्या हस्तेच वास्तु करावा आणि त्यात राहायला जावे असे मनांतून ठरविले होते.
आमंत्रण दिल्यावर व्यंकटनाथ महाराज अकोल्याला वास्तूसाठी आले होते. मीच त्यांना माझ्या गाडीतून घेऊन आलो होतो. वास्तूसाठी बाहेरगावाहून बरीच मंडळी आली होती.
एक दिवस महाराजांचे आन्हिक झाल्यावर त्यांचे जेवण झाले व नंतर सर्व भक्तांची पंगतीची तयारी झाली. आता आम्ही सर्वजण जेवून घेतो म्हणून सद्गुरूंना सांगण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो व तसे सांगितले.
त्यावर ते म्हणाले, तू या खोलीची सर्व दारे-खिडक्या आतून बंद करून घे व दार देखील बाहेरून बंद करून घे. मी त्याप्रमाणे केले. खोलीचे दार मी बाहेरून जसे बंद केले तसे त्यांनी ते आतूनदेखील बंद केले.
आम्ही सर्व जण जेवण्यासाठी पानावर बसलोच होतो तेवढ्यात महाराजांच्या खोलीच्या खिडकीशी बाहेरून भक्तांची बरीच गर्दी झाली. म्हणून चौकशी केली तर कळले: खिडकीच्या कांचेतून आत पाहिले तर खोलीत महाराज दिसतच नव्हते.
मी खिडकी बंद करताना ती केवळ आतून घट्ट बंद केली होती. त्याला कडी वगैरे घालून पक्की बंद केली नव्हती. म्हणून मीच ती खिडकी जोरात आत ढकलली आणि खिडकी उघडली.
पाहतो तो काय आश्चर्य — खोली आतून बंद दिसत होती, पण खोलीत महाराज नव्हते!
म्हणून एक मोठा लांब बांबू घेतला व तो खिडकीतून सर्व बाजूंनी ठासून पाहिला. पण कांहीच कळत नव्हते. इतक्यात बांबू कोपऱ्यांतून फिरवीत असताना खोलीच्या अगदी मध्यभागी महाराज सगळ्यांसमोर एकाएकी उभे दिसले.
उपस्थित सर्वांनी त्यांना तसे पाहिले.
ते आम्हाला म्हणाले, काय करत आहात रे? मी म्हटले, *महाराज, आम्ही सर्वजण केव्हापासून तुमचा शोध घेत आहोत; पण तुम्ही खोलीत कुठे दिसलेच नाहीत.*
त्यावर ते म्हणाले, *ये आत ये.* मग त्यांनी दार आतून उघडले. आम्ही सारेच आत गेलो. ते शांतपणे गादीवर बसले होते.
म्हणाले:
“मी अत्ताच कोल्हापूरला जाऊन आलो. एक बाई गर्भारशी आहे. दिवस भरत आलेले आहेत. ती पाय घसरून खाली पडली. त्यामुळे सगळे जण घाबरले. तिने मोठ्याने हाक मारली — ‘महाराज वाचवा.’ म्हणून धाऊन तिथे गेलो होतो. आता सर्व काही ठीक आहे. तिचे परवा पोस्टाने पत्र येईल ते तू पहाशीलच. तिचे बाळंतपण सुखरूपपणे पार पडेल.”
खरोखरच दोन दिवसांनी कोल्हापूरहून पत्र आले. त्यात महाराज येऊन गेल्याचे लिहिले होते व महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचा उल्लेखदेखील केला होता.
सदेह महाराज आमच्या सर्वांसमोर कोल्हापूरला गेले व लगेच आले, आणि सांगितल्याप्रमाणे पत्र येऊन त्यात ती घटना स्पष्टपणे लिहिली होती.
सदेह कुठेतरी दूर जाऊन पुन्हा परत येणे असा योगी आज मिळाला तर खरेच सात जन्मांचे भाग्य समजावे.
कोणत्याही साधकाला योगसाधना ही साध्य करता येऊ शकते. गुरूंचे मार्गदर्शन, गुरूंची कृपा, साधकाचे चिकाटीचे प्रयत्न — असले म्हणजे योगसाधना शिकता येऊ शकते. योगी सिद्ध गुरूं शिवाय हे शक्य नाही.
या विवेचनावरून हेही लक्षात येईल की, सद्गुरु कसे असावेत.