श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

संकल्पनेने दारिद्र्य गेले

गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायात सांगितले आहे की अमरापूरला एक ब्राम्हण वेदाभ्यासक होता. तो आणि त्याची पत्नी दोघे राहत असत. चार घरी कोरान्न भिक्षा मागायची, घरी आणून ती साध्वी कोरान्नाला पक्वान्न करीत असे आणि पूजा, नैवैद्य, वैश्वदेव, अतिथी सत्कार, त्यानंतर भोजन असा नित्यक्रम असे. दोघेही ब्राह्मण सात्विक प्रवृत्तीचे, सत्प्रवृत्त, सदाचारी होते. गुरुंवर नितांत आदर आणि श्रद्धा होती.

एकदा त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना घरी भिक्षेसाठी पाचारण केले. दारच्या वेलाच्या शेंगा तोडून भाजी केली. श्रीगुरूंनी भोजन करून प्रसन्नतेने जातेवेळी वेलाचे मूळ तोडले आणि संगमावर गेले. दुसऱ्या दिवशी वेल वाळला, म्हणून त्या दाम्पत्यांनी तो उपटून टाकला आणि पाहतो तर काय—तिथे सोन्याचा हंडा मिळाला आणि त्यांचे दारिद्र्य संपले. अशा प्रकारे श्रीगुरूंनी कृपा केली.

देवगाव रंगारी येथील व्यंकटनाथ महाराजांकडे घडलेली घटना

देवगाव रंगारीमध्ये व्यंकटनाथ महाराजांच्या घरी असाच काहीसा प्रकार घडला. एक बाई अनेक वर्षे घरकामाला येत असे—घर झाडणे, पुसणे, भांडीकुंडी धुणे, सडासंमार्जन करणे हे कार्य ती नित्य करत असे.

दररोज ती पाहत असे की महाराजांकडे लोक दूरदूरहून येतात, प्रश्न विचारतात, दुःख-कष्ट दूर करून घेतात. तिनेही एक दिवस काम झाल्यावर दूरून नमस्कार करून म्हणाली:

“या जन्मातील माझे दारिद्र्य, दुःख, क्लेश पुढच्या जन्मी नकोत. पुढचा जन्म चांगला जावा. पैशाची चणचण नसावी. एवढेच मागणे आपल्यापाशी मागते.”

महाराज म्हणाले:

“तुला पुढच्या जन्मात सुख पाहिजे का या जन्मात?” ती म्हणाली: “हा जन्म संपूर्ण दारिद्र्यात गेला. आता आणखी काय असणार!”

महाराज म्हणाले:

“मी तुला सोन्याचे दोन हंडे देतो. परंतु तुला पथ्य पाळावे लागेल. जे काही द्रव्य मिळेल त्याचा चौथा हिस्सा देवधर्मासाठी प्रथम खर्च कर. बाकी तू घे. हे पथ्य पाळले नाहीस, तर संपत्ती टिकणार नाही.”

ती मनोमन म्हणाली—इतका पैसा मिळणार असेल तर चौथा हिस्सा देवाला देण्यात काय हरकत आहे—आणि होकार दिला.

मध्यरात्रीचा संकल्प — आणि दोन सोन्याचे हंडे

महाराज म्हणाले:

“तुझ्या घराच्या मागे जो वेल आहे तो मी सांगेल त्या दिवशी रात्री बारा वाजता उपट. थोडा खड्डा कर. बाकी सर्व आपोआप होईल.”

तीने नवऱ्याला सांगितले. दोघांनी गुप्तता राखली.

महाराजांनी सांगितलेल्या दिवशी रात्री बारा वाजता त्यांनी वेल उपटला, खड्डा केला आणि त्यात दोन मोठे सोन्याचे हंडे, दागिन्यांनी भरलेले, सापडले! ते अतीव आनंदित झाले.

घर झोपडीचे, त्यामुळे धन ठेवणे अवघड. म्हणून त्यांनी ते जमिनीत खड्डे करून लपवले आणि संधी साधून औरंगाबादला नेऊन विकायचे असे ठरविले. काही सोने वर ठेवून उरलेले लपविले.

पथ्यभंग — आणि प्रारब्धाचा पलटवार

दररोज साडेपाचला येणारी ती बाई दुसऱ्या दिवशी दहापर्यंत आलीच नाही. शेवटी आली तेव्हा अंग मोडत म्हणाली:

“महाराज, आता माझ्याकडून काम होत नाही. दुसरी बाई ठेवा.”

महाराजांनी विचारले: “कालपर्यंत ठीक होतीस—एकाएकी काय झाले?” पण तिने काहीच सांगितले नाही.

तिने सोन्याचे दागिने विकून खाजगी व्यवहार सुरू केले. देवधर्मासाठी चौथा हिस्सा द्यायची गरज नाही असे तिचे विचार झाले. मोहाने डोळे झाकले. वृत्ती बदलली.

गावातील लोकांना संशय आला. तक्रार पोलिसांकडे गेली. पोलिसांनी झडती घेतली—काहीच मिळाले नाही. दमदाटी केली तरी काही न सांगता राहिली.

शेवटी कडक चौकशीत तिने सर्व सांगितले— सोने कुठे ठेवले, कसे मिळाले, कसे लपविले. पोलिसांनी ते जप्त केले. तिला आणि नवऱ्याला पकडून नेले.

शेवटी तिच्या हाती काहीच लागले नाही.

दैव देते — पण कर्म नेते

गुरुंनी तिला दोन सोन्याचे हंडे दिले. पण पथ्यभंग केल्यामुळे ते सर्व नष्ट झाले.

यातून एक गहन सत्य दिसते:

- धनलाभ हा नशिबाचा भाग असला तरी - तो योग्य मार्गाने वापरला, देवधर्माला दिला, तरच टिकतो - पथ्यभंग, मोह आणि दुराचरण धनाला जाळते

माणसाची चित्तवृत्ती सात्त्विक असेल तर जीवन सुखावह होते. अन्यथा प्रारब्ध आणि प्रवृत्ती मिळून धनाचा नाश अगदी क्षणात करतात.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/माधवनाथ-व्यंकटनाथ/संकल्पनेने-दारिद्र्य-गेले.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)