श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

उद्धव अनंतवार

गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मांड उत्पत्ती व गुरुसेवेचे महत्त्व सांगितले आहे. नामधारक भक्त सद्गुरूंच्या दर्शनासाठी जात असताना अतिश्रम झाले म्हणून एका झाडाखाली झोपला आणि गुरुंनी त्याला स्वप्नात दर्शन दिले. तो नामधारक जागा झाल्यावर अवतीभवती इकडे तिकडे गुरूंचा शोध घेऊ लागला पण ते त्याला दिसले नाहीत आणि त्यांच्या जवळ जाण्याचा त्याच्या जीवनाचा पुढील प्रवास सुरू झाला. असेच काहीसे घडले माझ्या जीवनात.

माझी सद्गुरूंना भेटण्याची कळकळ, माझी व्याकुळता लक्षात घेऊनच की काय सद्गुरूंनी मला त्यांच्या अस्तित्वाचा परिचय करून दिला. सद्गुरूंच्या सामर्थ्याच्या अस्तित्वाचा परिचय मिळताच मी विचाराने पूर्णपणे हादरलो. बुद्धीचे सर्व निकष कुचकामी ठरले आणि मनातून मी पूर्णपणे गोंधळून गेलो.

एक दिवस व्यंकटनाथ महाराजांच्या भेटीची तीव्र उत्सुकता वाढविणारा अनुभव मला आला. त्याचे असे झाले की नित्याची कालक्रमणा सुरू असताना, उद्धव अनंतवार नावाचा एक वर्गमित्र म्हणाला— “अरे, आमचे गुरु महाराज येत आहेत. ते आले की आपण त्यांच्या कडे जाऊ. ते आपल्याला गंधाच्या गोळ्या देतील. त्या घेतल्या की आपण परीक्षेत पास होतो.”

केवळ परीक्षेत पास होणे या विचारांनी आकर्षित झाल्यामुळे ते ज्या वेळी येतील त्या वेळी आपण जाऊ आणि गोळ्या मागू असे ठरविले.

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये हजेरी लावून सर्व मित्र बाहेर पडले. मी मित्राला सांगितले— “तू खोलीवर जा, तासाभरात मी येतो.” मग आपण सायकलवर फिरायला जाऊ.

थोड्या वेळानंतर विनाकारण काय वेळ घालवायचा म्हणून मी मित्राच्या पाठोपाठच त्याच्या खोलीवर गेलो. वेळ दुपारी १२ ते १२.३० ची. दार आतून बंद. मी कडी वाजवली, हाका मारल्या—पण दार उघडेना.

बराच वेळ गेल्यावर उद्धवने दार किंचित उघडून फटीतून बाहेर पाहिले. मी दार जोरात ढकलले आणि खोलीत प्रवेश केला.

आत पाहतो तर—उद्धवचा चेहरा लाल, डोळ्यातून अश्रू. दोन्ही हात त्याने गालावर घट्ट दाबले होते. खोलीची दारे-खिडक्या आतून बंद, खोलीत दुसरे कोणी नाही. जवळ जवळ अंधार.

मी त्याला म्हणालो— “उद्धवा, काय झाले? तू का रडतोस?”

उत्तर काहीच नाही. मी त्याचे हात काढले—त्याच्या गालावर पाच जाडसर बोटांचे उमटलेले ठसे! त्याच्या हाताएवढे अजिबात नव्हते.

मी त्याला उचलून पलंगावर बसविले. थोड्या वेळाने तो बोलू लागला—

“मी खोलीत आलो आणि झोपलो. नेहमी भिंतीकडे डोकं करुन झोपतो, पण आज चुकून पाय भिंतीकडे झाले. त्या भिंतीच्या पलीकडे नाथगुरू महाराजांची गादी आहे. मी झोपताच नाथमहाराज आले आणि म्हणाले— ‘बरा आहे रे बाळा, आजपर्यंत आमच्याकडे डोकं करून झोपत होता, आज पाय करुन झोपला? हा घे प्रसाद.’ असे म्हणून त्यांनी मुस्काटात जोरात मारली… आणि निघून गेले.”

मी चकित. मी विचारले—“म्हणजे बाजूच्या खोलीत ते नाहीत?” तो म्हणाला— “नाही. ते नागपूरातच नाहीत; ते देवगाव रंगारीला आहेत.”

देवगाव–नागपूर अंतर सुमारे ६०० किमी!

तो पुढे म्हणाला— “ते रोजच केव्हा ही येतात. कधी बाईचा, कधी माणसाचा आवाज काढतात. आम्हाला समजते की ते येऊन गेले.”

तो हे सर्व सांगत होता, परंतु मला ह्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. पण—

- गालावर उमटलेले जाड वळ - खोलीत दुसरे कोणी नव्हते - दारे आतून बंद

हे सर्व पाहून माझ्या मनात प्रश्न निर्माण होत होते. इतका मोठा हाताचा ठसा स्वतःच्या बोटांनी उमटविणे अशक्यच होते.

या सगळ्या प्रसंगामुळे नाथमहाराजांविषयीचे माझे कुतूहल वाढत गेले. मी त्यांना केव्हा भेटेन? केव्हा पाहीन?

त्यांच्याबद्दलचे विचार मनात सतत घोळू लागले. आणि माझ्या वैचारिक प्रकृतीत नवीन परिवर्तन सुरू झाले.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/माधवनाथ-व्यंकटनाथ/उद्धव-अनंतवार.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)