किर्तन सेवेतून अद्भूत अनुभूती
गुरुचरित्रा मध्ये गुरुंनी केलेला संवाद, गुरु–शिष्यांचा संवाद आणि सांगितलेले कथानक यावरून एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे शुद्ध प्रांजळ अंतःकरणाने आपण कुठूनही गुरूंशी आपल्या अंतर्मनाने संवाद साधला तर अनाकलनीय गोष्टी घडू शकतात.
मनामध्ये शंका नको, विचारांचे काहूर नको. शांत स्थिर मनाने गुरुंशी मनातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करा — *अघटित गोष्टी घडतील*.
—
अकोल्याला नानासाहेब मेरेकर म्हणून कीर्तनकार होते. अकोल्यातील हरिहरपेठेत एका मंदिरात ते पुजारी होते. ते चांगले कीर्तन करतात म्हणून नरेंन्द्रने त्यांना एकदा विनंती केली की, रामदासपेठेतील दत्तमंदिरात माधवनाथांच्या जन्मसप्ताहाच्या वेळी आठ दिवस महाराजांवर कीर्तन करावे.
त्यावर ते म्हणाले की, *तुम्ही मला माहिती द्या, मी महाराजांच्या मंदिरात किर्तन करीन. तुम्ही एकटे जरी असले, तरी मी महाराजांसमोर चांगले कीर्तन करीन. लोक जमले नाही तर मला त्याचे काही वाईट वाटणार नाही. अशाप्रकारचे कीर्तन मी पहिल्यांदाच करतो आहे. महाराज मला सांभाळून घेतील, हा माझा विश्वास आहे.*
—
कीर्तनाच्या पहिल्या दिवशी पाच–सहा लोकच होते. परंतु दुसऱ्या दिवशीपासून मंदिर तुडुंब भरू लागले. कीर्तनाचा कार्यक्रम फारच चांगला झाला.
माधवनाथ महाराजांसमोर आपण हजेरी लावली आणि महाराजांची आपल्यावर चांगली कृपा झाली असे त्यांना वाटू लागले.
—
नरेंद्राने त्यांना विचारले की, माधवनाथ महाराजांचे उत्तराधिकारी व्यंकटनाथ महाराज देवगाव रंगारी येथे पंथकार्य करतात, तिथे तुम्ही कीर्तन करायला याल का?
ते म्हणाले, *माझी प्रकृती चांगली असली तर मी येऊ शकतो; अडचण आली तर येऊ शकणार नाही.*
—
बराच काळ लोटला. एकदा नरेंद्र बाहेरगावाहून अकोल्याला येत असताना बस हरिहर मंदिरासमोर थांबली. त्या इमारतीकडे पाहताच नरेंद्राला असे प्रकर्षाने जाणवले की नानासाहेबांची प्रकृती खालावली असून त्यांना जगणे कठीण आहे.
नरेंद्र त्यांच्या भेटीस गेला.
ते म्हणाले: “यावेळेला तुम्ही कसे आलात? काय विषय आहे?”
नरेंद्र म्हणाला: “मी असे दृश्य पाहिले की तुम्ही हा देह सोडून चालले. देवगावला व्यंकटनाथ महाराजांसमोर कीर्तनाची हजेरी द्यायची आहे — ती चुकू नये म्हणून आलो.”
—
नानासाहेब म्हणाले:
*एरवी या वातावरणात माझी प्रकृती खूप बिघडते. पण तुमच्या संपर्कात आल्यापासून आणि माधवनाथांचे कीर्तन केल्यापासून माझी प्रकृती दिवसेंदिवस चांगली होत आहे. कोणताही त्रास नाही; वार्धक्याचा त्रासही नाही. हा अनुभव मी घेत आहे.*
नरेंद्र म्हणाला: “मी उद्या येतो आणि तुम्हाला विभूती देतो. ती जवळ ठेवा म्हणजे काही त्रास होणार नाही.”
—
पण नरेंद्र काही अडचणीमुळे चार दिवस जाऊ शकला नाही.
चार दिवसांनी गेला तर पाहतो तर काय — नानासाहेब अंथरुणावर.
घरातील लोक चिंतित.
नानासाहेब म्हणाले:
*तुम्ही गेल्यानंतर त्याच दिवशी अचानक दम्याचा त्रास सुरू झाला. श्वास वर गेला आणि खाली येत नव्हता. डॉक्टर म्हणाले — “अर्धा तासाच आयुष्य आहे.” अखेरची घरघर सुरू झाली.*
या अवस्थेत त्यांनी आतून प्रार्थना केली:
“मी बापूसाहेब चौधरींना शब्द दिला आहे की देवगावला महाराजांपुढे कीर्तन करेन. माझी ही सेवा महाराजांनी स्वीकारावी आणि मला तेवढी संधी द्यावी.”
इतके मनात येताच श्वास नियमित झाला. त्यांना खात्री वाटली की ते बरे झाले आहेत.
—
देवगावला व्यंकटनाथ महाराजांच्या वार्षिकोत्सवाला नरेंद्र त्यांना घेऊन गेला.
कीर्तनाची विनंती केली.
महाराज म्हणाले: “बाळ, तुला तीन दिवस कीर्तन करावे लागणार आहे. तीन दिवस येथे हजेरी दे.”
—
नानासाहेब म्हणाले:
*महाराज, माझी मोठी बहीण सीरियस आहे. हॉस्पिटलमध्ये आहे. डॉक्टर म्हणाले — कोणत्याही क्षणी प्राण जातील. माझ्याशिवाय करणारे कोणीच नाही.*
महाराज म्हणाले:
“अरे, तू तीन दिवस हजेरी दे. बाकी आम्ही पाहतो.”
पण नानासाहेब समाधान पावत नव्हते. ते म्हणाले:
*मी निघालो तेव्हा डॉक्टर म्हणाले — फक्त एखादा दिवस काढेल. त्यामुळे मला जाणे भाग आहे.*
—
महाराज म्हणाले:
“अरे, तू पंधरा दिवस जरी थांबला तरी काळजी करू नकोस. तिची व्यवस्था आम्ही करतो.”
त्यांना काही बोलणे योग्य वाटले नाही. शेवटी जड मनाने त्यांनी तीन दिवस कीर्तन मान्य केले.
—
तीन दिवस नानासाहेबांनी अतिशय प्रभावी कीर्तन केले. सर्व लोक भारावून गेले.
—
तीन दिवसांनंतर महाराज म्हणाले:
“इच्छा असेल तर अजून राहा.”
नानासाहेब म्हणाले:
*महाराज, मला जावेच लागेल. बहिणीला माझ्याशिवाय कोणी नाही. माझे लक्षही लागणार नाही. कृपा करून परवानगी द्या.*
महाराजांनी परवानगी दिली.
—
अकोल्यात पोहोचल्यावर बातमी मिळाली — बहीण सुधारत आहे.
देवगावला गेल्यापासूनच तिचा त्रास कमी झाला होता.
१५ दिवस तसेच गेले.
पंधराव्या दिवशी अचानक प्रकृती ढासळली आणि तिने प्राण सोडले.
नानासाहेबांच्या लक्षात आले:
“महाराजांनी पंधरा दिवसांचा उल्लेख केला होता — ते आपल्या लक्षात आले नाही.”
—
अशा प्रकारे:
- नानासाहेबांनी माधवनाथ मंदिरात मूर्तीसमोर कीर्तन केले, - त्यांची प्रकृती सुधारली, - मृत्यूच्या उंबरठ्यावर असताना अंतःप्रार्थनेने ते पुन्हा सावरले, - देवगावला हजेरी दिली, - आणि व्यंकटनाथ महाराजांनी दिलेली वेळ — *अचूक* घडून आली.
गुरु सदैव कृपा करायला सिद्ध असतात. साधकाने त्यांच्या ऊर्जेत राहणे हेच त्याचे साधन आहे.