जीवनांत बदल घडविणारा अनुभव
प्रत्येक माणूस हा विशिष्ट धोरणांनी, विशिष्ट विचार प्रणालीने आणि विशिष्ट तत्त्वांनीच वावरत असतो. तीच त्याची जीवनशैली. तेच त्याचे जीवन वैशिष्ट्य. जीवनात तो नेहमी आपल्याच विचारांच्या दिशेने प्रवास करीत असतो. तेच त्याचे जीवन चारित्र्य. त्या त्याच्या मूळ विचारांमध्ये सहजा सहजी परिवर्तन होत नाही. तोच त्याच्या पिंडाचा गुणधर्म. जीवनांत घडणार्या गोष्टींचे आत्म्यावर संस्कार होत असतात आणि होता होता, अनेक जन्मांनंतर पिंडाच्या संस्कारात बदल घडायला लागतो.
विचारांच्या ह्या परिवर्तनात बदल होण्यासाठी परमेश्वरी योजना असावी लागते. गुरूंच्या हस्तक्षेपा शिवाय हे शक्य होत नाही. गुरूच केवळ बदल करू शकतात. म्हणतात ना, *गुरूशिवाय ज्ञान नाही, गुरूशिवाय तरणोपाय नाही, गुरूशिवाय आत्मोन्नती नाही.*
माझ्या जीवनाला कलाटणी मिळण्यासाठी, माझ्या व्यक्ति-विशेषांत फरक पडण्यासाठी, माझ्या त्या वेळच्या विचारांना सुरूंग लावण्यासाठी, माझा उद्धार होण्यासाठीच कदाचित गुरू महाराजांची भेट ठरलेली होती. ज्यांची मला भेट होणार होती ते नाथपंथी होते—त्यांचे गुरू चैतन्य श्री माधवनाथ महाराज—अशी थोर विभूती.
मनाच्या कल्पना व वस्तुस्थिती ह्यात खूप अंतर होते. व्यवहारातील सतत वागणे, विचार, सभोवतालची परिस्थिती—ह्यातही मोठे अंतर होते. चालू जीवन हे वस्तुस्थितीभोवती होते. त्यामुळे भावनांना कोणतीही चालना नव्हती. माझे मन आणि विचार हे सद्य परिस्थितीनुसारच असणारे—याचाच माझ्या जीवनावर प्रचंड पगडा होता.
त्यामुळे, परीक्षेत पास होणे हेच एकमेव उद्दिष्ट होते. त्यासाठी मला गंधाच्या गोळ्या मिळाल्या तर आपण विनासायास पास होऊ—हे आकर्षण! आणि म्हणूनच कळत-नकळत मी महाराजांकडे आंतून ओढला गेलो आणि त्यांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत होतो.
खरं तर, मी विचारांनी पूर्ण गोंधळून गेलो होतो.
महाराज केव्हा येतील? मी केव्हा त्यांची भेट घेईन? त्या भेटीतून माझ्या जीवनाच्या भवितव्याचा अंदाज मला केव्हा मिळेल?
हे विचार माझ्या मनात सतत घोळत होते.
जीवनाची आत्तापर्यंतची तळमळ लक्षात घेऊन आता आपल्या जीवनाला मार्गदर्शन मिळणार ही आशा मनात निर्माण झाली. सद्गुरू संस्था अस्तित्वात आहे, ती माझ्या मनाची दखल घेत आहे, माझा ठाव घेत आहे, असे मला वाटू लागले.
खरं तर अजून सद्गुरूंचे दर्शन झालेही नव्हते. परंतु मनामध्ये, विचारांमध्ये, प्रकृतीमध्ये आणि चेतनेमध्ये प्रचंड बदल होत असल्याचे मी अनुभवत होतो.
काय प्रचंड सामर्थ्य असेल त्या सद्गुरूंचे!